भावनांच्या जरीकाठाचे युद्धानुभव 

अजेय लेले (सामरिक तज्ज्ञ) 
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

पुस्तक परिचय
विंग कमांडर धीरेंद्र सिंह जफा (निवृत्त) यांनी लिहिलेल्या या पुस्तकाचा अनुवाद वर्षा गजेंद्रगडकर यांनी अतिशय रसाळ आणि प्रवाही भाषेत केला आहे. उत्तम निर्मितीमूल्ये असणारं हे पुस्तक मराठी वाचकांच्या जाणिवा निश्‍चितच समृद्ध करेल.

सामरिक शास्त्राच्या कोणत्याही विद्यार्थ्याला युद्धेतिहास, युद्धनीती आणि युद्धकथा असं वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य वाचावे लागतं. सर्वसाधारणपणे वाचक या साहित्याचे दोन विभाग करतो- वाचनीय साहित्य आणि वाचलं नाही तरी चालेल असं साहित्य! शिवाय काही पुस्तकं आवर्जून वाचायलाच हवीत, अशा प्रकारात मोडतात आणि ‘डेथ वॉज नॉट पेनफुल‘ हे या शेवटच्या प्रकारात मोडणारे पुस्तक आहे. या पुस्तकाचं सर्वांत मोठं सामर्थ्य म्हणजे हे पुस्तक अनुवादित आहे, अशी जाणीव पुस्तक वाचताना कुठेच होत नाही. अतिशय सहजसुंदर भाषेतला हा अनुवाद वाचकाला खिळवून ठेवणारा आहे.

बांगलादेशाच्या मुक्तीसाठी १९७१ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या युद्धात सहभागी असणाऱ्या एका फायटर पायलटने आपले अनुभव या पुस्तकात शब्दबद्ध केले आहेत. युद्धकैदी म्हणून पाकिस्तानच्या तुरुंगात एक वर्ष राहिलेल्या धीरेंद्र सिंह जफा यांनी लिहिलेल्या मूळ इंग्रजी पुस्तकाचा हा मराठी अनुवाद वर्षा गजेंद्रगडकर यांनी केला आहे. अर्थात ७१ च्या युद्धातले एका वैमानिकाचे अनुभव असं या पुस्तकाचं स्वरूप असलं तरी हे केवळ कालक्रमानुसार केलेलं घटनांचं वर्णन नाही. युद्धाशी निगडित असलेल्या या सगळ्या अनुभवांना मानवी भावनांचा एक गडद पदर आहे. मातृभूमीच्या रक्षणासाठी जेव्हा जेव्हा हाक येते, तेव्हा आत्मसमर्पणाच्या तयारीने युद्धभूमीवर उतरणाऱ्या निधड्या छातीच्या शूरवीरांच्या विलक्षण आयुष्याचं दर्शन घडविणारे हे पुस्तक आहे. शिवाय द्वेष, कडवटपणा म्हणजे नेमकं काय, त्याचं खरं मूळ कोणतं, याविषयी जफा यांच्या मनात चाललेलं द्वंदही या पुस्तकात अधोरेखित झालं आहे. युद्धाच्या भयानक वास्तवाला कोणताही सैनिक जेव्हा जेव्हा सामोरा जातो, तेव्हा त्याच्या मनात उठणारे तरंगही या पुस्तकात चित्रित झाले आहेत.

एका युद्धकैद्यानं स्वतः शब्दबद्ध केलेले अनुभव ही या पुस्तकाची जमेची बाजू आहे. पण यापेक्षाही महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे मृत्यू, तुटलेपण, एकाकीपणा आणि खंत या भावनांची वैमानिकांच्या मनातली आंदोलनं या पुस्तकाने फार स्पष्टपणे वाचकांसमोर ठेवली आहेत. पाकिस्तानने पकडलेल्या युद्धकैद्यांच्या चौकशी समितीचे लोक, तुरुंगाधिकारी, तुरुंगातले इतर कर्मचारी आणि पाकिस्तानी नागरिक यांच्याशी झालेल्या चर्चा, गप्पा यांचं पारदर्शी वर्णन लेखकाने केलं आहे. त्याचा संदेश सूक्ष्म असला तरी स्वच्छ आहे- युद्ध म्हणजे भौगोलिक सीमांच्या विरुद्ध बाजूला असणाऱ्या सैनिकांचा अमानुषपणा नव्हे; युद्ध म्हणजे संकल्पनांमधला संघर्ष असतो.

बांगलादेश मुक्तियुद्धात सहभागी झालेल्या फायटर पायलट्‌सचा अफाट निर्धार व्यक्त करणारं हे पुस्तक म्हणजे केवळ युद्धकथा नाही; युद्धाच्या यथार्थतेविषयीच ते प्रश्न उपस्थित करतं. जेव्हा एखादा सैनिक युद्ध निरर्थक असल्याचं सांगतो, तेव्हा प्रत्येक माणसानं त्याकडे गांभीर्यानं पाहायला हवं. पाकिस्तान आणि भारत यांच्यातल्या संबंधांवर सतत तावातावानं चर्चा होत असताना हे अनुवादित पुस्तक वाचकांसमोर यावं, ही अतिशय उचित बाब म्हणायला हवी.

हे पुस्तक म्हणजे कुण्या एका वैमानिकाचे कहाणी नव्हे. शत्रूच्या तावडीत सापडलेल्या  फायटर पायलट्‌सच्या शौर्याच्या आणि घराविषयीची, कुटुंबाविषयीची त्यांच्या मनातली ओढ स्पष्ट करणाऱ्या या कथा आहेत. एका बाजूने अनिश्‍चित भविष्य आणि मनावर सतत फिरणारी मृत्यूची तलवार यामुळे एका विचित्र कोषात जाणारे सैनिक आणि दुसऱ्या बाजूने आपली सुरक्षित सुटका करण्यासाठी आपला देश नक्की प्रयत्न करेल याची खात्री असणारे सैनिक इथे आपल्याला भेटतात.

विंग कमांडर धीरेंद्र सिंह जफा (निवृत्त) यांनी लिहिलेल्या या पुस्तकाचा अनुवाद वर्षा गजेंद्रगडकर यांनी अतिशय रसाळ आणि प्रवाही भाषेत केला आहे. उत्तम निर्मितीमूल्ये असणारं हे पुस्तक मराठी वाचकांच्या जाणिवा निश्‍चितच समृद्ध करेल.

डेथ वॉज नॉट पेनफुल

  •  लेखक  ः धीरेंद्र सिंह जफा
  •  अनुवाद : वर्षा गजेंद्रगडकर
  •  प्रकाशक  ः अभिजित प्रकाशन, पुणे 
  •  किंमत  ः ३०० रुपये.
  •  पाने  ः  २८८

संबंधित बातम्या