आपापल्या बेटांवरची माणसं!

अमृता देसर्डा
सोमवार, 9 मे 2022

पुस्तक परिचय
 

कॅलिफोर्नियातील समुपदेशक आणि माणसांचे आहे तसे निरीक्षण करून ते कथेच्या माध्यमातून सांगणाऱ्या माधवी सुदर्शन यांचा ‘आपली आपली बेटं’ हा कथासंग्रह माणसाच्या मनोविश्वाचा, मनोव्यापाराचा वेध घेतो. माणसाच्या आत चाललेला कोलाहल समजून घेत माधवी सुदर्शन तो कोलाहल कथांमधून मांडायचा प्रयत्न करतात.

आजच्या काळातल्या मानवी नात्यांचा, त्यातल्या गुंत्याचा आणि तो गुंता सुटावा म्हणून करण्यात येणाऱ्या धडपडीचा शोध कथाकार माधवी सुदर्शन ‘आपली आपली बेटं’ या त्यांच्या कथासंग्रहातून घेतात. हा शोध त्यांना माणसाच्या स्वभावाच्या अनेक कंगोऱ्यांपर्यंत पोचवतो. वाचताना कधी तो शोध स्वतःचा वाटतो, तर कधी तो आपल्या आजूबाजूच्या माणसांमध्येच आहे असेही वाटू शकेल. त्या शोधांच्या या कथा म्हणजे मानवी स्वभावाच्या अनेक कंगोऱ्यांचे दर्शन!  

आपण स्वतःच्या भाव-भावना रोजच्या जगण्याच्या धबडग्यात इतक्या दाबत राहतो, की स्वतःशी असलेला मनमोकळा संवाद कधी हरवून बसतो हेच आपल्याला समजत नाही. जेव्हा माणूस आपल्याच घरात दडपणात जगत राहतो, तेव्हा त्याची झालेली अवस्था ‘उकडलेला बेडूक’ या रूपक कथेत त्या अतिशय उत्तमरीत्या अधोरेखित करतात. 

उमलत्या वयात येणारा एकटेपणा, नात्यांमधून झालेला अपेक्षाभंग, रिकामटेकडेपणा या आजच्या पिढीच्या समस्या लेखिका त्यांच्या कथांमधून मांडू पाहतात. प्रेमभंग झालेली निशा स्वतःला शिक्षा द्यायची म्हणून आत्मक्लेशाचा जो मार्ग वापरू पाहते, त्यातून आजच्या पिढीच्या विचारांची घालमेल दिसून येते. त्यांना आयुष्य सुंदर वाटायला हवे, ते मौल्यवान आहे, याची जाणीव व्हायला हवी हेच माधवी सुदर्शन त्यांच्या ‘वर्तुळ’ या कथेतून सांगू पाहतात. 

भौतिक सुखापलीकडे असलेले आयुष्य नेमके काय असते आणि एकाच घरात राहणाऱ्या पण एकमेकांकडे बिलकुल न पाहता, आत्मकेंद्री जगत राहणाऱ्या कुटुंबाची एक साधीशी गोष्ट ‘आपली आपली बेटं’ या कथेत लेखिकेने अगदी चपखल आणि मार्मिक मांडली आहे. सुखाच्या नादात आणि शोधात आपण आपल्या हातातल्या साध्या गोष्टी कशा गमावून बसतो हे सांगायचा प्रयत्न त्यांनी या कथेतून केला आहे. 

माणसांचे स्वभाव हे प्रत्येक वेळी आदर्श असतीलच असे नाही. बऱ्याचदा अनेक गोष्टी एकमेकांशी जुळत नसूनही आपण त्या प्रयत्नपूर्वक जुळवून घ्यायचा प्रयत्न करतो. पण इतक्या तडजोडी करूनही समोरचा माणूस काही स्वतःचा स्वभाव बदलायला तयार होत नाही. तर अशी माणसे आयुष्यात आल्यावर काय होते हे जाणून घेण्यासाठी ‘कुत्र्याचं शेपूट’ ही कथा लेखिका त्यांच्या सहज शैलीत मांडतात. 

शहरात राहणारा माणूस दिवसेंदिवस एकलकोंडा होत चालला आहे. त्यात स्वतःच्या व्यग्रतेतून बाहेर पडण्यासाठी, स्वतःचा रिकामपणा, साचलेपणा कमी होण्यासाठी तो काय धडपड करत असतो हे ‘पाळीव मालक’ या कथेतून लेखिकेने अतिशय उत्तमरीत्या मांडले आहे. त्याचबरोबर त्या धडपडीतून निर्माण होणारी उबगही त्यांनी वेगळ्या भाषेत मांडली आहे. 

जगण्यातला विरोधाभास ठळकपणे काही कथांमध्ये दिसून येतो; विशेषतः ‘गुलाब आणि बाभळी’ या कथेत तो जाणवतो. लहान मुलांच्या वाट्याला आलेले बालपण हे केवळ तुलना केली तर समजणार नाही, किंवा नुसतीच तुलना करून त्यातून काही साध्य होणार नाही हेही लेखिका अगदी सहजपणे सांगतात. 

काळाला जसा वेग आहे, तसा माणसांच्या जगण्याला एक वेग आहे. तो वेग काहीजण आत्मसात करतात, तर काहीजण त्यात अडकून स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतात. आणि जर जगण्यातला उपरेपणा वाट्याला आला, तर गोष्टी आणखीनच बिघडत जातात. एका मूर्ख, बेपर्वा भुरट्या चोराची रंजक गोष्ट लेखिकेने खूप ताकदीने या कथासंग्रहात मांडल आहे.

‘मी, ती आणि तो’ या दीर्घकथेत घडणाऱ्या नाट्यमय घडामोडी स्त्री-पुरुष नातेसंबंधांच्या पार्श्वभूमीवर अतिशय दमदारपणे मांडल्या आहेत. माणूस जगात कुठेही राहिला, कितीही शिकला, कितीही प्रतिष्ठा कमावली तरीही त्याची वृत्ती जर चांगली नसेल, तर त्याचा शेवट कसा होतो हे या कथेतून मांडायचा प्रयत्न लेखिकेने चांगल्या पद्धतीने केला आहे.  

एकूण दहा कथा असलेला हा संग्रह वाचकांच्या मनात विविध प्रश्न उभे करतो. जे प्रश्न खूप आधीपासूनच अनुत्तरित आहेत आणि आजही त्यांची आदर्श उत्तरे सापडलेली नाहीत, त्या प्रश्नांना लेखिका कथेच्या माध्यमातून वाचा फोडू पाहतात. आजच्या काळातल्या ज्या समस्या आहे त्यावर हा कथासंग्रह बोट ठेवतो. 

लेखिकेने नोंदविलेल्या अनेक गोष्टी या वैश्विक आहेत. स्थळ, काळ यांचा संबंध जरी असला तरीही त्या सगळीकडे लागू होतील अशा आहेत, हे या कथा संग्रहाचे वैशिष्ट्य आहे. जगण्याच्या धबडग्यात माणूस स्वतःला आणि त्याच्या माणसांना गृहीत धरत जातो. स्वतःच्या एका कोशात बसून राहतो. त्या कोशात त्याची संवेदनशीलता बोथट कधी होते हे समजत नाही. या कोशाच्या बेटात आजच्या काळातला माणूस इतका मश्गुल होतो, की आजूबाजूच्या जगण्याचा आस्वाद घ्यायचा राहून जातो. तो आस्वाद घेण्याची आठवण माधवी सुदर्शन त्यांच्या कथांमधून वाचकांना करू देतात.

 मानवी नात्यांतले संघर्ष, अपेक्षा आणि त्यात होणारे चढ-उतार हे रोजच्या जगण्याचा एक अविभाज्य भाग आहेत. मग खरेपणा, साधेपणा, आपलेपणा, सरलता, माणुसकी या मूल्यांची तडजोड करत आयुष्य जगायचे, की आपल्या आपल्या बेटांवर राहूनही या मूल्यांची जोपासना करत आयुष्य जगायचे, हा मूलभूत प्रश्न लेखिका आपल्या या कथासंग्रहातून वाचकांसमोर, त्यांच्या स्वतःला आलेल्या व्यावसायिक आणि वैयक्तिक अनुभवांतून अतिशय सोप्या शैलीत आणि वाचनीय पद्धतीने मांडतात यात शंका नाही.

संबंधित बातम्या