मानसिक आरोग्याची ‘मनमोकळी’ गुरुकिल्ली! 

अमृता देसर्डा 
सोमवार, 6 जून 2022

आयुष्यात आपण जे अनुभवतो त्यातून काहीतरी घेत असतो आणि पुढे जातो. पण ते घेत असताना आपण नेमके स्वतःकडे आणि त्या अनुभवांकडे कसे पाहतो? त्यातून आपल्याला जे मिळते किंवा जे गवसते त्याकडे स्व-जागरुकतेने पाहण्यासाठी आवर्जून वाचावे आणि संग्रही ठेवावे असे पुस्तक म्हणजे सुप्रिया पुजारी यांचे ‘मनमोकळं’ हे पुस्तक. 

आपण बोलू शकतो ही किती महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्याला नेमके काय वाटते, आपल्या मनात नेमक्या भावना कुठल्या आहेत, आणि त्या भावना नेमक्या शब्दांत आपण कशा मांडतो, या गोष्टींवर आपली प्रतिमा आणि आकलन अवलंबून असते. काहीजण त्याबाबतीत खूप स्पष्ट असतात, तर काहीजण मितभाषी. संवाद आणि सोबत या माणसाच्या अन्न, वस्त्र आणि निवारा यांबरोबरच दोन महत्त्वाच्या मूलभूत गरजा आहेत. इतर गोष्टी तर महत्त्वाच्या आहेतच, पण ‘संवाद साधणे’ हा मानवी जगण्यातला एक अविभाज्य भाग आहे. जर तो संवाद तणावमुक्त असेल, मनमोकळा असेल तर सगळ्या गोष्टी किती सुरळीत होऊ शकतात, त्यातून आपल्या आयुष्याचे संतुलन किती सहज होऊ शकते हे ‘सकाळ प्रकाशना’ने प्रकाशित केलेल्या सुप्रिया पुजारी लिखित ‘मनमोकळं’ या पुस्तकातून वाचकांना निश्चितच समजेल.

 लेखिका, समुपदेशक आणि लाईफ कोच सुप्रिया पुजारी यांनी या पुस्तकातून अतिशय वाचनीय शैलीत सोपेपणाने आणि साध्या भाषेत वाचकांना मार्गदर्शन केले आहे. स्वतःला आपण नेहमी प्रश्न विचारत असतो. कधी ते प्रश्न सकारात्मक असतात, तर कधी नकारात्मक. स्वतःला नेमके प्रश्न कसे विचारायचे, त्यासाठी स्वतःला कसे तयार करायचे, याची मांडणी लेखिकेने अतिशय सहजपणे केली आहे. 

मानसिक आरोग्याबद्दल हल्ली आपल्या मनात अनेक समज-गैरसमज असतात. तर त्याच्या दोन्ही बाजू लेखिकेने अनेक उदाहरणे देऊन मांडल्या आहेत. या पुस्तकातील सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे माणसाची ‘भावनिक गरज’. भावनिक गरज म्हणजे काय? याबाबतीत आपण बऱ्याचदा नकळत काणाडोळा करतो. किंबहुना, आपल्याला नेमकी भावनिक गरज काय आहे हे माहीत नसते. भावनिक गरज आणि भावनिक गुलामगिरी या दोन्ही गोष्टींमधला फरक लेखिका खूप छान पद्धतीने या पुस्तकातून मांडतात. त्याबाबतीत असणारे गैरसमज आणि त्याची वस्तुस्थितीदेखील त्या स्पष्ट करतात. 

केवळ शरीराने तंदुरुस्त राहून चालणार नाही, तर आपले मानसिक आरोग्यही तितकेच महत्त्वाचे आहे. आपण रोज जे वागतो, जे बोलतो, जे अनुभवतो त्याचा परिणाम हळूहळू नकळतपणे आपल्या मानसिकतेवर होत असतो. जर आपण त्या परिणामांकडे योग्य तितका वेळ देऊन पाहिले नाही तर काय होईल? आणि त्याकडे नेमकेपणाने कसे लक्ष द्यायला हवे, हे सुप्रिया पुजारी एक लाईफ कोच म्हणून ‘मनमोकळं’मध्ये मांडतात. 

माणूस स्वप्ने पाहत असतो आणि त्यानुसार स्वतःच्या आयुष्याचे ध्येय ठरवत असतो. कधी ती स्वप्ने सत्यात उतरतात; तर बहुतांशवेळा ती स्वप्ने तशीच स्वप्नात राहतात, त्यांचे प्रत्यक्षात रूपांतर होत नाही. अशा वेळी स्वतःचे नेमके ध्येय कसे ठरवावे, ते ठरवताना नेमक्या कुठल्या गोष्टी आचरणात आणाव्यात, या बाबतीत अगदी ‘ए टू झेड’ मार्गदर्शन लाईफ कोच म्हणून काम करण्याचा अनुभव असल्यामुळे लेखिका वाचकांना अगदी सहजपणे करतात. 

यशस्वी व्हायचे असेल तर स्वतःला चांगल्या सवयी लावून घेऊन त्यावर सातत्याने काम करून स्वतःला सकारात्मकरीत्या बदलून घ्यायला हवे. त्यासाठी कुठल्या चांगल्या सवयी लावून घ्यायला हव्यात, स्वतःत त्या सवयी मुरवण्यासाठी काय करायला हवे, हे सोपी उदाहरणे देऊन या पुस्तकात सांगितले आहे. 

या पुस्तकातील सगळ्यात महत्त्वाचा आणि अतिशय सविस्तरपणे सांगितलेला विषय म्हणजे ‘स्व-जागरूकता’ आणि ‘स्व-परिवर्तन’. एखादी गोष्ट आपल्यात नसेल, तर त्याची जाणीव आपल्याला आहे का? आणि जर एखादी गोष्ट आपल्यात आहे, पण त्या गोष्टीचे भानच जर आपल्याला नसेल तर काय होईल? स्वतःचा स्वीकार, स्वतःबद्दल असलेले भान जागृत ठेवणे आणि त्यातून स्वतःत योग्य ते परिवर्तन करून आणणे किती महत्त्वाचे आहे, हे पुस्तक वाचून नक्कीच समजते. आपल्या मनात येणारे असंख्य विचार आणि त्यातून निर्माण होणारे गोंधळ बाजूला सारून, योग्य तो मार्ग काढून स्वतःकडे निकोप नजरेने बघून पुढे कसे जायचे याचा एक अनोखा मार्ग लेखिका आपल्या बोलक्या शैलीतून मांडतात. 

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपण जेव्हा मागे वळून बघतो, तेव्हा आपण पुढे जातोय की तिथेच थांबतोय हे बघून आपल्या प्रगतीचा मार्ग योग्य आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी काही सल्लेही या पुस्तकात आहेत, त्याचा उपयोग वाचणाऱ्याला पावलापावलावर होईल, यात शंका नाही. माणसाचे मन कमकुवत असेल, ते नकारात्मकतेकडे झुकणारे असेल, आणि त्या मनाला कणखर आणि सकारात्मक करायचे असेल तर विचारातला, बोलण्यातला आणि वागण्यातला  मनमोकळेपणा खूप महत्त्वाचा असतो. तो मोकळेपणा येण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स या पुस्तकात दिल्या आहेत. आपली मानसिक रोगप्रतिकारशक्ती कशी वाढवायची आणि त्यातून आपल्या रोजच्या जगण्यात येणाऱ्या आव्हानांना तोंड देऊन उभे राहण्याचा नवमंत्र या पुस्तकातून आपल्याला नक्की मिळेल यात शंका नाही. 

पुस्तकाचे कुठलेही पान उलगडले तरी स्वतंत्रपणे ते वाचून त्यातले विचार आपल्या रोजच्या जगण्यात अगदी सहजपणे अंगीकारता येतील हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. मुद्देसूद मांडणी, योग्य त्या चौकटी, काही गोष्टीरूप उदाहरणे, आणि पुस्तकाच्या शेवटी अधोरेखित केलेला सारांश यामुळे हे पुस्तक केवळ वाचनीयच होत नाही, तर मानसिक आरोग्याची गुरुकिल्लीच त्यातून मिळते. 

मनमोकळं 
लेखक ः सुप्रिया पुजारी 
प्रकाशन ः सकाळ प्रकाशन, पुणे 
किंमत ः ₹    १७०
पाने ः १२८

संबंधित बातम्या