प्रश्‍नांना भिडणारा लेखसंग्रह

अमृता देसर्डा
गुरुवार, 4 ऑक्टोबर 2018

पुस्तक परिचय
उजेड आणि सावल्या
 लेखक ः वर्षा गजेंद्रगडकर
 प्रकाशक : अभिजित प्रकाशन, पुणे.
 किंमत ः १५० रुपये.
 पाने : १३६ 

पुस्तक परिचय
उजेड आणि सावल्या
 लेखक ः वर्षा गजेंद्रगडकर
 प्रकाशक : अभिजित प्रकाशन, पुणे.
 किंमत ः १५० रुपये.
 पाने : १३६ 

वर्षा गजेंद्रगडकर यांच्या ललित लेखांचा संग्रह म्हणजे शब्दांचा उजेड आणि सावल्यांचा खेळच जणू. शब्दांच्या जगात मुक्तपणे वावरून रोजच्या जगण्यातल्या असंख्य प्रश्नांचा आणि त्यांच्या उत्तरांचा पाठपुरावा करण्याचा उत्तम प्रयत्न लेखिकेने या ललित लेख संग्रहात केला आहे. घडून गेलेल्या बातमीचे चिंतन असो, किंवा काळाच्या आड लपून जाणारी एखादी गोष्ट असो, त्यातून विचारांचा प्रवाह वाहता ठेवलेला आहे. आधुनिक जगात राहणारी माणसे आणि जंगलात राहणाऱ्या आदिवासी माणसांचा संघर्ष हा किती टोकाचा आहे. आपण आधुनिक म्हणून घेणारी सुसंस्कृत माणसे निसर्ग ओरबाडून घेत आहोत आणि आदिवासींचे जगणे कसे विस्कटून टाकत आहोत याचे सखोल चिंतन लेखिका एक आदिम सहप्रवासी म्हणून करत आहेत.
‘सत्त्व हरवलं, फोलपट उरलं’ या लेखातून माणसाच्या संवेदनशीलता कशा बोथट झाल्या आहेत, दुसऱ्यांना मदत करण्याची इच्छा बाळगणे किंवा दारात काढल्या जाणाऱ्या रांगोळीमागचा अर्थ यांसारख्या छोट्या आणि सरळ गोष्टींचे भान न ठेवता कृत्रिम जगणे वाढत चालले आहे याची जाणीव हा लेखसंग्रह वाचताना होते.
कुठलीही प्रथा, परंपरा कधीही विनाकारण समाजात निर्माण होत नाही, त्याच्यामागे काहीतरी कारण असते, ते कारण शोधून जर डोळसपणे वागता आले, आजच्या पिढीच्या चौकटीत जर ते बसवता आले, तर अनेक प्रश्नांची उत्तरे आपोआप मिळतील आणि त्यातून जगण्यातली फोलपटं बाजूला जातील आणि सत्त्व तेवढं राहील अशी अपेक्षा या पुस्तकातून प्रतिबिंबित होते.
पत्र लिहिणे ही हल्ली दुर्मिळ झालेली गोष्ट. तरीही पंडित नेहरू, लोकमान्य टिळक, सेनापती बापट, गुलजार यांसारख्या मोठ्या माणसांनी त्यांच्या मुलांना लिहिलेली पत्रे किती प्रेरणादायी आणि मुलांच्या निरोगी वाढीसाठी किती महत्त्वाची असतात हे लेखिका अगदी प्रांजळपणे मांडतात. जाणत्या पालकांनी आपल्या पाल्याच्या वाढीसाठी त्यांच्यावर पत्रसंस्कार नकळत करणे किती गरजेचे आहे त्यातून जाणवत राहते.
शहरी माणूस आणि ग्रामीण भागातला माणूस यांच्यात किती अंतर आहे. खेड्यांमधला माणूस आजही हलाखीच्या परिस्थितीत जगत आहे. विकासाची प्रेरणा जर अंतरी जागी ठेवली, तर उजाडायला वेळ लागणार नाही अशी आशा त्यांच्या लेखांतून पाझरत राहते. प्रत्येक माणूस त्याच्या आजूबाजूला भिंती करतो. भेदांच्या आणि आत्मकेंद्राच्या कुंपणात स्वतःला थोड्याफार प्रमाणात अडकून ठेवतो. माणसे कुठल्याही देशातली असोत, कुठल्याही धर्माची, जातीची असोत, या भिंती आणि कुंपणामुळे त्यांना द्वेष, हिंसा, असुरक्षितता यांना सामोरे जावे लागते. हे एक माणूस म्हणून आपले दुर्दैव आहे अशी खंतदेखील लेखिका व्यक्त करतात.
लेखांचा हा लेखसंग्रह जगण्यातल्या अनेक प्रश्नांना अगदी सहजपणे मांडायचा प्रयत्न करतो, लेखिका त्या प्रश्नांना जाऊन थेट भिडते आणि उत्तरे देखील देते. हे पुस्तक म्हणजे एका उजेडाच्या प्रवासाची एक विलक्षण कहाणी आहे. ज्यात सावल्या आहेत, अंधार आहे, प्रकाश आहे आणि अर्थात उजेडात जाण्याचे ध्येय आणि धाडस या लेखणीत आहे.
पूर्वप्रकाशित झालेले हे वर्षा गजेंद्रगडकर यांचे सदर अभिजित प्रकाशनाने पुस्तकरूपात आणून मराठी साहित्यातील ललित लेखनात मोलाची भर घातली आहे.  

संबंधित बातम्या