पत्रकार व राजकारण्यांमधला लपंडाव

अनंत गाडगीळ
सोमवार, 1 मार्च 2021

पुस्तक परिचय

‘तो मी नव्हेच’... आर्थिक घोटाळा असो अथवा अन्य भानगड असो, प्रकरण उघड होताच त्यात अडकलेल्या प्रत्येक राजकीय व्यक्तीच्या तोंडी हे वाक्य येते. परदेशातही फारसे वेगळे नाही. इंग्लंडमधील प्रसिद्ध शोधपत्रकार ॲडम मॅक्वीन यांनी कुठलाही मुलाहिजा न ठेवता आपल्या लेखनातून अनेक राजकारण्यांचे पितळ उघडे पाडले आहे. ‘द लाईज ऑफ दी लॅण्ड’ हे त्यांचे सर्वांत गाजलेले पुस्तक. 

इंग्लंडमधील शोधपत्रकारितेचे जणू ‘सर्वोत्तम प्रतीक’ मानले जाणारे सर्वाधिक खपाचे मासिक म्हणजे ‘प्रायव्हेट आय’. इंग्लंडच्या अनेक राजकीय नेत्यांचे पितळ उघडे करून, प्रसंगी त्यांना राजकीय वनवासाला पाठविणारे ॲडम मॅक्वीन यांनी तब्बल चौदा वर्षे वार्ताहर ते संपादक ही पदे  या मासिकात भूषवली आहेत. इंग्लंडचे राजकारण हादरवणारी ‘किंग ऑफ सनलाईट’, ‘फिफ्टी इयर्स-एनिमी विदिन’ यांसारखी गाजलेली पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. 

सत्तेचा अंगरखा पांघरलेले काही राजकारणी स्वतः करीत असलेले गैरव्यवहार इतरांना समजत नाहीत या अंधसमजुतीखाली वावरत असतात. मग ते व्यवहार दूर हजारो मैलांवर जरी केलेले असले तरी त्याचे दुष्परिणाम कालांतराने करणाऱ्याच्या दारापाशी येतातच. पायघड्यांवरून चालायची सवय झालेल्यांना हातकड्या घालून तुरुंगाची पदयात्रा करणे नशिबात आल्याची, इंग्लंडच्या इतिहासात पाहायला मिळणारी, अशी काही उदाहरणे लेखक ॲडम मॅक्वीन यांनी नऊ प्रकरणांमधून खुबीने पुस्तक स्वरूपात आणली आहेत.        

यातील एक उदाहरण म्हणजे तत्कालीन केंद्रीय मंत्री जोनाथन एटकेन यांचा भ्रष्ट राजकीय प्रवास. ‘‘सत्याची तलवार आणि विश्वासार्हतेची ढाल घेऊन मी उभा आहे! विपर्यासी व अप्रामाणिक पत्रकारितेच्या वाढत्या कर्करोगाशी सामना करायला मी सज्ज आहे!’ इंग्लंडच्या संसदेच्या इतिहासात हे वाक्य जणू काही  सुवर्णाक्षरात नोंदले जाईल अशा थाटात अचानक घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये एटकेन एकापाठोपाठ एक वाक्यांचे बाण सोडत होते. एप्रिल १९९५ मधला हा प्रसंग. निमित्त होते, इंग्लंडमधील प्रसिद्ध वर्तमानपत्र ‘दि गार्डियन’ने एटकेन यांच्या संरक्षण सामग्री खरेदीतील गैरव्यवहारासंबंधीचे उघड केलेले प्रकरण. ‘दि गार्डियन’ने छापलेला वृत्तांत धादांत खोटा, थापेबाजीचा नमुना, लबाडांचे लिखाण असल्यामुळे या सर्वाचा उबग येऊन ‘दि गार्डियन’च्या संपादक व बातमीदाराविरुद्ध अब्रू नुकसान भरपाईचा खटला दाखल करीत असल्याचे एटकेन यांनी जाहीर केले. गमतीचा भाग म्हणजे चेहेऱ्यावर शौर्यत्वाचा आव पण पोटात काव काव अशी एटकेन यांची अवस्था होती. याचे कारण सदर प्रकरण चव्हाट्यावर आणणारा पत्रकार डेव्हिड पलिस्टर त्या पत्रकार परिषदेमध्ये एटकेन यांच्या समोरच बसला होता.   

राजकारणी व पत्रकार यांचे नाते काचेच्या भांड्यासारखे असते. एकदा तडा गेला की होणारी जखम त्रासदायक ठरते. प्रसारमाध्यमे राजकारण्यांच्या आर्थिक भानगडींपासून ते व्यक्तिगत आयुष्यातील प्रकरणे चव्हाट्यावर आणतात. कधी कधी राजकारणी पितपत्रकारितेचेही बळी ठरतात.   

हॅरोल्ड मॅकमिलन यांच्यानंतर इंग्लंडचे संभाव्य पंतप्रधान म्हणून त्या काळात ज्यांचे नाव घेतले जायचे त्या रेजिनाल्ड मौल्डिंग यांच्या नशिबी राजकीय वनवास आला होता. मौल्डिंग सलग १४ वर्षे संसद सदस्य, त्यातील तीन-चार वर्षे केंद्रीय मंत्री होते. मात्र सार्वत्रिक निवडणुकीत संपूर्ण पक्षाचा पराभव होताच, पहिल्या रांगेतील हा नेता शेवटच्या बाकावर विराजमान होत निवृत्तीच्या विचाराकडे चालला होता. निवृत्त व्हायला निघालेला नेता एकदम सक्रिय झालेला पाहून, ‘त’वरून ताकभात ओळखणाऱ्या पत्रकारांना एवढे निमित्त पुरेसे होते. सत्तेत असताना आपण काहीच कमावले नाही, निवृत्तीनंतर स्वतःची आर्थिक सोय कशी करायची हे मौल्डिंग यांना शेवटच्या रांगेत बसल्यावर उमगू लागले. चिपींग बार्नेट कंपनीने ही संधी मौल्डिंग यांच्या दारात आयती आणून ठेवली. वर्षाला २.५ लाख मानधन द्यायचे कबूल केले. पिचरी प्रॉपर्टी कॉर्पोरेशन या विकसक कंपनीने वर्षाला चार लाख मानधनाच्या बदल्यात मौल्डिंग यांना ‘सल्लागार’ म्हणून नेमूनही टाकले. बांधकाम क्षेत्राचे सल्लागार झालेल्या मौल्डिंग यांचा कालांतराने त्या काळातील सरकारी इमारती बांधण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या आर्किटेक्ट जॉन पोल्सनबरोबर स्नेह वाढू लागला. पोल्सन यांनी मौल्डिंग यांना आपल्या कंपनीचे संचालकच करून टाकले.

हळूहळू या सर्वांचे परिणाम सभागृहात दिसू लागले. बांधकाम क्षेत्रातील वरील कंपन्यांना हव्या असलेल्या धोरणाच्या बाजूने मौल्डिंग अचानक आक्रमकपणे बोलू लागल्याने पत्रकारांना संशय येऊ लागला. पत्रकारांनी नजर ठेवायला सुरुवात केली. १९७७ साल उजाडताच घड्याळाचे काटे उलटे फिरू लागले. भाषणांच्या मोबदल्यात ‘हक्का’चे असे दाखवत मौल्डिंग यांच्या खात्यात पोल्सन कंपनीने २१ हजार शेअर्स जमा केल्याचे उघड झाले. पिचरी कंपनीच्या खात्यातून अचानक गायब झालेल्या पैशांचे आयकर खात्याने स्पष्टीकरण मागितले. 
आर्किटेक्ट पोल्सन यांनी कंत्राटे मिळण्याच्या बदल्यात राजकारणी व अधिकारी यांना

लाच दिल्याचे प्रसारमाध्यमांनी उघड करताच त्यांना अटक होऊन सात वर्षांची शिक्षाही झाली. दरम्यान मौल्डिंग पुन्हा मंत्री झाले, एवढेच नव्हे तर त्यांना गृह खाते मिळाले. सर्व प्रकरणांची चौकशीची मागणी सभागृहात झाली. स्वतःविरुद्ध स्वतःच चौकशी कशी करणार? या प्रश्नावरून गदारोळ झाला. अखेरीस मौल्डिंग यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. 

मौल्डिंग यांच्या हात धुऊन मागे लागलेल्या प्रसारमाध्यमांनी नंतर मात्र अचानक कोलांटी उडी मारली. ‘डेली एक्सप्रेस’ने मौल्डिंग यांनी राजीनामा देऊन नैतिकता जपल्याबद्दल त्यांची प्रचंड स्तुती केली. तर ‘दि सन’ने ‘संभाव्य पंतप्रधानाची शोकांतिका’ म्हणत सहानुभूतीपूर्वक लेखही लिहिला. संसदेने नेमलेल्या चौकशी समितीने तब्बल तीन वर्षांनंतर मौल्डिंग दोषी असल्याचा अहवाल दिला. आयुष्यात अनेक वर्षे गृहमंत्री, खासदार, कंपनी संचालक अशा विविध भूमिका पार पाडणारे मौल्डिंग मात्र एव्हाना आयुष्याच्या सायंकाळी कायमचे ‘तळीरामा’च्या भूमिकेत गेले होते.     

The Lies of the Land
Writer ः Adam Macqueen
Publisher ः Atlantic Books, London
Price ः Rs. 250/-
Pages ः 352

संबंधित बातम्या