गणित व विज्ञानातील रंजकता

डॉ. अनिल लचके
शुक्रवार, 16 मार्च 2018

पुस्तक परिचय
गणित आणि विज्ञान 
युगायुगांची जुगलबंदी 

 लेखक :
डॉ. जयंत नारळीकर
 प्रकाशन ः राजहंस प्रकाशन, पुणे 
 किंमत : ३०० रुपये   पाने : २१०    
 

जगप्रसिद्ध तत्त्वचिंतक बर्ट्रांड रसेल म्हणत असत की गणित या विषयाकडे शुद्ध नजरेनं पाहा. ते सत्य आणि सौंदर्याच्या भरभक्कम पायावर उभं आहे, असं आपल्याला लक्षात येईल. विज्ञानाच्या दालनात प्रविष्ट व्हायचं असेल तर त्याचा दरवाजा आणि किल्ली, असं दोन्ही म्हणजे गणित आहे, असं रॉजर बेकन म्हणायचे. गणिताचे महत्त्व आपल्याला महान विद्वानांनी पटवायला पाहिजे असं नाही. सकाळी उठल्यापासून आपल्या मनातल्या मनात आपण काहीना काही गणित सोडवत असतो. आपल्याला अतिसूक्ष्म अणूच्या  अंतरंगातला आणि अतिविशाल अवकाशातील अनंताचा प्रवास घडवून आणण्यासाठी गणिताच्या गाडीची गरज असते. ज्येष्ठ्य शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी प्राचीन काळापासून आजपर्यंत गणिताचा विकास कसा होत गेला याचा एक रंजक आढावा ‘गणित आणि विज्ञान- युगायुगांची जुगलबंदी‘ या पुस्तकात घेतलेला आहे.

सृष्टी निरीक्षणातून विज्ञानाचा मागोवा घेणे सुरू झाले. त्यावेळी विविध प्रकारच्या मोजमापाची आणि खास करून आकडेमोडीची गरज लक्षात आली. रोमन पद्धतीमध्ये इंग्रजी अक्षरांचा उपयोग करून घेण्याचा प्रघात पडला. उदाहरणार्थ. १९०० आकडा व्यक्त करण्यासाठी एम सी एम एवढी तीनच अक्षरे वापरली जातात. नंतर शून्याचा शोध भारतीय खंडात लागला. ग्रह, तारे, नक्षत्रांचा अभ्यास सुरू झाला. ग्रीसमधील मिलेट्‌सचा थेल्स, झीनो, पायथॅगोरस, युक्‍लिड, सॅमॉसचा ॲरिस्टार्कस, ॲरिस्टॉटल, टॉलेमी, हिप्पार्कस्‌, आर्किमिडीज, इरॅटोस्थनीस, आणि (जगातील पहिली) स्त्री गणितज्ञ हायपेशिया यांचे विचार, तर्कशास्त्र, संशोधन आणि त्या अनुषंगाने येणारी एखादी कथा किंवा आख्यायिका लेखकाने अतिशय सुबोध भाषेत चित्रांच्या मदतीने सादर केली आहे. उदाहरणार्थ, ग्रीसमधील मिलेटसचा थेल्स याने सावलीवरून पिरॅमिडची उंची मोजण्याची सूत्रे काढली तर आर्किमिडीजने राजा हीरॉनच्या मुकुटामधील सोन्यात झालेली भेसळ शोधून काढली. या नंतर प्राचीन भारतातील गणित आणि खगोलशास्त्र आणि विज्ञानाचा अभिमानास्पद आढावा घेतलेला आहे. यात आर्यभट, वराहमिहीर, ब्रह्मदत्त, भास्कराचार्य, नीलकंठ सोमयाजी, माधव (केरळ) आणि ज्येष्ठदेव यांच्या संशोधनाचा ऊहापोह केला आहे. या भागातील आर्यभट आणि भास्कराचार्य यांचे मार्मिक आणि मिश्‍किल श्‍लोक वाचकांना अभिमानास्पद वाटतील. त्याच बरोबर, अरब, चिनी, ग्रीक लोक भारतात ज्ञान संपादन करण्यासाठी यायचे. भारतातून दिसणारी ग्रहणे किंवा शुक्राचे लंघन, खगोलवेध आदी निरीक्षणांच्या नोंदी ठेवण्यासाठी अनेक परदेशी संशोधक येत असत. आपल्याकडे मात्र पुरेशी वैज्ञानिक जिज्ञासा नसावी. परदेशगमनावर बंधन होते. आपले विद्वान परदेशी गेल्याचे उदाहरण दुर्मिळच आहे. परदेशातही अनेक धर्ममार्तंडांचा दबदबा आणि अंकुश असल्यामुळे केप्लर, कोपर्निकस, टायको ब्राहे, गॅलिलिओ गॅलिलेइ आदी शास्त्रज्ञांना बरेच अडथळे पार करून अनेक धक्कादायक मूलभूत सिद्धांत मांडण्याची पाळी आली. 

बीजगणित आणि भूमिती या दोन शाखा गणितामध्ये पूर्वीपासूनच आहेत. भूमितीमध्ये सरळ रेषा, वृत्त, शांकव आदी आकृतीच्या गुणधर्मावर प्रमेये असतात. बीजगणितामध्ये मात्र अव्यक्त परिमाणांबद्दल विविध समीकरणे-सूत्रे असतात. दोन्ही विषयांची व्याप्ती लक्षात घेऊन फ्रान्समधील रने दकार्त याने साडेचारशे  वर्षांपूर्वी सहनिर्देशक भूमिती (को-ऑर्डिनेट जॉमेट्री), कार्टेजियन भूमिती, प्रक्षेप भूमिती आणि इतर अनेक गणितातील दालने जगाला उघडून दाखवली. त्यात फार्मा आणि ब्लेझ पास्काल यांनी सातत्याने भर घातली. हे गणितज्ञ निव्वळ आकडेमोड म्हणून गणिताकडे पाहात नव्हते. त्यांना गणितामधील कला आणि रंजकतेची अनुभूती प्राप्त झाली होती.

आयझॅक न्यूटन यांचे गती-गणित-गुरुत्वाकर्षण आदी वैज्ञानिक कार्य विस्तृत असून त्याची माहिती विषद करताना न्यूटनने गणितशास्त्रात केलेले संशोधन लेखकाने स्पष्ट केले आहे. न्यूटन आणि लायबनिट्‌झ यांनी कलनशास्त्र (कॅल्क्‍युलस) विकसित केलं. त्यांच्या कार्यकाळात घडलेल्या अनेक गमतीदार गोष्टींचा उल्लेख प्रस्तुत पुस्तकात केला आहे. तसेच न्यूटननंतर गणित आणि विज्ञानाची वाटचाल कशी झाली, याचा एक इतिहास वाचकांसमोर मांडला आहे. नेपोलियनने सैन्याइतके महत्त्व गणिताला दिले. लॅंगरांज, लप्लास आणि लजान्द्र या गणितज्ञांना प्रोत्साहन दिले. जर्मनीच्या कार्ल गाउस यांचं गणितावर आधारित न्यूनतम वर्गाची रीत, भौतिकशास्त्र आणि खगोलशास्त्रातील कार्य आधुनिक विज्ञानाच्या प्रगतीला गती देणारे ठरले. 

फ्रान्सचा गाल्वा (१८११-३२) ‘गट सिध्दांता‘साठी जगन्मान्य झाला.  नॉर्वेच्या नील्स आबेल (१८०३-१८२९) ने समीकरणाच्या साह्याने एक प्रमेय सिद्ध केले. ते म्हणजे ५ आणि वरच्या घाताची समीकरणे नेहमीच्या बीजगणित पद्धतीने सुटत नाहीत. या अल्पायुषी गणितींनी मोठी कामगिरी केली आहे. जॉर्ज बुल याने गणितात तर्कशास्त्राची भर टाकली आणि गणिते सोडवली. श्रीनिवास रामानुजन (१८८७-१९१९) यांचा गणितामधील प्रतिभेचा आविष्कार असामान्य होता. त्यांच्या कार्याचा परिचय तसेच निवडक महिलांचे योगदान काय होते, ते या पुस्तकात वाचायला मिळते. पुस्तकात अनेक सुंदर चित्रे आहेत, वाचनीय चौकटी आहेत आणि त्याच बरोबर विज्ञान आणि गणितशास्त्रातील थोर व्यक्तींचे निश्‍चित कार्य काय आहे, हे सोप्या भाषेत स्पष्ट केलंय.  प्रो. जयंत नारळीकरांनी त्यांच्या सिद्धहस्त लेखणीने गणिताच्या प्रांगणात विज्ञान आहे आणि दोन्ही विषयात रंजकता असल्याचे सहजतेने दर्शविले आहे.  सहाजिकच पुस्तक संग्राह्य झाले आहे.

संबंधित बातम्या