परिपूर्ण संपादनाचा वस्तुपाठ

 अंजली कुलकर्णी
शुक्रवार, 27 जुलै 2018

बुकशेल्फ

पुस्तक परिचय

  • डॉ. आनंद यादव एक साहित्यिक प्रवास 
  •  संपादक ः डॉ. कीर्ती मुळीक, अप्पासाहेब जकाते यादव
  •  प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे 
  •  किंमत ः ४९५   पाने : १८५

डॉ. आनंद यादव - एक साहित्यिक प्रवास’ हा ग्रंथ मेहता पब्लिशिंग हाऊसने नुकताच प्रकाशित केला आहे. आनंद यादव यांची समीक्षक कन्या डॉ. कीर्ती मुळीक आणि अप्पासाहेब जकाते यादव या दोघांनी या ग्रंथाचे साक्षेपी संपादन केले आहे. आनंद यादव यांच्या १९६० पासून ५०-५५ वर्षांच्या लेखकीय कारकिर्दीचा एक परिपूर्ण मागोवा या ग्रंथात घेतला गेला आहे.

डॉ. आनंद यादव त्यांनी निर्माण केलेल्या आशयघन, प्रयोगशील, भरघोस साहित्यकृतींमुळे मराठी साहित्यातले एक महत्त्वाचे नाव आहे; परंतु तितकेच ते महत्त्वाचे आहे. कारण त्यांनी ग्रामीण साहित्य लेखनाची, ग्रामीण साहित्याकडे बघण्याची एक नवी वाट शोधली आणि ती वाट पाठीमागून येणाऱ्या नव्या ग्रामीण साहित्यिकांसाठी खुली केली. त्यांनी नव्या लेखकांना जी दिशा, जो विचार, जो दृष्टिकोन दिला, त्यातूनच ग्रामीण साहित्याची चळवळ निर्माण झाली. त्याअगोदर ग्रामीण साहित्याची लेखक, कवी आणि सर्वसामान्य वाचकांच्या मनावर असणारी एक लोकप्रिय पण दिशाभूल करणारी कल्पनारम्य प्रतिमा पुसून टाकून तिथे वास्तवाची धग पेरणे हे काम सोपे नव्हते; परंतु आनंद यादवांच्या साहित्यप्रेरणांची मुळं ग्रामीण भागात घट्ट रोवलेली होती. त्यामुळे अशी भ्रामक प्रतिमा घट्ट करणारं लेखन त्यांच्या हातून होणं अशक्‍यच होतं. कदाचित यातूनच त्यांच्यातील प्रयोगशीलतेने उसळी मारून जुन्याला नकार देत नवी वाट चोखाळण्याला त्यांना प्रवृत्त केलं असावं. त्यांच्या समग्र लेखनाच्या गाभ्यात आपल्याला ग्रामीण जीवन आणि तिथला माणूस त्याच्या आशा-आकांक्षा, सुख-दुःखं, आशा-निराशेच्या प्रहरांसकट भेटतो. कारण तोच त्यांच्या जीवनास्थेचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळेच अस्सल ग्रामीण जीवनदर्शन हे त्यांच्या संपूर्ण साहित्याचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले.

आनंद यादव यांनी विपुल आणि कसदार लेखन केलं. त्यांनी वेगवेगळे वाङ्‌मय प्रकार कुशलतेने हाताळले, ते केवळ सगळ्या साहित्यप्रकारात हात मारायचा या हौसेपोटी नव्हे, तर त्या-त्या साहित्यप्रकाराच्या स्वीकारामागे त्यांचा एक स्पष्ट दृष्टिकोन असे. त्यातूनच कविता, कथा, कादंबरी, आत्मचरित्रात्मक कादंबऱ्या, समीक्षा असे त्यांचे बहुआयामी लेखन निर्माण होत राहिले. ‘हिरवे जग’, ‘मायलेकरं’सारखे कवितासंग्रह, ‘गोतावळा’सारखी मराठी कादंबरीला नवे रूप देणारी कादंबरी, ‘नटरंग’सारख्या कादंबरीतून मांडलेली कलावंताची फरपट, ‘झोंबी’, नांगरणी, ‘घरभिंती’, ‘काचवेल’ हे अनोख्या पद्धतीनं आलेले आत्मचरित्रात्मक कादंबरीचे चार खंड ग्रामीण साहित्याला नवे मापदंड बहाल करणारे समीक्षात्मक ग्रंथ अशी एकूण चाळीस ग्रंथांची समृद्ध संपदा त्यांनी निर्माण केली. त्यांच्यातील प्रगल्भ साहित्य-जाणिवांचे दर्शन त्यातून घडले.

ग्रामीण जीवनाचे खरे दर्शन बोलीभाषेतूनच घडवणे शक्‍य आणि योग्य आहे अशा आग्रही विचाराने स्वतःला बोलीभाषेतूनच प्रकट केले. त्यांच्या कथा-कादंबऱ्यांतील पात्रे तर बोलीभाषेतून बोलतातच; परंतु निवेदकही बोलीभाषेतून संवादी होतो हे त्यांचे वैशिष्ट्य ठरले. त्याचबरोबर विविध लेखांतून बोलीभाषेचे समर्थन केले. मराठी साहित्यात एक वेगळा प्रवाह त्यांनी निर्माण केला.

त्यांनी ग्रामीण भागातील लेखनाचे अंकुर जपणाऱ्या नव्या, तरुण लेखकांना लिहिण्यासाठी एक पायवाट तयार करून दिली. त्यांच्या प्रेरणेने खेड्यापाड्यांतील अनेक तरुण कवी, लेखकांना लेखनाची ऊर्जा मिळाली. ग्रामीणतेचे खरे निकष त्यांनी स्पष्टपणे मांडले. दलित्य साहित्याच्या मराठी समीक्षेप्रमाणे साहित्याच्या समीक्षेला एक नवा आयाम त्यांनी बहाल केला. एक प्रकारे ग्रामीण साहित्याच्या चळवळीतून एक नवा प्रवाहच मराठी साहित्यात दाखल झाला. या ग्रंथात डॉ. आनंद यादव यांच्या या महत्त्वपूर्ण बहुमोल योगदानाचा परामर्श विविध लेखकांनी घेतला आहे. त्यात त्यांच्या कवितांवर प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांनी लिहिले आहे. ते म्हणतात, ‘आनंद यादव हा खराखुरा पहिला शेतकरी कवी होता... यादवांच्या आधी लिहिलेली कविता ही मळ्याच्या मालकाने लिहिलेली कविता होती. आनंद यादवांची कविता मात्र मळ्यात राबणाऱ्या, मजुरी करणाऱ्या शेतमजुराची कविता आहे. म्हणूनच त्यांनी कविता लेखन बंद केले याचे मला वाईट वाटते.’’ डॉ. मंदा खांडगे यांनी यादव यांच्या ललित लेखनाचा आस्थापूर्ण परामर्श घेतला आहे. ग्रामीण भागातील दिशाहीन, कसेबसे आयुष्य जगणाऱ्या वर्गाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तींची व्यक्तिचित्रे आनंद यादव यांनी आपल्या जीवनानुभवातून समर्थ लेखणीने रेखाटली आहेत हे अधोरेखित करून मंदा खांडगे यांनी आनंद यादव यांच्या ललित गद्याची वैशिष्ट्ये सांगितली आहेत. उदा. ‘पाटी आणि पोळी’ या ललित लेखात शिक्षणाने आपल्या स्वतःच्या जीवनात परिवर्तन झाले मात्र पाटीची संगत सुटलेल्या त्यांच्या भावाच्या - शिवाच्या जीवनात मात्र तसे परिवर्तन घडले नाही. स्वातंत्र्यानंतरही शेतमजुरांच्या जीवनात फारसा फरक पडला नाही याची खंत यादव यांनी व्यक्त केली आहे. ‘फुला आत्ती’सारख्या लेखात सहा नातींनंतर नातू झाल्यावर सुनेला पोटाशी घेऊन घळाघळा रडणारी फुला आत्तीचे चित्रण आहे. ‘लई छळली बाई तुला. आता सुखानं बसून खा’ असं ती म्हणते तेव्हा सूनही हुंदके देऊन रडते’ अशा शब्दांत ग्रामीण स्त्रीचे दुःखपूर्ण आयुष्याचे चित्रच यादव यांनी रेखाटल्याचे मंदा खांडगे यांनी स्पष्ट केले आहे.

डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी ‘उखडलेली झाडे’ या कथासंग्रहाची वैशिष्ट्ये ठळक करताना ‘उखडलेली झाडे’पासूनच्या आनंद यादव यांच्या लेखनात कसा बदल होत गेला आहे याचा शोध घेतला आहे. ते म्हणतात, ‘येथेही ग्रामीण माणूस हाच चित्रणविषय आहे; परंतु हा माणूस खेड्यांतला मात्र नाही. खेड्यात जगणे कठीण होऊ लागल्यामुळे आणि शहरात अतिरिक्त पैसा वाहू लागल्याने खेड्यातील माणसे शहरात येऊ लागली आहेत किंवा रोजगारासाठी शहरांवर अवलंबून राहू लागली आहेत. या शहराच्या संपर्कात आलेल्या ग्रामीण माणसाच्या जीवनाची बरेवाईट परिमाणे आनंद यादव कथांमध्ये शोधू पाहत आहेत.’

याबरोबरच रवींद्र ठाकूर यांनी ‘यादवांचे कथाविश्‍व’, डॉ. शुभांगी पातूरकर यांनी ‘आनंद यादव यांच्या आत्मचरित्रात्मक कादंबऱ्या’, डॉ. सुरेश देशपांडे यांनी ‘आनंद यादव आणि ग्रामीण साहित्य’ अशा विविध लेखांतून आनंद यादव यांच्या साहित्याचे मूल्यमापन केले आहे.त्याचबरोबर यादवसरांची बहीण, बंधू अप्पासाहेब जकाते यादव, स्वतः कीर्ती मुळीक तसेच रा. रं, बोराडे, इंद्रजित भालेराव यांनी यादवांबरोबरचे वैयक्तिक स्नेहसंबंध उलगडणारे आस्थापूर्ण लेखन केले आहे, ते फार हृद्य झाले आहे. डॉ. द.ता.भोसले, डॉ.तानाजी पाटील यांनी घेतलेल्या मुलाखतीतून डॉ.आनंद यादव यांची समीक्षकीय विचारव्यूह, त्यांची भूमिका इत्यादी मुद्द्यांवर नेमका प्रकाश पडला आहे, तर डॉ. सुधाकर शेलार यांनी ‘ग्रामीण साहित्य चळवळीचे प्रवर्तक’ असलेल्या आनंद यादव यांच्या तत्संदर्भातील कार्यकर्तृत्वाचा सांगोपांग, चिकित्सक आढावा घेतला आहे.

विशेष म्हणजे इतके प्रचंड, मूलगामी कार्य करणाऱ्या आनंद यादव यांना त्यांच्या कार्याला साजेसे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद रीतसर मिळूनही त्यांना त्यावर विराजमान होता आले नाही, या कटू प्रसंगाच्या पडछायेचा परिणाम मनावर न घेता प्रत्येक समीक्षकाने फार निखळपणाने त्यांच्या साहित्यिक कामाचीच उचित दखल घेतली आहे.

एक परिपूर्ण ग्रंथ वाचकांच्या हाती ठेवण्याचे श्रेय संपादकद्वयीला पूर्णपणाने द्यायला पाहिजे इतका आशयाने संपृक्त ग्रंथ त्यांनी सिद्ध केला आहे. त्याचबरोबर मुखपृष्ठ मांडणीपासून अत्यंत देखणे, उच्च निर्मितीमूल्य या ग्रंथास लाभले आहे. 

संबंधित बातम्या