मूल्यभान जागविणारी कविता 

अंजली कुलकर्णी
गुरुवार, 22 नोव्हेंबर 2018

पुस्तक परिचय
कदाचित अजूनही
कवयित्री ः अनुराधा पाटील 
प्रकाशक : शब्द पब्लिकेशन, मुंबई 
किंमत ः २०० रुपये.
पाने : १२८

साधारणपणे १९७१ नंतर लिहू लागलेल्या अगदी महत्त्वाच्या कवयित्रींपैकी अनुराधा पाटील हे महत्त्वाचे नाव आहे. नुकताच अनुराधा पाटील यांचा ‘कदाचित अजूनही’ हा पाचवा कवितासंग्रह प्रकाशित झाला आहे. यापूर्वी त्यांचे ‘दिगंत’, ‘दिवसेंदिवस’, ‘तरीही’ आणि ‘वाळूच्या पात्रात मांडलेला खेळ’ हे चार कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. तसे पाहिले तर अनुराधा पाटील हे कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपल्या डोळ्यांसमोर सतत येणारे नाव नव्हे. साहित्य संमेलने, कविसंमेलने, चॅनेल्स, सोशल मीडिया अशा कुठल्याच प्लॅटफॉर्मवर सहज भेटणारे हे नाव नव्हे. पण आपल्या सर्वस्वी स्वतंत्र प्रतिभाशक्तीमुळे मराठी कवितेवर स्वतःची स्वतंत्र मुद्रा उमटवलेले हे नाव आहे. अनुराधा पाटील ही एक कविवृत्ती आहे. जी एका निष्ठेने आणि असोशीने जपत अनुराधा पाटील आतल्या संवेदनेसह लिहीत आहेत. जगणे आणि लिहिणे एकच होऊन गेलेल्या दुर्मिळातल्या दुर्मिळ व्रतस्थ कवींपैकी त्या एक आहेत. 

अनुराधा पाटील यांचा ‘कदाचित अजूनही’ हा कवितासंग्रह वाचला, की एका चिंब भिजणाऱ्या धारेखाली खूप वेळ उभे राहावे आणि त्या पाण्याचे निर्मळ, नितळ, सृष्टीच्या भलेपणासाठीचे अवगाहन करणारे तत्त्व तनामनात भिनून जावे असा अनुभव येतो. या कविता वाचताना एका क्षणी असे जाणवते, की ज्या एका मानवतेच्या कळवळ्याची समाजाला आज नितांत गरज आहे त्या माणसाच्या ठायी असलेल्या कळवळ्याला त्या साद घालत आहेत. अत्यंत संयत, विवेकशील सुरात त्या माणसातल्या चांगुलपणाला आवाहन करत आहेत. चांगुलपणाची परिभाषाच हरवून बसलेल्या समाजाला त्या ती परिभाषाही बहाल करत आहेत. या सगळ्या कविता मिळून एक प्रार्थना आहे, जी सगळ्या मानवजातीसाठी त्या म्हणतात. स्वतः जवळ असलेल्या सगळ्या करुणेचा स्रोत त्यांनी या संग्रहातील कवितेकवितेतून वाहू दिलाय आणि असे वाटते, की त्या आस बाळगून पुढे बघतात, की हा स्रोत माणसांच्या काळजांपर्यंत पोचला तर’ कदाचित अजूनही ‘जग बदलेल - करुणामय प्रेममय होईल. त्याचबरोबर स्त्रियांच्या सनातन दुःखाकडे करुणेच्या डोळ्यांनी बघणारी एक खोल संवेदना इथे प्रत्ययकारी झाली आहे. असा एक व्यापक, खोल आशय घेऊन या संग्रहातील कविता अवतरली आहे.

अनुराधा पाटील यांच्या कवितेवर आपण रूढार्थानं जिला ‘स्त्रीवादी कविता’ म्हटले जाते असा स्त्रीवादी  शिक्का मारून मोकळे होऊ शकत नाही. तरीही ती निःसंशयपणे स्त्रियांच्या जगण्यातले असंख्य पीळ आणि त्यातले अस्वस्थ पदर टिपत असते. ही कविता जितकी स्वतःविषयी बोलते तितकीच ती एकूण स्त्रीजीवनाविषयी सांगत जाते. तसे तर जातीधर्म, वर्ग, प्रदेशानुसार स्त्रीदुःखाचे स्वरूप बदलत जाते, पण दुःखाच्या अटळ अस्तित्वाची सतत वाहणारी एक धारा सर्वत्र सारखी असते; जी प्रदेश, वर्ग ओलांडून पलीकडे एकच होते. अशा एका अंतःस्त्रावी स्त्री दुःखाच्या सतत झरणाऱ्या धारेचा नाद अनुराधाताईंच्या कवितेत ऐकू येत राहतो. ‘कदाचित अजूनही’ या संग्रहातील कवितेचे नदीपात्र अधिक विशाल, अधिक उदार आणि अख्ख्या मानवजातीला कवटाळून वाहते.

या संग्रहातील कविता स्त्री दुःखाची दुखरी नस नेमकी पकडून संवादी होतात. स्त्री दुःखाकडे पाहणारी एक प्रगल्भ नजर तिच्या समंजस सोशिकपणाचे दर्शन घडवते. केवळ एक संसारी, सामान्य स्त्री म्हणून नाही, तर कवयित्री म्हणूनही माणसांच्या जगात तगून राहणे किती अवघड आहे याचा प्रत्यय त्या देतात. ‘हे असंच होतं’ या कवितेत त्या लिहितात - 
‘आणि भाकरी भाजत कविता  वाचाव्यात 
तर कविता करपल्याचा वास पसरतो सर्वत्र’ 

भाकरी आणि कवितेची सांगड घालत तोल सावरू पाहणाऱ्या, संवेदनेची ओल जपत व्यक्त होऊ पाहणाऱ्या कवयित्रीपणाची आतली फरपट त्या मांडतात.
‘कवितेशी काही देणे ना घेणे असा हा भोवताल 
आणि आपल्याला आतच ठेवून बुजवली गेलेली काटेकोर तळघराची दारे..’

 ‘हे असंच होते’ कवितेत त्या पुढे लिहितात 
‘टाळता येत नाहीत तरीही आतड्यांचे गुंते 
की होता येत नाही पुरेसे निर्मम’ 

असा दुर्लक्षित तरीही नातेसंबंधात गुंतलेल्या मनातला गुंता आणि शेवटी - ‘पडू दे माझा पाय माझ्या त्वचेबाहेर अलिप्त’ ही प्रार्थना असा तिच्या मनाचा मूक आकांत अशा कवितांमधून भारतीय स्त्रीचे प्रातिनिधिक रूप घेतो.
स्त्री-पुरुष संबंधांमधल्या ताणांची बारीक वीण अनुराधाताई फार समंजस, संयतपणे आणि सूक्ष्मतेने उलगडतात. ‘दिवस’सारख्या कवितेत दैनंदिनीतील निरर्थकता आणि एकूणच जगण्यातील स्त्रीचे एकाकीपण, तुटलेपण, अगतिकता, दुय्य्मत्वाच्या जाणिवेने अपमानित अवस्था हे सारे प्रत्ययकारी शैलीत मांडतात . 
त्या लिहितात - 
‘दिवस 
या खोलीतून त्या खोलीत खिडकीशी उभं राहून 
कॉटवर टेकत कधी या कधी त्या नळाच्या 
तोट्या सोडत बंद करत निरर्थक’

हा दिवस केवळ निरर्थकच नाही,तर शरीरमनाची कोंडी करणारा आहे. त्याविषयीची एक विषण्णता कविता भरून टाकते.
‘जिथे दिवस जातो आपला आपल्या बरोबर
त्याचा त्याच्या बरोबर’

अशा एका अलिप्त, समांतर, निष्प्रेम, उपेक्षित जगण्यात सोडून दिलेल्या स्त्री जिवाची घालमेल इथे प्रत्ययास येते. ‘भुकेला लाज नसते’ यासारख्या कवितेत ही घालमेल त्या व्यक्त करतात.
‘भयमुक्त जगण्याची स्वप्नं । पडतात बाई । माझ्याही दारं खिडक्‍यांना । पण इथल्या साळसूद। कडी कोयंड्यांची । बेमालूम बतावणी । व्यापून टाकते । दाही दिशांचा । अख्खा पडदा...’
असे स्त्रीजीवनात वाट्याला येणारे कोंडलेपण आणि पुरुषी संस्कृतीचे ढोल बडवणारी ढोंगी व्यवस्था यावर ही कविता मोठ्या आवाजात न बोलताही फार सूक्ष्म मार्मिकपणे भाष्य करते.

स्त्री आणि घराचा अनुबंध अनुराधाताईंच्या कवितेत भरून आलेल्या आभाळासारखे उत्कट होऊन येतो. मात्र त्या घराकडे सांकेतिक पद्धतीने पहात नाहीत. ‘आपण उभे असतो’ या कवितेत त्या म्हणतात 
‘आपण उभे असतो तेवढीही जागा उरत नाही 
कधी कधी पायांखाली घर म्हणून’

त्याचबरोबर अनुराधाताईंच्या कवितेचा एक विशेष  नेहमीच जाणवतो,  तो म्हणजे त्यांच्या कवितेत एक संवेदनशील, जग जाणतेपणाने पाहणारी, आकळून घेणारी स्त्री तर दिसतेच; परंतु, जीवनातल्या विपरीत अनुभवांमुळे ज्यांच्या आतड्यांत तुटते, पण आपल्या दुःखाचे नेमके आकलन ज्या करून घेऊ शकत नाहीत अशा सर्वसामान्य स्त्रियांच्या दुःखाला त्या नेमके शब्द बहाल करतात. त्यांचे व्यक्तित्व जणू इथल्या मातीतल्या सर्वसामान्य स्त्रीचेच रूप धारण करते. त्यांची कविता इथल्या मातीत रुजलेली वाटते ती त्यामुळेच. बोलताना ती बोलतेही गावाकडील प्रतिमांच्या भाषेत. त्यांनी वापरलेली प्रतिमासृष्टी हा एक वेगळाच अनुभव आहे.  ‘आपण उभे असतो’ या कवितेत त्या म्हणतात, 
‘पण पुढे पुढेच चाललेल्या 
मुलांच्या कोरड्या डोळ्यात 
दिसत नाही पुन्हा 
आपण आणि त्यांनी 
एकाच वेळी ओलांडलेला समुद्र ..’ 

अनुराधाताईंच्या कवितेतील प्रतिमासृष्टी ही फार विलोभनीय आहे. विशेषतः ती भूमिनिष्ठ प्रतिमासृष्टी आहे. या मातीतील माणसे, स्त्रिया यांच्या इतकीच ती अस्सलतेचे परिमाण लेऊन आली आहे.  ‘बांधल्या पेंढीचा । सुटू दे रे आळा ’ किंवा  ‘हरेक ऋतुचक्रात । फुटतातच । मुंग्यांनाही पंख । म्हणून आमचं दुःख । अबाधित आहे’ 
अशा मातीच्या वासाच्या स्वाभाविक साहचर्यामुळे कवितेतील आशय गडद आणि संवेदनेच्या गाभ्याचा थेट प्रत्यय देणारा झाला आहे. अनुराधाताईंचे संवेदनविश्व भोवतालाशी करुणेच्या धाग्याने जोडलेले आहे. किंबहुना करुणा हाच त्यांच्या  कवितेचा स्थायी भाव आहे. भोवताली सुरू असलेल्या विपरीत परिस्थितीत माणसांचे माणूसपण तगून राहील की नाही या शंकेने कंपित होणारे काळीज इथे दिसून येते. आयुष्याच्या एका टप्प्यावर उभे राहून भोवतालाकडे पाहताना पुढील पिढीच्या भविष्याच्या विचाराने ते व्यथित होते. त्या लिहितात, 
‘त्याला देता येईल रस्त्यावर पडलेल्या 
एखाद्या बेनाम जिवाला खांदा काळजातल्या 
टिकलीएवढ्या निखाऱ्यावर 
साचलेली राख झटकून की पाढ्यामध्येच 
वाढत राहील त्याचं वय ?’ (रस्ता ओलांडताना)

वर्तमान परिस्थितीत आत्मकेंद्रित जगणे जगताना या मुलांच्या भावविश्वात इतरांसाठी संवेदनांचे तरंग शाबूत राहतील, की नष्ट होतील हा प्रश्न त्यांना व्यथित करतो. 
‘की विनाशाचे  संदर्भ वेढून टाकतील 
त्याचं अज्ञात आयुष्य तेव्हा कुठे असेन मी ?’
असा प्रश्न त्या स्वतःलाच विचारतात, तेव्हा त्या प्रश्नापाठीमागे प्रत्यही जाणवणाऱ्या भोवतालच्या दर्शनाचे संदर्भ असतात. जागतिकीकरणाच्या या युगात संपूर्ण मानवी जीवनाचेच यांत्रिकीकरण आणि व्यापारीकरण झालं आहे. अशा परिस्थितीत माणूस एकतर खरेदीदार झालाय वा विक्रेता; मालक झालाय किंवा मजूर; आणि यंत्र तर तो झालाच आहे फक्त त्याचे माणूस असणे मात्र नाकारले जाते आहे. 
अनुराधाताई लिहितात, ‘माणूस नावाचा शब्द 
निषिद्ध ठरवला गेलाय नव्या शब्दकोशात’ 

सर्व प्रकारच्या विषमता उसळून आलेल्या या काळात समाजाच्या तळाशी असलेला माणूस आणि त्यातही अभावांच्या जिण्याखाली चिणून गेलेल्या स्त्रीचे दुहेरी दुःख या संदर्भातील उद्‌गार त्यांच्या कवितेत सापडतो. उदा  ‘एवढं कर’ या कवितेत त्यांनी लिहिले आहे
‘परागंदा  होण्याच्या वाटेवर उभा असलेला 
शेवटच्या रांगेतला शेवटचा माणूस 
पाहता पाहता दिसेनासा झालाय’

किंवा ‘सध्या तरी’ या कवितेत त्या जगण्यातल्या दहशतीविषयी लिहितात. 
‘आजकाल ओळखीच्या डोळ्यांमध्येही दिसते 
मला अनोळखी अन्‌ 
एक दबलेली हिंस्र चेतावणी..’

या सगळ्या भोवतीच्या भयावह परिस्थितीविषयी भाष्य करताना अनुराधाताईंच्या  कवितेची लय वाढत जाते. एखादी तांब्याची तार तापून लालेलाल व्हावी, तसा त्यांच्या कवितांतर्गत स्वर तापत जातो. प्रतिमा अधिक टोकदार होत जातात. संग्रहातील अखेरच्या ‘समुद्र दाराशी आलाय’ या कवितेत हा संयत तरीही आतला आक्रोश टिपेला पोहोचतो. त्या कळवळून म्हणतात,
‘कोण सांभाळेल त्यांनी पाहिलेल्या 
अखेरच्या सूर्यकिरणाचा थेंबभर उजेड 
आपल्या पाणावलेल्या डोळ्यांत..’

कवीची कविता ही त्याची कृतीच असते आणि त्याने स्वीकारलेली ती एक जबाबदारी असते ही जाणीव कवयित्रीच्या ठायी आहे. त्या जाणिवेतून त्या समस्त मानवी संवेदनेला हाकारत आवाहन करताना लिहितात ‘मला माहिती आहे
काहीच उगवून येणार नाही आतल्या 
या कणभर ओलाव्यातून पण मला निदान 
पसरू द्या हात या अनंत आभाळाकडे 
पाझरू द्या मनात सुईच्या अग्रावर मावेल 
एवढी तरी करुणा..’ 

अखेरीस, ही एका मूल्यभानाची कविता आहे. मानवी जीवनातून हरवत चाललेल्या प्रेम, विश्वास आणि करुणा या मूल्यांची प्रतिष्ठापना करण्याचा ध्यास लागलेली ही कविता आहे. कदाचित हे मूल्यभान उद्याची स्त्रीच निर्माण करेल असा एक अदम्य विश्वासही ही कविता देते हे तिचे मोठेपण आहे. 

संबंधित बातम्या