वनहक्कांच्या संघर्षाची कहाणी

अंजली कुलकर्णी
शुक्रवार, 4 जानेवारी 2019

पुस्तक परिचय
 

प्रसिद्ध लेखक मिलिंद बोकील यांचे ‘कहाणी पाचगावची’ हे समाजशास्त्रीय संशोधनपर पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. मिलिंद बोकील यांच्या कथा, कादंबरी, वैचारिक अशा सर्वच लेखनाला एक समाजशास्त्रीय अभ्यासाची बैठक असते, ही गोष्ट आता सर्वश्रुत आहे. उदकाचिया आर्ती, रण-दुर्ग, कातकरी-विकास की विस्थापन अशा पुस्तकांनी ते सिद्ध केले आहे.

काही वर्षांपूर्वी ‘गोष्ट मेंढा गावाची’ हे त्यांचे पुस्तक प्रकाशित झाले होते. त्यात मोहन हिराबाई हिरालाल यांच्या पुढाकाराने मेंढालेखा या गावाने केलेल्या ‘दिल्ली-मुंबईत आमचे सरकार, आमच्या गावात आम्हीच सरकार’ या अद्‌भुत प्रयोगाची कहाणी सांगितली आहे. त्याच धर्तीचे काम करून चंद्रपूर जिल्ह्यातल्या पाचगावाने सामूहिक वनाधिकार मिळवला होता आणि त्याची अंमलबजावणीही यशस्वीरितीने सुरू आहे. या माहितीने कुतूहल जागृत झालेल्या मिलिंद बोकील यांनी प्रत्यक्ष पाचगावास भेट दिली आणि त्या सुरू असलेल्या प्रक्रियेचा भाग बनत, जंगलात हिंडत, लोकांशी संवाद साधत त्यांनी जे पाहिलं, जे अनुभवलं त्याची कहाणी त्यांनी या पुस्तकात शब्दबद्ध केली आहे.

व्यसनाधीनतेमुळे कंगाल आणि कणाहीन झालेल्या पाचगावात हे मूलभूत परिवर्तन घडले तरी कसे ? या प्रश्‍नाचे आणि त्यातून उमटणाऱ्या अनेक प्रश्‍नांची उत्तरे या कहाणीतून गवसत जातात. महाराष्ट्र रोजगार हमी योजनाही मजुरांच्या हक्कासाठी आहे आणि जर गावातल्या मजुरांची कायदेशीर मार्गाने कामाची मागणी केली, तर सरकार ते काम त्यांना पुरवण्यास बांधील असते, ही माहितीच पाचगावच्या लोकांना नव्हती, कारण आतापर्यंत रोजगाराची कामे काढणे हे तालुक्‍यातील अधिकाऱ्यांच्या लहरीवर अवलंबून होते. ही कामं करवून घ्यायची असतील, तर मजुरांनी संघटितरीत्या संघर्ष करण्याची गरज आहे, ही बाब विजय देठे यांनी गावकऱ्यांच्या मनावर बिंबवली. विजय देठे यांच्या पर्यावरण-मित्र या संस्थेनं त्यासाठी मजुरांना मदतीची तयारी दाखवली.

विजय देठेंनी त्यासाठी कामाची एक पद्धती विकसित केली, ती फारच महत्त्वाची आहे. गांधीजींनी जी साधनशुचितेची प्रणाली सांगितली होती. ती साधनशुचिता देठेंच्या कामात अंतर्भूत आहे. मिलिंद बोकील यांनी या पुस्तकात देठेंची कार्यपद्धती उलगडत तिचा परिचय करून दिला आहे.  या कहाणीची सुरुवात विजय देठेंच्या कहाणीपासून होते. विजय देठे आणि स्मिता कांबळे हे दोघं ज्या विरुर गावात राहत, त्या गावातल्या महिलांच्या आग्रहामुळे त्यांनी रोहयो समजून घेण्यासाठी अभ्यासगट सुरू केला. या अशिक्षित बायका दिवसभराची कामं उरकून संध्याकाळी रस्त्यावर बसून रोहयोतल्या तरतुदी ज्या कुतूहलाने समजून घेत ते पाहून अशिक्षित बायका काय अभ्यास करणार हा गैरसमज गळून पडला.

या अभ्यासगटाचं रूपांतर संघटनेत झालं आणि विरुरचा एक ऐतिहासिक लढा उभारला गेला, यातून अनेक धडे पर्यावरण-मित्र आणि एकूणच सामाजिक अभ्यासात समाविष्ट झाले. सरकारने जरी एखादी लोककल्याणकारी योजना घोषित केली असली, तरी नोकरशाहीच्या इच्छेअभावी ती योजना यशस्वीपणे राबवणे अशक्‍य असते आणि म्हणून नोकरशाहीवर अंकुश ठेवत तिच्याकडून ही योजना राबवणे - हे एक वेगळेच शास्त्र असल्याचे निरीक्षण मिलिंद बोकील यांनी या पुस्तकात मांडलं आहे. विरुरने जो धडा दिला तो पाचगावच्या संघर्षात उपयोगी पडला. कायद्याचा बारीक अभ्यास केला, तर सरकारी कारभारातील चुका आणि ढिसाळपणा उघडकीला आणता येतो आणि त्यांचा सनदशीर आणि शांततापूर्ण मार्गाने पाठपुरावा केला, तर अधिकाऱ्यांनाही त्यांच्या चुका दुरुस्त करायला भाग पाडता येतं, या कामातून लक्षात घेण्यासारखा मुद्दा आहे.

सर्वांत महत्त्वाचं म्हणजे पर्यावरण-मित्र या वाटचालीतून एक महत्त्वाचं सूत्र त्यांच्या हाती आलं. ते म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवणुकीप्रमाणे कायद्याचा अभ्यास आणि महात्मा गांधींच्या शिकवणुकीप्रमाणे शांतता व अहिंसेच्या मार्गाने लढा.

विरुरच्या लढ्यात जे मिळाले त्याचा बोलबाला इतर गावातही झाला आणि पर्यावरण-मित्रचे काम विस्तारू लागले. पाचगाव शेजारच्या परसोडी गावात रोहयोचे काम आणि त्याला योग्य मजुरी मिळू लागली. ते पाहून पाचगावच्या लोकांनी विजय देठे यांना त्यांच्या गावात पाचारण केलं आणि सुरू झाली पाचगावच्या लोकांनी स्व-सामर्थ्याच्या दिलेल्या प्रत्ययाची कहाणी, मेंढा-लेखा गावातील वनहक्काची लढाई त्यांच्या डोळ्यांसमोर उदाहरण म्हणून होती.

इंग्रजांच्या काळात जंगल, जमीन आणि पाणी यांच्यावरचे हक्क हिरावले गेलेले आदिवासी स्वातंत्र्यानंतरही स्वतःच्याच भूमीवर चोर, आक्रमक ठरले. त्यांचे हे न्याय्य हक्क त्यांना मिळण्यासाठी केंद्र सरकारने केलेल्या कायद्याची माहिती विजय देठेंनी गावकऱ्यांना दिली. स्वतःच्या हक्कांसाठी स्वतःच लढावे लागते याची जाणीव झालेल्या पाचगावच्या रहिवाशांनी मग वनहक्क समिती स्थापन करून वैयक्तिक तसेच सामूहिक हक्कांच्या संदर्भात प्रक्रिया सुरू केली. ग्रामसभा, उपविभागीय समिती, नंतर जिल्हास्तरीय समिती अशी ती प्रक्रिया जाणून घेण्यासाठी गावकरी सज्ज झाले.

परंतु, केवळ अर्ज करून आपल्याकडे कधीच काम होत नाही. शासन दरबारी अनुभवास येणारी दिरंगाई, बेफिकीरीची आणि मुख्य म्हणजे सरंजामशाही वृत्ती यामुळे हे हक्क पाचगावला सहजासहजी मिळणार नव्हतेच. त्यासाठी वनविभागाशी त्यांना सातत्याने सनदशीर, संघर्ष करावा लागला. अहिंसात्मक सत्याग्रहाचे शस्त्र वापरून त्यांनी जंगलाचे खरे मालक लोकच असत्याची जाणीव शासनाला करून दिली. वनहक्क कायदा वनावरील अधिकार त्या विशिष्ट जनसमूहाला देतो आणि वस्तीची ग्रामसभा ही संकल्पना मान्य करतो. ही बाब या लढ्यातून अधोरेखित झाली आणि ग्रामसभेची ताकदही सिद्ध झाली. गावसमूहांचा त्यांच्या भोवतालच्या नैसर्गिक साधनसंपत्तीवरचा अधिकार दिला, तर ते आपल्या सदस्यांचा आर्थिक विकासही करू शकतात आणि स्वतःच्या भांडवलातही वाढ करू शकतात हा वस्तुपाठ या लढ्याने दिला.

त्याचप्रमाणे कुण्या एका नेत्याभोवती - पुढाऱ्याभोवती न फिरणाऱ्या या लढ्याने एक कार्यपद्धतीचे आगळे सूत्र स्वीकारले. ते म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या विचारांचा संगम. बाबासाहेबांनी दिलेली सर्वांसाठी समान न्याय ही संकल्पना आणि अहिंसात्मक सत्याग्रह हे शस्त्र वापरून पाचगावने आजच्या काळात तयार झालेल्या आंबेडकर विरुद्ध गांधी या विद्वेषाला आंबेडकर अधिक गांधी हा कल्याणकारी पर्याय दिला आहे; ही फार मोठी गोष्ट असल्याचे बोकील यांनी नमूद केले आहे आणि ते खरेच आहे. या लढ्याला सर्वत्र व्यापक स्वरूप मिळावे ही त्यांची अपेक्षाही या साऱ्या लेखनाचे संचित म्हणून वाजवी आहे.
 

संबंधित बातम्या