भारलेला अनुभव देणारा अनुवाद 

अंजली कुलकर्णी
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

पुस्तक परिचय
 

‘गुलजार बोलतो... त्याची कविता होते,’ असं प्रख्यात शायर गुलजार यांच्याविषयी म्हटलं जातं. त्या गुलजार यांच्या ‘सगे सारे’ या हिंदी कवितासंग्रहातील कवितांचा किशोर मेढे यांनी केलेला मराठी अनुवाद मोठ्या प्रेमानं गुलजार यांचे मित्र आणि मराठीतील प्रसिद्ध कवी अरुण शेवते यांनी प्रकाशित केला आहे. सुरुवातीलाच सांगितलं पाहिजे, की या संपूर्ण संग्रहावर गुलजार, अरुण शेवते आणि किशोर मेढे यांच्यातील सुंदर भावबंधांची सुंदर छाया आहे. त्याचप्रमाणं ज्यांच्यावर त्यांनी आत्मीयतेच्या ओढीतून कविता लिहिल्या, त्या असंख्य व्यक्ती आणि त्यांच्याशी गुलजार यांच्या असलेल्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष नात्यांचा गोड गलबलाही इथं आहे. त्यात संपूर्ण विश्‍वावर गारुड करणाऱ्या शेक्‍सपिअर, व्हॅन गॉग, रवींद्रनाथ टागोर, अमृता... इमरोजपासून गुलजार यांची कन्या मेघना, नातू समयपासून पाली या त्यांनी ज्याला कधीच कुत्रा म्हटलं नाही, अशा बॉक्‍सरपर्यंत अनेकजणांची उपस्थिती आहे. कुसुमाग्रज आहेत, नामदेव ढसाळ, ग्रेस, केदारनाथ सिंहसारखे उत्तुंग कवी/शायर आहेत आणि अगदी बापू, नील आर्मस्ट्राँग, ॲन्ड्यू फिस्टल आणि पाब्लोही आहेत. गुलजारांची संवेदनशीलता, त्यांची प्रतिभा केवढा मोठा श्रीमंत पैस बाळगून आहे याची कल्पना यावरून यावी. 

या सगळ्या व्यक्तींवर लिहिलेल्या कविता म्हणजे गुलजारांनी जीव लावून जपलेल्या एकएक नक्षत्रासारख्या माणसांचा गोतावळा आहे. या सगळ्याच कवितांमधून गुलजार माणसांमध्ये किती आतड्यापासून गुंतले होते याचा प्रत्ययकारी अनुभव आहे. त्यातील तरलता काळजाला कापणारी आहे. ‘अमृता... इमरोज...’ या कवितेत त्यांनी लिहिलं आहे, ‘तुझ्या कविता अंगी भिनवताना भीतीच वाटते, वाटतं पाय ठेवतोय जणू ओल्या लॅन्डस्केपवर इमरोजच्या!’ गुलजारांनी प्रत्येक व्यक्तीवरच्या कवितांआधी त्यांच्याविषयी, त्याची ओळख सांगणारी मोजकीच वाक्‍यं लिहिली आहेत. खरं सांगायचं तर ती गद्य वाक्‍यं म्हणजेही कविताच आहेत, कारण ती लिहिताना गुलजारांनी आपल्या काळजातले शब्द बहाल केले आहेत. उदा. रवींद्रनाथ टागोरांविषयी त्यांनी लिहिलंय, ‘संपूर्ण बंगालमध्ये पिकासारखा उगवलेला एक कवी संपूर्ण इलाख्यावर निरंतर बरसणारा आसमंत. प्रत्येक घराघरात रोपट्यासारखा लावला गेलाय. फक्त एक कवी नाही, एक एकटा माणूसच समस्त बंगालचं ‘कल्चर’ आहे.’ किती अचूक शब्दयोजन. तर ‘मेघना’ या कवितेआधी एकाच वाक्‍यात त्यांनी लिहिलंय- ‘बोस्की मोठी झाली. आता मेघना आहे.’ 

गुलजार यांची सामाजिक, राजकीय परिस्थितीवरची कविता नेहमीच बंदुकीच्या गोळीसारखी आरपार वेध घेणारी असते. त्यांना सद्यःकालीन परिस्थितीविषयी वाटणारी विषण्णता, चीड, राग ते अत्यंत टोकदारपणे व्यक्त करतात. ‘सगे सारे’ मधल्या काही व्यक्ती अशा आहेत, की ज्यांचा गुलजारांशी कधी प्रत्यक्ष भेटीगाठींचा प्रसंग आला नाही. परंतु, अशा कित्येक व्यक्तींशी त्याचं नातं समान विचाराच्या धाग्यानं, लेखणीच्या रूपानं कायमस्वरूपी जोडलं गेलं होतं. एका अनामहृदयस्थ भावनेनं या माणसांविषयी त्यांच्या मनावर कब्जा केला होता आणि मन हेलावणाऱ्या प्रसंगातून त्या भावना अलगद कवितेतून पाझरल्या होत्या. डॉ. कलबुर्गी यांच्या संदर्भातली या संग्रहातली कविता या अनाम नात्याचं उदाहरण म्हणून सांगता येईल. डॉ. कलबुर्गींसारख्या विचारवंताविषयी इतर असंख्य जणांप्रमाणं गुलजार यांच्याही मनात नितांत आदरभावना होती. ती त्यांच्या हत्येनंतर उसळून कविता होऊन कागदावर उतरली. 

अगदी लहान-लहान ९-१० ओळींमधून गुलजारांनी जे कलबुर्गींविषयी लिहिलंय, ते अफलातून याच कोटीत मोजता येईल! गोळीचा आवाज आसमंतात दुमदुमला तेव्हा त्यांच्या डोक्‍यात विचार होतात कुठलासा जो बोलायचा, गुलजार म्हणतात, ‘विचार उंबऱ्यावरच पडला आहे.’ तर, कलबुर्गींविषयी त्या आधी त्यांनी दोन ओळीत लिहिलंय, ‘कलबुर्गी, कुठलंही नातं नव्हतं, ना पाहिलं, ना भेटलो, फक्त लेखणीचे सगे होतो आम्ही.’ एकाच विचारधारेशी इमान सांगणाऱ्या तिच्यासहच जगणं, मरणं शक्‍य असल्याची जाणीव देणाऱ्या दोन कधीही न भेटलेल्या सग्यांविषयीचा हा सार्थ उद्‌गार वाचकाच्या मनातही तसेच भावना तरंग उमटवतो. म्हणूनच गुलजारांची कविता वाचताना, वाचक त्या त्या व्यक्तीकडं गुलजारांच्या डोळ्यांनी पाहतो आणि तीच त्याची स्वतःची नजर होऊन जाते. 

मराठी भाषा, साहित्य, संस्कृतीविषयी गुलजार यांना वाटणारी आत्मीयता सर्वश्रुत आहे. अनेक मराठी कवी, लेखक, नाटककार, कलावंत, यांच्याशी त्यांचं जीवापासूनच सख्य होतं. मराठीतील अनेक कृतींना त्यांनी हिंदीत नेलं. या संग्रहात ‘कुसुमाग्रज’ या कवितेत ते म्हणतात, ‘लाल जर्द गुलाबाच्या पाकळ्यांवरून चालताना, कुसुमाग्रजांची पावले अलवार होऊन फोड यायचे तेव्हा स्वातंत्र्य आंदोलनातील धगधगते वणवे स्मरायचे!’ गुलजारांच्या सग्यांमध्ये मीनाकुमारीदेखील होती. गुलजारांवर तिचा एवढा विश्‍वास, की आपली शायरीची डायरी तिनं जाताना गुलजारांच्या हवाली केली होती. तिच्या कवितेचे जणू ते विश्‍वस्त होते. मीनाकुमारीवर ‘मीना’ या अगदी छोटेखानी कविता लिहिताना गुलजार व्याकूळ झाले असणार, ती व्याकुळता त्यांच्या शब्दांत ओतप्रोत भरली आहे. ते म्हणतात, ‘डोळे बंद करून झोपली आणि मरून गेली! त्यानंतर श्‍वासही नाही घेतला तिने!’ मीनाकुमारीच्या दर्दभऱ्या, प्रेमासाठी तडफडणाऱ्या जीवनावर आणि त्यापुढं अगदी सोप्या वाटणाऱ्या मूक मृत्यूवर गुलजार यांनी हे जखम करणारं भाष्य केलं आहे. 

गुलजार यांची काव्यशैली चित्रमय आहे. स्वतः उत्तम चित्रकार असल्यानं बहुधा, त्यांच्या कवितांमध्ये चित्रात असावेत तसे छोटे छोटे तपशील येतात. उदा. ‘इंधन’ कवितेत ते म्हणतात, लहानपणी आई शेणाच्या गोवऱ्या थापायची आम्ही त्या गोवऱ्यांवर चेहरे काढायचो, डोळे चिपकवून - कान बनवून.’ 

अशा शब्दांत बालपणीच्या आठवणींचं एक निरागस, लाघवी चित्रकाव्य उमटत जातं. तर, सुक्रिता पॉल या इंग्रजी लेखिकेच्या मनाचं चित्र काढताना ते लिहितात, ‘मला माहितीये, तू रस्ते का विसरून जातेस! तुला प्रत्येक रस्त्याचा शेवट भीतिदायक वाटत असतो.’ अशा तऱ्हेनं व्यक्तीच्या व्यक्तित्वासमोर आपल्या प्रतिभेचा आरसाच जणू ते धरत असतात. उदा. ‘आई’ या त्यांच्या कवितेत कधीच न पाहिलेल्या आईविषयी ते लिहितात, तेव्हा काळजालाच हात घालतात. त्यातल्या काही ओळी अशा, ‘लोक म्हणतात माझे डोळे, माझ्या आईसारखेच आहेत, पाण्यानं ओथंबलेले आहेत परंतु तरीही तहानलेलेच आहेत.’ गुलजारांना अलवार शब्दकळा वश आहेत, परंतु तेवढंच नाही. अत्यंत भावनाशील जगणं जगण्यातून त्यांच्या शब्दांना असा कळीस्पर्श लाभला आहे. थेट हृदयातून येणारे त्यांचे शब्द माणसांच्या हृदयाचा आरपार वेध घेतल्याशिवाय राहात नाहीत. कवितासंग्रहाच्या सुरुवातीलाच त्यांनी स्वतःलाही शब्दांसमोर उभं केलंय. ‘सेल्फ पोट्रेट’ काढताना त्यांनी आधी लिहिलंय, ‘मला तर तुम्ही ओळखताच...’ आणि कवितेत ते म्हणतात, ‘रोजच आरशावर लिहून जात असतो मी माझा चेहरा आणि खाणाखुणा परतल्यावर ओळखण्यात काही चूक होऊ नये म्हणून... परंतु रोजच बदलून जातंय काही न काही’ स्वतःच्या डोळ्यांसमोर सरून जाणारं, दिवसागणिक बदलत जाणारं, उतरणीकडं झुकणारं आयुष्य न्याहाळताना मात्र ते अलिप्त होतात. 

‘सगे सारे’ हा मराठी अनुवाद किशोर मेढे या प्रतिभावंत अनुवादकानं केला आहे. त्यांच्या अनुवाद सामर्थ्याविषयी गुलजारांनी स्वतःच सुरुवातीला दिलखुलासपणे लिहिलंय. ते म्हणतात, ‘पुरी रीसर्च करके आते थे और एक एक लफ्ज के कई शेड दिखा देते थे। लगता था, कपडे की दुकानपर बैठे थान पे थान खोलते चले जा रहे हैं।’ खरं तर गुलजारजींच्या या शब्दांतच किशोर मेढे यांच्या अनुवादाचं सगळं सौंदर्य कौशल्य याविषयीचं भाष्य आहे. 

एकतर मुळात अनुवाद करणं, तेही कवितेचा अनुवाद करणं हीच एक मोठी जोखीम असते. कवितेचा अनुवाद शक्‍य तरी असतो का, असंही मनात येतं. त्यातून या कविता गुलजार यांच्या. त्यांच्या शब्दकलेचा भरजरी, मलमली पोत मराठीत आणणं हे केवढं अवघड आव्हान होतं. परंतु, या कविता वाचताना किशोर मेढे यांनी ते आव्हान उत्तम पेलल्याचं जाणवत राहातं. गुलजारांच्या संवेदनशीलतेचं प्रतिभेचं पैठणीवस्त्र त्यांनी तेवढ्याच ‘ग्रेसफुली’ मराठीत आणलंय. विशेष म्हणजे वाचताना गुलजार यांच्याच कविता मुळातून वाचतोय असं वाटत राहतं. अनुवादकाच्या कविता वाचतोय असा भासही होत नाही, हे किशोर मेढेंचं श्रेय मोठं आहे. त्यासाठी अरुण शेवते, स्वतः गुलजार आणि किशोर मेढे या तिघांनी केलेल्या चर्चा किती परिणामकारक ठरल्या याची कल्पना या कविता वाचताना येते. कारण तो केवळ शाब्दिक अनुवाद करायचा नव्हता, तर त्यांनीच मनोगतात म्हटल्यानुसार शब्दातून सूचित होणारा अर्थ, कवितेचा आतला आवाज, यांचा अनुवाद त्यांना करायचा होता आणि त्यांनी तो समर्थपणे केला. अरुण शेवते यांचे मनोगत आणि एकूणच त्यांची निर्मितीतली गुंतवणूक लक्षणीय आहे. 

संबंधित बातम्या