पाकिस्तानमधील छळाची कहाणी

अरविंद तेलकर
सोमवार, 6 मे 2019

पुस्तक परिचय
 

युद्धस्य कथा रम्यः असं नेहमीच म्हटलं जातं. खरोखरच युद्धाच्या कथा रोमांचित करत असतात. या कथा कथन करणारा स्वतःच जर सैनिक असला, तर या कथांची खुमारी आणखीनच वाढते. अर्थात सर्वच कथा काही रम्य आणि रोमांचित करणाऱ्या नसतात. काही कथा भयावह, माणुसकीला काळिमा फासणाऱ्या शत्रूच्या हिंस्र वागणुकीच्या असतात. याचा प्रत्यक्ष अनुभव घेतलाय भारतीय जवान चंदू चव्हाण यानं.

चंदू चव्हाण याला २९ सप्टेंबर २०१६ रोजी पाकिस्तानमधील सैनिकांनी पकडलं आणि सुरू झाला तब्बल तीन महिने २१ दिवसांचा नरकवास. पाकिस्तानी सैनिकांना अद्दल घडवण्यासाठी भारतीय लष्करानं राबवलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर काही काळातच चंदू चव्हाणला पकडण्यात आलं होतं. पाकिस्तानातल्या ‘द डॉन’ या दैनिकाच्या एका हिंदू पत्रकार महिलेनं केलेल्या ट्विटमुळं चंदू पाकिस्तानी सैनिकांच्या ताब्यात असल्याचं गुपित फुटलं होतं. त्याला सोडवण्यासाठी लष्कर आणि सरकारनं सर्वतोपरी प्रयत्न केले. त्याचं फळ मिळालं २१ जानेवारी २०१७ रोजी. त्याच दिवशी चंदूची सुटका झाली आणि तो मायभूमीत परतला. त्यासाठी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले होते.

जळगाव जिल्ह्यातील पाचोडा हे चंदूचं मूळ गाव. त्याच्या वडिलांचं किराणा मालाचं दुकान होतं. दुकानातून जेमतेम प्राप्ती होत असे. आर्थिक परिस्थिती बेतासबात असली, तरी चंदू, त्याचा भाऊ भूषण आणि बहीण रूपाली सुखात नांदत होते. अशातच एके दिवशी वडील तापानं फणफणले. काही दिवस त्यांनी ताप अंगावरच काढला. आजार बळावू लागल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु, उपचारांना त्यांचं शरीर फारसं प्रतिसाद देत नव्हतं आणि एके दिवशी त्यांचं निधन झालं. दुर्दैवानं वडिलांच्या पाठोपाठ वर्षभरानं आईचंही कर्करोगामुळं निधन झालं.

आई-वडिलांचं कृपाछत्र हरपल्यानंतर भूषण आणि रुपालीला आजी-आजोबा घेऊन गेले. चंदू गावतच असलेल्या त्याच्या आत्याकडं राहू लागला. तिच्यासोबत दुसऱ्यांच्या शेतावर काम करायला जाऊ लागला. याच काळात त्याला खेळ खेळण्याचा नाद लागला. शाळाही सुरू होती. सहावीनंतर तोदेखील आजोळी राहण्यास बोरविहीर गावी गेला. इथूनच त्याच्या आयुष्यात बदल होऊ लागले. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर भाऊ भूषण लष्करात गेला. हाच आदर्श गिरवत चंदूही लष्करात दाखल झाला. अठरा महिन्यांचं खडतर प्रशिक्षण घेतल्यानंतर त्याची रवानगी सांबा भागातील सीमेवर करण्यात आली.

जम्मू काश्‍मीरची सीमा कायम धगधगती असते. उरी क्षेत्रही त्याला अपवाद नाही. पाकिस्तानी सैनिकांकडून जवळजवळ रोजच या भागात गोळीबार केला जातो. चंदूला पकडण्याची काही दिवस आधी भारतीय हद्दीत शिरलेल्या दहशतवाद्यांनी हेमराज नावाच्या एका सैनिकाचं शीर कापून नेलं होतं. पाकिस्तानच्या या कृतीनं लष्करातील प्रत्येकाच्या अंतःकरणात प्रतिशोधाचं स्फुल्लिंग चेतवलं गेलं होतं. प्रतिशोधाचा हा वणवा चंदूच्याही मनात पेटला होता. त्याच तिरीमिरीत त्यानं पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश केला. हेमराजच्या मृत्यूचा बदला घेण्याचा त्याचा उद्देश होता. पाकिस्तानच्या हद्दीत जवळजवळ चार किलोमीटर आत गेल्यानंतर त्याला एका टेकडीवर पाकिस्तानी चौकी दिसली. चौकीतल्या सर्व सैनिकांचा खातमा करण्याच्या उद्देशानं त्यानं टेकडी चढण्यास सुरुवात केली. अर्धीअधिक टेकडी चढल्यानंतर त्याला पकडण्यात आलं. तिथून लगेच लष्करी कोठडीत रवानगी करण्यात आली. पाकिस्तानी तुरुंग म्हणजे काळकोठडीच असते. कोठडीतून सुटका होईपर्यंत चंदूनं सूर्यप्रकाश पाहिलाच नाही. रात्री-बेरात्री आणि दिवसा कधीही दोन-तीन सैनिक कोठडीत शिरत आणि मारहाण करत. सर्जिकल स्ट्राईकची माहिती विचारत. चंदूनं आपल्याला काहीच कळत नसल्याचा आव आणला होता. कोणत्याही प्रश्नाला त्यानं उत्तर दिलं नाही. काहीच बोलत नसल्यानं पाकिस्तानी सैनिकांनी मारहाणीबरोबरच त्याला शरीरभर सुया टोचून बेजार केलं. शारीरिक आणि मानसिक अत्याचार केले. हा सर्व छळ त्यानं मोठ्या धैर्यानं सहन केला.

चंदूबाबत डॉन दैनिकानं केलेल्या ‌ट्विटपासूनच ‘सकाळ’चे उपसंपादक संतोष धायबर यांनी या बातमीचा पाठपुरावा केला होता. चंदूबाबतची प्रत्येक बातमी त्यांनी ई-सकाळवर प्रसिद्ध केली आणि चंदूच्या सुटकेनंतर धुळ्याला जाऊन प्रत्यक्ष त्याची भेट घेतली. चंदूची पाकिस्तानमधील कहाणी ’सकाळ साप्ताहिक’मधून सर्वप्रथम प्रसिद्ध झाली होती. वाचकांच्या अधिक सविस्तर माहिती हवी होती त्यामुळे त्याचं पुस्तक करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. सहज आणि साध्या सोप्या भाषेत लिहिलेलं हे पुस्तक वाचताना, पाकिस्तानबाबतच चीड निर्माण होते आणि चंदूच्या धैर्याचं कौतुक वाटतं.  

संबंधित बातम्या