एक रुचिसंपन्न संगीतज्ञ!

आशा अग्निहोत्री
सोमवार, 31 जानेवारी 2022

पुस्तक परिचय

काही लेखक फार सहजपणे वाचकाला स्वतःच्या लेखनात गुंतवून ठेवतात आणि वाचकाला त्यांच्या पुढल्या लेखाची आतुरतेने वाट पाहायला लावतात. ही हातोटी ज्योती दाते यांना सहज अवगत आहे. अतिशय सकारात्मक आणि नेटके लेखन आणि नेमकेपणा साधणारे, हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख आकर्षण. आपल्या यजमानांच्या आयुष्यावरील गोष्ट कथित करताना ही सर्व लेखन वैशिष्ट्ये प्रामुख्याने ज्योती दाते यांच्या ‘लाजवाब’ या चरित्र लेखनामध्ये आढळतात. 

‘लाजवाब’ या पुस्तकात जगजित सिंग, पंकज उधास, गुलाम अली, तलत अझीझ, अनुप जलोटा, चंदन दास, भुपींदर सिंग, अनेक दिग्गज मंडळींबरोबरच सर्व मंगेशकर कुटुंबीय, पंडित भीमसेन जोशी, पंडित कुमार गंधर्व, पंडित वसंतराव देशपांडे, पु. ल. देशपांडे; अगदी संगीत, लेखन क्षेत्रातील एकूण एक मराठी, हिंदीतील दिग्गज मंडळींबरोबर रवी दाते यांनी केलेला त्यांचा संगीत प्रवास ज्योती दाते यांनी फारच सुबकतेने वर्णन केला आहे. अनेक वर्णन केलेल्या प्रसंगांमध्ये आपण हजरच होतो की काय असे भासते. यूट्युबच्या जमान्यात दृश्य-कला सहज उपलबद्ध असताना लेखनाच्या माध्यमातून सर्व प्रसंग कल्पकतेने वाचकांसमोर उभे करणे, हे कौशल्य निश्चितीच ‘लाजवाब’ या पुस्तकात अनुभवायला मिळते.

वडील रामुभय्या दाते आणि ज्येष्ठ बंधू अरुण दाते यांची संगीत क्षेत्रातील कारकीर्द सर्वश्रुत असताना स्वतःची ओळख वेगळ्या पद्धतीने मांडणे, हे तसे रवी दाते यांच्यासमोरील मोठे जिकिरीचे काम. या क्षेत्रात ओळख, वशिला आणि वरदहस्त दीर्घ काळ साथ देऊ शकत नाही. तुम्हाला श्रोत्यांसमोर तुमचे वेगळेपण मांडावेच लागते. ते दीर्घकाळ टिकवणे हे त्याहून मोठे आव्हान असते. रवी दाते हे एक उत्तम गजल संगीतकार तर होतेच पण अतिशय जिंदादिल, अभिरुचीसंपन्न कानसेन होते. एक उत्तम खवय्ये, संगीतज्ञ आणि त्याच्या जोडीला ऐटबाज जीवनशैली पसंत असणारे होते. हे लेखिकेने त्यांच्या लेखनातून रोचकपणे मांडले आहे. अशा रुचिसंपन्न राहणीमानासाठी त्यांनी आयुष्याच्या प्रत्येक वळणावर घेतलेले निर्णय आणि त्यासाठी इमाने इतबारे करावी लागलेली धडपड, अर्थकारण हे आत्ताच्या पिढीच्या कलाकार मंडळींनीही आवर्जून समजून वाचावे असे आहे.

एखाद्या अवलिया व्यक्तिमत्त्वाचे एवढे कोडकौतुक होते, तेव्हा त्याच्या मागे काही प्रियजन अर्थातच खंबीरपणे उभे असतात हे ओघाने आलेच आणि त्यात ज्योती दाते या त्यांच्या अर्धांगिनीने घेतलेले कष्ट याला मोलच नाही. फार काळजीपूर्वक, मनाने कुठेही कोणी दुखावले जाणार नाही या बेताने त्यांनी रवी दात्यांबरोबर केलेला त्यांचा जीवनप्रवास ही स्वतःची बाजू फार सुंदर मांडली आहे. स्वतःची लेखिका, पत्रकार ही छबी नवऱ्याच्या कलेकलेने सर्वकाही करून जपणे आणि यामध्ये ज्योतीताईंची झालेली घालमेल वाचकाच्या नजरेतून सुटत नाही. लग्न करण्यासाठी स्थळ म्हणून ज्योतीताईंना पाहायला आलेले रवी दाते, त्यांचा पाहण्याच्या कार्यक्रमाचा प्रसंग आणि तेव्हापासून जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर घडलेल्या नाजूक, कठीण, मौजेच्या आणि संस्मरणीय आठवणी या चरित्रलेखनात फारच सुंदर कथित केलेल्या आहेत. ज्योती दाते आपली पत्नी म्हणून आयुष्यात पदार्पण करण्यापूर्वीचा इतिहासही रवी दात्यांनी आपल्या पत्नीस सर्व खाचाखोचा, बारीक तपशिलासह कथित केल्याने तो ज्योती दाते यांनी सुंदर शब्दबद्ध केला आहे. यावरून एक गोष्ट जाणवते की रवी दाते व ज्योती दाते हे उभयता  एकमेकांचे घट्ट मित्रही होते. त्यांच्यातील अभूतपूर्व मैत्रीमुळे ते मोकळेपणाने एकमेकांशी नेहमीच सर्व विषयांवर ज्या गप्पा मारायचे त्यातूनही लेखन सहज साकारले गेले आहे. 

रवी दाते यांनी त्यांच्या हयातीत हे लेखन आत्मचरित्र म्हणून लिहिले नाही, कारण त्यांच्या घरातच एक ताकदवान लेखक आहे हे त्यांना माहीत होते. आत्मचरित्र लिहायचे असे त्यांनी ठरविले होते, पण लिहायचा कंटाळा ही सबब पुढे करून त्यांनी ही जबाबदारी आपल्या लाडक्या सुविद्य पत्नीवर सोपवली होती. आपल्या आत्मचरित्रास आपली पत्नीच योग्य न्याय देऊ शकते याची पूर्ण खात्री रवी दाते यांना असल्याने ते आत्मचरित्र या जबाबदारीतून निर्धास्त राहिले. 

रवी दाते सर्व मित्र परिवारात, आप्तेष्ट, नातेवाईक, संगीत क्षेत्रात आणि अगदी व्यवसायातही ‘किस्से रंगवून’ सांगण्यासाठी प्रसिद्ध होते. त्यांच्या राहत्या घराचे नाव याच त्यांच्या गुणामुळे त्यांनी ‘मैफल’ असे ठेवले. अर्थातच यजमानांच्या या स्वभावाचा उपयोग ज्योतीताईंना पुस्तक लिहिताना पुरेपूर झाला. ‘लाजवाब’ वाचताना रवी दाते यांनी केलेले कथन आणि ज्योती दाते यांनी त्याचे केलेले रूपांतरित लेखन हे अर्थातच या गुणी लेखिकेचा परिस स्पर्श आहे हेसुद्धा वाचकास जाणवते.

 ‘लाजवाब’ हे रवी दाते यांचे व्यक्तिचित्रण मला प्रामुख्याने आवडायचे कारण म्हणजे रवी दाते यांनी काळानुसार कायम स्वतःला कसे बदलले आणि हे करताना जीवनाचा पुरेपूर आनंद घेण्यात कुठेही कसर सोडली नाही, हा मला मिळालेला मंत्र. त्यांचा स्वतःचा मुलगा समीर दाते व त्यांची स्नुषा दिपाली सोमय्या-दाते हे उत्तम गायक आहेतच. खरेतर या दोघांमुळे रवी दात्यांच्या स्वरबद्ध केलेल्या गझल रचना आता सर्व श्रोत्यांपर्यंत पोचत आहेत. अनेक नवोदित अलीकडल्या गायकांना वेगळ्या पद्धतीने गुरू म्हणून शिक्षण देऊन ‘गुरू शिष्य’ परंपरेतही रवी दाते यांनी नवीन बदल अवलंबला. सध्याच्या काळातील आपल्या आवडत्या गायिका प्रियांका बर्वे, बेला शेंडे, सावनी रवींद्र या रवी दात्यांच्या शिष्या. हे सर्व अर्थातच ‘लाजवाब’मध्ये वाचायला मिळेल.

ज्योती दाते यांनी हे चरित्र लेखन केवळ एक वर्षात आपल्या जोडीदाराचे निधन झाल्यावर पूर्ण केले आणि यजमानांच्या प्रथम स्मरणदिनी प्रसिद्ध केले.आपल्या लाडक्या मित्रास आणि पतीस याहून खास श्रद्धांजली असूच शकत नाही. रवी दाते यांचा मूळचा पिंड ‘हम जहाँ होते है महफिल वहा जम जाती है’ असा होता. ‘लाजवाब’ पुस्तकाद्वारे ज्योती दाते आपल्याला ‘दाते मैफिलीत’ सहज सामावून घेतात.

  • लाजवाब
  • लेखिका :  ज्योती दाते
  • प्रकाशन : ग्रंथाली प्रकाशन, मुंबई
  • किंमत : ₹    ४००
  • पाने : १८६

संबंधित बातम्या