मनस्वी कवीची जीवनगाथा

आशा साठे
गुरुवार, 11 जानेवारी 2018

पुस्तक परिचय
 

अलीकडेच सर्वोत्कृष्ट अनुवादासाठी ‘साहित्य अकादमी पुरस्कार (२०१६) मिळालेले मिलिंद चंपानेरकर यांनी अक्षय मानवानी यांनी लिहिलेल्या कवी साहिर यांच्या जीवनाचा मागोवा घेण्याऱ्या पुस्तकाचा केलेला हा अनुवाद. साहिर यांच्या काव्याचे मोल जाणत असल्याने, त्यातील उर्दू शब्दांची साहिर यांची काव्यात्म ताकद; भावार्थ देताना उणावू नये यासाठी उर्दू काव्यशास्त्राचा व्यासंग असणारे सय्यद आसिफ यांनी त्यांना मित्रत्वाने साथ केल्याचा उल्लेख चंपानेरकरांनी आवर्जून केला आहे.
रूढ अर्थाने चरित्र म्हणावे असे हे पुस्तक नाही; तर कवी साहिर यांच्या कवितांचा, त्यांच्या चित्रपट कारकिर्दीचा, त्यातही दिसणाऱ्या जीवननिष्ठांचा, मूल्यांचा आणि त्यावर प्रभाव टाकलेल्या त्यांच्या व्यक्तिविशेषांचा (गुण, अवगुणासहित) मागोवा घेणारं असं हे लिखाण आहे.

८ मार्च १९२१ मध्ये पंजाबमधील लुधियाना शहरात साहिर यांचा जन्म झाला. मूळ नाव अब्दुल, त्यांच्या वडीलांचे घराणं मोठ्ठे धनवान, जमीनदार. वडील मगरुर, साहिर यांची आई सरदार बेगम त्यांची अकरावी पत्नी. पण अब्दुल पहिलाच मुलगा. नवऱ्याच्या एकूण वर्तनाला कंटाळून आणि मुलाला नीट शिकवायचे या हेतूने त्या नवऱ्यापासून वेगळ्या राहू लागल्या. आपल्या भावांच्या मदतीने त्यांनी मुलाच्या पालनपोषणाची जबाबदारी पेलली. शालेय वयातच त्यांचा काव्याकडील कल वाढत गेला. मॅट्रिकच्या परीक्षेला बसलेल्या अब्दुल यांनी एका कवितेतूनच साहिर (जादूगार) हा शब्द निवडला आणि ते साहिर लुधियानवी झाले. टोपण नावाद्वारे आपला पैतृक संदर्भही त्यांनी मनाने नाकारला. वडिलांच्या वर्तणुकीची छाया जीवनावर पडली होती पण त्यामुळे जमीनदारीबद्दल तिरस्कार, भांडवलदारीबाबत भ्रमनिरास, दीनदलित गरिबांबद्दल कळवळा यांनी मोठं काव्यरूप घेतलं. आईबद्दलची संवेदनशील जाणीव पुढे त्यांच्या स्त्रीविषयक कवितांतून प्रकट होत राहिली. साहिर जन्मभर अविवाहित राहिले. पन्नास-साठचा हिंदी सिनेसृष्टीतील गीतांचा सुवर्णकाळ घडवण्यात त्यांचा वाटा मोठा होता. विद्यार्थिदशेपासून प्रागतिक विचारसरणी अंगीकारणारे, त्यामुळे प्रसंगी कॉलेज सोडणारे, धर्मनिरपेक्षता, शोषणरहित समाज याबाबत तीव्र जाणीव जन्मभर धगधगती ठेवणारे साहिर, त्याचवेळी अत्यंत काव्यात्म तरल भावाविष्कार गीतातून गुंफणारे साहिर असं त्यांचं व्यक्तिचित्र या पुस्तकात हळूहळू प्रकट होत जातं. अनेक ठिकाणाहून माहिती गोळा करत, अनेक संबंधित व्यक्तींशी बोलत, मुलाखत घेत मनवानी यांच्या मनातील साहिर प्रतिमा जशी ठळक होत गेली तशीच ती पुस्तकातून मांडण्यात आली आहे. निष्कर्ष काढण्याचा खटाटोप न करता इथे वाचकांना एक कलावंत व्यक्ती जाणून घ्यायचा प्रवास करायला लावला आहे. फाळणीनंतर मुंबईत ‘बडा साँग रायटर बनूंगा’ म्हणून राहिलेल्या साहिर यांची बाजी, टॅक्‍सी ड्रायव्हर, देवदास, नया दौर, प्यासा, फिर सुबह होगी, साधना, धूल का फूल, हम दोनो, गुमराह, ताजमहाल, वक्त, कभी कभी अशी शंभरच्या वर चित्रपटांची भरगच्च फिल्मोग्राफी हे पुस्तक त्यातील गीतांच्या आस्वादासह समोर ठेवते. त्यांच्या ‘तल्खियाँ,’ ‘परछाइया’ (युद्ध विरोधी दीर्घ कविता) ‘आओ की कोई रव्वाब बुने’ या स्वतंत्र कविता संग्रहाची छाया सदैव त्यांच्या चित्रपट गीतांवर आहे.

प्यासाची काव्यात्मता आणि वास्तवदर्शन, आईवरील आत्यंतिक प्रेम, अमृता प्रीतम आणि अनेक स्त्रियांबरोबरचे प्रेम धागे यावर स्वतंत्र प्रकरणं आहेत. अनेक बाबतीत अहंकारी, अनेक बाबतीत भित्रे, निर्णय घेऊ न शकणारे. सदैव मित्रपरिवारात राहणारे असे आणि अनेक अंतर्विरोध पेलणारे १९८० मध्ये या जगाचा निरोप घेणारे कवी साहिर इथे भेटतात. पण मनात उरतात ते ‘जिन्हे नाज है हिंदपर वो कहा है?’ आणि ‘ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्‍या है?’ असे प्रश्‍न विचारत अस्वस्थ करणारे पण ‘वो सुबह कभी तो आएगी’, ‘वो सुबह हमी से आएगी’ असा विश्‍वास जागविणारे प्रागतिक विचारांशी प्रामाणिक नातं जपणारे असे द्रष्टे कलावंत.

लोककवी साहिर लुधियानवी
 लेखक : अक्षय मनवानी 
 अनुवाद : मिलिंद चंपानेरकर 
 प्रकाशक : रोहन प्रकाशन, पुणे 
 किंमत : ३२० रुपये.
 पाने : ३३८

संबंधित बातम्या