वास्तवचित्रित कादंबरी

आशा साठे
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

पुस्तक परिचय
...के हर ख्वाहिश पे
 प्रकाशक : राजहंस प्रकाशन, पुणे
 लेखक ः अरुणा देशपांडे
 किंमत ः  ३५० रुपये
 पाने : २८४

तरुण वयात मार्क्‍सवादाच्या प्रभावाने फक्त आपल्या व्यक्तिगत आयुष्याविषयी स्वप्ने न पाहता भोवतालच्या समाजात परिवर्तन घडवून आणण्याच्या ध्यासाने झपाटलेल्या, आयआयटी किंवा जेएनयुसारख्या शिक्षण संस्थेतून उच्च शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या मित्रमंडळींची त्यांच्या तशाच शिकलेल्या, स्त्री मुक्ती चळवळीच्या विचारांची पार्श्‍वभूमी असलेल्या जोडीदाराची कहाणी या कादंबरीत समोर येते. 

लग्नानंतर वीस बावीस वर्षांनी बहुतेक विवाहित जोडप्यांच्या आयुष्यात ‘मिडल एज क्रायसिस’ हा पॉइंट येतो म्हणतात. या कहाणीची सुरुवात या पॉइंटवरच होते. जागतिकीकरणाच्या रेट्याने सामाजिक चळवळीचा अवकाश आक्रसत असताना या मित्रमंडळींनी आपली ध्येयं, स्वप्नं यांची तपासणी केलेली आहे. काय मिळवलं? काय गमावले? पर्सनल इज पोलिटिकल या विचारापासून कितपत दूर आलो? व्यक्तिवादी होण्यापासून वाचवता येतं का? लग्न संस्थेत अडकताना जी स्त्री-पुरुष समतेची भूमिका घेतली ती कितपत निभावली? कोणाच्या जिवावर? मुळात निभावता येणं शक्‍य असतं का? असे असंख्य प्रश्‍न घेऊन यातली माणसं प्रामाणिकपणे स्वतःला तपासत आहेत.
पहिल्या भागात मोठ्ठा पत्रकार झालेला हेमंत आणि बॅंकेतील नोकरी सांभाळून; एक आपले मूल आणि एक दत्तक मूल सांभाळताना मूल्यभाव जपत कुटुंब उभं करणारी वर्षा यांची कहाणी आहे. 
दुसऱ्या भागात कामगारांच्या प्रश्‍नावर काम करणारा मोठा अभ्यासू, डॅशिंग, बासरी वाजवणारा शिशिर आणि कॉलेजात नोकरी करणारी, विद्यार्थ्यांच्या मदतीने विविध प्रकल्प करणारी ग्रीष्मा यांची कहाणी आहे.

तिसऱ्या भागात समाजशास्त्रज्ञ बनलेला नामवंत प्राध्यापक शरद आणि आधुनिक विचारांशी अपरिचित असलेली, त्याबद्दल कधीच ओढ निर्माण न होऊ शकलेली, पारंपरिक गृहिणीपणात रमण्याची स्वप्नं पाहात लग्न करून आलेली वासंती यांची कहाणी आहे.
या कहाण्या पात्रांच्या मनोगतातून शोधाव्या लागतात. यांच्या निमित्ताने इतर व्यक्तींच्याही कहाण्या येतात. 

वीस पंचवीस वर्षात सगळंच झपाट्याने बदललं आहे. या बदलत्या वातावरणात खूप लढाया सगळ्यांनाच लढाव्या लागल्या आहेत. मुद्दा परिवर्तनाचा असो किंवा मानवी मूल्यांचा. खरी लढाई बाहेरच्या जगाशी असते. तशी स्वतःशीही असते. आपण जे बोलतो, इतरांना सांगतो त्याप्रमाणे वागणं कितपत शक्‍य झालं, याचा लेखाजोखा प्रामाणिकपणे प्रत्येकजण मांडतो. पुन्हा प्रत्येकाचा आपला आपला आतला आवाज असतो. तो दिशा ठरवतो. मग कुणी एखाद्या कंपनीत मॅनेजर बनतो, कुणी एनजीओच्या आधाराने तडजोडी करतो, स्त्री पुरुष नात्याचे गुंते होतातच. क्वचित समर्थनाचा सूर चढा लागतो. वैचारिक चिंतन, चर्चा असंच लेखनाचे स्वरूप आहे. कथानकाची एकरेषीय मांडणी नाही. त्यामुळे तोचतोचपणा आला आहे. कुठे अनाठायी विस्तार झाला आहे. पुढील पिढीने उभे केलेल्या प्रश्‍नाने कादंबरी सुरू झाली आहे. पण तो धागा पुढे प्रमुख राहिलेला नाही. शिशिर ग्रिष्मा, शरद वासंती यांच्या आयुष्यातले काही प्रसंग प्रत्ययकारी आहेत. पण एकूण प्रसंग घटना यापेक्षा कादंबरीचे स्वरूप वैचारिक वास्तव चित्रणाचे आहे. 

वासंतीने घटस्फोट स्वीकारणे, त्यामागची भूमिका प्रभावीपणे येते. मग इतर पुरोगामी, मुक्त विचाराच्या स्त्रियांचे काय? वर्षा आणि ग्रीष्मा यांच्या मनोगतातून. ती भूमिका स्पष्ट झाली आहे. आपल्या जोडीदारांच्या विचारसरणीचे महत्त्व त्यांना कळले आहे. त्यावर भाळूनच आपण त्यांच्यावर प्रेम केले. जोडीदार म्हणून त्यांची निवड केली हे सत्य त्या नाकारत नाहीत. अस्वस्थ वर्तमान वाट्याला आले तरी खंबीर वैचारिक भूमिकेमुळे जगण्याची इयत्ता कशी वाढते याची त्यांना जाण आहे. त्यामुळे त्या संसार टिकवत आहेत; पण तो पारंपरिक भूमिकेतून नाही. 

अशा प्रकारच्या प्रामाणिक सिंहावलोकनातून कदाचित पुढची वाट स्वच्छ होण्याची शक्‍यता!

संबंधित बातम्या