आयुष्याच्या तपासणीचा ऐवज

आशा साठे
सोमवार, 17 जून 2019

पुस्तक परिचय
 

‘ऐवजी’ या नंदा खरे लिखित पुस्तकाला एप्रिल २०१९ मध्ये उत्कृष्ट ग्रंथनिर्मितीचा पुरस्कार मिळाला. चंद्रमोहन कुलकर्णी यांचं मुखपृष्ठ आणि फाल्गुन ग्राफिक्‍स यांची मांडणी. 

‘ऐवजी’ हे नंदा खरे यांचं पुस्तक रूढ अर्थानं आत्मचरित्र, आत्मकथन असं संबोधलं जाईल. पण, खरं तर ते आत्मचरित्राऐवजी अशा स्वरूपाचं लेखन आहे, ज्यात नंदा खरे यांना ‘ऐवजी’ शब्दाऐवजी ‘ऐवज’ हा शब्द अधिक पसंत आहे. ते स्वतःला साहित्यिक म्हणत नाहीत, तर लेखक म्हणतात. हा ऐवज लिहिण्यामागं त्यांची स्वतःची खूप विचार करत, आयुष्य तपासत सिद्ध झालेली भूमिका आहे. कोणताही तत्त्वज्ञ, शास्त्रज्ञ, कलाकार, उद्योजक वगैरे आयुष्यात जे काही बरेवाईट करतो ते त्याचं एकट्याचं कधीच नसतं. स्थलकालाचा त्या आयुष्याच्या ताण्याबाण्यात खूप संबंध असतो. त्याची संस्कृती, सामाजिक स्थान, त्या व्यक्तीचा वर्ग आणि एकूण भोवताल याचा खूप वाटा असतो. या दृष्टीनं स्वतःचं आयुष्य तपासताना, मराठी मध्यमवर्गीय ब्राह्मण लोकांपैकी एका मोठ्या गटाचा प्रतिनिधी म्हणून हा शोध घेताना, जी उत्तरे सापडली ती म्हणजे तो ‘ऐवज’ हे पुस्तक वाचकांसमोर ठेवतं. 

पुस्तकाच्या पहिल्या भागात वाचकांना आत्मचरित्रात अपेक्षित असते, ती जीवन कहाणी आहे. म्हणजे त्यांच्या वडिलांची खरे-तारकुंडे ही प्रसिद्ध बांधकाम कंपनी. आई डॉक्‍टर. देव मानणारे नसले, तरी देवाचे हे लाडके म्हणावेत अशी सर्व अनुकूलता. शिक्षण, व्यवसाय, नातीगोती, संसार, मुलंबाळं, मित्रमंडळी सगळंच व्यवस्थित. आयुष्याबद्दल कुरकूर करावी असं काहीच नाही. इतरांच्या दृष्टीनं सुख-दु:ख म्हणावं, अशी काहीतरी अस्वस्थता नंदा खरे यांना वाटत होती. जीवनाला अर्थ देणारं, सार्थ ठरवणारं सहावं सुख शोधत राहण्याची आस लागली. चौतीस वर्षांच्या व्यवसायानंतर पंचावन्नाव्या वर्षीच त्यांनी खूप लवकर व्यवसायातून निवृत्ती घेतली. या जगाबद्दलचा त्यांच्या मनात एक परात्म भाव वाढत होता. पण त्यातून नैराश्‍याकडं जाण्याचा स्वभाव नव्हता. हे असं का? हे समजून घेण्यासाठी त्यांनी अभ्यासाची वाट धरली. विज्ञान आणि मानव्यशाखांच्या अभ्यासातून एकूणच तपासणी सुरू झाली. त्याला पूरक अनेक नवे उद्योग सुरू झाले. आजचा सुधारक, कळमेश्‍वरसारख्या ठिकाणी शिकवणं, अनेक पुस्तकांच लेखन, संपादन, मराठी विज्ञान परिषद अशा आयुष्याच्या भरगच्च सेकंड इनिंगची हकिगत पुस्तकाच्या दुसऱ्या भागात आहे. 

पुन्हा तिसऱ्या भागात आपल्या नव्या दृष्टिकोनातून आयुष्याची मुख्यतः शिक्षण, ज्ञान, कौशल्य, संपादन आणि वर्ग यांची तपासणी आहे. त्यात जी उत्तरं समोर आली आहेत, नव्या आर्थिक भांडवली संस्कृतीच्या संदर्भात, एकूण माणसाच्या जगण्याच्या संदर्भात, बदलती जीवनशैली आणि मूल्यव्यवस्था या संदर्भात, स्पर्धा आणि सहकार्य यातल्या नीतिविचारासंदर्भात ती उत्तरं म्हणजेच हा ‘ऐवज’! विचार करणाऱ्यांनी तो उचलून तपासत राहावं आणि सुख शोधावं इतकंच या पुस्तकाचं मागणं आहे.    

संबंधित बातम्या