टिळकांच्या नेतेपणाचा आलेख 

आशा साठे 
सोमवार, 23 डिसेंबर 2019

पुस्तक परिचय
 

लोकमान्य टिळकांचा हा चरित्रग्रंथ १ ऑगस्ट २०१९ रोजी लोकमान्यांच्या पुण्यस्मरण शताब्दीनिमित्त विशेष आवृत्ती म्हणून सकाळ प्रकाशनाने प्रसिद्ध केला आहे. याची मूळ आवृत्ती पूर्वी ‘गंधर्ववेद’ प्रकाशनाच्या खाडिलकर बंधूंनी काढली होती. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील नेत्यांमध्ये लोकमान्य टिळक यांचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे. संपूर्ण देशाचे नेतृत्व करणारा हा पहिला नेता. त्यांच्या हयातीतच ते चरित्रलेखनाचा विषय झाले होते. नंतरही विविध अभ्यासकांनी त्यांच्याबद्दल लिहिले. विविध दृष्टिकोन त्यात व्यक्त झाले. त्या सर्वांना वाट पुसत, त्यांच्या दृष्टिकोनाची दखल घेत डॉ. सदानंद मोरे यांनी चिकित्सकपणे जास्तीत जास्त तटस्थपणे अभ्यासविषय म्हणून चरित्रनायकाचे परीक्षण करत हे चरित्र सिद्ध केलेले दिसते. 

लोकमान्य टिळकांच्या सार्वजनिक जीवनातील घटना त्यांच्या विचारपद्धतीमुळे नेहमीच चर्चेचा विषय ठरल्या आहेत. आजच्या काळातही पुन्हा पुन्हा त्यांनी निर्माण केलेल्या संस्था, काढलेल्या वर्तमानपत्रांची भूमिका, वेगवेगळ्या कारणांनी दिलेले कायदेशीर लढे, त्यातले त्यांचे युक्तिवाद, राजकारणातली जहाल भूमिका, विशेषतः त्यात दाखवलेले धाडस, शठं प्रति शाष्ठ्यं असा लढाऊ बाणा, हिंदुत्ववादी नसून निष्ठावंत हिंदू असणे, गणेशोत्सवासारखे उत्सव सुरू करणे, ‘स्वराज्याची सर सुराज्याला नाही,’ असे म्हणून आगरकर या आपल्या मित्रापासून शेवटपर्यंत अनेकांचे शत्रुत्व पेलणे, ब्रिटिशांविरुद्ध असंतोषाचा अग्नी कायम धगधगता ठेवणे, वेदांचा गणित अभ्यास, गीतारहस्यासारखा ग्रंथ लिहिणे, शेवटपर्यंत देशाच्या स्वातंत्र्यापेक्षा कशालाही आपल्या आयुष्यात स्थान न देणे, अशा सर्व महत्त्वाच्या विषयांभोवतीचा निःपक्षपाती इतिहास आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न हे पुस्तक करते. डॉ. सदानंद मोरे अशा लेखनातून नेहमीच वाचकांनी स्वतंत्रपणे विचार करावा अशी मांडणी करतात. तशीच याही पुस्तकाची त्यांनी केली आहे. 

लोकमान्य टिळकांच्या नेतेपणाचा एक आलेख हे पुस्तक आपल्यासमोर ठेवते. शिक्षण संस्थेतील त्यांची भूमिका, त्यातून बाहेर पडल्यावरचे कर्तृत्वाच्या कक्षा रुंदावणारे कार्य, त्याला इंग्रजांशी कायद्याच्या चौकटीत भांडणाची रग, त्यातल्या प्रतिक्रियास्वरूप कृतीमुळे समाजातील काही घटकांमध्ये निर्माण होणारा आनुषंगिक दुरावा, क्रांतिकारकांबद्दल वर्तमानपत्रातून आपलेपणाने बाजू लढवणे, सुरत काँग्रेसमधील लढाऊ बाणा, मंडालेचा सहा वर्षांचा तुरुंगवास, त्यातून बाहेर येऊन पुढील त्यांची कारकीर्द पाहताना नेता हा त्या त्या काळाने घडवलेला असतो का असा प्रश्‍न वाचकांच्या मनात निर्माण होतो. उत्तरार्धातले टिळक, त्यांची मानसिकता थोडी बदललेलीही जाणवते. गांधींची योग्यता ओळखलेले आणि स्वीकारलेले टिळक दिसतात आणि त्यांच्याबद्दलचा आदर अधिकच वाढतो. 

इंग्रजी राजवट ही त्यांची कायम शत्रू होतीच; पण नेमस्त पंथीय असा एका मोठ्ठा विद्वान, विचारी लोकांचा गटही कायम त्यांच्या विरोधात होता. तो का? वाचकांनी आजच्या भोवतालच्या संदर्भात विचार करण्यासारखा प्रश्‍न आहे. 

संपूर्ण चारित्र्याच्या वाचनानंतर माझ्यावर अगदी आकाश जरी कोसळले, तरी निराश न होता माझ्या उद्दिष्टांसाठी मी त्या कोसळलेल्या आकाशाचा उपयोग करीन, अशा बाण्याच्या एका कर्मयोगी नेत्याची प्रतिमा ही चरित्रकहाणी आपल्यासमोर उभी करते.

संबंधित बातम्या