नाट्यपूर्ण घडामोडींचा प्रवास

ज्ञानेश बेलेकर, नाशिक  
गुरुवार, 28 जून 2018

पुस्तक परिचय

वरातीमागून घोडं
 लेखक :  सु. ल. खुटवड
 प्रकाशक : मेनका प्रकाशन,पुणे
 किंमत ः २०० रुपये
 पाने : १५०
 

मराठी विनोदी साहित्याला उच्च दर्जाची परंपरा आहे. मात्र, अलीकडील काही वर्षात विनोदी साहित्याचा दर्जा घसरत चालल्याचे दिसून येते, असा माझा स्वतःचा अनुभव आहे. मी गेली पंचवीस- तीस वर्षे विविध दिवाळी अंकासाठी चित्रे, व्यंगचित्रे, मुखपृष्ठे, खिडकीचित्रे करीत आहे. दोन हजारांपेक्षा जास्त पुस्तकांची मुखपृष्ठे केली आहेत. यासाठी विनोदी साहित्य फार बारकाईने वाचावे लागते. या पार्श्‍वभूमीवर माझे हे मत बनले आहे. सध्या हाताच्या बोटावर मोजण्याइतके दर्जेदार विनोदी लिहिणारे लेखक आहेत. त्यापैकीच सु. ल. खुटवड हे एक आहेत. त्यांचा नवीन कथासंग्रह ‘वरातीमागून घोडं’ हा त्याची साक्ष देणारा आहे.  

कथेचा बांधेसुदपणा, कथा फुलवण्याचे तंत्र, कल्पनाविलास, प्रसंगनिष्ठ विनोद, कोट्या, हजरजबाबीपणा, कथेचा शेवट आदी कसोट्यांवर यातील कथा यशस्वीरीत्या उतरल्या आहेत. विषयांचे वैविध्य आणि नाट्यपूर्ण घडामोडी ही दोन वैशिष्ट्ये मला सुलंच्या लेखनात जाणवली आहेत. 

त्यांच्या कथांमध्ये अनेक मासलेवाईक प्रसंगाबरोबरच इरसाल नमुनेही आपल्याला भेटतात. कथेचा बाज व उंची वाढविण्यात त्यांचा मोठा हातभार लागलेला आहे.   

शेजारणीवर इंप्रेशन पाडण्यासाठी केलेला खटाटोप आणि ही गोष्ट बायकोपासून लपविताना उडालेली तारांबळ म्हणजे ‘सखी शेजारीण’ ही कथा. लेखकाने ही कथा खूप छान पद्धतीने फुलवली आहे. प्रसंगनिष्ठ विनोदाचा उत्तम नमुना म्हणून या कथेकडे पहावे लागेल. ‘चोरातील माणुसकी’ ही कथा हसता हसता वाचकाच्या डोळ्यातून पाणी काढण्यात यशस्वी होते. पोलिसांच्या कार्यपद्धतीवर यात खुसखुशीत ताशेरे ओढले आहेत. पोलिसांपेक्षा चोरच कसा मदतीला धावतो, हा या कथेचा विषय आहे. 

‘रडणारा पोपट’ ही कथा फॅंटसीच्या अंगाने जाणारी उत्तम प्रेमकथा आहे. प्रेमासाठी वाट्टेल ते करणाऱ्या श्रीधरला पोपटाचे रूप घेऊन मुग्धाच्या घरी राहावे लागते व त्यातून झालेले गैरसमज, उडालेला गोंधळ, एकमेकांवरील निस्सीम प्रेम यातून ही कथा फुलत जाते. कथेचा शेवट मात्र चटका लावणारा आहे. 

‘कुत्र्याचा ससेमिरा’ ही आणखी एक अफलातून कथा. भटक्‍या कुत्र्याचा त्रास कोणाला होत नाही? पण सुधीर जगतापची गोष्टच वेगळी. या त्रासातून सुटण्यासाठी तो पोलिस, महापालिका, नगरसेवक यांच्याकडेच काय पण दत्तमहाराजांकडेही खेटेही मारतो. यात सर्वसामान्य माणसाची कशी ससेहोलपट होते, हे खुसखुशीत शैलीत लेखकाने मांडले आहे. सुलंच्या लेखनाची काय ताकद आहे, हे यातून दिसते. 

उपहास आणि उपरोध यांचे उच्च दर्जाचे मिश्रण म्हणजे ‘साहित्यिकांची कर्जमाफी’ ही कथा. साहित्यिकांमधील गटतट, त्यांच्यातील राजकारण, तडजोडी, सरकारचं झुलवत ठेवणं यावर चांगला प्रकाश टाकला आहे. 

सुलंचा कथासंग्रह म्हटलं की एकतरी कथा ही अस्सल पुणेकरावर असणार म्हणजे असणार. या संग्रहात ती ‘हुज्जत’ या नावाने आहे. लोकांशी हुज्जत घालायची आगळी- वेगळी हौस तात्या सरमळकर यांना आहे. धक्कातंत्राचा वापर करत लेखकाने कथेचा शेवट केला आहे.  

हसता हसता वाचकाला अंतर्मुख करणाऱ्या, कथा म्हणून फिट्टमफाट, जत्रेतील थयथयाट, दिल्लीदौरा, चोर- पोलिस या कथांचा उल्लेख करावा लागेल. लोकांची अडवणूक करून प्रत्येक कामाचे पैसे उकळणारा तलाठी भाऊसाहेब ‘फिट्टमफाट’मध्ये आपणाला आढळतो. गावातील राजकारण आणि हेवेदावे याची सफर ‘जत्रेतील थयथयाट’मधून घडते.   

राजकारणात मुरलेला सरपंच व ग्रामसेविका संगीता इंगळे यांचे जमलेले गॉटमॅट खुमासदार पद्धतीने मांडले आहे. संगीताची लाल किल्ला व ताजमहाल पाहण्याची इच्छा सरपंच गावकऱ्यांच्या पैशातूनच कशी पूर्ण करतात. हा सारा जांगडगुत्त्याचा प्रवास अनुभवण्यासाठी ‘दिल्ली दौरा’ ही कथा वाचायला हवी. 

प्रामाणिक पोलिस हवालदार ते सर्वांना पुरून उरणारा हवालदार हा रघुनाथ बारकुटे याचा प्रवास ‘चोर- पोलिस’ या कथेत उलगडून दाखवला आहे. त्याचबरोबर डोक्‍याची कल्हई, भांडा सौख्यभरे, डायरी एका चोराची आदींची भट्टीही छान जमली आहे. 

शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे यांच्या व्यंगचित्रातील जोरकस रेषांप्रमाणे सुलंच्या कथेतील वाक्‍येही जोरकस असतात. कोठेही विनोदासाठी ओढून ताणून आणलेली ती आढळत नाहीत. प्रसंगनिष्ठ विनोद ते अतिशय तन्मयतेने साकारतात. त्यामुळे आगामी काळातही विनोदी साहित्याची पताका सुलं डौलाने फडकवतील, अशी आशा बाळगायला हरकत नाही.

संबंधित बातम्या