संशोधनाचा प्रेरक प्रवास

डॉ. अनिल लचके
गुरुवार, 14 फेब्रुवारी 2019

पुस्तक परिचय
 

मराठीत एक म्हण आहे, ‘मुलाचे पाय पाळण्यात दिसतात’. हिंदी मध्येही अशा अर्थाची म्हण आहे, ‘होनहार बिरवान के होत चिकने पात.’ एखादी व्यक्ती मोठेपणी कोण होऊ शकेल, त्याचा अंदाज बालपणीच करता येतो. आपल्याकडे हरहुन्नरी  शाळकरी मुलं आणि मुली आहेत. त्यांनी मोठेपणी कोण व्हावं, ते त्यांचे पालक ठरवतात. अशाने अष्टपैलू किंवा बहुगुणी मुलांचे जीवन सुरक्षित होतं, पण त्याच बरोबर ते चाकोरीबद्ध होतं. 

जेष्ठ प्रतिभावंत खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे ‘करिअर’ मात्र चाकोरीबद्ध झाले नाही. त्यांचे वडील प्रो. विष्णू नारळीकर गणिताचे प्राध्यापक होते. त्यांनी मुलाची आवड लक्षात घेऊन त्यांना बालपणापासून गणित आणि शास्त्र या विषयांमधील रंजक साहित्य, कोडी, चुटके आदी साहित्य-संपदा उपलब्ध करून दिली. गणिततज्ज्ञ प्रो. मोरेश्वर हुजुरबाजार त्यांचे मामा. मोरूमामांमुळे कूटप्रश्न सोडवण्याची आवड त्यांच्यात निर्माण झाली. त्यांची आई म्हणजे संस्कृतपंडिता सुमती नारळीकर. त्यांनी भाषेचं सौंदर्य, व्याकरण, लालित्य वर्णनक्षमता यांनी परिपूर्ण असलेलं दालन डॉ. नारळीकरांना उघडून दिलं. विज्ञान आणि साहित्य यामुळे त्यांची आवड बहुआयामी होत गेली. आईने त्यांना संस्कृत साहित्यामधील भवभूती, कालिदास, आदी शंकराचार्य यांचं साहित्य, रचना आदी मधील बारकावे, अर्थ नारळीकरांच्या निदर्शनाला आणला. 

बी. एस्सी. झाल्यावर त्यांनी इंग्लंडला जाऊन केंब्रिजमध्ये जगमान्य शास्त्रज्ञ फ्रेड हॉएल यांच्यासह संशोधन करून रॅंग्लर आणि डॉक्‍टरेट पदवी मिळवली. जिज्ञासा आणि नैसर्गिक आवडी-निवडीला योग्य वयात खत-पाणी मिळत गेल्यामुळे डॉ. नारळीकर हे एक जगप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ झाले. त्यांनी लिहिलेल्या ‘मी शास्त्रज्ञ कसा झालो?’ या पुस्तकात ज्येष्ठांचे मार्गदर्शन आणि प्रेरणा या मधून एखाद्याची करिअर कशी खुलत जाते, याचे सुबोध आकलन होतं.

जिज्ञासा जागृत असली, की निसर्गातील गूढरम्यतेचा मागोवा घेता येतो. हा प्रवास सोपा नसतो. पण जेव्हा यश मिळते तेव्हाचे तृप्तीचे क्षण मोठा सात्त्विक आनंद मिळवून देतात. खगोलविज्ञान का शिकावे?, वैज्ञानिक चौकटीतून फलज्योतिषाचे मूल्यांकन, मंगळाचे अमंगळत्व, देव आणि वैज्ञानिक, भारतीय शास्त्रज्ञ व्यथित का असतात?, ऊर्जा आणि पर्यावरण यांचा परस्पर संबंध, विद्यार्थ्यांची शोधक वृत्ती कशी वाढीला लागेल, वगैरे जिव्हाळ्याचे विषय निवडून त्यावर केलेलं डॉ. नारळीकरांचे विज्ञानवादी विचार आणि चिंतन पुस्तकात  वाचायला मिळतात. पुस्तकात निवडक शास्त्रज्ञांची छोटी चित्रे समाविष्ट केली आहेत. या पुस्तकामुळे वाचकाच्या मनात विज्ञान विषयक कुतूहल निर्माण होईल आणि जनमानसात विज्ञानवादी वातावरण निर्माण होण्यासाठी मदत होईल, असं म्हणायला हरकत नाही. 


जीवसृष्टीच्या विकासाची कहाणी

निसर्गात अनेक चमत्कारिक किंवा विलक्षण गोष्टी घडताना आपण पाहतो. त्या का घडल्या कशा घडल्या, या बाबत आपल्याला नेहमीच कुतूहल वाटतं. प्रत्येक घडामोडींच्या मागे कार्यकारणभाव, म्हणजे नियम, तत्व किंवा सिद्धांत असतो. त्या आधारे विविध गोष्टी सुसंगतपणे मांडून सतत निरीक्षण केलं, की त्या मागचं शास्त्र उमजतं. या मूलभूत शास्त्रामधून विज्ञान-तंत्रज्ञानाचा पाया भक्कम होतो. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी त्यांच्या ‘नव्या सहस्त्रकातील नवे विज्ञान’ या पुस्तकात जीवसृष्टीचा विकास कसा झाला हे स्पष्ट केलं आहे. तसेच विज्ञानाच्या वाटचालीतील नानाविध टप्पे कसे पार पाडले गेले (किंवा जातात) या संबंधीचे  चिंतन केलेलं आहे. शास्त्रज्ञांनी आपली बुद्धिमत्ता चिकाटीने पणाला लावली आणि त्यामुळे विज्ञान-तंत्रज्ञानाची अनेक दालने जगासाठी खुली होत गेली. 

वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय? विज्ञानयुगातील भारताचे बलस्थान नक्की कुठे आहे? विशेषतः भारताची वैज्ञानिक झेप कुठं पर्यंत कशी होत जाईल, याचं यथायोग्य सकारात्मक मूल्यमापन त्यांनी केलंय. आपण मंदिरे, समाध्या बांधल्या. कला साहित्याला राजाश्रय दिला, पण शास्त्र विषयाची हाव धरली नाही, उलट त्या बाबत उदासीन राहिलो. आपली शिक्षण-पद्धती चाकोरीबद्ध झाली. आपण विज्ञानयुगात आहोत. ट्रॅक्‍टर, यंत्रे, विमान, रेल्वे, मोबाईल, संगणक असं सर्व वापरतो. तरीही आपण अंधश्रद्धेपायी स्वतःचे नुकसान करून घेत आहोत. 

वधू-वर स्वभावाने, गुणाने, मनाने एकमेकांस अनुरूप असले तरी त्या जोडप्याच्या पत्रिका जुळत नाहीत म्हणून सुखी होऊ शकणारा विवाह टाळतो. एकविसाव्या शतकात वावरताना भूतकाळाबरोबर भविष्यकाळाकडेही विज्ञानाभिमुख दृष्टिकोनातून कसे पाहाता येईल याचे चिंतन लेखकाने केलेलं आहे. विज्ञानवादी संस्कृतीचा अनुनय करणं किती गरजेचं आहे, या संबंधीचे विवेचन या पुस्तकात वाचायला मिळते. मातृभाषेमध्ये विज्ञानाचा प्रसार व्हावा, असं नारळीकरांनी वाटतं. 

शाळांमध्ये मातृभाषेतून विज्ञान शिकवलं जावं, मात्र पारिभाषिक शब्द सुटसुटीत असावेत, किमान क्‍लिष्ट नसावेत. असे ही ते सांगतात. भारतीय उपखंडात परंपरागत चालत आलेली जीवनमूल्ये हा जीडीपी मध्ये मोजता न येणारा अमोल ठेवा आहे. तेव्हा प्रगतीपथावरील भारताने आपलं भारतीयत्व जपून ठेवलं जाईल, अशी अपेक्षा लेखकानं व्यक्त केली आहे. एकविसाव्या शतकात भारताची वाटचाल कशी होणं अपेक्षित आहे, या संबंधीचं प्रो. जयंत नारळीकरांनी केलेलं मार्गदर्शन मोलाचं आहे.

संबंधित बातम्या