चित्तवेधक वैज्ञानिक कादंबरी-संग्रह

डॉ. अनिल लचके
सोमवार, 3 मे 2021

पुस्तक परिचय

विज्ञान तंत्रज्ञान विषयक प्रसिद्ध होणाऱ्या कथा किंवा कादंबऱ्यांमुळे मराठी साहित्याचे दालन सातत्याने समृद्ध होत गेले आहे. अशा साहित्यात वाचकाचे मनोरंजन होईल असे कथाबीज असतेच, पण त्यात भविष्यकाळाचे पडसाद उमटत जातात. संशोधकांचे मूळ ध्येय म्हणजे, सृष्टीतील गूढरम्य गोष्टींचे गुपित जाणून घ्यायचे. डॉ. जयंत नारळीकरांसारखे ज्येष्ठ शास्त्रज्ञ ते गूढ सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोचवण्यासाठी कथा किंवा कादंबरीची योजना करतात. यामुळे आधुनिक विज्ञान रंजकतेने मराठी साहित्य-सृष्टीत येत आहे. परिणामी समाज आणि विज्ञान जवळ यायला मदत होत आहे. अशा लोकार्थी विज्ञान साहित्यात काही अगम्य सिद्धांताची संकल्पना वाचकांना सहजतेने उलगडून सांगितलेली असते. यामुळे मराठी भाषा ही ज्ञानभाषा तर होते. तसेच वाचकांचे प्रबोधनही होते. यामुळे समाज विज्ञानाभिमुख व्हायला मदत होते. 

विज्ञानातील अनेक विषय अद्‍भुतरम्य आहेत. त्यांचा परिचय रोचक आणि उद्‍बोधक पद्धतीने झाला पाहिजे. हे लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी सातत्याने दर्जेदार वैज्ञानिक कथा आणि कादंबऱ्या लिहून मराठी साहित्यसृष्टीत मोलाची भर टाकलेली आहे. त्यांच्या पाच गाजलेल्या कादंबऱ्यांचा एक संग्रह - ‘कादंबरी-समग्र जयंत नारळीकर’ प्रसिद्ध झालाय. त्यामध्ये ‘प्रेषित’, ‘वामन परत न आला’, ‘अंतराळातील स्फोट’, ‘व्हायरस’ आणि ‘अभयारण्य’ या पाच कादंबऱ्यांचा समावेश आहे. विज्ञान विषयक कादंबरी वाचताना त्यातील आधारभूत वैज्ञानिक पाया वाचकांना कळणे महत्त्वाचे आहे. कारण त्यामुळे वाचक त्या कथानकाचा आनंद अधिक चांगल्यारीतीने घेऊ शकतात. या संग्रहातील प्रत्येक कादंबरीमागील विज्ञान संक्षिप्त स्वरूपात; केवळ एक पानात स्पष्ट केलेले आहे. 

आपल्यासारखी जीवसृष्टी विश्वामध्ये कुठे आहे का, या अनुत्तरित प्रश्नाचा ऊहापोह संग्रहातील ‘प्रेषित’ या कादंबरीत केला आहे. पृथ्वीपासून ४१ किलोमीटर उंचीवरदेखील जीवाणूंचे अस्तित्व आहे. ते पृथ्वीवरून वर गेलेत की वरून खाली येत आहेत, याचा निवडा झालेला नाही. या कादंबरीमध्ये पृथ्वीबाहेर जीवसृष्टी आहे, असे गृहीत धरले आहे. ‘जवळच्या’ एका ताऱ्याभोवती फिरणाऱ्या ग्रहावर प्रतिकूल परिस्थिती निर्माण होते. साहजिक तेथील रहिवासी अन्य अनुकूल ग्रहावर राहण्याचा प्रयत्न करतात. अखेरीस काय झाले ते ‘प्रेषित’ वाचल्यास लक्षात येते. कथानकातील सायक्लॉप्स या अवाढव्य दुर्बिणीच्या वर्णनामुळे काही वैज्ञानिक संकल्पना सहजपणे स्पष्ट होतात आणि विज्ञानासह अनेक गूढ गोष्टींचा उलगडा होत जातो. 

‘वामन परत न आला’ या कादंबरीमध्ये खोल विहीर खणताना एक बंद पेटारा सापडतो. तो पेटारा म्हणजे एक कालकुपी असते. त्यात पुढारलेल्या प्राचीन संस्कृतीची माहिती मिळते. पण ती नष्ट का झाली ही वस्तुस्थिती दुर्लक्षित होते. ही गोष्ट शास्त्रज्ञांना उशिरा कळते. ती चूक दुरुस्त करायचा प्रयत्न ते करतात. यामध्ये वामनाचे योगदान काय ते लक्षात घेण्यासारखे आहे. 

दीड हजार वर्षांपूर्वी, म्हणजे हर्षवर्धनाच्या काळात एक तारका-स्फोट झाला होता. ताऱ्यांनादेखील जन्म आणि मृत्यू असतो! एखाद्या ताऱ्यामधील ‘इंधन’ संपले की त्याच्या आकारमानानुसार त्याचा स्फोट तरी होतो किंवा तो श्वेतबटू होऊन अंतराळात भटकू लागतो. स्फोट झालेल्या ताऱ्यांचे अणू-रेणू सर्व दिशांकडे फेकले जातात. काही अवशेष पृथ्वीकडे येतात. या स्फोटाभोवती गुंफलेले एक कथानक डॉ. नारळीकरांनी ‘अंतराळातील स्फोट’ या कादंबरीमध्ये गुंफलेले आहे. हर्षवर्धनापासून सध्याच्या काळापर्यंतच्या घटनांची मालिका या कादंबरीत रोचक पद्धतीने वाचायला मिळते. 

‘व्हायरस’ हा परजीवी असतो आणि आपल्या आरोग्यासाठी घातक असतो. त्याची संख्या अतिवेगाने वाढते. संगणकाचा व्हायरस परजीवी नसतो. पण तो ज्याचा संगणकात जातो, तेथील कार्यप्रणाली निकामी करतो. कारण ती एक संगणकीय प्रणाली असते. ‘व्हायरस’ या कादंबरीमध्ये लेखकाने रेडिओ दुर्बिणीमार्फत पृथ्वीवर आलेल्या व्हायरसवर उपाय शोधला. अखेरीस ‘ऑपरेशन क्लीन अप’ मोहिमेमुळे त्या व्हायरसचा बीमोड झाला. या कादंबरीला महाराष्ट्र  शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.  

पृथ्वीवर जीवसृष्टी असणे ही एक अपूर्व घटना आहे. अफाट विश्वामध्ये वसुंधरेचे ते वैशिष्ट्य आहे. जीवसृष्टीचा विकास अजूनही होत आहे. तथापि, अनेक घटकांमुळे जीवसृष्टी धोक्यात येत आहे. तिचा ऱ्हास थोपवण्याची कामगिरी मानवाने हाती घ्यायला पाहिजे. ढासळते पर्यावरण, तंत्रज्ञानाचा बेसुमार वापर, ओझोनच्या छत्राला पडणारी छिद्रे, अण्वस्त्र-स्पर्धा अशा अनेक समस्यांचे चिंतन लेखक ‘अभयारण्य’मध्ये करताना दिसतो. तसेच ‘वसुधैव कुटुंबकम्’ हाच विचार योग्य असल्याचे ध्यानात येते. 

या पाच कादंबऱ्यांचे विषय उत्कंठावर्धक आहेत; वाचकाला खिळवून ठेवणारे आहेत. त्यातील पात्रांची नावे आणि स्वभाव वैशिष्ट्ये लक्षणीय आहेत. संग्रहामध्ये काही सूचक चित्रांचा समावेश आहे. खगोलशास्त्रातील आणि अन्य अनेक विस्मयकारक वैज्ञानिक संकल्पना डॉ. नारळीकरांनी रंजक पद्धतीने खुलवून स्पष्ट केल्या आहेत. जिज्ञासू वृत्तीच्या विद्यार्थ्यांना यामुळे काहीतरी रचनात्मक करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. वाचकांना मनोरंजक वैज्ञानिक सफर घडवून आणण्याची क्षमता डॉ. जयंत नारळीकरांच्या ‘समग्र जयंत नारळीकर’ या पाच कादंबऱ्यांच्या संग्रहात आहे. त्यामुळे हा समग्र संग्रह वाचनीय झालाय, यात शंका नाही. 

समग्र जयंत नारळीकर 
लेखक : डॉ. जयंत नारळीकर 
प्रकाशन : राजहंस प्रकाशन, पुणे
किंमत : ₹   ८०० 
पाने : ३९६

संबंधित बातम्या