मुंगीच्या नजरेतून माणसांची कथा

डॉ. भालचंद्र सुपेकर
सोमवार, 2 ऑगस्ट 2021


पुस्तक परिचय

जागतिक तापमानवाढीच्या पार्श्वभूमीवर ‘वारूळ’ कादंबरीमधील मुंगी आणि माणसातला संवाद अंतर्मुख व्हायला लावणारा आहे. या संदर्भात प्रत्येकाने मुंगीएवढा वाटा उचलला तरी मोठा फरक पडू शकतो, असा गर्भित संदेशही ही कादंबरी देते.

मुंगी हा पृथ्वीवरचा अत्यंत छोटा जीव आणि माणूस हा सर्वांत बुद्धिमान प्राणी. या दोघांमध्ये संवाद होऊ शकेल काय? अद्यापपर्यंत तरी ते शक्य झालेले दिसत नाही. पण संजय ऐलवाड यांनी ‘वारूळ’ या कादंबरीच्या निमित्ताने हा संवाद घडवून आणला आहे. नुसता काल्पनिक, ललित संवाद नसल्यामुळे आणि तापमानवाढ तसेच पर्यावरणाच्या संवर्धनाची किनार असल्यामुळे ही कादंबरी प्रचंड साहित्यपसाऱ्यातही लगेच सर्वांचे लक्ष वेधून घेते. 

पुस्तक हातात घेताच त्याचे आकर्षक मुखपृष्ठ मनाचा वेध घेते. मुखपृष्ठावरच्या चित्रात एकमेकांशी संवाद साधणाऱ्या मुंग्यांनी आत वारुळात नेमका काय धुमाकूळ घातला असेल, याची उत्सुकता तिथूनच निर्माण होते. 

ही कथा आहे वारुळाची, वारुळात राहणाऱ्या मुंग्या नि मुंगळ्यांची. वारुळातले तापमान वाढायला लागते, त्याचा मुंग्यांना त्रास व्हायला लागतो म्हणून त्या त्याच्यावर उपाय शोधायला लागतात. त्यासाठी त्या गावातल्या माणसांशीही संवाद साधतात. तापमानवाढ ही काही एक-दोघांची समस्या नाही, तर ती जगाची समस्या आहे आणि त्यावर उपाय करायचा असेल तर प्रत्येक गाव, शहर, राज्य, देश आणि जगाने प्रयत्न करायला पाहिजेत, असे माणसे सांगतात.

पण तरी काय करता येईल असे विचारल्यावर झाडे लावावी लागतील, वाहून जाणारे पाणी जमिनीत मुरवावे लागेल, मातीची धूप थांबवावी लागेल, सर्व प्रकारचे प्रदूषण टाळावे लागेल, ओझोनच्या थरावर दुष्परिणाम होणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल, उद्योगांमधून वातावरणात सोडला जाणारा धूर कमी करावा लागेल, असे अनेक उपाय माणसे सुचवतात.

वारुळात पोचल्यावर माणसांशी संवाद साधून मिळालेल्या माहितीच्या आधारे मुंग्यांचे दहा-बारा गट केले जातात. या गटांनी त्यांना त्यांना दिलेल्या जबाबदारीनुसार काम करायचे ठरवले जाते. बंधारा आणि शेततळ्यांची कामे करणारा, वृक्षलागवडीसाठी खड्डे खणणारा, विशेष अभ्यास करणारा, संशोधन करणारा, साहित्याची जुळवाजुळव करणारा आणि राखीव असे हे अनेक प्रकारचे गट केले जातात. हे गट हिरिरीने काम करून तापमानवाढ रोखण्यात कसे यश मिळवतात अशी ही कथा आहे.

पत्रकारितेत अनेक वर्षे कार्यरत असलेले संजय ऐलवाड यांची साहित्याबाबतची उत्तम जाण त्यांच्या विषयाच्या निवडीतूनच दिसून येते. बारीकसारीक गोष्टी टिपून घेण्याचं वैशिष्ट्य असलेली त्यांची पत्रकाराची नजर कादंबरीत ठिकठिकाणी जाणवते. मुंगीच्या नजरेतून जगाकडे बघतानाच्या कादंबरीत रेखाटलेल्या अनेक प्रसंगांतून त्यांच्या कल्पनाशक्तीची चुणूक दिसते. 

या कादंबरीला बालकादंबरी म्हणणे म्हणजे एका अर्थाने तिच्यावर अन्याय केल्यासारखे होईल. लेखकाने ती अर्थातच लहान मुले नजरेसमोर ठेवून लिहिली आहे, तरीही मोठ्यांनाच नव्हे तर जगातल्या सगळ्यांनाच आजघडीला अत्यंत आवश्यक असलेला संदेश देणारी ही कादंबरी आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख लिहितात तसे, ‘केवळ विद्यार्थ्यांनीच नव्हे तर पालकांनीपण ही कादंबरी वाचावी, अशी ही नितांत सुंदर कलाकृती झाली आहे.’ 

‘वारूळ’ ही कादंबरी आहे मुंग्यांची, पण वास्तव आहे माणसांचे. ही व्यथा आहे मुंग्यांची, पण चिंता आहे संपूर्ण विश्वाची. थोडक्या शब्दांत सांगायचे तर मुंगीच्या नजरेतून लिहिलेली माणसांची कथा, असे या कादंबरीचे वर्णन करता येईल. 

मुंगी विचार करू शकते का? तर विज्ञान याचे उत्तर ‘होय’ असे देते. कारण तिच्या शरीरात एक मेंदू असतो आणि त्या मेंदूचा वापर करून ती स्वतःसाठी वारूळ घडवते, स्वतःच्या समुदायासाठी अन्नसाठा करते, अत्यंत सुनियोजित वसाहतीप्रमाणे वारुळात मुंग्यांचा एक मोठा समूह गुण्यागोविंदाने राहतो. संकट आलेच तर त्याला एकजुटीने सामोरा जातो, अशा अनेक गोष्टी आपण सर्वांनी प्रत्यक्ष पाहिल्या आहेत. पण मुंगीच्या तुलनेत हजारो पटीने मोठा मेंदू असूनही माणूस हे सगळे करू शकत नाही, हे वास्तवही आपल्याला ठाऊक आहे. नेमक्या याच मर्मावर ही कादंबरी बोट ठेवते. 

आजच्या युगात अत्यंत वानवा असलेला नवा विज्ञाननिष्ठ विचार ही कादंबरी मांडते. तापमानवाढीसारख्या जागतिक विषयावर भाष्य करते. पृथ्वीवर लाखो सजीव राहतात. यापैकी प्रत्येक सजीव तापमानवाढीचा मुकाबला करण्यासाठी काही ना काही उपाय करतोच. पण माणूस सोडला तर इतर सर्व सजीव केवळ जैविक उपाय करतात, कारण त्यांच्याकडे तंत्रज्ञान नाही. माणसाकडे तंत्रज्ञान असल्यामुळे रोगापेक्षा भयंकर उपाय तो शोधतो आणि अंगीकारतो. त्यामुळे त्याच्या घरात, बंगल्यात त्याला तापमानवाढ जाणवत नाही पण संपूर्ण जगाच्या तापमानवाढीला कणाकणाने का होईना हातभारच लागतो. अशा परिस्थितीत केवळ तंत्रज्ञाननिष्ठ, विज्ञाननिष्ठ राहून पुरेसे नाही तर ‘वसुधैव कुटुंबकम्’ या सूत्रावरच्या मानवतावादी निष्ठेच्या अधिष्ठानाचीही गरज ही कादंबरी अधोरेखित करते.

तापमानवाढीत माणसाचाच सर्वाधिक वाटा आहे. पण त्याबाबतीत माणूस पाहिजे तितका संवेदनशील झालेला नाही. आज मुंगीसारख्या छोट्या जिवांना त्याचे चटके बसत असले तरी कालांतराने याच तापमानवाढीच्या ज्वाळा मानवी अस्तित्वालाही कवेत घेतल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे या समस्येवर आता गंभीरपणे विचार करण्याला प्रवृत्त करत ही कादंबरी माणसाला अंतर्मुख करून टाकते.

तापमानवाढ रोखण्यासाठीचे वारूळ हे जगातील सर्वांत पहिले संशोधन केंद्र झाले, असा खूपच सूचक उल्लेख कादंबरीच्या शेवटी आहे. निव्वळ आंतरराष्ट्रीय परिषदा भरवून, (तिथं पाण्याच्या बाटल्यांपासून, फोल्डर्स आणि पेनापर्यंत प्लॅस्टिकचा भरमसाट वापर करून), मोठमोठ्या चर्चा घडवून, ठराव मंजूर करून तापमानवाढ रोखता येणार नाही, हे आता लक्षात आले आहे. त्यामुळे प्रत्येकाने मनापासून गंभीरपणे संकल्प करण्याची आणि आपल्या घररूपी वारुळापासून सुरुवात करण्याची गरज आहे, असेच यातून लेखकाला सूचित करायचे आहे.

बजरंग लिंभोरे यांनी केलेली अक्षरजुळणी आणि मांडणी पुस्तकाला साजेशी आहे. प्रतीक काटे यांच्या मुखपृष्ठावरील आणि आतील रेखाचित्रांमुळे पुस्तकाने सादरीकरणात उंची गाठली आहे. या दोघांचा आवर्जून उल्लेख करायलाच हवा. सर्वांगसुंदर कलाकृती अशा शब्दातच या कादंबरीचे स्वागत करावे लागेल.

वारूळ

  • लेखक : संजय ऐलवाड 
  • प्रकाशक : संस्कृती प्रकाशन, पुणे
  • किंमत ः ₹  १२५/-
  • पाने ः ५६

संबंधित बातम्या