दुःखविषयक संवाद

डॉ. हिमानी चाफेकर 
शनिवार, 8 डिसेंबर 2018

पुस्तक परिचय
 

‘थॅनटॉलॉजी’ हे मृत्यूशी निगडित असणाऱ्या विचारांचा, भावनांचा व वर्तनाचा अभ्यास करणारं शास्त्र होय. अशा अभ्यासासंदर्भातील एक महत्त्वाचं नाव म्हणजे डॉ. एलिझाबेथ कुबलर रॉस. डॉ. एलिझाबेथ यांनी कॅन्सरसारख्या असाध्य रोगाला सामोरे जाणारे रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांच्या मुलाखती घेऊन त्यांच्यामध्ये होणारे मानसिक चढ-उतार व एकंदरच त्यांच्यामध्ये दिसून येणाऱ्या मानसिक-भावनिक प्रक्रिया, प्रतिक्रिया यांविषयी सखोल अभ्यास केला. माणसं जेव्हा मृत्यूला सामोरी जातात, तेव्हा मानसिक - भावनिक पातळीवर ती काही विशिष्ट व ठराविक अवस्थांमधून जातात, अशी संकल्पना डॉ. एलिझाबेथ यांनी मांडली. ‘ऑन डेथ अँड डाइंग’ या १९६९ मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकात डॉ. एलिझाबेथ यांनी ही संकल्पना विस्ताराने मांडली आहे. त्यांच्या या संकल्पनेवर मानसशास्त्र जगतात भरपूर चर्चा झाली आणि यानंतर मृत्यू, त्याच्याशी निगडित भावभावना व एकूण दुःख या विषयावरील संशोधनाने एक नवी उचल घेतली. पुढील काही दशकांमध्ये विविध मानसतज्ज्ञांनी या विषयाचे वेगवेगळे पैलू अभ्यासून त्याचे शास्त्रीय विवेचन केले आणि हे असे विविधांगी विवेचन एकाच पुस्तकात उपलब्ध करून देऊन मराठी वाचकांपर्यंत पोचविण्याची मोलाची कामगिरी डॉ. संज्योत देशपांडे यांनी ‘अढळ दुःखातून सावरताना’ या त्यांच्या पुस्तकाद्वारे केलेली आहे. पुस्तकाची मांडणी एकाच वेळी शास्त्रीय तरीही अगदी सर्वसामान्यांच्या हृदयाला भिडणारी अशी आहे.

वैद्यकशास्त्र जसजसे प्रगत होत गेले, तसतसे अगदी मरणाच्या दारात उभ्या असलेल्या माणसालासुद्धा कृत्रिम साधनांच्या मदतीने यांत्रिक पद्धतीने का होईना, पण जगवता येईल अशा विविध उपचारपद्धती विकसित होत गेल्या. परंतु या साऱ्या प्रकारात अनेकदा मृत्यूची गुणवत्ता मात्र ढासळत गेली. सन्मानाने मरण या आपल्या मूलभूत हक्काला तर कुठे ठेच लागत नाही ना ? आपण स्वतःच्या जगण्याच्या गुणवत्तेबाबत इतके जागरूक असतो, पण आपण आपल्या मृत्यूच्या दर्जाबाबत जागरूक का नाही आहोत? पुस्तकाच्या सुरुवातीलाच असे हे प्रश्‍न मांडून डॉ. संज्योत यांनी आजच्या काळात वैद्यकीय इच्छापत्र करणे कसे गरजेचे बनले आहे हे सांगून या संदर्भात जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे.

‘दुःख’ ही एकच भावना, परंतु व्यक्तिगणिक आणि परिस्थितीनुसार या भावनेची किती वेगवेगळ्या प्रकारे अनुभूती येऊ शकते याचा साक्षात्कार पुस्तकाच्या काही प्रकरणांमधून आपल्याला होत राहील. प्रिय व्यक्तीचा मृत्यू पचवणे अवघडच असते, परंतु त्यातूनही असा मृत्यू अचानकपणे, अकाली, ध्यानीमनी नसताना झाला तर... अशा घटना मनाला मुळापासून हादरवून टाकतात. शिवाय अशा प्रकारच्या मृत्यूमागचे कारण काय होते हेही महत्त्वाचे ठरते. हार्टॲटॅक, पक्षाघात, आत्महत्या, अपघात, खून, नैसर्गिक आपत्ती... अशा या प्रत्येक कारणाबरोबर प्रियजनांना अनुभवास येणाऱ्या दुःखाच्या छटा बदलत जातात. मृत्यू कसा झाला हे जसे महत्त्वाचे तसेच तो कोणाचा झाला हेही तितकेच महत्त्वाचे. जोडीदार, पालक, अपत्य ते अगदी पाळीव प्राणी... पुन्हा भावना एकच - दुःख - परंतु प्रत्येक नात्यानुसार त्याची अनुभूती निराळी.

पुस्तकाच्या ‘अचानक होणारा आघात,’ ‘वंचित दुःखाचे क्षण’ यासारख्या प्रकरणांमधून दुःखाच्या वरील छटांचा अतिशय संवेदनशीलतेने आढावा घेतलेला आहे. तसेच प्रत्येक छटा उलगडताना हृदयद्रावक उदाहरणेही दिलेली आहेत. ही प्रकरणे वाचल्यावर आपल्याला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवेल. प्रेमाच्या बाबतीत आपण म्हणतो, प्रेम म्हणजे प्रेम, म्हणजे प्रेम असते, तुमचे आमचे सर्वांचे सेम असते. दुःखाच्या बाबतीत मात्र याच्या अगदी उलट आहे असे आपल्याला पुस्तक वाचताना जाणवत राहील आणि असे म्हणावे वाटेल की, ‘दुःख म्हणजे दुःख म्हणजे दुःख असते, तरीही प्रत्येकाचे ‘युनिक’ आणि ‘डिफरंट’ असते; क्वचितच कधी कोणाचे सेम असते!’

स्वतः मृत्यूला सामोरं जात असताना माणूस मानसिक-भावनिकदृष्ट्या कोणत्या टप्प्यामधून जातो? प्रिय व्यक्तीच्या मृत्यूमुळे शोकात बुडालेल्या प्रियजनांच्या मानसिक, वैचारिक, भावनिक व वर्तनाच्या पातळीवर काय परिणाम होतात? दुःखाची ही संपूर्ण प्रक्रिया नॉर्मल कधी मानायची? आणि दुःखाची प्रक्रिया गुंतागुंतीची झालीय व आता तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा, हे कसे जाणायचे? असा प्रकारच्या अनेक प्रश्‍नांची उत्तरे आपल्याला पुस्तकात सापडतील. मृत्यूचे वास्तव स्वीकारताना, त्यास सामोरे जाताना मोठ्यांचीच ही गत होते, तिथे बिचाऱ्या लहान मुलांचे तर काय होत असेल ? निरागस दुःख या प्रकरणात विविध वयोगटातील मुलांची मृत्यू ही संकल्पना समजून घेण्याची कुवत, त्यांना पडणारे प्रश्‍न, त्यांच्या भावनिक प्रतिक्रिया व मुख्य म्हणजे या बाबतीत मोठ्यांनी लहान मुलांशी कसे वागले पाहिजे या साऱ्याविषयी डॉ. संज्योत यांनी उपयुक्त मार्गदर्शन केले आहे.

प्रिय व्यक्तीच्या मृत्यूमुळे आपण खूप काही गमावून बसतो हे खरे; परंतु गमावणे हे दर वेळी मृत्यूशीच निगडित असते असे नाही. जीवनातील विशिष्ट टप्पे किंवा काही प्रसंग, घटना याही गमावण्याला कारणीभूत ठरू शकतात म्हणजे उदाहरणार्थ घटस्फोटामुळे संपुष्टात आलेलं नातं असो, आजारामुळे, अपघातामुळे एखादा अवयव निकाली होणे असो किंवा अगदी नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर बदललेला रोजचा दिनक्रम असो. मृत्यू व्यतिरिक्त जीवनात असे अनेक प्रसंग येऊ शकतात. ज्यामध्ये आपण काही ना काही गमावत असतो. दुःखाच्या वाटा या प्रकरणात अशा अनेक गोष्टींचा आढावा घेऊन डॉ. संज्योत यांनी दुःखाच्या विषयाला परिपूर्णत्व आणले आहे.

दुःखाबद्दल असे हे विश्‍वरूपदर्शन झाल्यानंतर वेळ येते, ती हळूहळू का होईना पण त्यामधून सावरण्याची. दुःख वाटणे जसे स्वाभाविक असते, तसेच त्यामधून सावरण्यासाठी मनाचा कणखरपणा वाढविणेही शक्‍य होऊ शकते. पण हे साध्य कसे करायचे? या विषयीचे मार्गदर्शन अखेरच्या प्रकरणात आपल्याला वाचायला सापडेल. ‘दुःखाच्या गोष्टीचा शेवट हा मनाच्या काटकपणातून व्हायला हवा !’ अशा प्रेरणादायी संदेशाने डॉ. संज्योत यांनी दुःखाची ही कहाणी संपविली आहे. अशा प्रकारे एकंदरच दुःखाच्या अनेकविध छटा, पैलू उलगडत विषयाला परिपूर्ण बनविण्याचा डॉ. संज्योत यांनी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. पुस्तकाची मांडणी शास्त्रीय असली, तरी विषयातील नाजूकपणा लक्षात घेत प्रत्येक प्रकरण संवेदनक्षमपणे, सहानुभूतिपूर्वक हाताळलेले आहे. त्या मानसतज्ज्ञ तर आहेतच; परंतु व्यक्तिगतपणे गेल्या काही वर्षांमध्ये त्यांना आलेल्या दुःखाच्या अनुभूतीमुळे त्यांच्या लिखाणाला एक प्रकारचा पर्सनल टच आला आहे.

दुःख आणि त्यातूनही मृत्यू या विषयापासून आपण सगळे नेहमीच दूर पळू पाहतो. स्पर्धा परीक्षांमध्ये यश कसं मिळवावे, करिअर निवडीमध्ये कोणत्या गोष्टी लक्षात घ्यावात, वैवाहिक जीवन सुखी कसं बनवावे, व्यक्तिमत्त्व विकास कसा साधावा यासारख्या अनेक गोष्टींबाबत आपण आज-काल खूप जागरूक बनलो आहोत. या संदर्भात बरेच वाचन करू लागलो आहोत आणि गरज लागल्यास निःसंकोचपणे तज्ज्ञांचा सल्लाही घेत आहोत. परंतु मृत्यू म्हणजे तर आयुष्यातील सर्वांत मोठी सत्त्वपरीक्षा ! तरीही या बाबतीतल्या जागरुकतेबद्दल आजही बऱ्याच अंशी उदासीनताच दिसून येते. याचा परिणाम म्हणजे दुःख या विषयाबाबत जनमानसात अनेक गैरसमजुती आढळून येतात आणि त्यामुळे दुःखाची ही एकंदर प्रक्रिया अधिकच गुंतागुंतीची होऊन बसते; म्हणूनच या पार्श्‍वभूमीवर ‘अटळ दुःखातून सावरताना’ यासारख्या पुस्तकांची गरज आणि उपयुक्तता अधिक प्रकर्षानं जाणवत राहते.

संबंधित बातम्या