मनाविषयी बरेच काही...

डॉ. हिमानी चाफेकर
सोमवार, 14 डिसेंबर 2020

पुस्तक परिचय

मानसोपचारतज्ज्ञ म्हणून प्रदीर्घ काळ कार्यरत असलेल्या डॉ. शोभा पाटकर यांनी प्रस्तुत पुस्तकात ‘मानसिक स्थैर्य’ व ‘मानसिक समृद्धी’ हे दोन विषय प्रामुख्याने हाताळले आहेत. पुस्तक एकूण दहा प्रकरणांत विभागले असून पहिल्या काही प्रकरणांत मानवी मेंदूची रचना, प्रत्येक भागाचे कार्य वगैरे माहिती दिली आहे. मेंदूचे कार्य केवळ शारीरिक प्रक्रियांपुरते सीमित नसून भीती, राग यांसारख्या अगदी मूलभूत भावनांपासून ते नैतिकता, प्रतिष्ठा, सर्जनशीलता यांसारख्या उच्चतम भावनिक व मानसिक प्रक्रियांमध्येही आपला मेंदू किती महत्त्वाची भूमिका बजावीत असतो हे आपल्याला या प्रकरणांमधून समजते.

व्यक्तिमत्त्व जडणघडणीत आनुवंशिकता महत्त्वाची की भोवतालचे वातावरण अधिक महत्त्वाचे? व्यक्तिमत्त्वातील कोणते गुणधर्म आनुवंशिकतेने येतात व कोणत्या गुणधर्मांचा विकास वैयक्तिक, कौटुंबिक वा सामाजिक परिस्थितीवर अवलंबून असतो? जन्मल्यापासून ते पौगंडावस्था व पुढे प्रौढत्वापासून ते अखेरपर्यंत आपले व्यक्तिमत्त्व कसे विकसित होत असते? त्यामध्ये कोणते पैलू समाविष्ट असतात व विकासाच्या या एकंदर प्रवासात आपला मेंदू कोणत्या निरनिराळ्या भूमिका बजावीत असतो? या साऱ्या प्रश्‍नांची उत्तरे आपल्याला पुढील काही प्रकरणांमधून मिळतात. मनःस्थिती आणि परिस्थिती या दोहोंच्या परस्पर देवाणघेवाणीमधून आपले मानसिक स्वास्थ्य किंवा मानसिक स्थिरता अथवा अस्थिरता यांची पातळी ठरत असते. परंतु परिस्थिती फारशी अनुकूल नसतानाही केवळ सकारात्मक वृत्ती बाळगल्यास आपल्याला जीवनात आनंद, समाधान, कृतार्थता यांसारख्या सकारात्मक भावनांचा सातत्याने अनुभव मिळू शकतो. परंतु, यासाठी प्रथम आपल्याला निखळ आनंद व समाधान देणारे स्रोत कोणते याचा शोध घ्यायला हवा. तसेच एकंदरच सकारात्मक जीवनपद्धतीचे वेगवेगळे पैलू समजून घ्यायला हवेत. एवढेच नव्हे तर सकारात्मकतेने जगता जगता हळूहळू आपले जीवन शक्य तितके परिपूर्ण करण्याच्या दिशेने प्रयत्न करायला हवेत. पण हे सर्व साधायचे कसे? या बाबतची रूपरेषा आपणास पुस्तकाच्या ‘सकारात्मक मनोविज्ञान’ हा प्रकरणात वाचायला मिळते.

आपल्या सर्व मनोव्यापाराला सजीवत्त्व देणारी कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे ‘भावना’. आनंद, समधान, कृतज्ञता, राग, भीती, द्वेष, अशा मनात उमटणाऱ्या विविध सकारात्मक व नकारात्मक भावनांविना आपले आयुष्य अगदी निरस व यांत्रिक झाले असते. परंतु अन्नात मीठ कमी-जास्त झाले की जशी जेवणाची चव बिघडते, त्याचप्रमाणे भावनांचे योग्य नियोजन व नियमन फार महत्त्वाचे ठरते. प्रस्तुत पुस्तकात आपल्याला या विषयीही थोडक्यात, पण उपयुक्त मार्गदर्शन मिळेल. माणसास खऱ्या अर्थाने माणुसकी प्रदान करणारी उदात्त जाणीव म्हणजे अर्थात नैतिकतेची जाणीव! चांगले-वाईट, योग्य-अयोग्य या संदर्भातील निर्णय घेण्याची ही क्षमता. अशा या एका अत्यंत मौलिक क्षमतेचा विकास अगदी बालवयापासून ते प्रौढत्वापर्यंत टप्प्याटप्प्याने होत असतो. परंतु, नीतिमत्ता ही संकल्पना मुळातूनच फार गुंतागुंतीची आहे. ही संकल्पना सापेक्ष आहे, तशीच ती कालनिष्ठ व संस्कृतीनिष्ठही आहे. म्हणूनच मनुष्य कितीही हुशार असला तरी अनेक वेळा एखाद्या परिस्थितीत योग्य काय व अयोग्य काय हे ठरविणे अवघड होऊन बसते. काही वेळा हे ठरविताना विचित्र प्रकारच्या भावनिक द्वंद्वांना सामोरे जावे लागते. नैतिकतेबाबतचे असे हे अनेकविध पैलू पुस्तकातील ‘दिल एक मंदिर’ या प्रकरणात चर्चिले आहेत.

मानसिक आजाराचे स्वरूप प्रत्येक वेळी शारीरिक आजारासारखे सुस्पष्ट दिसतेच असे नाही. मग अशा वेळी आपल्याला मानसिक विकार आहे का व उपचाराची गरज आहे का हे संबंधित व्यक्तीने किंवा कुटुंबीयांनी कसे ठरवावे? पुस्तकाच्या अखेरच्या प्रकरणांमध्ये या संदर्भात उपयुक्त मार्गदर्शन केलेले आहे. मानसिक समस्यांबद्दल पूर्वीच्या तुलनेत आजकाल अधिक मोकळेपणाने चर्चा होत असली तरी समुपदेशनासाठी जाण्यास आजही अनेक जण काचकूच करतात. अनेकांना समुपदेशनाची व्याप्तीच ज्ञात नसते. त्यामुळे समुपदेशनाकडे जायला मी काय वेडा आहे का? मला सगळे समजते, समुपदेशक काय निराळे सांगणार? नुसत्या बोलण्यासाठी कशाला खर्च करायचा? असे अनेकविध प्रश्‍न लोकांना पडतात. परंतु वास्तवात समुपदेशन हे नुसते बोलणे नसून ती एक शास्त्रीय तत्त्वांवर आधारलेली उपचारपद्धती आहे आणि त्याची उपयुक्तता केवळ मानसिक विकारांपुरती मर्यादित नाही. शैक्षणिक, व्यावसायिक,  

कौटुंबिक व इतर अनेक मानसिक ताणतणाव व यांसाठी समुपदेशन उपयोगी पडते. पुस्तकाचे अखेरचे प्रकरण समुपदेशन प्रक्रियेसंदर्भात माहिती देऊन त्याविषयीचे गैरसमज दूर करण्यात मदत करते.

तर अशाप्रकारे ‘मना मना दार उघड’ असे म्हणत लेखिका डॉ. शोभा पाटकर मनाचे दार उघडतात आणि त्यांच्याच भाषेत सांगायचे तर मनाविषयी ‘सर्व काही’ लिहितात. मन, व्यक्तिमत्त्व विकास, मानसिक स्वास्थ्य, सकारात्मक मनोविज्ञान, भावनांचे नियमन, नैतिकता, मानसिक अस्थिरता व मनोविकार, समुपदेशन असे सर्वच मोठमोठे विषय लेखिकेने एकाच पुस्तकात हाताळले आहेत. त्यामुळे १८४ पृष्ठ संख्या असलेले हे पुस्तक त्यातील अनेक विषयांना पुरेसा न्याय देऊ शकलेले नाही, असे जाणवत राहते. परंतु, असे जरी असले तरी प्रस्तुत पुस्तक एक महत्त्वाची गोष्ट साध्य करते. मनोविकार व एकंदरच मानसिक समस्यांबाबत आजही जनमानसात हवी तितकी जागरूकता दिसून येत नाही. डिप्रेशन किंवा अन्य काही मानसिक पीडा असलेल्या व्यक्तींना त्यांचे कुटुंबीय, मित्र परिवार सर्रास असे म्हणताना दिसतात, ‘हे सगळं तुझं मानसिक आहे, तू हे मनातून काढून टाक म्हणजे डिप्रेशन जाईल तुझं...’ असे म्हणण्यामागे अभिप्रेत अर्थ असा असतो, की शारीरिक व्याधींना जसे काहीतरी ठोस वैद्यकीय, शास्त्रीय कारण असते, तसे त्या व्यक्तीस होणाऱ्या मानसिक त्रासाला काही कारण नाही व त्यामुळे त्रास होऊ द्यायचा नाही हे पूर्णपणे त्या व्यक्तीच्याच हातात आहे. परंतु, वास्तवात बहुतांश मानसिक विकारांमागे मेंदूतील रासायनिक असंतुलन किंवा शारीरिक पातळीवरील अन्य कारणे जबाबदार असतात. कारण मुळातून मनाचे कोणतेही कार्य मेंदूशी निगडित असते. प्रस्तुत पुस्तकात मनाचा मेंदूशी असलेला हा संबंध ठायीठायी उलगडून दाखविलेला आहे. त्यामुळे मनाच्या व्यापारांबद्दल वाचकांमध्ये शास्त्रीय दृष्टिकोन निर्माण होण्यास मदत होईल. शिवाय प्रत्येक मुद्दा हा आकृत्यांद्वारे, चित्रांद्वारे सोप्या पद्धतीने समजावून सांगितला आहे. या पुस्तकाच्या जमेच्या बाजू होत. एकंदरच सर्वसामान्य वाचकास मनाविषयी विविध पैलू समजून घेण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.

०००००००

मना मना दार उघड
लेखिका - डॉ. शोभा पाटकर
प्रकाशन - लोकवाङ्‍मय प्रकाशन, पुणे
किंमत - २५० रुपये
पाने - १८

संबंधित बातम्या