क्रांतिकारी जीवनाचा प्रवास  

डॉ. केशव साठ्ये
सोमवार, 9 मार्च 2020

पुस्तक परिचय
 

चाईल्ड प्रॉडिजी यात मोडणारा हा ११ वर्षांचा मुलगा. ‘हसने से हो सुकू न रोने से कल पडे’ या मिसरा (आधारभूत ओळी)ला तात्काळ या बालकवीने ‘इतना तो जिंदगीमे किसीकी खलल पडे - हसने से हो सुकू न रोने से कल पडे’ ही सुरुवात करत एक अतिशय सुंदर गझल सादर केली. विशेष म्हणजे थेट बेगम अख्तरच्या स्वरात ती पुढे  मुक्कामालाही गेली. ‘कैफी आझमी जीवन आणि शायरी’ या लक्ष्मीकांत देशमुख यांच्या लोकवाङ्‍मय गृह यांनी प्रकाशित केलेल्या कैफी आझमी यांच्या चरित्रात हा प्रसंग वाचताना या कवीच्या उत्तुंग यशाचे गमक इथेच सापडते.

‘मी प्रेमचंद परंपरेचा पाईक आहे’ हे वाक्य मनोगतात आहे. कैफी आझमी या प्रतिभावंताच्या कारकिर्दीच्या एक्सरेत काय काय येणार याची चाहूल या वाक्यामुळे  वाचकांना सहज लागते. ‘मिजवा’ हे कैफी यांचे मूळ गाव. उत्तर प्रदेशातील एक ५००-६०० उंबऱ्यांचे हे खेडे. अर्धांगवायूचा झटका आल्यानंतर या गावी परतण्याची कविराजांची ऊर्मी आणि आयुष्यातील बराचसा काळ तिथे व्यतित करण्याचा त्यांचा निग्रह; त्यामुळेच त्या गावात झालेल्या वेगवेगळ्या शैक्षणिक सुधारणा, आधुनिक सुखसोयी पाहताना ग्रामीण भारताचे बदलणारे रूप आपल्याला एक निखळ आनंद देते. कैफी यांना सक्तीने मदरशात शिक्षणाला पाठवणे, तेथील वातावरणातील मुक्कामात  भेटलेले प्रक्षोभक पुस्तक ‘अंगारे’, त्यातून  त्यांच्या मनात पेटलेली आधुनिक विचारांची  ठिणगी, हे  वाचताना या तरुणाच्या लोकाभिमुख वृत्तीचे दर्शन होते.

मौलवी ते कॉम्रेड हा प्रवास, १९ व्या वर्षी कम्युनिस्ट पार्टीत सदस्य म्हणून दाखल होणे, ‘झंकार’ या पहिल्याच काव्य संग्रहातून आपल्या जीवनमूल्यांची त्यांनी करून दिलेली ओळख, इकडे खासगी आयुष्यात शौकत (पत्नी)चा त्यांच्या आयुष्यात झालेला नाट्यमय प्रवेश, तिला स्वतःच्या रक्ताने प्रेमपत्र लिहिणारा हा प्रियकर या ठिकाणी आपल्याला भेटतो. इन्कलाबचा नारा देणारा हा कवी केवढा  संघर्ष करून निकाह करतो आणि तुटपुंज्या कमाईत कसा संसार थाटतो याचे चित्र लेखकाने अतिशय मनापासून रंगवले आहे.

सामाजिक जाणीव प्रखर असलेला, सहिष्णुता, सामाजिक सौहार्द यासाठी आयुष्यभर झटणारा, वेळप्रसंगी क्रांतिकारी होऊन भूमिगत होणारा कॉम्रेड आणि दुसरीकडे ‘तुम इतना क्यू मुस्कुरा रहे हो’, ‘धिरे धिरे मचल’सारखी रेशीम गाणी लिहिणारा भावना प्रधान कवी, हा मोठा पट या पुस्तकाने मांडला आहे. सत्तेसमोर लांगुन चालन न करता मिळालेला पद्मश्री किताब परत  करणारा कैफी, बाबरी मशिदीसारख्या प्रसंगाने हळहळणारा कैफी अशी अनेक रूपे  दाखवत  हे पुस्तक वाटचाल करते. गझलपेक्षा नज्म या काव्य प्रकारात रमणारा हा कवी लेखकाला विशेष भावलेला दिसतो  आणि  म्हणून  त्यांच्या कवितांचे  विस्तृत रसग्रहण करून त्याचा मराठीतील भावानुवाद देऊन काव्य या कला प्रकारचा उचित सन्मान लेखक या पुस्तकात  करतो.   

हे ३९३ पानांचे पुस्तक वाचताना लेखकाने घेतलेले कष्ट, जमा केलेले संदर्भ  कैफी यांच्या संदर्भात अभ्यासकांनी मांडलेली मते, जयश्री देसाई यांच्या शौकतवरील पुस्तकातील वेळोवेळी वापरलेले उतारे यातून समग्र कैफी मांडण्याचा  प्रामाणिक प्रयत्न यात दिसतो. 

एक मात्र जाणवले, यावर  अधिक संपादकीय संस्कार व्हायला हवे होते. जीवन आणि शायरी ही कैफींच्या आयुष्यातील दोन अंगे नव्हेतच. पण सहज वाचन आनंद देण्यासाठी हे दोन काटेकोर स्वतंत्र विभाग ठेवले असते, तर या पुस्तकात आलेला विस्कळीतपणा, मुद्रण दोष कमी व्हायला मदत झाली असती.  

शीर्षकात मार्क्सिस्ट हा शब्द ‘मार्किस्ट’ होऊन आला आहे. शिवाय ज्या नज्ममुळे त्यांचे लग्न  जमले त्यातही ‘मेरे’च्याऐवजी ‘मिरे’ असे झाले आहे आणि तेही दोन-तीनदा. या गंभीर चुका सहज टाळता आल्या असत्या. 

पण एक मात्र नक्की, की या पुस्तकाच्या निमित्ताने लेखकाने एका संवेदनशील कवीचा जीवन प्रवास मांडताना आंदोलने, संघर्ष यांचे महत्त्व विषद करत  सामाजिक  सहिष्णुता, मानवता याचा जो  जागर केला आहे, तो या चरित्राला एक वेगळे परिमाण देतो.

संबंधित बातम्या