संवेदनशील मनाने टिपलेला गावगाडा

डॉ. केशव साठये
सोमवार, 20 डिसेंबर 2021

पुस्तक परिचय

व्यक्तिचित्रे रंगवणे ही मुळात एक अतिशय आव्हानात्मक अशी गोष्ट आहे. माहीत असलेल्या व्यक्तींबद्दल लिहिले, तर वाचक आपल्या पूर्व ज्ञानाच्या आधारे त्या लेखनाशी स्वतःला जोडून घेऊ शकतो आणि माणूस अधिक समजून घेण्यातला आनंद मिळवू शकतो. त्यातही व्यक्तिचित्रात थोडी कल्पनाशक्ती मिसळून साहित्यकृती तयार केली, की त्या लेखनाला एक टोकदारपणा येतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे वि. ग. कानिटकर यांनी रंगवलेली ‘पूर्वज’ आणि ‘आणखी पूर्वज’ ही दोन चरित्रवजा थोडी काल्पनिक फोडणी दिलेली पुस्तके. संदर्भित पुस्तक ‘गोठण्यातल्या गोष्टी’ हे एक प्रकारे याच पठडीतले, कल्पनाशक्तीचे रंग मिसळलेल्या व्यक्तिचित्रांची आरास आहे. सोबतीला गोठणे नावाच्या गावाचा साहित्यिक सातबारा उताराही आहे. लेखक म्हणतो त्याप्रमाणे या व्यक्तिकेंद्रित कथाच  आहेत. याला कथा म्हणा किंवा व्यक्तिचित्रे, हा सारा मामला अतिशय वाचनीय आहे.

कोकणातील रायगड जिल्ह्यातील गोठणे हे एक छोटे गाव या सर्व कथांचे घटनास्थळ आहे. गावाच्या  वातावरणाचे हे नेपथ्य इतक्या बारीकसारीक तपशिलाने कथांमधून समोर येते की यातील गुरांचे गोठे, गावातले वाडे हेसुद्धा एक व्यक्तिरेखा होऊन आपल्याला या गोष्टीत रममाण व्हायला मदत करतात. लेखकाने गोठणे गावाचे अतिशय नक्षीदार शब्दचित्र रेखाटले आहे. गावातील बाजारपेठ, नाकेदार हॉटेल, गावातले गल्ली बोळ दाखवत या लेखन यात्रेवर वाचकांना घेऊन जाताना लेखक त्या निमित्ताने गावाच्या व्यक्तिमत्त्वाचेही दर्शन घडवतो. यात जाता जाता सांगितलेली उपकथानकेही मूळ आशयाला बळकटी देणारी आहेत. त्यामुळे घडणाऱ्या घटना अनुभवताना, प्रसंग वाचताना गावासकट माणसे वाचायला मिळाल्याचे एक संपृक्त समाधान वाचकाला मिळते. लेखकाने यात थोडा मसाला टाकला असला, तरी तो किती टाकायचा याचे भान त्याने दाखवले आहे. हे सगळे खरे नाही हे माहीत असूनही हे असे असू शकते, ही भावना वाचकांच्या मनात निर्माण होतेच आणि हेच या व्यक्तिकथांचे वेगळेपण आहे.  

यातील सर्व व्यक्तिकथा ज्या माणसांविषयी बोलतात ती माणसे कुणी फार मोठी नाहीत, ना कोणता मोठा पराक्रम यांच्या नावावर आहे. सर्वसामान्य दिसणारी ही माणसे आपल्याला वाचता वाचता उंच वाटू लागतात. याचे श्रेय लेखकाच्या निवेदन शैलीला तर आहेच, पण त्याहीपेक्षा त्या व्यक्तिरेखांमधली खास वैशिष्ट्ये टीपकागदा सारखी टिपणाऱ्या लेखकाच्या संवेदनशीलतेलाही आहे. 

यातील प्रसंग, सखेसोबती, गावकरी लेखकाने आपल्या लहानपणी पाहिलेले अनुभवलेले आहेत. पण तरीही इतक्या वर्षांनंतर त्यांच्या आठवणींचा गजरा माळताना त्यावेळचा ताजेपणा आणि सुगंध त्यांनी जराही विरू दिलेला नाही. स्मरणरंजनाला काळाच्या बंधनातून मुक्त करून ते ‘आजचे’ करण्याच्या या लेखन कौशल्याला दाद द्यायला हवी. मूळ व्यक्तिरेखांमध्ये मिसळलेल्या कल्पनारम्यतेमुळे पात्रांना उठाव आला आहे. वाचकांना यातील गूढरम्यतेचा आस्वाद घेताना एक आकर्षक नेपथ्य देण्यात हा लेखनघाट (फॉर्म) यशस्वी झाला आहे.  ही मनस्वी माणसे लेखकाने पांढऱ्या, काळ्या, करड्या रंगात रंगवली आहेत. अतिशय सामन्य पार्श्वभूमी असलेल्या मंडळीच्याही जगण्यात एक उत्सव असतो, तो दाखवून देत पारावर उकिडवी बसणारी माणसेही आयुष्य भरभरून जगत असतात याचा रोकडा प्रत्यय देणाऱ्या या कथा आहेत.  या कथासंग्रहात एकूण सात व्यक्तिरेखा आपल्याला भेटतात. जिताडेबाबा खिडकी खंडू, मॅटिनी मोहम्मद, सुलतान पेडणेकर, जयवंतांची मृणाल, रंजन रमाकांत रोडे आणि गोलंदाज. ही सगळी मंडळी कथा निवेदकाच्या उत्तम परिचयातली आहेत वा संपर्कातली आहेत. 

कोणी वर्गमित्र आहेत, कोणी वडिलांच्या ट्रकवर काम करणारी आहेत. सुलतान पेडणेकरचे पराक्रम, अचाट साहस वाचताना स्तिमित व्हायला होते. जिताडेबाबा, म्हणजेच तात्या दुर्वे त्याचे मत्स्य प्रेम आणि त्यानिमित्त लेखकांनी वर्णन केलेल्या रेसिपीज खवय्यांना नक्की प्रेमात पाडतील अशा आहेत. रांगड्या राकट गावातील गुलबकावलीचे फूल शोभावी अशी बुद्धिमान देखणी मृणाल म्हणजे या कथा संग्रहातील एक टवटवीत अध्याय आहे. जिताडेच्या गोठ्यात काम करणारा हरकाम्या खिडकी खंडू म्हणजे एका जिगरबाज, धाडसी तरुण. त्याची कथा खिळवून ठेवणारी आहे. मॅटिनी मोहम्मद ही या कथासंग्रहातील गावातील हिंदी चित्रपटांचे वेड दर्शविणारी एक अतिशय रोचक अशी कथा आहे. रंजन रमाकांत रोडे हा कलावंत केवळ बोटातलीच कलेने नव्हे, तर स्वतंत्रपणे विचार करण्याच्या पद्धतीमुळे गावकऱ्यांच्या आदरास पात्र  होतो, त्याचप्रमाणे वेळप्रसंगी कसा नको तसा वागतो, याचेही दर्शन कथेत घडते. गोलंदाज या पन्नास पानी कथेत गोलंदाज नावाचा अवलिया सवंगड्याच्या क्रीडा कौशल्याचे दर्शन घडवत गोट्यांचा खेळ, पतंगबाजी आणि क्रिकेट या आपल्या बालविश्वातील देहभान हरपून टाकणाऱ्या खेळांचे सुरेल समालोचन आपल्याला वाचायला मिळते.

लेखकानी आवर्जून या लेखनाला कथा म्हटलेले असले, तरी कथा या पारंपरिक फॉर्मपासून त्या थोड्या दूर गेलेल्या आहेत. अर्थात असे असायलाही हरकत नाही. पण त्यामुळे एरवी कथा या साहित्य प्रकारातून समोर येणारा एक घोटीवपणा, कथावस्तूचे संवेदनशील विश्लेषण, व्यक्तिरेखांचा मनोव्यापार हा अनुभव या लेखनातून क्वचितच मिळतो. या संग्रहातील कथा व्यक्तिकेंद्रित असल्यामुळे त्या व्यक्तीच्या संदर्भातील अनेक घटना, प्रसंग, किस्से एकामागून एक येत राहतात. अशा लेखनात त्यातील क्रम महत्त्वाचा असतोच. शिवाय त्या व्यक्तीच्या वैविध्यपूर्ण वैशिष्ट्यांचे परिणामकारकतेच्या दृष्टीने सादरीकरण केले, तर उत्कर्षबिंदू साधण्याच्या दृष्टीने तो क्रम उपयोगी ठरतो. हे यातही साधलेले असले, तरी आणखी कारागिरी करायला यात वाव होता.

यातील अन्वर हुसेन यांची रेखाटने विशेष कौतुकास पात्र आहेत. याचे कारण ती कथानकाशी छान इमान राखून आहेत. ‘लार्जर दॅन लाईफ’ ही कथाशैली यातील चित्रांमधील रंग रेषांमधून प्रतीत होते. नाक्यावरच्या नाकेदार हॉटेलच्या माहोलचे दृश्यरूपही ग्रामीण बाजाचे सुरेख दर्शन घडवते. जिताडेबाबा आणि जिताडा मासा, गोलंदाजाचा पुतळा, पतंगबाजीचा खेळ चित्रकाराने अतिशय तन्मयतेने रंगवलेला आहे. 

या कथा संग्रहाच्या निमित्ताने, वास्तव आणि कल्पना यांची मनोहारी तरीही तार्किक सरमिसळ करून केवळ माणसांचेच नाही, तर गावाचे, गावकऱ्यांचे, तेथील परंपरांचे, संस्कृतीचे एक चिरंतन पोर्ट्रेट साकारत हे साहित्यिक फ्युजन अतिशय चित्रम शैलीत लेखकानी वाचकांसमोर ठेवले आहे, आणि हेच  या साहित्यकृतीचे यश आहे. 

गोठण्यातल्या गोष्टी

  • लेखक :  हृषीकेश गुप्ते
  • प्रकाशन : रोहन प्रकाशन, पुणे  
  • किंमत : ₹    ३२५
  • पाने : २२३

संबंधित बातम्या