अभ्यासपूर्ण अन्वयार्थाचा दस्तावेज 

डॉ. केशव साठ्ये 
सोमवार, 27 जानेवारी 2020

पुस्तक परिचय
 

भारतीय जनमानस तीन विषयांबाबत कमालीचे संवेदनशील असल्याचे आपण पाहतो. क्रिकेट, सिनेमा आणि राजकारण. यातील राजकारणाचा फिव्हर हा निवडणुकांच्यावेळी शिगेला गेलेला असतो. या पार्श्‍वभूमीवर प्रणय रॉय आणि दोराब आर. सोपारीवाला यांच्या ‘दि व्हर्डिक्ट-डिकोडिंग इंडियाज इलेक्शन्स’ (मार्च २०१९) या इंग्रजी पुस्तकाचे ‘कौल लोकमताचा-भारतीय निवडणुकांची उकल’ हे पत्रकार सतीश कामत यांनी  केलेल्या भाषांतरित पुस्तकाचे स्वागत करायला हवे. या निमित्ताने भारतीय निवडणुकांचा एक गोळीबंद सारांश मराठी वाचकांना त्यांनी उपलब्ध करून दिला आहे. 

प्रणय रॉय यांनी संयुक्तपणे लिहिलेल्या  पुस्तकाच्या या भाषांतराला आपोआपच एक अनुभव समृद्धीचे आणि विश्‍वासार्हतेचे परिमाण लाभले आहे. सर डेव्हिड बटलर या जगविख्यात  निवडणूकशास्त्र-तज्ज्ञाच्या प्रस्तावनेमुळे याचे मोल वाढले आहे. या पुस्तकात एकूण पाच प्रकरणे आहेत. त्यात भारतीय निवडणुकांतील निर्णायक वळणे, अंदाज कसे बांधावे त्या अंतर्गत अंदाज सूचक संकेत कसे ओळखावेत, नमुना निवडीतील त्रुटी, मतचाचण्यांचे प्रकार  याची सविस्तर चर्चा केली आहे. ग्रामीण आणि शहरी मतदारांमधील फरक, स्त्रियांचा मतदानात वाढता सहभाग, त्यांचा कल, अपक्ष उमेदवारांचे घटते  प्रमाण, अँटी इंकम्बसी याचाही अभ्यासपूर्ण ऊहापोह हे पुस्तक करते. शिवाय हे सगळे  तक्त्यांच्या, सारिणींच्या आकड्यांच्या आणि टक्केवारीच्या आधारे सांगितले गेले असल्यामुळे सर्वसाधारण वाचकांनाही याचे आकलन सहज होऊ शकेल. निष्कर्ष या प्रकरणात लेखकाने वाचकांच्या मनात निवडणुकीच्या संदर्भात कोणते प्रश्‍न उभे राहू शकतील याचा अंदाज बांधून विद्यमान सरकारविषयी मतदारांच्या भावना, गायब मतदार, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे, उसळी मारणारे निकाल, हेलकावे (स्विन्ग्ज), ध्रुवीकरण  हे मुद्दे ऐरणीवर आणले आहेत. या पुस्तकातून आणखी काही महत्त्वपूर्ण माहिती समोर येते. एखाद्या पक्षाकडे वृत्तवाहिन्यांची मालकी असली, तरी त्या निवडून आण्यासाठी कुचकामी ठरतात आणि छोट्या पडद्यावर उमेदवाराचे ३० सेकंदांपेक्षा जास्त दर्शन धोकादायक ठरू शकते हे ते निष्कर्ष. माध्यमांनी राजकारण्यांना शिस्त आणली हा महत्त्वपूर्ण पैलू हे पुस्तक सोदाहरण समोर आणते. 

या पुस्तकात सात दशकांच्या निवडणुकींचा अभ्यासपूर्ण आढावा घेतला गेला आहे. भारतासारख्या खंडप्राय देशात जनमानसाची नाडी अचूक ओळखणे हे अत्यंत जिकिरीचे असे काम आहे. प्रांत, भाषा, संस्कृती, जीवनमान, शिक्षण यात कमालीचे वैविध्य असलेल्या १३० कोटीहून अधिक लोकसंख्येच्या देशात लोकांनी कोणाला मत दिले, कोण निवडून येणार, कोणाचा प्रभाव आहे याचा जास्तीतजास्त अचूक अंदाज बांधणे हे अशक्य कोटीतील भासेल असे काम असते. हे शिवधनुष्य या पुस्तकाने यशस्वीपणे पेलले आहे आणि मतदार राजा आहे यावर शिक्कामोर्तबही केले आहे. सबळ पुरावे आणि सखोल विश्‍लेषण यामुळे हे पुस्तक लक्षणीय ठरते.  

अशा पुस्तकामध्ये संदर्भ खूप महत्त्वाचे असतात. संदर्भसूची वाचून  हे पुस्तक जागतिक पातळीवरील अगदी २०१९ पर्यंतच्या संदर्भांनी युक्त आहे  हे जाणवले. पण संदर्भ कसे द्यायचे याची शिस्त पाळली गेली नाही. काही  ठिकाणी वाक्येच वाक्ये लिहिली आहेत. काही संदर्भीय लेखाखाली तारीख नाही. या त्रुटी टाळता आल्या असत्या. दूरदर्शन हे आजही विश्‍वासार्ह मानले जात नाही, हे या पुस्तकातले विधान (पृष्ठ ४१) प्रत्यक्ष काही मतदारांशी बोलून केलेले असले, तरी ग्रामीण आणि निमशहरी भागात आजही दूरदर्शनचे महत्त्व कमी झालेले नाही हे वास्तव आपल्याला कसे नाकारता येईल? किंबहुना खासगी वाहिन्यांत बातमीचे वस्तुकरण होत असताना दूरदर्शनचे वास्तवीकरण उठून दिसते.

मोठ्या प्रमाणावर अंदाज चुकलेल्या, अपयशी ठरलेल्या संशोधनाचा सविस्तर तपशील या पुस्तकात केस स्टडी म्हणून यायला हवा होता. त्यादृष्टीने २००४ आणि २०१४ च्या लोकसभा निवडणुका आणि २०१५ ची दिल्ली विधानसभा निवडणूक महत्त्वाची ठरली असती. यात या संशोधन संस्थांचे नेमके काय चुकले हे मांडले असते तर ते दिशादर्शक झाले असते. पुस्तकात संशोधनाचे प्रारूप, आराखडा आणि काही निवडक प्रश्‍नावल्या परिशिष्टात दिल्या असत्या तर माध्यम आणि समाजशास्त्राच्या विद्यार्थ्यांनाही  ते उपयुक्त ठरू शकले असते. जगभरात ‘निवडणूक अंदाज शास्त्र’(सेफॉलीजी) हे अजूनही फारसे विकसित नसताना असा शास्त्रशुद्ध दस्तावेज  भारतीय पत्रकारांकडून समोर येणे ही अभिमानास्पद बाब आहे.  

संबंधित बातम्या