शब्दचित्रांची दिलखुलास पोर्ट्रेट्स!

डॉ. केशव साठ्ये
सोमवार, 19 एप्रिल 2021

पुस्तक परिचय

ऐंशीच्या दशकात पुण्यातील जाहिरात आणि प्रकाशन विश्वात इलस्ट्रेटर म्हणून चंद्रमोहन हे नाव नेहमी कानावर पडत असे. पुस्तके, मासिके, गृहपत्रिका अशी सगळीकडे त्यांची उपस्थिती लक्षणीय आणि उल्लेखनीय होती. पुढे एक उत्तम पेंटिंग कलावंत म्हणूनही ते नावाजले गेले. अनेक प्रदर्शनातून त्यांच्या मनोवेधक  कलाकृती रसिकांच्या मनःपटलावर विराजमान झाल्या. या आपल्या ४० वर्षांच्या कलासक्त आयुष्यातील काही सोनेरी क्षण त्यांनी ‘बिटविन द लाइन्स’ या पुस्तकात शब्दबद्ध केले असून राजहंस प्रकाशनने हे देखणे पुस्तक प्रकाशित केले आहे. आयुष्यातील घटनांकडे अतिशय सजगतेने पाहणारा, येणाऱ्या अनुभवांना; जन्मजात लाभलेल्या शहाण्या दृष्टीने सामोरे जाणाऱ्या कलावंताचे हे एक प्रकारे स्केच बुकच आहे.

‘बिटविन द लाइन्स’ पुस्तकाचे मोठे शक्तिस्थळ म्हणजे यातील व्यक्तिरेखा, प्रसंग, स्थळ यांचे तपशील. असे तपशील देताना लेखकाचा कस लागतो. ‘निळी सायकल’ या पुस्तकातील पहिल्याच लेखात चंद्रमोहन आपल्या तपशील देण्याच्या आगळ्या शैलीची चुणूक दाखवतात. काही वेळाने तर ती सायकल आपल्यासमोर एक व्यक्ती होऊन उभी राहते आणि आता बोलायला लागेल की काय असे वाटून जाते. पोलीस खात्यात असलेल्या आपल्या वडिलांचे सायकल प्रेम दाखवताना आपल्या कनिष्ठ मध्यमवर्गीय घराच्या उंबरठ्याच्या आत ते आपल्याला नेतात. लेखकाच्या बालपणीचे जग, पोलीस कॉलनीतील वातावरण या सायकल यात्रेतून आपल्याला भेटते. शेवटी ही सायकल लेखकासह आपल्याला अभिनव कॉलेजच्या रस्त्यावर आणून सोडते. पुढील सर्व लेखाच्या जोडणीची ही पहिली साखळी त्या दृष्टीनेही या लेखाचे महत्त्व आहे.
पुस्तकातील ‘नमामी नर्मदे’ या शेवटच्या प्रदीर्घ लेखातही अतिशय मनोभावे रेखाटलेले तपशील वाचायला मिळतात. होशंगाबाद इथल्या नर्मदा नदीच्या तीराचे नेपथ्य या लेखनाला आहे. नर्मदेच्या तीरावरचा भक्तीभाव आणि बकालपणा दाखवत सकाळ आणि संध्याकाळच्या वातावरणाचे लॅन्ड्स्केप, त्याचे गहिरे रंग लेखक वाचकांच्या मनाच्या कॅनव्हासवर अतिशय सहजतेने कोरतो. माणसे आणि माहोल यांच्या गजबजाटाने हा लेख धार्मिकता, परंपरा याचा उत्तम कोलाज सादर करतो. थोडा कार्यानुभव आणि चार पैसे मिळावेत या उद्देशाने साहाय्यक म्हणून एका प्रथितयश चित्रकाराकडे काम करतानाचे आलेले प्रसंग आणि होणारी अवहेलना ‘दे दान’ या लेखात लेखक मांडतो. कॅप्टन रो आणि बापट ही जोडी जाहिरात लेखक आणि चित्रकाराची जोडगोळी पुण्याच्या माध्यम विश्वात एक आगळे स्थान मिळवलेली होती. ‘व्यवहार’ हा लेख यातील कॅप्टन रो या आसामीची ग्रेसफुली ओळख करून देतो. 
अनेक नामवंत लेखक, कवी, संपादक इथे भेटतात. पु .ल. देशपांडे, सुनितीबाई यांच्या अचानक झालेल्या भेटीचा रोचक अनुभव यात आहे. शांताबाई शेळके यांच्याशी झालेल्या मनमुराद गप्पा आहेत. आनंद अंतरकर यांच्या पुस्तकाच्या डिझाईनच्या निमित्ताने छपाई, कागद आणि एकूण पुस्तक निर्मितीच्या काही कडू, गोड आठवणी आहेत. अण्णा दाबके या मित्रासोबत अ‍ॅनिमेशन जगाची केलेली सफर यात आहे. शर्वरी रॉय चौधरी या शिल्पकाराच्या मातीचा सुगंध देणाऱ्या सादरीकरणाचा आंखो देखा हालही यात आहे. खास मुंबईहून येऊन शिकवणारे रेगे सर, वर्क ऑफ आर्ट आणि आर्ट ऑफ वर्कमधील फरक समजावून सांगणारे गोंधळेकर सर, कलाकृतीला ही व्हर्जिनिटी असते हे सांगणारे र. कृ. जोशी, डार्करूम कामावर हुकमत असलेले शिंदे, झाडू पोछा करणारे आणि मॉडेल म्हणून बसलेले आठवले, रवी बिल्डिंगचे मालक बाळासाहेब धारप, कवी ग्रेस अशी अनेक पोर्ट्रेट्स लेखक यात रंगवतो. या सर्वांच्या व्यक्तिमत्वांचा नेमका पोत पकडून त्यांचे त्रिमितीदर्शन लेखकाने इथे घडवले आहे.
मटका अड्ड्यावरचा थरार, चित्रपट पाहताना त्यातील दृश्यांचे तपशील टिपण्याची सवय, गुन्हेगाराचे रेखाचित्र काढण्याचा अनुभव, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेससाठी काम करताना त्यांच्या जाचक अटींना विरोध करण्याची कलावंताची बंडखोरी अशा अनेक कॅलिडोस्कोपी अनुभवांनी हे पुस्तक नटलेले आहे. व्यावसायिक पण सजग चित्रकार कलावंताचा हा जीवनप्रवास जाहिरात आणि प्रकाशन क्षेत्राचा इतिहास आणि त्याची कार्यपद्धती असा एक महत्त्वाचा दस्तऐवज आपल्या पुढ्यात टाकतो. डिजिटल युगात प्रवेश करण्यापूर्वीचे छपाई तंत्र, त्यासाठी आवश्यक कौशल्ये, डार्क रूमच्या अंधारात उमलणारे आर्ट वर्क ही सारी माहिती अतिशय रोचकपणे हे पुस्तक आपल्याला देते. पानापानावर पसरलेली रेघांची नक्षी आणि त्यातून फुलणारे अनुभव समृद्ध शब्द ‘बिटविन द लाइन्स’ या शीर्षकाचा नेमका अर्थ सांगून जाते. 
पुस्तकातील थोडी उणी बाब म्हणजे यातील लेखांचे केलेले संपादन. ते अधिक काळजीपूर्वक व्हायला हवे होते असे वाटते. उदाहरणार्थ ‘मित्र’सारखा लेख यात पराग हा मित्र आणि अभिनवचे दिवस या दोन्ही महत्त्वाच्या गोष्टी एकत्र आल्या आहेत. हा सोळा पानी लेख दोन भागात सहज आणि नैसर्गिकपणे वेगळा करता आला असता. ‘पंढरी’ या लेखातही पंढरी ही व्यक्तिरेखा आणि ग्रेस या दोन्ही गोष्टी एकदम फोकसमध्ये आणण्याचा प्रयत्न झालेला दिसतो. शिफ्ट फोकस हे कॅमेराचे तंत्र लेखनात किती अवघड असते ते इथे लक्षात येते. लेख विषयाच्या महत्त्वानुसार लहान मोठे होत असतातच हे मान्य करूनही तीन पानी ते वीस पानी अशा रेंजमध्ये लेख वाचताना वाचक म्हणून थोडी कसरत करावी लागते. पुस्तकाचाही एक गुरुत्वमध्य असतो, तो यामुळे थोडा ढासळतो. यात काही छोटे, छोटे दोन ते चार पानांचे लेख आहेत. विषयानुसार ते एकत्र करून थोडे पुनर्लेखन करून बघण्याचा प्रयोग करता आला असता. तथापि, एक अतिशय वेगळ्या आणि स्वतंत्र शैलीचे लेखन या निमित्ताने वाचायला मिळते, हे कबूल केले पाहिजे. भिडलेल्या व्यक्तींची चित्रेही भारावून न जाता रेखाटणे, विषयातील वस्तुनिष्ठता टिकवून ठेवताना त्यातील रसगंध उडून जाणार नाही याची दक्षता घेणे, हे केवळ कलाकुसरीचे काम नाही तर प्रतिभेचेही काम आहे आणि ते इथे लेखकाने चोख केले आहे. 

बिटविन द लाइन्स

  • लेखक : चंद्रमोहन कुलकर्णी
  • प्रकाशन : राजहंस प्रकाशन, पुणे
  • किंमत : ₹   ३०० 
  • पाने : २४०

संबंधित बातम्या