कारागृहातील निःश्‍वास

डॉ. माधवी वैद्य 
गुरुवार, 19 जुलै 2018

हार जेल हे नुसते नाव जरी ऐकले तरी अंगावर काटा उभा राहावा हे साहजिकच! पण इथेही मनाची कोवळीक जपणाऱ्या काही गोष्टी अभिव्यक्त होतात असे जर समजले तर त्यावर कोणाचा विश्‍वास बसेल का? पण या गजाआडही एका छोट्याशा झरोक्‍यातून डोकावतात स्वप्ने! आसमंतात वाहता राहणारा आशेचा वारा इथेही क्षणभर विसावायला येतो. इथे असते धीमी काळगती; कारण वातावरणच तसे! 

हार जेल हे नुसते नाव जरी ऐकले तरी अंगावर काटा उभा राहावा हे साहजिकच! पण इथेही मनाची कोवळीक जपणाऱ्या काही गोष्टी अभिव्यक्त होतात असे जर समजले तर त्यावर कोणाचा विश्‍वास बसेल का? पण या गजाआडही एका छोट्याशा झरोक्‍यातून डोकावतात स्वप्ने! आसमंतात वाहता राहणारा आशेचा वारा इथेही क्षणभर विसावायला येतो. इथे असते धीमी काळगती; कारण वातावरणच तसे! 

मने थिजलेली; कारणेही तशीच! पण या थिजलेल्या, गोठलेल्या परिस्थितीतूनही ‘रॉक रोझ’सारखी सुंदर फुले फुलतातच. परिस्थितीशी झगडून, वादळातून तावून सुलाखून बाहेर पडत ती सुंदर फुले उमलतात, त्यांच्या पाकळ्यांचा थरार आणि सुगंध आपल्यापर्यंत पोचतो आणि आपले मनही त्या स्पंदनांनी क्षणभर भावविभोर होऊन उठते. ही सारी किमया घडते एक मनस्वी कविता हातात आल्यावर; जी कविता ‘तिनका तिनका तिहार’ मध्ये शब्दांकित होऊन या पुस्तकाच्या पानापानांवर शब्दांची पखरण करून गेली आहे आणि आपल्याला सांगते आहे... आम्हीही संवेदनशील मने घेऊन वावरणाऱ्या तुमच्या आया, बहिणी आहोत....

तुरुंगातील महिला कैद्यांचा हा अनोखा कवितासंग्रह आपल्या हाती दिला आहे तो वर्तिका नंदा आणि विमला मेहरा यांनी. या कवितांचा सुंदर अनुवाद केला आहे तो अतिशय संवेदनशील अनुवादक मंजिरी धामणकर यांनी. एक चांगली कविता आपल्यापर्यंत पोचवल्याबद्दल या तिघींचेही आभारच मानायला हवेत. मेहता पब्लिशिंग हाऊसने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. ते त्यांच्या परंपरेला साजेसेच झाले आहे. 

आपल्या मनोगतात विमला मेहरा लिहितात, ‘मला वाटतं, प्रत्येक माणसाच्या व्यक्तिमत्त्वाला चांगले-वाईट पैलू असतात. वाईट बाजू प्रबळ झाली, की चुका होण्याची आणि पकडले जाण्याची शक्‍यता असते. परिणामी तुरुंगवासही घडू शकतो. चांगली बाजू प्रभावी असली, की सगळे नीट समजते; आचरण चांगले राहते. चुकांचा पश्‍चात्ताप होतो. सुधारण्याची इच्छा होते.’ महिला कैद्यांच्या मनातल्या अगतिकतेचे मनोबलात रूपांतर करण्यासाठी वर्तिकाने त्यांच्याकडे या पुस्तकासंबधीचा प्रस्ताव अचानक आणला आणि या पुस्तकाच्या निर्मितीला गती मिळाली, ही या पुस्तकाची चित्तरकथा आहे.

पुस्तक उघडल्यावर पहिल्याच पानांमधून आपल्याला तिहारचे वातावरण जाणवायला लागते. रुक्ष, कठोर, नीतिनियमांच्या चौकटीत बद्ध झालेले. ’’Now you are entering in certified jail’’ आणि मग Man power ची एक जंत्री वजा पाटी. वर्तिका नंदा लिहितात, ‘‘तिहारच्या पत्यावर कोणालाही पत्र पाठवण्याची इच्छा नसते. या दाराच्या आत भौतिक सुखांना प्रवेश नसतो...तिथून आकाश वेगळे दिसते आणि तारेही...’ जिथे सगळी नाती गळून पडतात तिथे उगवतो एक अंकुर. शरीर शृंखलांनी बद्ध असतानाही मनात आशेचा किरण जागता ठेवायला साह्यभूत होते कवितेचे एक मापटे.’ अशाच एका दुपारी त्यांना अचानक ‘तिहार’चा गाभाच गवसल्यासारखे झाले. त्या दुपारी काही महिला कैद्यांनी काही कविता, त्यांच्या भाव भावना व्यक्त करणाऱ्या त्यांना ऐकवल्या. कविता म्हणताना आतापर्यंत कोंडून राहिलेल्या मनातील भावनांचे बांध फुटले. त्यांच्याकडून एकही कविता पूर्ण होऊ शकली नाही. पण त्या जिथे गप्प झाल्या, तिथेच बहुधा कविता सुरूही झाली. या कविता म्हणजे त्यांच्या दुःखाश्रूंमध्ये भिजलेले शब्द, भावना आहेत. त्यांच्या स्वप्नांमध्ये हिंदोळणारे मृदू शब्द आहेत. या कवितांना आहे अपूर्णतेचे अस्तर...

या पुस्तकाच्या शीर्षकाचा उगम अशोक चक्रधर यांनी लिहिलेल्या एका दोह्यात आहे. यातून या महिलांच्या मनातली तगमग उभी राहते.

ते म्हणतात-
तिनका तिनका जोडकर चिडिया नीड बनाय.
हत्यारी पापिन मरी पवन उडा ले जाय.

काडी काडी जोडून चिमणी बांधते आपले घरटे आणि ती मेली कर्दनकाळ वावटळ येते आणि घरटे उडवून घेऊन जाते.
खरे तर हे आहेत इथल्या ‘कळ्यांचे निःश्‍वास’! हे निःश्‍वास ऐकले, की कविमनही कावरेबावरे होऊन जावे अशी इथली शब्दकळा! साखळदंडांनी जखडलेल्या स्त्रियांचे हे उद्‌गार म्हणजे बाईच्या अंतर्यामीचा खुलेआम केलेला दस्तऐवजच आहे.

इथे आपल्याला त्यांच्या कवितांतून कैदी भेटत नाहीत. त्यांच्या अंतरंगात निवास करणारा माणूस भेटतो. त्यांचे माणूसपण भेटते. इथे भेटते रमा चौहान. अनेक भाषांवर तिचे प्रभुत्व आहे. काही कारणाने ती ‘तिहार’मध्ये आली. आज संपूर्ण कुटुंबाने तिच्याशी संबंध तोडले आहेत. तिची आई, मुलगी कुठे आहेत तिला काहीदेखील माहीत नाही. हाच तिच्या मनाचा दुखरा कोपरा आहे. जो कवितेतून व्यक्त होतो. ‘मन पाखरू’ या कवितेत ती म्हणते

एका पक्ष्याला पिंजऱ्यात कोंडून घालतोस,
ना उडू देतोस, वाढू देतोस, ना खेळू देतोस,
म्हणूनच माणसा, जीवनात अयशस्वी होतो
पिंजऱ्यातून मुक्त कर आपल्या मनोभावनांना, 
बघ कसे इंद्रधनुष्याचे मोल मिळेल स्वप्नांना!

असेच इंद्रधनुष्याचे रंग पाहत असताना हातून झालेल्या चुकीमुळे सीमा रघुवंशी ‘तिहार जेल क्रमांक ६’मध्ये आली. तिने प्रमोदला आपला जोडीदार निवडले. देवळात जाऊन लग्न केले. पण त्याची रीतसर नोंदणी केली नाही. आज ती आणि प्रमोद एकाच परिसरामध्ये राहात असूनही त्यांची भेट नाही. पण आपल्यावर नितांत प्रेम करणाऱ्या प्रमोदच्या प्रेमाच्या ताकदीवर ती तगून आहे. तुरुंगातून सुटका झाल्यावर ती त्याच्याशी रीतसर नोंदणी करण्याचे स्वप्न उराशी बाळगून आहे. या कठीण प्रसंगात तिची एकच सहचरी तिला जगण्याचे बळ देते ती सहचरी म्हणजे तिची कविता. 
ताप भिंती या कवितेत ती म्हणते-

सकाळ संध्याकाळ लिहित बसते
या चार भिंतीत फक्त, तुझं नाव लिहिते...
हे शब्द माझे नव्हेत, काळजाचा हुंकार आहे..

असे काळजाचे हुंकार तिच्या अनेक कवितांमधून आपल्याला ऐकायला मिळतात. 
इथे लिहिती होते रिया शर्मा. ती आणि तिचे पती दोघेही ‘तिहार’ जेलमध्येच! नशिबाच्या या दृष्ट खेळात दिलासा इतकाच आहे, की पती-पत्नीच्या प्रेमाचा धागा मजबूत राहिला आहे. दर शनिवारी-रविवारी दोघांची भेट होऊ शकते आहे. तरीही तिच्या मनात अनेक प्रश्‍नचिन्हे उठतात; ज्यांना ती आपल्या कवितेत स्थान देते. तिला वाटते-
 

मी कधी त्या खुल्या हवेत, त्या ढगात विहरु शकेन?
की आयुष्यभर इथेच खितपत पडेन?...
कधी माझ्या घरात, माझ्या माणसात जाऊ शकेन?
की असं लांबूनच त्यांना पाहून डोळे अश्रू ढाळत राहतील?

ही कविता सर्वच महिला कैद्यांच्या मनातले ह्रदगत उलगडून दाखवणारी आहे. प्रत्येक जण आज त्या बंदिवासात असेच जीवघेणे प्रश्‍न घेऊन जगते आहे. 

आणखी एक मनस्वी कवयित्री इथे भेटते. तिच्या दिवस उगवतो तो कवितेचे बोट धरून आणि मावळतो तो ही कवितेच्या साक्षीने.

आरती हरियानातील यमुनानगर इथली. दैवदुर्विलासाने तिला इथे आणली. तिची चिमुकली मुलगी तिला पडलेले प्रश्‍न आरतीला विचारते. आरतीजवळ त्याची उत्तरे नाहीत. पण ती आपले मन मोकळे करते कवितेच्या माध्यमातून. ती आपल्या ‘काळ’ या कवितेत म्हणते-
प्रत्येक गीतात एक वाद्य असतं,
प्रत्येक गुन्ह्यापाठी एक रहस्य असतं,
माझ्या गुन्ह्याची चिंता करू नका कुटुंबीयांनो,
चमकणाऱ्या चंद्रावरही लांच्छन असतं..
.

तर अशा आहेत ‘तिहार’मध्ये, एका बंदिवासात जन्मलेल्या या कविता, त्यांचे भाग्यच असे आहे, की बंदिवासातही त्यांनी फुलून यावे, डोळ्यात वाहणाऱ्या अश्रूंनी कागदांवर शब्दरूप घ्यावे, माणसातील माणूसपणाचे दर्शन त्यातून घडावे. एवढे करण्याची मोकळीक त्यांना मिळावी, मिळाली हे या कवितांचे भाग्य! 

या कविता आहेत फक्त वानगीदाखल... यांची संपूर्ण दखल घ्यायची असल्यास हा संग्रह मनःपूर्वक वाचावाच लागेल. मग पानोपानी आपल्याला भेटत राहतील त्यांच्या भावभावना, आशा-निराशा, सुखदुःखे आणि ऊन सावल्या. पण त्यांची जगण्याची आणि उमलण्यांची जिद्द मात्र अभूतपूर्व आहे. आजपर्यंत तुरुंगवासात असताना अनेक दिग्गजांनी अभूतपूर्व साहित्यनिर्मिती केली आहे. या महिलांनीही एक लहानसा प्रयत्न केला आहे, की लिहिण्याचा पण या लेखनातील जिद्द, आवेश बघून थक्क, स्तिमित व्हायला होते हे नक्की!
‘मी’ या कवितेत आरती म्हणतात-
दावाच नाही माझा, सूर्य असण्याचा,
पृथ्वीवरचा अंधार नाहीसा करण्याचा
मात्र, मी एक दिवली नक्कीच आहे,
तमाशी आजन्म लढण्याचा 
एकमेव वसा आहे माझा,
येवोत दुःखांची वादळे,
संकटांची वावटळ
माझी ज्योत फडफडेल जराशी,
पण विझणार नाही...

तिनका तिनका तिहार 
 कवयित्री ः वर्तिका नंदा, विमला मेहरा 
 अनुवाद ः मंजिरी धामणकर 
 प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे 
 किंमत ः १८०   पाने : १४६ 

 

संबंधित बातम्या