निसर्गाचे अगणित पैलू

डॉ. मंदार दातार, आघारकर संशोधन संस्था
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

पुस्तक परिचय
 

कवींना, साहित्यिकांना निसर्ग जसा दिसतो, तशा साकार होतात लालित्यपूर्ण, लोकांना सहजी भावणाऱ्या रचना. सरळधोपट, चष्मे लावून एका ठराविक चौकटीतून निसर्ग पाहणाऱ्या अभ्यासकांच्या दृष्टीतून लिहिली जातात निसर्गाची वर्णने, खूप महत्त्वाची पण केवळ वर्णनेच. पण, प्रा. माधव गाडगीळांसारख्या विज्ञानाचे तत्त्वज्ञान कोळून प्यायलेल्या हाडाच्या शास्त्रज्ञाला हे सारे निसर्गात दिसतेच, पण त्याही पलीकडे दिसते निसर्गातले गणित. निसर्गातले हे इतरांना न दिसणारे गणित माधव गाडगीळ सर्वसामान्यांना पचेल अशा पण अलंकारिक शैलीत मांडू शकतात, हे लेखक म्हणून त्यांचे वेगळेपण ठरते. 

पद्मभूषण माधव गाडगीळांचा परिचय महाराष्ट्राला जसा बिनीचे जीवशास्त्रज्ञ म्हणून आहे, तसाच आहे एक उत्तुंग प्रतिभेचे लेखक म्हणून. गेल्या काही वर्षांत त्यांनी अनेक माध्यमांतून निसर्गविषयक ज्ञान जनमानसापर्यंत पोचवले आहे. त्याचीच पुढची पायरी म्हणजे ‘सकाळ’ प्रकाशनतर्फे नुकतेच प्रकाशित झालेले त्यांचे ‘निसर्गाने दिला आनंदकंद’ हे पुस्तक. रॉबर्ट मॅकआर्थर, एडवर्ड विल्सन यांसारख्या निसर्गशास्त्र विषयातल्या धुरंधरांची परंपरा गाडगीळांनी त्यांच्या अभ्यासातून, संशोधनातून पुढे चालवलीच आहे, पण संशोधनाबरोबरच सर्वसामान्य वाचकांसाठी निसर्गलेखनाचा जे. बी. एस. हाल्डेनसारखा वसाही त्यांनी हाती घेतला आहे. बंगळुरात असताना त्यांनी हिंदूसारख्या मातब्बर वृत्तपत्रात सातत्याने लिखाण केले. निवृत्तीनंतर पुण्यात ते कायमस्वरूपी वास्तव्यासाठी आल्यावर ‘सकाळ’ने ही संधी हेरली आणि त्यांनीही सातत्याने गेली दहा-बारा वर्षे ‘सकाळ’मध्ये अनेकविध विषयांवर उत्तमोत्तम लेख लिहिले. त्यातील काही निवडक लेखांचे पुस्तक ‘निसर्गाने दिला आनंदकंद’ या नावाने ‘सकाळ’नेच नुकतेच प्रकाशित केले आहे. दर महिन्याला गाडगीळांच्या लेखाची वाट पाहणाऱ्या वाचकांना हे सारे लेख एकत्रित स्वरूपात मिळणे म्हणजे मोठी पर्वणीच आहे.

या पुस्तकात गाडगीळ निसर्गाचे अगणित पैलू उलगडून दाखवतात. त्यांच्या लेखणीला काहीच वावगे नाही. देवमाशांपासून ते छोट्या सूक्ष्मजीवांपर्यंत, देवरायांपासून ते गावरान वाण राखणाऱ्या शेतांपर्यंत, समुद्राच्या तळाशी असलेल्या वडवानलापासून ते एव्हरेस्टपर्यंत, निसर्गातल्या सहकाराबाबतही आणि संशयी समतोलाविषयीसुद्धा, महाराष्ट्रातल्या मेंढा गावापासून ते स्कॅंडिनेव्हियापर्यंत. या साऱ्याबरोबरच निसर्गाच्या ऱ्हासाची असंख्य उदाहरणेही ते कळकळीने मांडतात, पण तरीही त्यांची सकारात्मकता, त्यांचा आशावाद कुठेच सुटत नाही. किंबहुना लोकांच्या प्रयत्नातूनच निसर्गसंवर्धन शक्‍य आहे, असे त्यांचे ठाम प्रतिपादन आहे. या लिखाणात प्राणिशास्त्र, वनस्पतिशास्त्र तर आहेच, पण त्याबरोबरच पौराणिक कथा, इतिहास, भूगोल, रसायनशास्त्र, अर्थशास्त्र, संख्याशास्त्र यांचे संदर्भ देऊन गाडगीळ आपला विषय फुलवतात. संदर्भांची आणि उदाहरणांची विस्मित करणारी विविधता साऱ्या लिखाणात दिसते. या साऱ्या लेखन वैविध्याला अरुंधती वर्तकांचे तितकेच समर्पक मुखपृष्ठ वेगळीच उंची देते. ‘सकाळ’नेही आकर्षक स्वरूपात पुस्तकाची मांडणी केली आहे.

या पुस्तकातील लेखांची शीर्षके तर इतकी चपखल आणि काव्यात्मक आहेत, की वाचक त्याच्याच प्रेमात पडेल. ‘इतकी घाई, कशास बाई?’, ‘संघर्ष अन शोषण, की सहकार अन पोषण’, ‘होते मनात हत्ती आमुच्या रानीवनी नांदावे’, ‘बहरू दे सर्जनशीलता आपणा सर्वांची’ ही झाली काही वानगीदाखल उदाहरणे. एकुणातच त्यांच्या साऱ्याच लिखाणात शास्त्रीय प्रमेय, गृहीतकांबरोबर मराठी कविता, संस्कृत श्‍लोक विपुलतेने येतात.    

सध्या एखाद्या विषयातल्या हौशी लोकांनाही तज्ज्ञ मानण्याची फॅशन आली असताना हे पुस्तक वाचून गाडगीळांसारखी उंची गाठायची असेल, तर अभ्यासाची किती खोली गाठावी लागते किंवा त्या दृष्टीने किमान किती प्रयत्न करावे लागतात याची जाणीव वाचकांना नक्कीच होईल. ‘जे न देखे रवी, ते देखे कवी’ असे आपल्याकडे म्हणतात. पण कवीलाही जे दिसत नाही ते विज्ञानाला दिसते. जग किती अद्‌भुतरम्य आहे हे कथन एखाद्या कवीचे, शाहिराचे शब्द घेऊन, पण विज्ञानाला अपेक्षित असलेले तारतम्य तसेच ठेवून एखादा शास्त्रज्ञ कसे करू शकतो, हे समजून घ्यायचे असेल तर ‘सकाळ’ प्रकाशनाचे ‘निसर्गाने दिला आनंदकंद’ हे नेटके पुस्तक आवर्जून वाचायला हवे.

संबंधित बातम्या