स्त्रियांसाठी उपयुक्त विवेचन
पुस्तक परिचय
‘स्त्रियांचे आजार आणि उपचार’ या पुस्तकामध्ये डॉ.अविनाश भोंडवे यांनी अतिशय योग्य आणि चपखल शब्दांत खूप गुंतागुंतीच्या समस्यांचे सोप्या पद्धतीने विश्लेषण केले आहेत.
जनमानसात स्त्रियांच्या आरोग्याबाबत चर्चाच जास्त होते, पण प्रत्यक्षात कृती करण्यात खूप उशीर होतो. याच कारणास्तव बरेच आजार वाढतात आणि त्यांच्या निदानास उशीर होतो. म्हणूनच डॉ. अविनाश भोंडवे लिखित ‘स्त्रियांचे आजार आणि उपचार’ हे पुस्तक स्त्रियांसाठी उपयुक्त आहे.
प्रत्येक लेखामधून स्त्रीने असे आजार उद्भल्यास वेळेत काय करावे, काय उपचार घ्यावेत हे सविस्तर सांगितले आहे, त्याचे खूप कौतुक वाटते. तसेच या पुस्तकात त्यांनी प्रसूती दरम्यान होणाऱ्या समस्यांचा, सिझेरियन प्रसूतीच्या सर्व कारणमीमांसांचा उत्तम ऊहापोह केलेला आहे. विशेषतः गरोदर स्त्रियांमधील मधुमेह, लसीकरण, प्रसूती आणि प्रसूतीपश्चात त्रासाबद्दलची विस्तृत माहिती खूप उपयुक्त ठरावी.
मातामृत्यू वेळेत रोखून मातामृत्युदराची आकडेवारी कशी कमी करायची, याचे विश्लेषण अतिशय उल्लेखनीय आहे. सर्व भावी मातांना याचा नक्कीच खूप उपयोग होईल. स्तनदा मातांना मातृदुग्ध पेढीचा उतारा तर नवीन माहिती देईलच. पण त्याशिवाय मातांना स्तनपानासाठी उद्युक्त करेल आणि दुग्धदानालाही उत्तेजन देईल.
महिलांमधील कर्करोगाचा अभ्यास आणि त्याचे निदान कसे योग्य पद्धतीने व्हायला हवे, हा लेख छानच आहे आणि आपल्या स्त्रियांना हे अगदी सहज करता येण्याजोगे आहे.
मानसिक संतुलन आणि त्याचे महत्त्व अधोरेखित करून डॉ. अविनाश भोंडवे यांनी या पुस्तकाची वैचारिक उंची वाढवली आहे. चांगल्या आरोग्यासाठी शरीरही निरोगी हवे, मनाची उभारीही असावी आणि सामाजिक आरोग्याची स्थितीदेखील चांगली असावी. चांगली तब्येत किंवा आरोग्य म्हणजे नुसता औषधोपचार नाही, तर आनंदी आणि सुखी जीवन शक्य व्हावे अशी शरीराची आणि मनाची अवस्था. असे म्हणतात, की जेव्हा शरीर आणि मन हे दोन्ही व्यवस्थित असतात आणि आपण आपली नेहमीची कामे नीट, व्यवस्थितपणे करू शकतो, तेव्हाच आरोग्य सुदृढ असते. याच विषयावर लिहिलेले स्त्रियांचे मानसिक आरोग्य आणि व्यसनाधीनता यावरील लेख सौम्य शब्दांत खूप काही शिकवून जातात. या पुस्तकाचे मार्मिक आणि स्त्रियांचे जिव्हाळ्याचे विषय म्हणजे तारुण्य टिकविण्यासाठी उपायांबद्दल केलेले उत्तम मार्गदर्शन.
तरुण मुलींपासून ते रजोनिवृत्तीच्या वयापुढच्या महिलांच्या आरोग्यासाठी हे अगदी योग्य असे पुस्तक आहे. जेणेकरून घरबसल्या सर्व शास्त्रशुद्ध माहिती आणि विवेचन मिळू शकेल. लक्षात असू द्या, भारत देशाची प्रगती ही स्त्रियांच्या आरोग्यशीच निगडित आहे.
स्त्रियांचे आजारा आणि उपचार
- लेखक : डॉ. अविनाश भोंडवे
- प्रकाशन : सकाळ प्रकाशन, पुणे
- किंमत : ₹ १५०
- पाने : १०३