संशोधनात्मक मागोवा

डॉ. नंदकिशोर कपोते
गुरुवार, 22 मार्च 2018

पुस्तक परिचय    
 

  • घुंगूरनाद
  •  लेखिका ः मीना शेटे - संभू, 
  •  प्रकाशक ः विश्‍वकर्मा पब्लिकेशन्स, पुणे. 
  •  किंमत : ३०० रुपये.  पाने : २०८

गेल्या आठ वर्षात इंग्रजी गाजलेल्या तब्बल ४८ हून अधिक पुस्तकांचा मराठी अनुवाद केलेल्या मीना शेटे - संभू यांनी दहा स्वतंत्र पुस्तकांचेही लेखन केले आहे. ‘घुंगूरनाद. कथाविश्‍व - विविध घराण्यांसह’ हे त्यांचे दहावे स्वतंत्र पुस्तक त्यांच्या एकूणच लेखन कारकिर्दीत शिरपेच खोवणारे आहे.

कथकच्या क्षेत्रातील अंतिम शब्द मानल्या गेलेल्या ज्येष्ठ गुरू पंडित बिरजू महाराज यांनी लिहिलेली प्रस्तावना हे या पुस्तकाचे खास वैशिष्ट्य आहे. पंडित महाराजजी कधीही पूर्ण खात्री करून घेऊन त्यांचे शंकानिरसन झाल्याखेरीज कोणालाही लेखी शुभेच्छाही पाठवत नाहीत. त्या पार्श्‍वभूमीवर या पुस्तकासाठी त्यांनी दिलेली दीड पानी प्रस्तावना ही लेखिकेच्या आणि मराठी भाषिक रसिकांच्या दृष्टीनेही गौरवास्पद आहे. याखेरीज पुस्तकाला लाभलेला रायगड घराण्याचे चतुरस्र कलाकार पंडित रामलालजी बरेठ यांचा अभिप्रायही असाच बोलका आहे. पुस्तकातील ‘घराणे’ हे प्रकरण संशोधनपर असून लेखन अभ्यासपूर्ण असल्याची ग्वाही पंडित महाराजजींनी दिली आहे. तर बरेठजींनीही रायगड घराण्यावर प्रकाश टाकणारे लेखन केल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. या दोन्ही गोष्टी या पुस्तकाचे वेगळेपण अधोरेखित करणाऱ्या आहेत. कथकमधील विविध चार घराणी हा या पुस्तकाचा मुख्य गाभा आहे. त्यातही नेहमी लखनौ, जयपूर आणि बनारस ही तीन घराणी मानली जातात. रायगडला घराणे मानावे की नाही याबाबतीत अद्यापही मतभेद आहेत. परंतु आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीमुळे रायगड हे चौथे घराणे कसे आहे याचा या पुस्तकात करण्यात आलेला ऊहापोह हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य मानावे लागेल. रायगड घराण्याची आणि या कलाकारांची समग्र माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे, त्या दृष्टीने हे पुस्तक इतर अनेक पुस्तकांहून वेगळे ठरते. यासाठी लेखिकेने प्रत्यक्ष त्या घराण्याच्या दिग्गज गुरुंशी साधलेला संपर्क, केलेल्या अभ्यास आणि संशोधन याची झलक या प्रकरणात स्पष्टपणे दिसते.

‘घुंगूरनाद’ अनेक अर्थांनी आगळेवेगळे ठरते. एक तर मराठीत अशा प्रकारची कथकला वाहिलेली पुस्तके कमी आहेत. कलाकार भरपूर आहेत; परंतु अभ्यासपूर्ण पुस्तकांची वानवाच आहे. या परिस्थितीत अनेकदा कलाकारांना आणि प्रामुख्याने विद्यार्थ्यांना हिंदी आणि इंग्रजी पुस्तकांवरच अवलंबून राहावे लागते. अभ्यासक्रमावर आधारित काही पुस्तके विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहेत. परंतु ‘घुंगूरनाद’चे वैशिष्ट्य म्हणजे ते केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित नाही. अत्यंत रसाळ, ओघवत्या शैलीत लिहिलेले कथकविश्‍वाचे रसग्रहण करणारे हे पुस्तक आहे. यात लोकनृत्य, नृत्याचा इतिहास, त्या संदर्भातील ग्रंथपरंपरा यापासून कथकच्या परंपरागत इतिहासापर्यंतच्या सर्वच गोष्टींवर बारकाईने केलेले संशोधन दिसून येते. यासाठी विविध गुरुंशी लेखिकेने चर्चा केली आहे. अनेक ग्रंथांचा संदर्भ घेतला आहे. या पुस्तकाची संदर्भसूची पाहिली तर याविषयी केलेला दांडगा अभ्यास स्पष्ट होतो म्हणूनच या पुस्तकाला मराठी भाषेच्या कथकविषयक दालनात स्वतःचे आगळेवेगळे स्थान मिळाले आहे यात शंकाच नाही. असे अनेक प्रकाशित केल्याबद्दल विश्‍वकर्मा पब्लिकेशनलाही धन्यवाद दिले पाहिजेत.

विद्यार्थ्यांना अभ्यासाचा पाया भक्कम करण्यासाठी, सर्वसामान्यांना विषय समजून घेऊन त्यातील बारकावे टिपण्यासाठी; तसेच तज्ज्ञांना संशोधनात्मक अभ्यासपूर्ण लेखनाने आकर्षित करण्यासाठी एकच पुस्तक उपयुक्त ठरावे ही विलक्षण गोष्ट आहे. लेखिकेच्या चिंतनशील निरीक्षणातून लिहिले गेलेले पुस्तकातील ‘उपसंहार’ हे चौदावे प्रकरण या दृष्टीने वाटण्याजोगे आहे. यामध्ये लेखिकेने एकूणच कथकच्या क्षेत्रातील महत्त्वाच्या बाबींविषयीची आपली निरीक्षणे, अभिप्राय आणि निष्कर्ष नोंदवले आहेत. पुस्तकाचे सार त्यात आले आहे. प्रत्येक घराण्याच्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गुरूंची माहिती, संगीत नाटक अकादमीच्या पारितोषिक विजेत्या नर्तक - नर्तिकांची एकत्रित माहिती आणि विशेषतः घराणे म्हणजे काय याविषयी चर्चा करून दिलेला नेमका अर्थ या सगळ्या गोष्टींनी पुस्तकाला वेगळे परिणाम प्राप्त झाले आहे.

पुण्याचा स्वतंत्र नृत्य इतिहास देण्यात आला आहे. त्यावर पंडित बिरजू महाराजांनी ‘अशाप्रकारे प्रत्येक गावाचा इतिहास लिहिला गेला तर भारताचा कथक इतिहास आकाराला येईल,’ अशी केलेली टिप्पणी या प्रकरणाचे महत्त्व दाखवून देते. धडाडीची पत्रकार, संशोधिका आणि अभ्यासपूर्ण लेखिका अशी ओळख निर्माण केलेल्या या लेखिकेचे हे पुस्तक सुंदर लेखनशैलीसाठीही ओळखले जाईल यात शंका नाही.

संबंधित बातम्या