एक वृत्त कोलाज

डॉ. राजेंद्र दास
सोमवार, 22 एप्रिल 2019

पुस्तक परिचय
 

पत्रकार म्हणून दीर्घकाळ काम करणाऱ्या सुरेश शहा यांनी ‘विकास यात्रेचे वारकरी’ या ग्रंथामधून कुर्डुवाडी, माढा या परिसरातील बातम्या कायमस्वरूपी जतन करण्याचे काम केले आहे. बातमीचे मूल्य केवळ तात्कालिक स्वरूपाचे कधीच नसते. मराठीमध्ये बातम्यांचे पुस्तक पहिल्यांदाच प्रसिद्ध होत आहे. अनेक दिग्गज पत्रकारांचे, संपादकांचे लेख, वृत्तपत्रातील गाजलेल्या सदरातील लेख, अग्रलेख संग्रहरूपाने आलेले आहेत. पण शहा यांच्यासारखा प्रयत्न सहसा कुणी केल्याचे आढळत नाही. 

वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये छापून आलेल्या या निवडक बातम्या, बातमीपत्रे, वृत्तमालिका व या परिसरातील उद्योग, शेती, समाजकारण, राजकारण, शिक्षण, साहित्य, नाट्यचळवळ, सांस्कृतिक क्षेत्र, शिल्पकलेसारख्या कला, अशा अनेक चांगल्या गोष्टींचे ‘दस्तऐवजात’ रूपांतर करण्याचे अत्यंत कष्टप्रद व जिकिरीचे काम वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी केले आहे. परिशिष्टासह सात विभागात या ग्रंथाची विभागणी विषयानुरूप केलेली आहे. घटनाक्रम आणि कालक्रम याचेही विलक्षण भान ठेवण्यात आलेले आहे. पहिल्या विभागात सामाजिक, राजकीय, सहकार, रुग्णसेवा, पत्रकारिता या क्षेत्रांशी संबंधित बातम्या आणि लेखांचे सांगोपांग विवेचन आहे. यामध्ये पहिले सहकारमहर्षी माढ्याचे गणपतराव साठे यांचे सहकार क्षेत्रातील, लोकल बोर्डाच्या काळातील सडेतोड काम, कुर्डुवाडीचे स्वातंत्र्यसैनिक गणपतराव शेंडे यांचे काँग्रेससाठीचे योगदान, माढा तालुक्‍याच्या पायाभूत सुविधांसाठी झटणारे माजी आमदार कै. विठ्ठलराव शिंदे यांच्या मनस्वी कामाचा आढावा घेतला आहे. कुर्डुवाडीचे किंग मेकर मा. के. एन. भिसे मालक यांच्या कर्तृत्वाचा आढावा घेताना, त्यांनी शून्यातून केलेल्या सामाजिक शैक्षणिक कार्याचे योग्य मूल्यमापन केले आहे. 

गेली चाळीस वर्षे क्रियाशील आमदार म्हणून जनप्रिय ठरलेले आमदार बबनराव शिंदे, सहकारातील सुगंध म्हणून परिचय असलेले माजी आमदार कृष्णराव परबत, कुर्डुवाडीचे माजी नगराध्यक्ष कांतिलाल रावजी शहा यांचेही चित्रण आहे. शेती आणि उद्योगाचे नवे प्रणेते जिल्हा परिषद अध्यक्ष संजयमामा शिंदे, कुर्डुवाडीचे माजी नगराध्यक्ष डॉ. कुंतल शहा, स्वातंत्र्यसैनिक माजी नगराध्यक्ष हिरालाल दोशी, सराफ पेढीचे शिवलाला शहा, नरेंद्र पाटील, श्रेणिकभाई अन्नदाते, एच. बी. डांगे, माधव स्मृतीचे संस्थापक डॉ. वसंतराव देसाई, ग्रामीण रुग्णसेवक डॉ. रमण दोशी, डॉ. अशोक वागळे, ज्यांनी बत्तीस वर्षे अखंड रुग्णसेवा करून या परिसराचे नाव मोठे केले अशांचाही यामध्ये उल्लेख आहे. सेवाभावी शल्यविशारद डॉ. शरद शहा, कुर्डुवाडीचे माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश कदम यांचे शिवगिरिजा प्रतिष्ठानचे अलौकिक साहित्य पुरस्काराचे काम, नाट्यचळवळ, रुग्णसेवा याचाही समावेश इथे आहे. कुर्डुवाडी सारख्या ग्रामीण भागात साहित्य पुरस्कार देऊन अनेक मोठ्या लेखकांना व्यासपीठावर आणल्याचाही उल्लेख या ग्रंथात आवर्जून आहे. शहराच्या विकासाचा ध्यास घेतलेल्या डॉ. विलास मेहतांच्या कामाचीही दखल घेतलेली आहे. याशिवाय डॉ. साखरे, डॉ. विजयकुमार शहा, अजात शत्रू गोविंदराव कुलकर्णी, नगराध्यक्ष निवृत्ती गोरे, शेती, राजकारण, समाजकारण, उद्योग क्षेत्रातील उत्तम कामगिरी करणारे रणजितसिंह शिंदे, सामाजिक, धार्मिक काम करणारे चंद्रशेखर चंचेश्‍वरा, रिखवलाल शहा (सराफ), दामोदर काळे (उद्योजक), ट्रक व्यावसायिक राजेश गांधी, सुरेश भारे, सावंत बंधू, दुष्काळातही डाळिंब निर्यात करणारे शेतकरी हणमंत गाजरे, भारत कापरे, शीतल तांबोळी, तरटे फोटोग्राफर, प्रभाकर गोरे, खुशालभाऊ धोका, सुभाष कुबेर, डी. के. पाटील, उमाकांत पारखे, बजरंग डांगे ते चहावाले मारुती ठावरे यांच्यापर्यंत अनेकांच्या वैशिष्ट्यांचा आढावा सविस्तर घेतला आहे. विनायकराव पाटील यांचे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक कार्य, शास्त्र शाखेमध्ये नव्याने शिकणारी मुले यांचेही स्मरण आहे. 

याशिवाय माढा तालुक्‍यातील स्वातंत्र्य सैनिक, माढा तालुक्‍याचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान सांगितले आहे. महात्मा गांधी, पंडित नेहरू, मौलाना आझाद, वल्लभभाई पटेल, डॉ. राजेंद्र प्रसाद, साने गुरुजी यांच्यासारख्या थोरांच्या सभा इथेच झाल्या. गाजलेले कादंबरीकार वालचंद शहा, ‘प्रभात’कार वा. रा. कोठारी, व्यंगचित्रकार हरिश्‍चंद्र लचके, आंतरराष्ट्रीय चित्रकार भगवान चव्हाण व विजय शिंदे या कलावंतांवरचे लेखही या ग्रंथाचे महत्त्व वाढवितात. 

स्वतंत्र महिला विभागामध्ये सर्व स्तरातील महिलांचा कार्य आढावा आहे. त्यात सोलापूरच्या श्राविका श्रमाच्या सुमतीबाई शहा, जैन बोधकच्या संपादिका कुमुदिनीबाई दोशी, अंबाताई देसाई, शरयू शहा, चंदा तिवाडी, सुनंदाताई शिंदे, विद्युल्लता शहा, डॉ. संजीवनी केळकर, लता मोरे, रूपा गांधी, रुक्‍मिणी वाकडे, रेवती शहा, दीपा मेहता, बदाम बाई धोका, रेल्वे स्टेशनवर चहा विकणाऱ्या वडिलांच्या अभ्यासू मुली डॉक्‍टर झाल्या हाही उल्लेख लक्षात राहणारच. अरणच्या समृद्धी रणदिवेच्या कवितेने राष्ट्रपतींचेही लक्ष वेधून घेतल्याचा उल्लेख आहे. 

संस्थापक स्वरूपाचे महत्त्वाचे कार्य करणाऱ्या उद्योग, आरोग्य, शिक्षण, सहकार, सांस्कृतिक क्षेत्रातील संस्थांचाही परिचय इथे समर्पकपणे दिलेला आहे. विठ्ठल शुगर्स, कुर्मदार कारखाना, मोडनिंबचे श्री. उमा विद्यालय, कुर्डुवाडीचे नूतन विद्यालय, के.एन. भिसे महाविद्यालय, माढा तालुक्‍यातील आदर्श बॅंक म्हणून गाजलेली जनता सहकारी बॅंक यांचे योगदानही नोंदविलेले आहे. याशिवाय उत्तुंग भरारी घेतलेली माढेश्‍वरी बॅंक, शिवशक्ती पतसंस्था, दारफळची अभिनव अशी धान्य बॅंक, हमाल पंचायत, माढ्यातील सन्मती नर्सिंग होम, डॉ. विनायक वागळे प्रतिष्ठान, माढ्यातील शिवलाल रामचंद्र वाचनालय, कुर्डुवाडीतील शामलाल वाचनालय, श्री. महावीर वाचनालय व त्यांचे ग्रंथपाल खडके सर यांच्याही कार्याचा आढावा या ग्रंथात सविस्तर आहे.

थोडक्‍यात, एखाद्या कोलाज चित्राप्रमाणे माढा तालुक्‍यातील सर्वच क्षेत्रांचा अभ्यासपूर्वक असा लेखाजोखा इथे मांडलेला आहे. फार परिश्रमाने सिद्ध केलेला हा ४५० पानांचा ग्रंथ सुमेरू प्रकाशनाने अत्यंत देखणा काढला आहे. सचिन व समीर तरटे, संजय जाधव व प्रभाकर सुतार यांनी छायाचित्रे व चित्राच्या माध्यमातून अधिक जिवंतपणा आणला आहे. वृत्तपत्रविद्येचा अभ्यास करणाऱ्यांसाठी हा ग्रंथ म्हणजे एक संदर्भग्रंथच आहे.

संबंधित बातम्या