भटक्‍या-विमुक्त समाजाचे चित्रण

डॉ. रूपाली शिंदे
सोमवार, 15 जुलै 2019

पुस्तक परिचय
 

आत्मकथन, कादंबरी, प्रवासवर्णन, ललित व वैचारिक लेखन अशा विविध साहित्य प्रकारांमधून सामाजिक आशय मांडणारे लेखक म्हणून लक्ष्मण गायकवाड यांचे नाव परिचित आहे. भटक्‍या-विमुक्त समाजजीवनाचे चित्रण करणारा ‘परिघाबाहेर’ हा त्यांचा लेखसंग्रह ‘सकाळ’ प्रकाशनाकडून प्रसिद्ध करण्यात आला. व्यक्तिरेखाटनाच्या रूपाने सामाजिक समस्या आणि व्यथा-वेदनांची जाणीव व्यक्त करणे, असे या लेखसंग्रहाचे स्वरूप आहे. 

प्रत्यक्षदर्शी व्यक्ती आणि अनुभवांची शब्द रेखाटने करताना सामाजिक आशयाची जोपासना करीत दुःख बोलके करणे, सत्यनिष्ठा जपणे आणि व्यक्तिचित्रणातील जिवंतपणा टिकवून ठेवणे अशी विविध आव्हाने पेलण्याची कसोटी असते. ही कसोटी अर्थातच लेखकाची असते. अपरिचित, दुर्लक्षित, क्वचित अति परिचयात अवज्ञा झालेल्या माणसांचे जगणे शब्दांमध्ये बांधताना वाचकांचा विश्‍वास संपादन करण्याचे अवघड काम लेखकाला करावे लागते. ते करत असताना लेखकाची नैतिकता पणाला लागते. दारिद्र्य आणि उपेक्षेचा विलाप मध्य लयीत जागविणे आणि सामाजिक न्यायाची मागणी द्रुत लयीत वाढविणे अशी दुहेरी सत्त्वनिष्ठा सिद्ध करीत लेखकाला व्यक्तिचित्रण करावे लागते. 

सामाजिक आशयप्रधान ललित अथवा लघुनिबंध संग्रह असे ‘परिघाबाहेर’ या लेखसंग्रहाचे नामकरण करणे सहज शक्‍य आहे. परिघाबाहेरच्या जगाला परिघाच्या केंद्रस्थानी आणताना त्याला मुख्य प्रवाहाच्या गतिरोधाने पुन्हा प्रस्थापित करणे, ही संस्कृती संक्रमणातील अटळ अवस्था असते. ‘परिघाबाहेर’चे जग आणि लेखक हा त्या अटळ अवस्थेच्या सांस्कृतिक प्रवासाचा एक भाग आहे. या लेखसंग्रहातील लेख वाचताना या घडामोडी वाचकाच्या मनात घडतात. त्याचे श्रेय लेखकाला दिले पाहिजे. वाचकांच्या विचाराला चालना देणारे लेखन केल्याचे महत्त्व अर्थातच लेखकाच्या पारड्यात पडते. त्याचबरोबर या लेखांची निवेदन शैली लेखक-वाचक यांच्यातील अनौपचारिक संवाद साधणारी केल्याबद्दल लेखकाचे अभिनंदनच केले पाहिजे. 

सामाजिक जाणिवेतून ललित लेखन करणारे मराठी साहित्यिक मोजकेच आहेत. त्यातही पुन्हा विशिष्ट सामाजिक स्तरांतील माणसांचे जग, त्यांचे प्रश्‍न मांडणे, त्यांची कारणमीमांसा करणे हे ललित लेखनामध्ये क्वचितच घडते. सामाजिक स्तरांची जीवनचित्रणे करण्यासाठी व्यक्तिचित्रणांची वाट धरणे हा एरवी दुर्मिळ असणारा संयोग ‘परिघाबाहेर’च्या लेखसंग्रहामध्ये घडला आहे. भटक्‍या-विमुक्त समाजाचे चित्रण करण्याचा खूप मोलाचा प्रयत्न रामनाथ चव्हाण यांनी केला आहे. फासेपारधी जमातीमध्ये सामाजिक सुधारणा घडवून आणताना एका कार्यकर्त्याला दिसलेले या जमातीचे जगणे रेखाटण्याचा प्रयत्न लक्ष्मण माने यांनी केला आहे. त्याचप्रमाणे गिरीश प्रभुणे यांनीही पारध्यांचे जिणे शब्दबद्ध केलेले आहे. अलीकडच्या काळात भटक्‍या विमुक्तांवर लेखन करणारे हे चारही महत्त्वाचे लेखक आहेत. आधुनिकीकरणापासून, शिक्षणापासून हजारो मैल दूर असलेल्या आणि शहराच्या, गावाच्या वेशीवर, चव्हाट्यावर झोपडे बांधून राहणाऱ्या या वर्गाचे प्रश्‍न मूलभूत गरजांशी जोडलेले आहेत. 

आपल्याच जाती-जमातीच्या अंधाऱ्या, बंदिस्त जगात जगणाऱ्या या माणसांचे प्रश्‍न आजही तसेच आहेत. त्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी आयोग स्थापन झाले. पण आयोगाच्या शिफारशी पुरेशा गांभीर्याने लक्षात घेतल्या नाहीत. परिणामी त्यांची अंमलबजावणीही झाली नाही. या राजकीय आणि सामाजिक वास्तवाकडे लेखकाने लक्ष वेधले आहे. या लेखसंग्रहाचे वैशिष्ट्य म्हणजे जातीनिहाय विचारांच्या, समज-गैरसमजांच्या ठाम समजुतीपासून लेखक मुक्त होऊ पाहतोय. स्वतःचे विचार, जाणिवा यांना परिघाबाहेर जाताना लेखकाचे विचार जातीभेदांपासून विमुक्त होत आहेत. याची प्रसादचिन्हे पुढील अवतरणामध्ये दिसतात. ‘दलितांनी, भटक्‍या विमुक्तांनी ब्राह्मण समाजाला शत्रूच्या ठिकाणी न पाहता, मित्राच्या ठिकाणी पाहावं’..... ‘भारताच्या या भूमीत दुःखापासून मुक्त होण्याचा माणुसकीचा आणि ज्ञानाचा मार्ग दाखवणाऱ्या बुद्धांची शिकवण आणि त्यांचा विचार सांभाळून ठेवण्याचं कसब ब्राह्मण समाजानंच जपून ठेवल्याचं मला पदोपदी पाहायला मिळत.’ लेखकाने मांडलेले हे विचार जातीपातींच्या पलीकडे जाऊन सौहार्दाचे सामाजिक वातावरण निर्माण होण्याच्या दिशेने टाकलेले उदारमतवादी पाऊल आहे. ‘परिघाबाहेर’ मधील लेख सामाजिक वास्तवाचे चित्रण तर करतातच, पण त्याचबरोबर न पुसणारी, मनात सतत तेवत राहिलेली जातीची ओळख बाजूला ठेवून खुला संवाद झाला पाहिजे, ही सदिच्छा आशादायक वाटते. 

संबंधित बातम्या