पुण्याचा ऐतिहासिक दस्तावेज

डॉ. सचिन विद्याधर जोशी
बुधवार, 21 मार्च 2018

पुस्तक परिचय

भारत इतिहास संशोधक मंडळाने चिं.ग.कर्वे यांच्या माध्यमातून पुणे नगर संशोधन वृत्ताचे खंड १९४२ या वर्षापासून प्रसिद्ध केले होते. त्यापूर्वी पुण्याच्या इतिहासावर मराठीमध्ये विस्तृत लिखाण झाले नव्हते. त्यानंतर देखील पुणे आणि परिसरावर अभ्यासपूर्ण असे काम फारसे झाले नाही. पण गेल्या १५-२० वर्षात एकूणच महाराष्ट्रातील ऐतिहासिक वास्तूंविषयीची जागरूकता वाढलेली आहे. पुण्यासारख्या ठिकाणी पुराणवास्तूंच्या संवर्धनाच्या जागरूकतेविषयी अभ्यास वर्ग आयोजित केले जातात. ‘हरवलेले पुणे’ या पुस्तकाचे लेखक डॉ. अविनाश सोवनी यांचे विशेष आभार मानावेसे वाटतात कारण त्यांनी या पुस्तकरूपाने खूप वेगळी माहिती लोकांपर्यंत पोचविली आहे. हे लेखन करीत असताना त्यांनी अनेक दखल घेण्याजोगे संदर्भ देखील दिले आहेत. लेखक शिक्षणाने आणि व्यवसायाने आर्किटेक्‍ट असल्यामुळे सर्व स्थळांचा आणि वास्तूंचा अभ्यास शास्त्रीय पद्धतीने केल्याचे सहज समजून येते. पुण्याच्या प्राचीनत्वाचे दाखले देताना डॉ. सोवनी यांनी पुरातत्त्वशास्त्र या विषयातील काही शोधनिबंधांचे वाचन केले आहे असे दिसून येते. पुणे शहर मुठा नदीच्या काठावर वसलेले आहे. पुण्याचे रूपांतर छोट्या खेड्यापासून मोठ्या शहरापर्यंत झाले. या स्थित्यंतरामध्ये खूप मोठा इतिहास दडलेला आहे आणि तो वास्तूच्या स्वरूपात पुण्यामध्ये ठिकठिकाणी दिसून येतो. पुणे येथील कसबा पेठ परिसरात डेक्कन कॉलेजतर्फे काही वर्षांपूर्वी पुरातत्वीय उत्खनन झाले होते. त्याचा वृत्तांत कॉलेजच्या संशोधन मासिकामध्ये प्रसिद्ध झालेला होता. ती सर्व माहिती अत्यंत सोप्या भाषेमध्ये सर्वसामान्य वाचकांपर्यंत डॉ. सोवनी यांनी पोचविली आहे. पुणे शहरामध्ये जुना कोट होता आणि तो १४ व्या शतकात बांधला गेला होता अशी गेली अनेक वर्षे समजूत होती. पण ते वर्ष हे १५ वे शतक होते हे सोवनी यांच्या अभ्यासातून समोर आले आहे. हा किल्ला किंवा कोट पुण्यात कोठे होता आणि कसा होता याविषयीची खात्रीशीर माहिती या पुस्तकांमधून मिळते. पुण्याच्या जुन्या कोटाचे अवशेष म्हणजे कोकण दरवाजा, बांधलेल्या पायऱ्या, इ. आज कोठे पाहायला मिळेल हे फक्त याच पुस्तकात दिलेले आहे. नागझरी या ओढ्याच्या काठावर पूर्वेला सोमवार, मंगळवार, नाना आणि भवानी या पेठा वसलेल्या होत्या. तर पश्‍चिम तीरावर कसबा, गणेश, रविवार आणि गंज या पेठा होत्या आणि आजही आहेत. या सर्व जागांची नकाशाच्या स्वरूपात माहिती दिल्यामुळे या जागांचे स्थान सहज समजते. नागेश्वर आणि त्रिशुंड गणपती या मंदिरांची स्थापना तसेच त्यांची पूर्वीची व आजची स्थिती यावर उत्तम विश्‍लेषण पुस्तकात केले आहे. मला आवडलेली या पुस्तकातील उत्कृष्ट माहिती ही शनिवारवाड्याविषयी सांगितलेली आहे. वाड्यातील प्रत्येक वास्तूचे ऐतिहासिक संदर्भ घेऊन त्याचे विस्तृत स्वरूपात स्थापत्यशास्त्रीय विवेचन पुस्तकामध्ये देण्यात आले आहे. शनिवारवाड्याची अनेक दुर्मिळ छायाचित्रे पुस्तकात आहेत. शनिवारवाडा अग्निप्रलयात नष्ट होण्यापूर्वी इ. स. १८२० मध्ये एका इंग्रज अधिकाऱ्याने काढलेले चित्र आपल्याला पुस्तकात पाहायला मिळेल. वाडा जळाल्यावर मूळ जोत्यावर इंग्रजांनी काही वास्तू बांधल्या होत्या. त्याचे जुने फोटोदेखील डॉ. सोवनी यांनी दिले आहेत. ओंकारेश्वर मंदिर, हुजूरपागा , रमणबाग, पर्वतीचा रमणा, इ. वास्तुंचा इतिहास व त्याची बांधणी यांची माहिती अत्यंत सोप्या भाषेमध्ये चित्रांसहित दिलेली आहे. पुण्यातील जुना कापडगंज, चोळखण आळी, पेशव्यांचा शिकारखाना, कोतवाल चावडी, झांबरे चावडी, करकोळपुरा, यासारखी ठिकाणे इतिहासाच्या पडद्याआड गेलेली होती. त्या जागेवर फार काही अवशेष नसले तरी त्या जागा नेमक्‍या कोठे होत्या आणि त्याचे महत्त्व काय होते हे सर्वांसमोर येण्यास या पुस्तकाच्या निमित्ताने मदत होईल. जुन्या पुण्यातील विविध जागांच्या कृष्णधवल फोटोचा आणि चित्रांचा संग्रह लेखकाने वाचकांपर्यंत पोचविला आहे. पुस्तकामध्ये नकाशे दाखविल्यामुळे पुण्यातील वेगवेगळी ठिकाणे, जलव्यवस्थापन, ओढ्याचे मार्ग, इ. जागा कोठे होत्या हे आज निश्‍चित सांगता येऊ शकते. डॉ. सोवनी यांनी पुण्याचा इतिहास पाषाणयुगापासून ते प्रभात फिल्म कंपनी व आर्यन चित्रपटगृहपर्यंत मांडून माहितीचा खजिनाच सर्वांसमोर खुला केलेला आहे असे मला वाटते. पुण्याची जडणघडण ही लेखकाने फार सुंदरपणे वाचकांना सांगितलेली आहे. पुस्तकाचे शीर्षक ‘हरविलेले पुणे’ असे असले तरी हे पुस्तक वाचून झाल्यावर आपल्याला ‘पुणे’ पुन्हा एकदा नव्याने सापडेल.

हरविलेले पुणे 
 लेखक : अविनाश सोवनी
 प्रकाशन ः  उन्मेष प्रकाशन, पुणे
 किंमत : ४०० रुपये   पाने : ३४१
 

संबंधित बातम्या