...सावध,  ऐका पुढच्या हाका!

डॉ. संजीव कुलकर्णी
सोमवार, 28 जून 2021

पुस्तक परिचय

‘अशाश्‍वताच्या समशेरीवर’ हे पुस्तक म्हणजे हवामान बदलाच्या रौद्र संकटाचे भारतीय संदर्भ या विषयावर वेळोवेळी प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या काहीशा लहान, नेमक्या लेखांचे संकलन आहे. 

व्यंकटेश माडगूळकरांच्या एका कथेत की कादंबरीत  ‘माणसे जगायला बाहेर पडली’  असा उल्लेख आहे. ते वाचल्यावर आतून हलल्यासारखे वाटते. संतोष शिंत्रेंच्या ‘अशाश्वताच्या समशेरीवर’  या पुस्तकाची अर्पणपत्रिका वाचताना आणि ती अर्पणपत्रिका ज्या (न थिरकणाऱ्‍या!) जबाबदार तरुणाईला अर्पण केली आहे, तिचे या पुस्तकाच्या मलपृष्ठावरील छायाचित्र बघताना असे आतून हलल्यासारखे वाटते. या तरुण मुलामुलींच्या हातात एक फलक आहे आणि त्यावर लिहिले आहे: You’ll die of old age, we’ll die of climate change!  या मुलांच्या संवेदनशीलतेला दाद द्यावी की या मुलांच्या हाती आपण कोणता वारसा सोपवून जातो आहोत याची शरम वाटावी असा संभ्रम निर्माण करणारे हे चित्र! 

पुस्तकामधल्या तीस लेखांचे विषय वेगवेगळे आहेत. तरीही मूळ विषयाचा गाभा एकच असल्याने हे लेखन विस्कळित वाटत नाही. तांत्रिक विषयावरचे लेखन रूक्ष होण्याचा धोका असतो. शिंत्रे यांच्या सदर पुस्तकात भरपूर तांत्रिक तपशील आणि आकडेवारी असली, तरी त्यांनी ती शक्य तितक्या रसाळपणे मांडली आहे. निव्वळ रंजन हा अशा नवनिर्मितीचा उद्देश नसतोच. आशावाद जरूर असावा,  पण भाबडेपणा नसावा. पत्रकारितेच्या अंगाने लिहिलेल्या आणि एखाद्या विवक्षित प्रश्नाला हात घालणाऱ्‍या लेखनाला तर हे पथ्य अधिक कठोरपणाने पाळावे लागते. त्या कसोटीवरही हे पुस्तक उतरते.

मानव आणि इतर सजीव यांच्यात निसर्ग  भेदाभेद करत नाही. हा भेदाभेद आपण करतो. त्यामुळे सृष्टीचे आपण राजे आहोत ही मानवनिर्मित अनैसर्गिक कल्पना आहे. खरे तर कल्पना नव्हे,  हा मोठा भ्रम आहे.  त्यामुळे हे छोटेखानी पुस्तक अनेक अर्थांनी महत्त्वाचे आहे.  ‘आजचा दिवस आपला’  या झुंड भावनेने सगळे आज,  आत्ता, ताबडतोब भोगून,  ओरबाडून घेण्याची लालसा ज्या भयावह वेगाने वाढताना दिसते आहे,  आणि जागतिक साथीने जिला आळा बसून मानवी जीवनाला एका  ‘ठेहराव’  प्राप्त होईल अशी भाबडी आशा व्यक्त केली जात आहे,  त्या लालसेचे वस्तुनिष्ठ स्वरूप या पुस्तकाने समोर येते. दुसरे म्हणजे लेखकाने त्याच्या मुळातील वैज्ञानिक बैठकीला न्याय देत या पुस्तकात बरीच महत्त्वाची आकडेवारी,  तक्ते आणि कोष्टके दिली आहेत. विज्ञान अशा साधार गोष्टींना प्रमाण मानते. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संख्यात्मक साक्षरता (Scientific Temperament and Numerical Literacy)  या दोन गोष्टींच्या अभावामुळे आपल्या समाजाला फार मोठी किंमत मोजावी लागली आहे. या पुस्तकात या दोन्ही गोष्टींचा समावेश आहे,  त्यामुळे हे गंभीरपणे वाचायचे पुस्तक आहे. 

सप्टेंबर संपता संपता निरोप घेणारा पाऊस आता बाराही महिने हजेरी लावायला लागला,  दिवाळीत गुलाबी वाटणारी पण नंतर डिसेंबर जानेवारीमध्ये कडाक्याचे रूप धारण करणारी थंडी आता जवळजवळ गायबच झाली, मॉन्सूनपूर्व वादळांची संख्या आणि तीव्रता वाढली आणि त्यामुळे आता कोकणची किनारपट्टीच खरवडून निघते की काय असे वाटायला लागले. हे सगळे सामान्य माणूस बघत,  वाचत असतो. ओझोन थराचे विरळ होणे. ग्रीन हाऊस इफेक्ट, ग्लोबल वॉर्मिंग असले शब्दही त्याच्या कानावर पडत असतात. पण हे नेमके काय आहे,  ते किती गंभीर आहे,  त्याबाबतील कोण काय करते आहे,  त्यातले काय योग्य,  काय अयोग्य अशा अनेक विषयांना हे पुस्तक स्पर्श करते. विकसित देशांची स्वार्थी,  आपमतलबी धोरणे आणि त्याची विकसनशील देशांना द्यावी लागणारी किंमत यावरही या पुस्तकातले काही लेख प्रकाश टाकतात. सरकारी कामकाजांमधील एकूण ढिसाळपणा याबाबत काही लिहिण्यासारखे शिल्लक राहिले नाही. वृक्षारोपण आणि वनसंवर्धन हे त्याचेच एक उदाहरण. झाडे कमी झाली या ढोबळ प्रश्नाला लवकर वाढणारी झाडे (सुबाभूळ,  ग्लिरिसिडिया,  निलगिरी) यांची सरधोपट लागवड करणे असे ढोबळ उत्तर हे त्याचेच एक उदाहरण आहे.  सरकारी अनास्था,  दिरंगाई,  प्राथमिकतांची गल्लत आणि अतिशय चमत्कारिक निर्णयपद्धती याची आपल्याला काय आणि किती किंमत द्यावी लागते आहे,  लागणार आहे याचा काहीसा अंदाज हे पुस्तक वाचून येतो.   

विकास आणि पर्यावरण यांचे काय नाते आहे?  एकतर विकास नाहीतर पर्यावरण असे ते आहे काय?  म्हणजे विकास व्हायचा असेल तर पर्यावरणाचा बळी दिलाच पाहिजे असे आहे काय?  याचे सूज्ञ उत्तर  ‘नाही’  असे आहे. शाश्वत विकास या कल्पनेचा लेखकाने या पुस्तकात उल्लेख केला आहे आणि त्या विकासाची सतरा उद्दिष्टेही दिली आहेत. म्हणजे विकास,  प्रगती हे सगळे करायचे पण त्याची किंमत पर्यावरणाच्या ऱ्‍हासाने द्यायची नाही. ही केवळ स्वप्नाळू कल्पना नाही तर त्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी २०१५पासून प्रयत्नही सुरू केले आहेत. 

हे पुस्तक बव्हंशी हवामान बदलाविरूद्धच्या झुंजीतील आपल्या देशाची इच्छा आणि प्रयत्न यांच्या अपुरेपणाची कहाणी सांगत असले आणि भविष्यातील भेसूर प्रश्नांच्या शक्यता मांडत असले तरी जेथे मानवी प्रयत्नांना यश आले आहे  तेथील उल्लेखही दिलखुलासपणे करते. विरळ होत जाणाऱ्‍या ओझोन थराची मानवी प्रयत्नाने झालेली पुनर्स्थापना, हे त्यातले एक उदाहरण. तापमानवाढीचे प्रभाव कमी करण्याच्या उद्दिष्टांत भारताची उंचावणारी कामगिरी हे दुसरे. भारतातील विविध राज्ये हवामान बदल आणि त्याच्या दुष्परिणामांच्या निराकरणासाठी काय काय करत आहेत याचा तपशीलही  ‘वासरात लंगडी गाय शहाणी’  असा असला तरी उत्साहवर्धक आहे. कोणताही सोहळा  ‘केक कापून’  साजरा करण्याच्या अलीकडील पद्धतीत वसुंधरादिनानिमित्त पृथ्वीसारखा दिसणारा केक कापण्याचा अनाठायी उत्साह दाखवणारे अश्विनी मेननने काढलेले व्यंगचित्र या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर आहे.

ओरबाडल्या जाणाऱ्‍या निसर्गाचे चटके प्रामुख्याने गरीब लोकांना आणि गरीब देशांना सोसावे लागत असले तरी ओरबाडणारे हात हे प्रामुख्याने श्रीमंत लोकांचे आणि श्रीमंत देशांचे आहेत. काहीही असो,  मुळात ही ओरबड थांबवणे,  कमी करणे हाच शाश्वत भविष्याचा मार्ग आहे. चंगळवाद आपल्या आयुष्याला पोखरत जात असताना आपण येणाऱ्‍या पिढीसाठी कसले आयुष्य मांडून जाणार आहोत, आणि ते जर तसे नको असेल तर आपल्याला  ‘आज,  आत्ता,  ताबडतोब’  काय करणे आवश्यक आहे याचा गंभीरपणाने विचार करायला लावणारे हे पुस्तक आहे.

अशाश्वताच्या समशेरीवर

  • लेखक : संतोष शिंत्रे
  • प्रकाशक : ग्रे सेल्स, पुणे
  • किंमत ः ₹  २८५/-
  • पाने ः ८८

संबंधित बातम्या