साक्षरतेकडून सरलतेकडे

गणेश राऊत
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

पुस्तक परिचय
नॉलेज, कॉलेज आणि व्हिलेज
 लेखक : डॉ. कैलास नरहरी बवले
 प्रकाशक : उषा-अनिल प्रकाशन, पुणे
 किंमत : २७० रुपये  
 पाने : २३६ 

कॉलेज, नॉलेज आणि व्हिलेज हे वेगळे शीर्षक असणारे डॉ. कैलास बवले यांचे पुस्तक प्रथम दर्शनीच स्वतःकडे आकृष्ट करून घेते. या पुस्तकात शाश्‍वत विकासाच्या शिक्षणवाटा लेखकाने सांगितल्या आहेत.

पुस्तकाचे एकूण सहा विभाग आहेत. भारतीय शिक्षण समग्रतेचा अनुभव, बाल शालेय शिक्षण, माणूस नवा, भारत नवा! निर्णळ ज्ञान प्रवाहो, उपयोजित कौशल्ये व लोकसंख्या लाशांभ आणि ज्ञानावतार असा विभागांमध्ये पुस्तकाची मांडणी केलेली आहे. हे लेखन अनुभव आणि संशोधन अशा दोन्हींनी युक्त आहे. लेखक अर्थशास्त्रातील प्राध्यापक आणि संशोधक असल्याने या विषयातील संदर्भ लेखनात जागोजागी आले आहे. अनौपचारिक शिक्षणाला विकासाशी जोडण्याचे तंत्रज्ञानाधारित प्रयोग करण्यासाठी लेखकाने स्वेच्छानिवृत्ती घेतली. या कृतीमधून लेखकाचा या विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोन समजतो. या पुस्तकातील लेख मुळात काही साप्ताहिके वा त्या-त्या विषयातील नियतकालिकांमध्ये लिहिलेले आहेत, असे लेखकाने मनोगतमध्ये नमूद केले असले तरी पुढे पुस्तकात लेखांखाली स्वतंत्र उल्लेख केला नाही. तसा उल्लेख केला असता तर अभ्यासकांची आणखी सोय होते.

लेखक उच्च शिक्षणक्षेत्रात कार्यरत असतानाच त्याने उच्च शिक्षण आणि ग्रामीणविकास संकुल या प्रकल्पात सक्रिय योगदान दिले. त्याची फलश्रुती म्हणजे हे पुस्तक आहे. यातील काही निरीक्षणे वाचकाला धक्का देतात. कधी कधी आपल्याला त्याची कल्पनासुद्धा नसते. उदा. युनोने ज्या तीन भारतीय शिक्षण तज्ज्ञांना मान्यता दिली त्यात महात्मा गांधीजी, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर आणि जे. पी. नाईक यांचा समावेश आहे. १ जून हा दिवस युनोने वैश्विक पालक दिन म्हणून जाहीर केला आहे. जुलै महिन्यातील चौथा रविवार व अमेरिकेने आंतरराष्ट्रीय पालक दिन म्हणून मान्यता दिलेला दिवस आहे.

‘कोंडवाडे नकोत - आनंदवाड्या हव्यात’ हा लेख आपल्याकडील शालेय शिक्षण पद्धतीचे अपयश दर्शवितो. शालाबाह्य मुलांची आकडेवारी सरकारी पातळीवर अपयशाचे निदर्शक आहे. याला उत्तर म्हणून लेखकाने नॉलेज - कॉलेज - व्हिलेज - सहयोगी प्रकल्प सुरू केला तो राबविण्याची जबाबदारी पाच महाविद्यालयांनी घेतली आहे. शिक्षणक्षेत्रातील समस्या मांडणारे लाखो लोक आहेत. त्यावर उपाय सुचविणारे शेकडो लोक आहेत. त्यानुसार कृती करणारे दोन आकडी आहेत. खवले सर त्यांच्यापैकी एक आहेत. ते समस्या मांडून थांबले नाहीत तर ‘जे केले ते सांगितले’ असे लेखन करणारे आहेत. हेच त्यांच्या पुस्तकाचे यश  आहे. नावडकर बंधू यांनी मुखपृष्ठ चांगले केले. पुस्तकाच्या मांडणीवर प्रकाशकांनी कष्ट घेतल्याचे दिसते.

संबंधित बातम्या