बुकशेल्फ

इरावती बारसोडे
सोमवार, 27 मे 2019

जंगलाचा राजा वाघ
लेखक : अतुल धामनकर
प्रकाशन : मनोविकास प्रकाशन
किंमत : १८० रुपये, पाने : ७६

जंगलाचा राजा वाघ
लेखक : अतुल धामनकर
प्रकाशन : मनोविकास प्रकाशन
किंमत : १८० रुपये, पाने : ७६
वन्यजीव अभ्यासक अतुल धामनकर यांनी २५ वर्षांहून अधिक काळ ताडोबाच्या जंगलात पायी फिरून वाघांचा अभ्यास केला आहे. याच अभ्यासातून हे सचित्र पुस्तक उदयास आले आहे. या पुस्तकातून वाघाचे उगमस्थान, वाघाची वीण, पिल्लांचे शिक्षण, वाघांचा जगण्यासाठीचा संघर्ष, अशी रंजक माहिती वाचायला मिळते. त्याशिवाय मानव आणि वाघ यांचे सहसंबंध, वाघांचे संरक्षण याचाही उल्लेख पुस्तकामध्ये केलेला आहे. हे पुस्तक वाघांच्या जीवनाचा प्रवास घडवते आणि जंगलाच्या अनोख्या विश्‍वात घेऊन जाते. 


सिंह
लेखक : अतुल धामनकर
प्रकाशन : मनोविकास प्रकाशन
किंमत : १८० रुपये, पाने : ७६
वन्यजीव अभ्यासक अतुल धामनकर यांनी स्वतः गुजरातमधील गीरच्या अभयारण्यामध्ये फिरताना आलेले थरारक अनुभव या पुस्तकामध्ये मांडलेले आहेत. लिखित अनुभवांना साथ मिळाली आहे ती त्यांनी काढलेल्या उत्कृष्ट छायाचित्रांची. लेखक आपल्याला गीरच्या जंगलातून फिरवून आणतो. गीरच्या अरण्यामध्ये आता जगातील शेवटचे काही आशियायी सिंह उरले आहेत. या सिंहांचा नामशेष होण्यापासून परतीचा प्रवास पुस्तकामध्ये वाचायला मिळतो. सिंहाचे कुटुंब, पिल्ले, शिकारीची पद्धत, सिंहाचे मूळ आणि कूळ, त्याचा मानवाशी असलेला सहसंबंध लेखकाने पुस्तकामधून मांडला आहे.


बखर संगणकाची
लेखक : अतुल कहाते, अच्युत गोडबोले
प्रकाशन : मनोविकास प्रकाशन
किंमत : ३०० रुपये, पाने : ३३०
गेल्या काही दशकांमध्ये संगणकक्षेत्रामध्ये खूप झपाट्याने प्रगती झाली. आता संगणकाचा प्रवास कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंत येऊन पोचला आहे. या प्रवासामध्ये अनेकांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. या प्रवासामध्ये भागीदार असलेल्या शिलेदारांच्या अविस्मरणीय आणि अविश्‍वसनीय कहाण्या या पुस्तकामध्ये वाचायला मिळणार आहेत. थोडक्‍यात, संगणकाच्या तंत्रज्ञानाचा सुरुवातीपासूनचा संपूर्ण प्रवास या पुस्तकाच्या माध्यमातून समजून घेता येणार आहे. माहिती अतिशय सोप्या भाषेत आणि ओघवत्या शैलीमध्ये दिलेली असल्यामुळे समजायला सोपी आहे.


संवाद
लेखक : अच्युत गोडबोले
प्रकाशन : मनोविकास प्रकाशन
किंमत : ४५० रुपये, पाने : ५४२
भाषा अस्तित्वात नव्हती, तेव्हा माणसाने एकमेकाशी संवाद कसा साधला असेल, या कुतूहलातून ‘संवाद’ या पुस्तकाचा जन्म झाला आहे. आदिमानवाच्या काळापासून आधुनिक युगापर्यंत माणसाची संवाद साधण्याची साधने बदलत गेली. ही साधने नेमकी कोणती होती, त्यांचा शोध कसा लागला, कोणी लावला, त्यामागचे तंत्रज्ञान याची रंजक माहिती या पुस्तकामध्ये दिलेला आहे. भाषा आणि संवादाच्या उगमापासून ही सफर सुरू होते. पोस्ट व्यवस्था, छपाई, वर्तमानपत्र, तारयंत्र, टेलिफोन, रेडिओ, टेलिव्हिजन, रडार, इंटरनेट, मोबाईल आणि फेसबुकपर्यंत मानवाने केलेला प्रवास आपल्याला या पुस्तकामध्ये वाचायला मिळतो.


बैरागड
लेखक :
डॉ. मनोहर नरांजे
प्रकाशन : साकेत प्रकाशन
किंमत : ३०० रुपये, पाने : २५६
बैरागड ही मेळघाटातल्या आदिवासींच्या उत्कर्षासाठी अविरत झटणाऱ्या डॉक्‍टर दांपत्याची संघर्षगाथा आहे. डॉ. रवींद्र कोल्हे आणि डॉ. स्मिता कोल्हे यांनी बैरागड येथे वास्तव्य करून मोठ्या कष्टाने तेथील आदिवासींमध्ये विश्‍वास निर्माण केला. या दोघांचे बैरागडमधले कठोर आयुष्य लेखकाने स्वतः तिथे राहून अनुभवले. हा अनुभव लेखकाने पुस्तकातून वाचकांसमोर मांडला आहे. पुस्तक सत्यघटनांवर आधारित आहे. डॉ. रवींद्र कोल्हे आणि डॉ. स्मिता कोल्हे यांनी सांगितलेल्या जीवनानुभवावरून बैरागड पुस्तक साकारले आहे.

संबंधित बातम्या