आभासी चलनाची दुनिया 

कौस्तुभ मो. केळकर, आर्थिक घडामोडीचे अभ्यासक    
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

पुस्तक परिचय
बिटकॉइन
 लेखक ः अतुल कहाते 
 प्रकाशक ः सकाळ मीडिया प्रा लि., पुणे 
 किंमत : १६० रुपये.  पाने : ११०

अर्थकारण आणि पैसे या क्षेत्रात प्रभुत्व असणाऱ्या लेखकांनी आणखी एक माहितीपूर्ण पुस्तक वाचकांकरता सादर केले आहे. पैसे तयार होण्यामागची गरज, जाणीव त्याच्या निर्मितीमध्ये होणारे गोंधळ तसेच यावरील उपाय आणि तंत्र हे केंद्रस्थानी मानून बिटकॉइनची निर्मिती कशी झाले हे लेखकांनी उदाहरणासहित विस्तृतपणे मांडले आहे.

यातील फायदे, तोटे आणि धोके सांगताना डिजिटल पैसे म्हणजेच बिटकॉइन हे ज्या प्रकारे काळा पैसे रोखू शकतो तसेच त्याच्या अनेक डिजिटल कॉपी बनू शकतात, ही उणीव दूर करण्यासाठी अनेक प्रोग्रॅमर्स कसे झटत होते हे सांगितले आहे. यातील सुरक्षेचे उदाहरण म्हणजे ‘की’. इंटरनेटवर बिटकॉइन खाते हॅक करता येऊ नये म्हणून त्यांच्या व्यवहारांमध्ये वापरण्यात येणारी ‘पब्लिक की’ आणि ‘प्रायव्हेट की’ हा मुद्दा ठळकपणे मांडला आहे. बिटकॉइनच्या निर्मितीबद्दलची पार्श्वभूमी विस्तृत केली आहे. 

डेविड साँग नावाचा संगणकतज्ज्ञ सर्वसामान्य लोकांची खासगी माहिती इंटरनेटवर जपण्यासाठी काय करता येईल या गोष्टीवर बराच काळ काम करत होता. त्याने काढलेल्या ‘डिजीकॅश’ या आभासी चलनाचा वापर हॅले या बिटकॉइन निर्मितीमध्ये गुंतलेल्या व्यक्तीने करण्यास सुरवात केली, परंतु यामधील असलेल्या त्रुटी दूर केल्या. बिटकॉइनचा महत्त्वाचा गुणधर्म लेखकांनी उत्तम रीतीने सादर केले आहेत. यातील वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही मध्यवर्ती संस्थेचे या चलनावर नियंत्रण नसून या चलनाची जबाबदारी असंख्य युजर्सचे संगणक ब्लॉकचेनद्वारे घेत असून ते बिटकॉइनमध्ये होणाऱ्या व्यवहाराची सत्यता पडताळून बघतात. म्हणजेच असंख्य युजर्सची ही ब्लॉकचेन हे बिटकॉइनची नियंत्रक आहे. यातून किंवा संस्थेच्या हातामध्ये बिटकॉइनचे अधिकार एकवटले जात नाहीत. यामधील एक नावीन्यपूर्ण बाब म्हणजे नवीन बिटकॉइन निर्माण होण्यासाठी सर्व यूजर्सच्या संगणकांना एक कोडे पाठवले जाते आणि जो संगणक सर्वांत पहिल्यांदा उत्तर देईल त्याला बिटकॉन मिळण्याची व्यवस्था आहे असा रीतीने बिटकॉइनचा प्रसार वाढवण्यात येतो. तसेच आपल्या देशात रिझर्व्ह बॅंक देशातील सर्व चलनाची जबाबदारी घेते, नवीन चलन छापते. अशी जबाबदारी कोणतीही संस्था घेत नाही. या सर्वांतून काळा पैसा निर्माण होणे अवघड आहे परंतु यातून कोणता गैरव्यवहार, घोटाळा झाला तर जबाबदारी कोण घेणार हा महत्त्वाचा प्रश्न लेखकांनी मांडला आहे. आतापर्यंत अनेक डिजिटल कॅश व्यवहारात आल्या, परंतु संतोषी नाकामोटो यांनी यामधील बऱ्याच त्रुटी दूर करून बिटकॉइन हे लोकांनी लोकांसाठी चालविलेले चलन तयार केले आहे. जेव्हा एखाद्या देशात अराजक माजेल, त्या देशातील जनतेला आपल्या चलनावर विश्वास नसेल तेव्हा त्या देशातील जनता अमेरिकन डॉलर्स, सोने यामध्ये गुंतवणूक करतात. उदाहरणार्थ, झिम्बावे, व्हेनेझुवेला या देशातून अमेरिकन डॉलर्सचा वापर केला जातो. या देशातील नागरिकांचा आपल्या चलनावर विश्वास नाही. याच धर्तीवर सहा देशांमध्ये बिटकॉइन मोठ्या प्रमाणावर वापरले जात आहे. कारण अमेरिकन डॉलर्सपेक्षा तेथील लोकांचा बिटकॉइनवर जास्त विश्वास आहे. थोडक्‍यात काय तर बिटकॉइन हे अमेरिकन डॉलर्सला पर्यायी चलन म्हणून जागतिक पातळीवर पुढे येत आहे.

परंतु आपली सरकारने बिटकॉइनला मान्यता दिलेली नाही, असे असूनसुद्धा ज्या लोकांकडे काळा पैसे आहे, अशा व्यक्ती बिटकॉइन खरेदी करत आहेत. अर्थतज्ज्ञांच्या मते अवैध धंदे करणारे, गांजा विक्री करणारे या लोकांना आर्थिक व्यवहारात गोपनीयता लागते, असे लोक बिटकॉइन वापरात असल्याने एक समांतर अर्थव्यवथा तयार होत आहे. हे धोकादायक आहे, हे लेखकांनी आवर्जून मांडले आहे. तसेच अर्थतज्ज्ञांच्या मते बिटकॉइनची वाढलेली किंमत हा एक फुगा असून तो लवकरच फुटेल.

एकंदर काय तर हे एक वाचनीय पुस्तक आहे. लेखकांचे याबद्दल अभिनंदन !!

संबंधित बातम्या