विकासनीतीवर उत्तम मार्गदर्शन

कौस्तुभ केळकर
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

पुस्तक परिचय
 

अच्युत गोडबोले यांनी ‘अनर्थ - विकासनीती ः सर्वनाशाच्या उंबरठ्यावर?’ या पुस्तकाद्वारे आपल्या देशाला आणि जगाला विनाशकारी आर्थिक प्रगती हवी की शाश्‍वत विकास हवा, हे अतिशय वास्तवपणे मांडले आहे. पर्यावरणाचा नाश करत होणाऱ्या विकासातून शेवटी अनर्थ ओढवेल असा स्पष्ट संदेश लेखकाने दिला आहे. जागतिकीकरणामुळे निर्माण झालेली विषमता, प्रदूषणाची आवळत जाणारी मगरमिठी हे वाचकांना अंतर्मुख करायला लावते. आपण नेमके कोणत्या बाजूचे आहोत आणि कोणता मार्ग स्वीकारणार आहोत, हा प्रश्‍न ऐरणीवर येणे अतिशय आवश्यक आहे असा संदेश हे पुस्तक देते. 

या पुस्तकात सद्यःस्थिती या भागात स्वातंत्र्यापासून आजपर्यंत झालेल्या आपल्या देशाच्या आर्थिक प्रवासाचा आढावा घेतला आहे. जागतिकीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आपला जीडीपी सात ते आठ टक्क्यांनी वाढला, परंतु नोकऱ्या मात्र केवळ १.३ टक्क्यांनीच वाढल्या. म्हणजे ही जॉबलेस ग्रोथ आहे, तसेच २००४ नंतरची जीडीपीमधील वाढ निरोगी नव्हती, केवळ सेवा क्षेत्रात आणि चैनीच्या उत्पादनातच वाढ झाली, हे कटू सत्य लेखकाने प्रभावीपणे सादर केले आहे. भारतात दर एक लाख प्रसूतीमागे १३० माता मरतात आणि हे प्रमाण इतर देशांच्या तुलनेत प्रचंड आहे. मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार देशात मार्च २०१७ पर्यंत एक हजार लोकसंख्येप्रमाणे ०.६२ डॉक्टर्स होते. परंतु, जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) म्हणण्यानुसार हे प्रमाण एक असले पाहिजे, असे लेखकाने नमूद केले आहे. यातून आपल्या देशातील आरोग्य क्षेत्राची गंभीर परिस्थिती लेखकाने समोर आणली आहे. हे वास्तव अंतर्मुख करायला लावते. आरोग्य क्षेत्राप्रमाणेच शिक्षणव्यवस्थेची परिस्थिती खूप गंभीर आहे, यावर लेखकाने विस्तृतपणे आणि आकडेवारीचा आधार घेऊन लिहिले आहे. तसेच आपल्या देशातील विज्ञान क्षेत्राची सद्यःस्थिती सविस्तर सादर केली आहे. ‘गेल्या जवळजवळ १०० वर्षांत आपल्या देशाला एकही नोबेल पारितोषिक मिळालेले नाही. ही खरच खूप लाजिरवाणी बाब आहे,’ असे लेखक ठळकपणे मांडतात. तसेच देशातील शेती क्षेत्राची स्थिती दर्शवताना, १९९५ पासून तीन लाख ५० हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, हे विदारक चित्र समोर येते. लेखकाने देशातील विषमता आणि गरिबी यावर प्रकाश टाकला आहे. याबाबत लेखक सांगतात, की ‘भारतातल्या सर्वांत खालच्या जनतेकडे फारच थोडी संपत्ती आहे. थोडक्यात ते जवळपास कफल्लक आहेत, तर कित्येकजण कर्जबाजारी आहेत. आपल्या देशातील सर्वांत खालच्या ९० टक्के लोकांकडे भारतातील फक्त १९ टक्के संपत्ती आहे, तर १ टक्का लोकांकडे ५८ टक्के संपत्ती आहे.’ केवढी ही प्रचंड विषमता! यातील आणखी विषमतेबद्दल महत्त्वाचा मुद्दा ‘जिनी कोइफिशियंट’ लेखकाने सादर केला आहे. भारतातील भुकेल्या लोकांची समस्या ‘ॲक्शन अगेन्स्ट हंगर’ यातून विस्तृत मांडली आहे. दारिद्र्य आणि विषमतेचे एक भयानक उदाहरण म्हणजे आदिवासी पाड्यातील परिस्थिती. हे सांगताना लेखकाने हेरंब कुलकर्णी यांच्या ‘दारिद्र्याची शोधयात्रा आणि महाराष्ट्राची अस्मिता’ या पुस्तकाचा संदर्भ घेतला आहे. आलिशान बीएमडब्ल्यू कार आणि बैलाऐवजी नवऱ्याला जुंपून बायकोने केलेली नांगरणी, पाण्याचा बाटल्यांचा ढीग आणि एका घागरीकरता अनेक मैल केलेली वणवण, फाईव्ह स्टार मॅटर्निटी होम्स आणि दगडाने तुटणारी नाळ अशी अनेक विदारक सत्य लेखकाने मांडली आहेत. 

देशातील आणखी भीषण समस्या म्हणजे बेकारी. बेकारी गेल्या ४५ वर्षांतील सर्वांत जास्त आहे. २०११-१२ मध्ये ती २.२ टक्के होती. हे लेखकाने प्रभावीपणे सादर केले आहे. तसेच या पुस्तकात प्रदूषणाच्या गंभीर समस्येवर प्रकाश टाकण्यात आला आहे. आज देशातील अनेक शहरांमध्ये मास्कशिवाय चालणे अशक्य झाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार जगातील सगळ्यात जास्त प्रदूषित १५ शहरांमध्ये १४ शहरे भारतातील आहेत. ही लाजिरवाणी गोष्ट आहे. 

हे सर्व अस्वस्थ करणारे आहे, परंतु हे सत्य असून याद्वारे लेखकाचा समाजाला अंतर्मुख आणि जागरूक करण्याचा स्तुत्य प्रयत्न आहे. या सर्वांवर उपाय काय, तर सरकारने लोकाभिमुख अशा कल्याणकारी योजना राबवल्या पाहिजेत आणि त्या कशा राबवायच्या हेही उत्तम रीतीने सांगितले आहे. पुढे लेखक म्हणतात, की आपण जागतिकीकरण स्वीकारले पाहिजे की नाही, तर ते स्वीकारले पाहिजे. परंतु, याचा आपल्या देशाच्या भल्यासाठी उपयोग होणे गरजेचे आहे. जनतेच्या कल्याणासाठी सरकारने खर्च करायचा असेल, तर मुबलक उत्पन्नाचे स्रोत सरकारकडे पाहिजेत. यासाठी प्रत्यक्ष करांचे दर वाढवणे, वारसाहक्काच्या संपत्तीवर कर लावणे, कॉर्पोरेट्सना करमाफी/करसवलत न देणे, टॅक्स हेव्हन्सवर नियंत्रण ठेवणे, या सर्वांतून सरकारला जीडीपीच्या सुमारे २० टक्के उत्पन्न जास्त मिळेल आणि ते कल्याणकारी योजनांवर खर्च करता येईल. 

लेखकाने जागतिक पातळीवरील अनेक समस्यांवर प्रकाश टाकला आहे. लेखक म्हणतात की मानवजातीचा विनाश टाळायचा असेल, तर जगातील सर्वांना पर्यायी विकासनीती, पर्यायी तंत्रज्ञान वापरावे लागेल. सुखासीन जगण्यासाठी आणि चंगळवादासाठी माणूस अधिकाधिक वस्तू निर्माण करतो आहे आणि त्यासाठी जंगले नष्ट करत चालला आहे. उदा. दर ९८ सेकंदांना जगात २३१ एकर जंगल नष्ट होते. तसेच माणसाने नैसर्गिक परिसंस्था आणि तिला आधार देणारी जमीन, पाणी आणि त्यावरील वातावरण यामध्ये प्रचंड बदल केले आहेत. उदा. जंगले तोडणे, खाणी खणणे, नद्यांचे प्रवाह वळवणे, जमिनीतील पाणी वाट्टेल तसे उपसणे असे अनेक उद्योग केले आहेत. आज जगातील एक भीषण समस्या म्हणजे, निर्माण होणारा घन कचरा. २०१२ मध्ये घन कचरा निर्मिती १३० कोटी टन होती, तर २०२५ पर्यंत कचरा २२० कोटी टनापर्यंत जाईल. २०५० पर्यंत २० कोटी लोकांना पाण्यासाठी आपले घरदार सोडून जावे लागेल. अशा अनेक गंभीर समस्यांचा ऊहापोह केला आहे. लेखकाने उपाय सुचवताना म्हटले आहे, की सर्वांनी सार्वजनिक वाहतूकव्यवस्थेचा अवलंब केल्यास रस्ते मोकळे होतील, सायकली चालवता येतील, कच्च्या तेलाची बचत होईल, प्रदूषण कमी होईल. परंतु, हे होऊ न देण्यामागे अनेक कंपन्यांचे हितसंबंध गुंतले आहेत. चंगळवादाचे आणखी एक उदाहरण म्हणजे जाहिराती. जाहिरातींच्या प्रचंड माऱ्यामुळे अनावश्यक वस्तू आज गरजेच्या झाल्या असून यामध्ये नाहक पैसा खर्च होत आहे.

परंतु, लेखकाने नमूद केल्याप्रमाणे आज काही प्रमाणात का होईना, पण जनजागृती होत आहे. भविष्यातील संभाव्य सर्वनाश टाळण्यासाठी पावले टाकली जात आहेत. या सगळ्याला कंटाळून पाश्चिमात्य जगातील अनेकांनी स्वतःहून पैशाच्या मागे न लागणे, विनाकारण वस्तू खरेदी न करणे, कुटुंबाबरोबर निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवणे सुरू केले आहे. याला डाऊनशिफ्टिंग असे म्हणतात. थोडक्यात या चंगळवादाच्या ट्रेडमिलवरून उतरण्याचा निर्णय काहींनी घेतला आहे.

आज आपला देश वेगाने प्रगती करू इच्छितो, परंतु केवळ चंगळवादाच्या मागे न लागता शाश्‍वत आणि सर्वांगीण प्रगती करणे गरजेचे आहे. हे पुस्तक सर्वांनी वाचणे ही काळाची गरज आहे.  

‘अर्थात’, ‘मनात’, ‘मुशाफिरी’ यांसारखी अनेक उत्तम पुस्तके लिहिणारे ख्यातनाम लेखक अच्युत गोडबोले यांचे या पुस्तकासाठीसुद्धा मनःपूर्वक अभिनंदन.

संबंधित बातम्या