अद्‍भुत विश्वाची सफर

डॉ. केशव साठ्ये
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021

पुस्तक परिचय

आपला व्यवसाय, नोकरी हे आपण करत असतोच. पण ते करत असताना आजूबाजूच्या अनेक गोष्टींचा आस्वाद घेण्याचाही आपण प्रयत्न करत असतो. हा एक प्रकारे आपल्या आवडत्या गोष्टींचा उत्सव असतो. ‘बायोस्कोप’ हे संतोष शिंत्रे यांचे पुस्तक म्हणजे एका रसिक आणि चोखंदळ वाचकाने/प्रेक्षकाने  आपल्याला आवडलेल्या, संग्रही करून ठेवाव्यात अशा अनेक आशय समृद्ध साहित्याचा/आठवणींचा केलेला उत्सवच आहे. 

पुस्तकाच्या मुखपृष्ठाचा उल्लेख सहसा शेवटी करण्याचा प्रघात आहे. पण पुस्तकाच्या महाद्वाराचा सन्मान हा प्रथम झाला पाहिजे आणि जेव्हा मुखपृष्ठ पुस्तक वाचण्याला अधिक उद्युक्त करते, तेव्हा तर नक्कीच. मुखपृष्ठावरील बायोस्कोप मधून पाहणारा मुलगा, बायोस्कोपही एकदम जुन्या काळातला. शिवाय या फोटोचे वैशिष्ट्य हे की त्या मुलाची उत्सुकता, अधीरता त्याचा चेहेरा न दिसताच त्याच्या देहबोलीवरून  आपल्या लक्षात येते.  

या पुस्तकात एकूण सहा विभाग आहेत. गुणिजन, पुस्तके, तंत्रज्ञान, इतिहास, पर्यावरण आणि साहित्य. यातील इतिहास आणि पर्यावरण हे दोन विषय लेखकाचे व्यासंगाचे आणि अभ्यासाचे विषय आहेत. त्यामुळे यामध्ये आलेले लेख हे नवी माहिती देणारे, इतिहासाची कधी न उलगडलेली पाने उलगडणारे आहेत. पण जेव्हा लेखक आवडलेली पुस्तके इथे सोदाहरण सांगतो, तंत्रज्ञानाची वेगळी बाजूही दाखवतो, एखाद्या कवीची शक्तीस्थळे मर्मज्ञपणे मांडतो, तेव्हा वाचक यात रंगून जातात. या पुस्तकातील मला  विशेष आवडलेले लेख म्हणून मी ‘अमिताभ आख्यान’ आणि ‘सलील वाघची कविता’ यांचा उल्लेख करेन. ‘भारतातील डेन्मार्क’ आणि ‘साहित्यातील मृत्यू चित्रे’ हाही विशेष वाचनीय ऐवज आहे.

अमिताभ बच्चन यांच्याविषयी आपण अनेकवेळा अनेक ठिकाणी वाचलेले, पाहिलेले असते. पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा असा वेध क्वचितच घेतला जातो. विविध भूमिका त्यांनी कशा पेलल्या, त्या साकार करताना कोणते अभिनय गूण उपयोगी पडले, याचे तार्किक विश्लेषण हा लेख करतो. त्यांच्या आवाजाची चर्चा तर करतोच, पण देहबोलीबद्दल, संवाद-सादरीकरणाबद्दलही अतिशय विस्तृत असे निरीक्षण यात आहे. म. म. केळकर यांच्याविषयीचा लेखही एका चतुरस्र संपादकाची, अभ्यासकाची आगळी ओळख वाचकांना करून देतो. ‘पुस्तके’ या विभागात वीरप्पन विरुद्ध विजयकुमार या पुस्तकाविषयी लेखकाने भरभरून लिहिले आहे. एका पोलिस अधिकाऱ्याच्या या डायरीतून एक कुविख्यात दरोडेखोर, उलट्या काळजाचा गुन्हेगार नेमका कसा होता याचे रोमहर्षक पण वास्तव असे वर्णन आपल्याला वाचायला मिळते.

‘इतिहास’ या सदरात छत्रपती शिवरायांच्या कर्नाटक स्वारीचे स्वराज्य रक्षणातील महत्त्व लेखक उलगडून दाखवतो. तर ‘कृषिकल्याण राजा’ या लेखात बळीराजाचे महत्त्व शिवरायांनी कसे ओळखले होते आणि त्यामुळे त्यांना कशा विविध सवलती त्यांनी दिल्या याविषयी विवेचन करतो. सध्याच्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा लेख वाचताना सध्याची सामाजिक विसंगती जाणवल्यावाचून राहत नाही. याच सदरातला एक लेख आवर्जून वाचण्यासारखा आहे, तो म्हणजे ‘भारतातील डेन्मार्क’. आपल्यावर इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज, डच या मंडळींनी राज्य केले होते, हे आपल्याला माहीत असते पण डेन्मार्कनेही आपल्यावर सत्ता गाजवली. अतिशय सूत्रबद्धरीतीने त्यांनी आपले भारतातील व्यवहार केले होते. हा सारा अज्ञात इतिहास मुळातूनच वाचण्यासारखा आहे. तरंगमबाडी हे पुद्दुचेरी जवळचे गाव नकळतच आपल्या मनावर नोंदले जाते. 

प्रजाती म्हणजे species या विषयी इत्थंभूत माहिती या पुस्तकात मिळते. विविध प्रजातींचे जगणे कसे आवश्यक आहे, अधिवासाचे नेमके महत्त्व काय हे सांगत लेखक विकासाच्या नावाखाली होणाऱ्या विध्वंसाकडे आपले लक्ष वेधतो. यामुळे भविष्यात काय संकटे उभी राहणार आहेत हे इथे मुद्देसूदपणे मांडलेले असल्यामुळे आपण अवाक आणि अंतर्मुख होतो.

‘सलील वाघची कविता’ हा या छोटेखानी पुस्तकातील एक उत्कर्षबिंदूच म्हणावा लागेल. या निमित्ताने लेखक त्याची कवितेशी प्रथम झालेली ओळख आणि त्यामुळे आलेले मळभ सांगत वास्तव मांडणाऱ्या आजच्या सलीलच्या कवितेचे मोल सांगतो. सर्वव्यापी, सखोल सामाजिक स्पंदने टिपणारी, थेट भाष्य करणारी, प्रामाणिक कविता या निमित्ताने आपल्याला भेटते. ‘गॉडफादर’ चित्रपटाचा नायक डॉन व्हिटो कॉर्लीओन याचा मृत्यू आणि माचीवरील बुधाच्या नायकाचे शेवटचे 

क्षण मूळ पुस्तकात आहेत, तसेच 

लेखकाने यात मांडले आहेत. यावर कोणतीही मल्लीनाथी न करता मृत्यू या अनाकलनीय आणि गूढ अशा मानवी आयुष्यातील शेवटच्या थांब्याला कुर्निसात करून लेखक इथे थांबतो. बायोस्कोपमधून पाहण्यासारखे आता काही उरलेले 

नाही असे तर लेखकाला म्हणायचे 

नसेल ना?..

  • बायोस्कोप
  • लेखक - संतोष शिंत्रे
  • प्रकाशन - ग्रे सेल्स, पुणे
  • किंमत - २५० रुपये
  • पाने - १४८

संबंधित बातम्या