‘उन दिनों’ की बात

माधव गोखले
सोमवार, 16 ऑगस्ट 2021

पुस्तक परिचय

विसाव्या शतकाच्या तिसऱ्या दशकापासून पुढे जवळपास सत्तर वर्षांचा प्रवास पाहिलेल्या आणि वेगवेगळ्या कारणांमुळे आता काळाच्या उदरात गडप होऊन जवळजवळ विस्मरणात गेलेल्या उर्दू नियतकालिकांमधील मूळ लेखांचा अब्बासी या पुस्तकाच्यानिमित्ताने शोध घेतला आहे.

‘लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया...’ हे शब्द गीतकार शांताराम आठवले यांनी मास्तर कृष्णरावांच्या स्वररचनेवर रचले तेव्हा भारतीय चित्रपटसृष्टीने जेमतेम पंचविशी ओलांडली होती; पडद्यावर हालणारी चित्रं बोलू लागली त्याला पुरती दहा वर्षंही झाली नव्हती. आठ दशकांपूर्वी लिहिलेले हे शब्द, आज शतकोत्तर वाटचाल करताना एका प्रचंड मोठ्या उद्योगात रुपांतरित झालेल्या, भारतीय चित्रपटसृष्टीचीच ओळख ठरले आहेत. या लखलखत्या चंदेरी दुनियेचे आणखी एक न्यारेपण म्हणजे या दुनियेने कित्येक तारे-तारकांना अढळपद प्राप्त करून दिले आहे.

छायाचित्रणकार, भाषांतरकार, लेखक यासिर अब्बासी यांचे ‘ये उन दिनों की बात है - उर्दू मेमॉयर्स ऑफ सिनेमा लिजंडस्’ हे पुस्तक चंदेरी दुनियेतल्या तारे तारकांच्या याच अढळपदाची आणखी एक कहाणी आहे. चित्रपट पत्रकारितेमध्ये एकेकाळी आपला ठसा उमटवलेल्या ‘शमा’, ‘नईरंग-इ-खयाल’ सारख्या उर्दू नियतकालिकांत तसेच उर्दू भाषेतल्या अन्य साहित्यात उमटलेले चित्रसृष्टीचे एका वेगळ्याच कोनातून दिसणारे प्रतिबिंब अब्बासी या पुस्तकातून चित्रपट रसिकांसमोर ठेवतात. आता जवळजवळ विस्मरणात गेलेल्या उर्दू नियतकालिकांमधील या लिखाणाचा शोध आता अवघड असला तरी हा काळ मात्र अजून विस्मरणात गेलेला नाही. या काळातल्या अनेक कलाकृती आणि त्या कलाकृती साकारणाऱ्या कलाकारांची मोहिनी आजही जाणवत राहते.

भारतीय चित्रपटसृष्टीवर आपला अमीट ठसा उमटविणाऱ्या नामवंत अभिनेत्यांनी, दिग्दर्शकांनी, कथाकारांनी, गीतकारांनी, संगीतकारांनी इथे चित्रपटसृष्टीतल्या त्यांच्या तितक्याच नामवंत सहप्रवाशांची शब्दचित्रे रेखाटली आहेत, स्वतःच्या आठवणी सांगितल्या आहेत आणि चित्रपटांच्या दुनियेबद्दलचे त्यांचे दृष्टिकोनही मांडले आहेत. या भाषांतरित संकलनाचे वैशिष्ट्य म्हणजे हे सगळं लिखाण भारतीय चित्रपटांच्या प्रवासातल्या एका मोठ्या कालखंडावर आपला ठसा उमटवणाऱ्या कलाकारांचे आहे. चित्रपटसृष्टीविषयी लेखन करणाऱ्या पत्रकारांना दिलेल्या या मुलाखती नाहीत. त्यात काही ठिकाणी स्वतःची बाजू मांडण्याचे प्रयत्न आहेत, क्वचित काहीशी बोचरी वाटणारी मते आहेत, काही मुद्द्यांबाबत मौन आहे, आणि हातचे काही न राखता मन मोकळे करणारेही बरेच काही आहे. 

दिलीप कुमार, देव आनंद, बलराज साहनी, धर्मेंद्र, सुनील दत्त, कमाल अमरोही, शकील बदायुनी, जयदेव, जावेद अख्तर असे अनेक नामवंत त्यांच्या आठवणींसह ‘ये उन दिनों की बात है’च्या पानांतून भेटतात.

‘बाजी’च्या, मोठ्या बहिणीच्या, भूमिकेतून मीनाकुमारीबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त करताना नर्गीस लिहितात, ‘तिचं महत्त्व कोणालाच कळलं नाही... तू पुन्हा या जगात पाऊलही टाकू नकोस. ही जागा तुझ्यासारख्या लोकांसाठी नाही.’ ‘मीना –मौत मुबारक हो’ हा या संकलनातला पहिलाच लेख वाचकाला अंतर्मुख करतो. चाहत्यांच्या मनात स्वतःसाठी एक खास अशी जागा निर्माण करणाऱ्या रजतपटावरच्या तारे –तारकांना प्रसंगी केवढ्या एकटेपणाचा, बेपर्वाईचा सामना करावा लागतो, याचंच हे चित्रण. नर्गीस यांचा हा लेख वाचताना किंवा सुरय्या, नादिरा, श्यामा, मीना शौरी यांचे लिखाण वाचताना चित्रपटसृष्टीने अनेक अभिनेत्रींना दिलेल्या एकटेपणाची जाणीव होत राहते.

या शब्दचित्रांमध्ये इफ्तेकार यांनी अशोक कुमार आणि किशोर कुमार या बंधुद्वयांबद्दल, कैफी आझमी यांनी साहिर लुधियानवींबद्दल, ख्वाजा अहमद, के.ए., अब्बास यांनी पृथ्वीराज कपूर आणि राज कपूर या पिता-पुत्राच्या जोडीबद्दल, इस्मत चुगताई यांनी सुरय्याबद्दल आणि नौशाद यांनी के. असिफ आणि त्यांच्या ‘मुग़ल-ए-आज़म’बद्दल लिहिले आहे. चित्रपटांच्या दुनियेत आपापल्या कर्तृत्वाचे मानदंड निर्माण करणारे कलाकार दुसऱ्या तितक्याच कर्तृत्ववान कलाकारांबद्दल लिहिताना त्या सगळ्या काळाचे एक आगळेच चित्र उभे राहते. पृथ्वीराज कपूर यांच्याविषयीची के.ए.अब्बास लिहितात, ‘पृथ्वीराज कपूर यांच्याबद्दल भूतकालवाचक लिहिणे माझ्यासाठी अत्यंत कठीण काम आहे. मला सारखे वाटते, कोणत्याही क्षणी ते प्रकट होतील. माझ्या पाठीवर एक चापट मारतील, त्यांच्या चेहऱ्यावर त्यांच ते ठेवणीतले हास्य असेल, आणि ते विचारतील, ‘मग अब्बास, मी मेलो असं तू का जाहीर केलंस?’ कदाचित तक्रारीच्या सुरात ते असेही म्हणतील, ‘मी ‘नव्हतो’ असं कधीच नव्हतं, मी आहेच.’ पृथ्वीराज यांच्या खेळीयाच्या त्या मुखवट्याआड एका खऱ्या कलाकाराचा आणि आपल्या कलेने लोकांना आनंद मिळेल यासाठी प्रयत्न करणाऱ्या एका द्रष्ट्याचा चेहरा होता, असे अब्बास म्हणतात.

अब्बास यांनी राज कपूर यांच्यासाठी अनेक चित्रपट लिहिले. राज कपूर यांच्या व्यक्तिमत्त्वातले बारकावे टिपताना ते लिहितात, ‘तो (राज कपूर) जर फक्त स्वतःवरच प्रेम करतो तर मग आपण सगळे अजूनही त्याच्यावर का प्रेम करतो? कारण त्याच्या स्वतःशिवाय त्याला आणखी एक गोष्ट अत्यंत प्रिय आहे ती म्हणजे त्याचं काम, त्याची कला.’

राजा मेहदी अली खान यांचा सदाअत हसन मंटो यांच्यावरचा आणि नाटककार जावेद सिद्दीकी यांचा सत्यजित रे यांच्याबरोबर ‘शतरंज के खिलाडी’च्या सेटवर काम करतानाच्या अनुभवावरचा लेखही मुळातून वाचायला हवा.

विस्मरणाच्या धुक्यात हरवून गेलेले काही रंजक किस्सेही या पुस्तकाने पुन्हा जिवंत केले आहेत. आज साठ-एकसष्ट वर्षांनंतरही चित्रपट नव्या-जुन्या पिढ्यांना भुरळ घालणाऱ्या या चित्रपटातल्या तानसेनच्या व्यक्तिरेखेला बड़े गुलामअली खाँ यांचा आवाज कसा मिळाला, याची कहाणी के. असिफ आणि ‘मुग़ल-ए-आज़म’च्या आठवणीत संगीतकार नौशाद यांच्या शब्दांत वाचायला मिळते.  

‘मी स्वतःचाच चेहरा आरशात खूप वेळ निरखत होतो. खोटं नाही सांगत, पण मला राहून राहून वाटत होतं एखाद्या छान दिसणाऱ्या मुलीनं लट्टू व्हावं असं काय आहे या चेहऱ्यात...’ असं बद्रुद्दीन काझी स्वतःच्या विवाहाबद्दल सांगताना लिहितात. दारुड्याचे सोंग घेऊन गुरुदत्तच्या ऑफिसमध्ये जा असा सल्ला बलराज सहानींनी या बद्रुद्दीन काझीला दिला होता. जॉनी वॉकर या नावाने नंतर या अभिनेत्याने नंतरच्या काळात चित्रपट जगतात आपली अशी एक जागा मिळवली. ‘हमारी शादी’ या लेखाच्या सुरुवातीलाच त्यांनी एक गंमतशीर टिपणी केली आहे, ‘माझं लग्न म्हणजे एक मोठा गंभीर राजकीय पेचप्रसंग आहे आणि वर्तमानपत्रांनी त्याच्या मुळापर्यंत जायलाच हवं, नाहीतर सगळी वर्तमानपत्र आणि नियतकालिकं बहुधा बंदच पडतील... विलक्षण अंदाज बांधले जाताहेत... मी प्रेमात पडून लग्न केलंय की लग्नानंतर प्रेमात पडलोय, याच्याच शोधात प्रत्येकजण आहे.’ 

हे लेख ज्यांनी लिहिले आहेत आणि ज्यांच्याविषयी लिहिले आहेत त्या कलाकारांची, अब्बासी यांच्या पत्नी गितीका नारंग अब्बासी यांनी केलेली अतिशय उत्तम पोर्ट्रेट स्केच हे या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट्य. इफ्तेकार, अजित, धर्मेंद्र, राज कपूर, मीनाकुमारी, दिलीप कुमार, देव आनंद या प्रत्येक नावागणिक डोळ्यासमोर उभी राहणारी छबी जशीच्यातशी सादर करणारी ही पोर्ट्रेट स्केच जशी वाचकाला आठवणींमधून फिरवून आणतात, तशीच कमर जलालाबादी, राजा मेहदी यांच्यासारख्या आता फक्त आठवणींमध्ये उरलेल्या कलाकारांचे चित्ररूप दर्शनही घडवतात. या पुस्तकाच्या निमित्ताने काही पोस्टर्स, चित्रपटांच्या जाहिराती यांचाही एक दुर्मीळ खजिना वाचकांसमोर उलगडतो.

पुस्तकातील लेखांची निवड हा एक महत्त्वाचा भाग होता. एक प्रमुख निकष म्हणून या पुस्तकातला प्रत्येक लेख लेखकाच्या हयातीतच प्रसिद्ध झाला आहे. या एका कारणामुळे काही लेख वगळावे लागल्याचे अब्बासी यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.

Yeh  Un Dinon Ki Baat Hai Urdu Memoirs of Cinema Legends

  • Selected and Translated by Yasir Abbasi
  • Publisher : Bloomsbury Publishing India
  • Price : ₹   699
  • Pages : 389
     

संबंधित बातम्या