बुकशेल्फ

-
सोमवार, 21 डिसेंबर 2020

बुकशेल्फ

शून्यातून शंभराकडे...
‘शून्यातून शंभराकडे’ हे पुस्तक सलीम शेख यांचे आत्मकथन आहे. मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यामध्ये कष्टकरी, गरीब कुटुंबात शेख यांचा प्रवास सुरू झाला. त्या प्रवासात जवळचे नातेवाईक, मित्र, शिक्षक असे अगणित लोक भेटले, ज्यांच्यामुळे शेख यांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल झाले. हाच प्रवास रेखाटणारे हे पुस्तक आहे. शैक्षणिक प्रवासातील अडचणी व त्यातून काढलेला मार्ग, मार्ग दाखवणारी माणसे यावरही लेखकाने भाष्य केले आहे. 
लेखक - सलीम शेख
प्रकाशन - राजहंस प्रकाशन, पुणे
किंमत - २५० रुपये
पाने - २२३

सोनेरी दिवस
‘ब्राईट डे’ या कादंबरीचा हा अनुवाद असून ग्रेगरी डॉसन या हॉलिवूडमधील एका प्रसिद्ध पटकथा लेखकाची ही गोष्ट आहे. नायक इंग्लंडमधील कॉर्नवॉल इथे लेखन करण्यासाठी येऊन राहतो. तिथे एका वृद्ध दाम्पत्याशी त्याची भेट होते आणि त्यांच्यामुळे त्याच्या विस्मृतीत गेलेल्या गतायुष्याला उजाळा मिळतो. वर्तमानात ज्या लोकांशी संबंध येतो, त्यांच्यामुळे त्याची मानसिक ओढाताणही होते आहे. यातून नायक सुखाचा मार्ग कसा शोधतो याची ही कथा. 
लेखक - जे. बी. प्रीस्टले
अनुवाद - डॉ. विजया देशपांडे
प्रकाशन - उत्कर्ष प्रकाशन, पुणे
किंमत - ४०० रुपये
पाने - ३६०

मंत्र गुंतवणुकीचा
अर्थनियोजनापासून आर्थिक उद्दिष्टांपर्यंत वाटचाल करण्याचे अनेक पर्याय असतात. पीपीएफ, शेअर्स, म्युच्युअल फंड, सोने, स्थावर मालमत्ता, पेन्शन स्कीम.. यापैकी कोणता पर्याय निवडावा? आणि कोणताही निवडला तरी त्यासाठी संशोधन, अभ्यास आणि अनुभव हवा, तरच यशस्वी गुंतवणूक होऊ शकेल. त्यासाठी मूल्यांकन क्षमता, विश्‍लेषण करण्याची क्षमता हे आवश्‍यक गुण आहेत. या गुणांच्या आधारे गुंतवणुकीची पायाभरणी कशी करावी हे या पुस्तकामध्ये स्पष्ट केले आहे.
लेखक - अरविंद परांजपे
प्रकाशन - राजहंस प्रकाश, पुणे
किंमत - २८० रुपये
पाने - २०९

रक्तगुलाब
काश्‍मीर म्हणजे निसर्गाने बहरलेले रम्य ठिकाणी. पण तेथे धार्मिक, आर्थिक, शासकीय, राजकीय गुंतागुंतीचे जाळे आहे. या पार्श्‍वभूमीवर चित्रित झालेली काश्मिरी पंडितांच्या कुटुंबाची कहाणी म्हणजे ‘रक्तगुलाब’ हे पुस्तक. ही स्वतःशी, कुटुंबाशी, समाजाशी, व्यवस्थेशी असलेल्या द्वंद्वांच्या पार्श्‍वभूमीवरील नात्यांची कथा आहे. 
लेखक - आशीष कौल
अनुवाद - छाया राजे
प्रकाशन- राजहंस प्रकाशन, पुणे
किंमत - ३३० रुपये
पाने - २९३

चक्रव्यूह
स्वतःच्या मूळ खेडेगावातच दवाखाना थाटणाऱ्या तरुण डॉक्टरची ही कथा आहे. हा डॉक्टर आपल्या ज्ञानाच्या मर्यादा जाणणारा आहे. अनेक अडचणींवर मात करून तो गावात बस्तान बसवतो. स्वतःचेच गाव त्याला वेगवेगळ्या रूपात दिसू लागते. ग्रामीण जीवनातील गुंतागुंतीतून वाट काढत तो आपले जीवन जगत राहतो. 
लेखक - डॉ. गजानन उल्हामाले
प्रकाशन - राजहंस प्रकाशन, पुणे
किंमत - ४५० रुपये
पाने - ३७२

भारतीय अर्थव्यवस्था
यूपीएससी, एमपीएससी, पीएसआय, एसटीआय, एएसओ परीक्षांमधील अर्थशास्त्र विषयाच्या अभ्यासासाठी अत्यंत उपयुक्त  
असे हे पुस्तक आहे. विविध स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या व अर्थशास्त्र विषयाच्या अध्यापनाचा अनुभव असलेल्या तज्ज्ञ लेखकांनी या पुस्तकामध्ये लेखन केलेले आहे. तसेच २०१४पासून राज्य सेवा परीक्षेत विचारण्यात आलेल्या अर्थशास्त्र विषयातील विषयातील विभाग, उपविभाग, घटकावरील प्रश्‍नांचा त्यांच्या स्पष्टीकरणासह समावेश करण्यात आला आहे.
लेखक - भूषण देशमुख, हेमंत जोशी
प्रकाशन - सकाळ प्रकाशन, पुणे
किंमत - ५९९ रुपये
पाने - ५३

संबंधित बातम्या