टाटा स्टोरीज

-
सोमवार, 16 मे 2022

पुस्तक परिचय
 

या चाळीस कथांमध्ये टाटा उद्योग समूहाला घडविणारे अनेक अनुभव आहे, हकिगती आहेत ज्या आजही प्रेरणादायक ठराव्यात. टाटा समूहाला भेट द्यावी, असं महात्मा गांधींना का वाटत होतं? इथपासून ते अंतराळवीर कल्पना चावलानी तिच्या पहिल्या अंतराळ मोहिमेत जे.आर.डी. टाटांनी टपाल घेऊन केलेल्या पहिल्या विमानोड्डाणाचे छायाचित्र आपल्याबरोबर नेल्याच्या आठवणीपर्यंत आणि जमशेदजी टाटा यांच्या वाचनप्रेमापासून ते भविष्याचा वेध घेणाऱ्या त्यांच्या दूरदृष्टीपर्यंत अनेक विषय ‘#टाटा स्टोरीज’ वाचकासमोर ठेवते.

‘#टाटा स्टोरीज’ लिहीत असताना मी अक्षरशः झपाटून गेलो होतो,’ अशा शब्दांत ‘#टाटा स्टोरीज’चे लेखक हरीश भट यांनी या पुस्तकाविषयी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये या पुस्तकाच्या निर्मितीचा प्रवास मांडला आहे. गेली चौतीस वर्षे टाटा समूहामध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर काम करताना, अनेक टाटा ब्रँड्सची निर्मिती करण्यात मोलाचा वाटा असणाऱ्या भट यांच्या लेखणीतून साकारलेल्या या चाळीस गोष्टी ‘#टाटा स्टोरीज’च्या वाचकालाही झपाटलेपणाचा अनुभव देणाऱ्या आहेत. पेंग्विन रॅन्डम हाऊस इंडियाने प्रकाशित केलेल्या ह्या मूळ इंग्रजी पुस्तकाचा व्यंकटेश अनंत उपाध्ये यांनी केलेला मराठी अनुवाद साकेत प्रकाशनाने प्रसिद्ध केला आहे.

या सगळ्या कथांना पुण्यातील टाटा सेंट्रल अर्काइव्हजने जपलेला टाटा समूहाशी संबंधित पत्रव्यवहार, छायाचित्रे आणि अन्य दस्तावेजांचा भक्कम आधार आहे, त्याशिवाय टाटा समूहातील भट यांच्या अन्य सहकाऱ्यांच्या मदतीमुळे हे पुस्तक टाटा समूहाच्या इतिहासातील एक रोचक भाग वाचकांसमोर ठेवते, यात शंका नाही. टाटा समूहावर लिहिलेल्या भट यांच्या ‘टाटालोग’ या पुस्तकाचेही यापूर्वी वाचकांनी स्वागत केले होते.

भारतीय मनासाठी ‘टाटा’ हा केवळ एक उद्योगसमूह नाही, तर त्या शब्दाला ध्यासपूर्ण निर्मितीचं, सातत्यपूर्ण गुणवत्तेचं, टाटा नावाच्या मूल्यप्रणालीचं आणि सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेचं वलय आहे. भारतीय उद्योगविश्वातल्या पोलाद निर्मिती, वाहन उद्योग, हवाई सेवा, आदरातिथ्य अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये स्वतःचा अमिट ठसा उमटविताना गेल्या दीड शतकांहून अधिक काळाची परंपरा असलेल्या टाटा समूहाने, बदलत्या काळाचा मागोवा घेत भारतीय उद्योगविश्वाला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ‘टाटा’ या विशेषनामाबरोबर सर्वसाधारणपणे मनात येणारी भावना यापेक्षा वेगळी नसते.

सर जमशेदजी टाटांसह टाटा समूहातल्या आजवरच्या दिग्गजांसंबंधीच्या या कथा टाटा समूहाच्या प्रवासाचा एक दस्तावेज एका आगळ्या स्वरूपात वाचकासमोर मांडतात. यातल्या काही गोष्टी कदाचित आपण याआधी ऐकल्या-वाचल्या असतीलही, पण त्या पलीकडे जात या कथा टाटा समूहाची मूल्य, अफाट मेहनत घेण्याचा ध्यास आणि या पुस्तकातल्या सगळ्याच व्यक्तींच्या निष्ठा, जिद्द आणि सातत्य आपल्या समोर ठेवतात. ‘#टाटा स्टोरीज’ या निव्वळ यशकथा नाहीत. या कथांमध्ये कुठे अपयशही आहे, पण त्यातूनही सामोरी येते ते प्रयत्नांमधले सातत्य आणि जिद्दीच्या जोरावर अपयशातून, अडचणींमधूनही मिळत गेलेला मार्ग.

टाटा समूहाचे संस्थापक सर जमशेदजी टाटा यांच्यासह सर दोराबजी टाटा, जे.आर.डी. टाटा आणि रतन टाटा हे त्यांचे वारसदार; त्यांच्यासोबत टाटा समूहाच्या जडणघडणीत मोठा सहभाग असणाऱ्या लेडी मेहेरबाई टाटा, चार्ल्स पेरिन, नेव्हिल व्हिन्सेंट, बॉबी कूका, डॉ. जॉन मथाई, सुमंत मुळगावकर, रूसी मोदी, दरबारी सेठ, नानी पालखीवाला, झर्क्सेस देसाई अशा दिग्गजांच्या कथा ‘#टाटा स्टोरीज’ आपल्याला सांगते; त्याचबरोबर टाटा समूहाचा विस्तार, भारताच्या आर्थिक भवितव्याची चर्चा करणारा ‘बॉम्बे प्लॅन’ आणि भारतीय विज्ञान संस्था, ताज हॉटेल, टाटा स्टील, टायटन, टाटा टी, टाटा इंडिकासारखे उद्योग, टाटा कॅन्सर हॉस्पिटल, टीआयएफआर, एनसीपीए अशा संस्थांचा प्रवासही एका अनोख्या पद्धतीने उलगडत नेते. 

‘#टाटा स्टोरीज’ची सुरुवात होते ती दोन दिग्गजांच्या एकत्रित प्रवासापासून. दोघांचेही स्वप्न एकच – आपल्या मातृभूमीच्या प्रगतीचे. गोष्ट आहे जुलै १८९३मधील. जपानमधील योकोहोमा बंदरातून ब्रिटिश कोलंबियातील व्हॅन्क्युव्हरकडे निघालेल्या एसएस एम्प्रेस इंडिया या जहाजातून या दोन लोकोत्तर व्यक्ती प्रवास करीत होत्या -सर्व धर्मांच्या वैश्विक परिषदेमध्ये हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व करण्यासाठी अमेरिकेस प्रस्थान ठेवलेले स्वामी विवेकानंद आणि टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा. जहाजबांधणी उद्योगासंबंधी चर्चा करण्यासाठी जमशेदजी जपानला गेले होते. त्या प्रवासात त्यांनी जपानमधील रेशीम उद्योग आणि इतरही काही उद्योगधंदे पाहिले होते. आणि तेथून ते वर्ल्ड कोलंबियन एक्स्पोझिशनला भेट देण्यासाठी शिकागोलाच जात होते.  बारा दिवसांच्या या प्रवासात या दोघांच्या भेटी झाल्या त्यात दोघांचे नेमके काय संभाषण झाले त्याचे तपशील उपलब्ध नसले तरी स्वामी विवेकानंदांच्या व्यक्तिमत्त्वामुळे जमशेदजी प्रभावित झाले होते. पुढे पाच वर्षांनी जमशेदजींनी स्वामीजींना लिहिलेले एक पत्र उद्धृत करत लेखक जमशेदजींच्या मनावरील स्वामीजींची प्रभाव स्पष्ट करतात. नोव्हेंबर १८९८मध्ये लिहिलेले हे पत्र आहे. त्यावेळी जमशेदजींच्या मनात भारतीय विज्ञान संस्थेची –इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सची महत्त्वाकांक्षी कल्पना आकारास येत होती. एकत्र केलेल्या प्रवासाचे स्मरण करून देत, जमशेदजी आपल्या पत्रात लिहितात, ‘भारतात त्यागवृत्ती वृद्धिंगत करण्याबद्दल आणि ती नष्ट न होऊ देता उपयुक्त मार्गांकडे वळवण्याच्या कर्तव्याबद्दल आपण मांडलेले विचार या क्षणीही मला स्पष्टपणे आठवत आहेत.’ आपल्या या नियोजित संस्थेच्या नेतृत्वाची धुरा स्वामी विवेकानंदांनी स्वीकारावी अशी इच्छाही जमशेदजींना या पत्रात व्यक्त केली होती.

अशीच आणखी एक रोचक कथा आहे ज्युबिली हिऱ्याची. प्रसिद्ध कोहिनूर हिऱ्यापेक्षा दुपटीहून मोठा असणारा जगातला सहाव्या क्रमांकाचा हा हिरा दोराबजी टाटांनी त्यांच्या पत्नीला –मेहेरबाईंना – भेट दिला होता. पहिल्या महायुद्धातून जग सावरत असताना अगदी प्रारंभिक अवस्थेत असणाऱ्या टाटा स्टीलला वाचवविण्यासाठी १९२४मध्ये दोराबजी टाटा आणि त्यांच्या पत्नी मेहेरबाई यांनी ज्युबिली हिऱ्यासह स्वतःची सगळी संपत्ती गहाण ठेवून इम्पिरियल बँकेकडून एक कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. या कर्जामुळे सावरलेली टाटा स्टील पुन्हा भरभराटीच्या मार्गावर गेली.

‘नेतृत्वाबद्दलच्या खऱ्याखुऱ्या गोष्टींमधून जेवढं शिकायला मिळतं तेवढं नेतृत्वाबद्दलच्या कोणत्याही सैद्धांतिक मिमांसेतून शिकता येत नाही’, असं अॅड-गुरू पियूष पांडे यांनी या पुस्तकावर प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे. या पुस्तकातल्या प्रत्येक कथेतून पांडे यांच्या म्हणण्याचा प्रत्यय येतो.

या चाळीस कथांमध्ये टाटा उद्योग समूहाला घडविणारे अनेक अनुभव आहे, हकिगती आहेत ज्या आजही प्रेरणादायक ठराव्यात. टाटा समूहाला भेट द्यावी, असं महात्मा गांधींना का वाटत होतं? इथपासून ते अंतराळवीर कल्पना चावलानी तिच्या पहिल्या अंतराळ मोहिमेत जे.आर.डी. टाटांनी टपाल घेऊन केलेल्या पहिल्या विमानोड्डाणाचे छायाचित्र आपल्याबरोबर नेल्याच्या आठवणीपर्यंत आणि जमशेदजी टाटा यांच्या वाचनप्रेमापासून ते भविष्याचा वेध घेणाऱ्या त्यांच्या दूरदृष्टीपर्यंत अनेक विषय ‘#टाटा स्टोरीज’ वाचकासमोर ठेवते.

यातली प्रत्येक कथा वाचायला सहा मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागू नये, हा आजच्या डिजिटल जगातला वाचन-वेळाचा ‘नियम’ ह्या कथा लिहिताना पाळल्याचे भट यांनी टाटा समूहाच्या संकेतस्थळावर या पुस्तकाबद्दल लिहिताना म्हटले आहे. या कथा आजच्या काळातल्या ‘हितोपदेश’ ठराव्यात, आई-वडिलांनी लहान मुलांना या गोष्टी आवर्जून सांगाव्यात अशी अपेक्षाही लेखकाने व्यक्त केली आहे.

संबंधित बातम्या