अनुभवांचे उत्कट वर्णन

मेधा आलकरी
शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018

पुस्तक परिचय
अमेरिका खट्टी मिठी
लेखक : डॉ. मृण्मयी भजक
प्रकाशक : ग्रंथाली, मुंबई 
किंमत : २०० रुपये.
पाने : १७३ 

डॉक्‍टर मृण्मयी भजक यांच्या अमेरिका खट्टी मिठी या पुस्तकाचं नुसतं शीर्षक वाचूनच डोळ्यासमोर उभी राहते ती ऑरेंज कलरची अर्धचंद्राकृती लिमलेटची गोळी. चघळता चघळता कधी संपून जाते कळतच नाही. मागे रेंगाळत राहते, एक हवीहवीशी, आंबट गोड चव. हे पुस्तकही तसंच आहे. संपूच नये असं वाटणारं. नवनवीन अनुभवांची भर त्यात पडतंच राहावी आणि आपण त्याचा मनमुराद आस्वाद घेतंच राहावा असं वाटत राहतं. 

परदेशातील प्रवास वेगळा आणि निवास वेगळा. प्रवासात आपण पाहतो सौंदर्यस्थळं, पण निवासात पाहतो माणसं. डॉक्‍टर मृण्मयी यांनी ती नुसती पाहिलीच नाहीत तर वाचली. त्यांना पुस्तकं वाचायची प्रचंड आवड आहे हे त्यांच्या ग्रंथालय भेटीच्या ‘आनंद तरंग’ या लेखातून जाणवतं, पण त्यांना माणसं वाचायची कला अवगत आहे हे मात्र पुस्तकातील प्रत्येक लेखावरून लक्षात येतं. प्रत्येक अनुभवात प्राण फुंकून त्यांना जिवंत करण्याचं त्यांचं कसब ध्यानात येतं आणि पाल्हाळ न लावता ते नेमक्‍या आणि नेटक्‍या शब्दात मांडायच्या त्यांच्या शैलीचं कौतुक वाटतं.

परदेशी राहिलेल्या, गृहिणीपद आनंदाने स्वीकारलेल्या सगळ्या महिला डॉ. मृण्मयी यांच्या या अनुभवांशी आपलं नातं जोडू शकतील. विदेशी लोकांच्या उच्चार पद्धतीमुळे अर्थबोध न झालेल्या चेहेऱ्यावरचं काहीही न कळल्याचं स्मितहास्य घ्या किंवा हिंदी शिकवण्याचा अट्टहास म्हणा किंवा नवीन पदार्थ बनवताना स्वयंपाकघरातील त्रेधातिरपीट म्हणा, सगळे अनुभव या पठडीतले. कपाळावरील लाल कुंकवाची कारणमीमांसा आणि पाचवार साडी व अडीच मीटरची ओढणी यातला फरक त्यातल्या प्रत्येक स्त्रीने कधी ना कधी समजावून सांगितला असतोच असतो आणि त्यांच्या लाइट कोऱ्या चहाचे व कडक काळ्या कॉफीचे घुटके घेत कधीतरी हळूच आपला फक्कड आल्याचा चहा त्यांच्या गळी उतरवलेला असतो. 

ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांचे आशीर्वाद पुस्तकाला लाभले आहेत. गीतकार प्रवीण दवणे यांनी प्रस्तावनेत पुस्तकातील अनेक सौंदर्यस्थळे दाखवली आहेत. ‘शब्दांच्या पलीकडले’ हा अनुभव डॉ. मृण्मयी यांनी अतिशय उत्कटपणे लिहिला आहे. भारतीय मृण्मयी व मेक्‍सिकन ग्रेस या दोन माता. संस्कृती व भाषा भिन्न असली, तरी मूळ मानवी स्वभावाची, खास करून मातृत्वाची जी ओळख पटते, कुठे तरी ते सूर छेडले जातात, ती एकच तार झंकारते, आणि शब्दांच्या पलीकडले असे आनंददायी संगीत निर्माण होते.

टोफू, टरफलं आणि टेक्‍सास हा एक मजेशीर लेख. या लेखातून मृण्मयीच्या आत दडलेलं एक बालक आपल्याला दिसतं. शिस्तप्रिय अमेरिकेत टरफलं खाली टाकण्याचा आनंद हा त्या शिस्तीवरचा उतारा वाटतो तिला.

अमेरिका व भारत यांच्यामधील भिन्नता दाखवताना लेखिकेचा सूर कधीही श्रेष्ठत्वाचा अथवा निर्भत्सनेचा नसतो. त्यांची जीवनपद्धती समजावून घेऊन केलेली ती एक निर्भेळ तुलना असते. पश्‍चिमेकडील लोकांसाठी सूर्यप्रकाश अतिशय महत्त्वाचा. एकमेकांना भेटले, की हवामानाच्या आणि त्यातही स्वच्छ सूर्यप्रकाशाच्या गोष्टी सुरू. आधी गंमत वाटणाऱ्या व नंतर अंगवळणी पडणाऱ्या या गोष्टी. तिथल्या गोठवणाऱ्या थंडीनंतर येणाऱ्या स्वच्छ सूर्यप्रकाशाची लेखिकेलाही किती आस लागली होती आणि त्याचं स्वागत करताना तिनेही ते शब्द कसे सहजरीत्या वापरले याची प्रांजळ कबुली देणारी लेखिका खूप आवडून जाते. 

डॉ. मृण्मयीच्या लेखनातील अजून एक वैशिष्ट्य म्हणजे निर्जीव गोष्टींना ती देत असलेलं व्यक्तिरूप. सेंट जोसेफ हे त्यांचं अमेरिकेतील राहतं गाव. त्या छोटेखानी गावाशी, मिशिगन लेकबरोबर ती संवाद साधते. पुस्तकाची सुरवातच ‘सेंट जो’ ला लिहिलेल्या पत्राने झाली आहे. सुपरबझारमधून आणलेल्या दीड डॉलरच्या मेथीच्या मुळाशी चिकटलेल्या गोऱ्या  मातीतही ती मानव स्वभाव शोधते. 

हे पुस्तक वाचत असताना आपल्याला डॉ. मृण्मयी यांच्या आरस्पानी स्वभावाचं दर्शन होतं. सहवेदना समजून घेणारी ही लेखिका तितक्‍याच हळुवारपणे त्या कागदावर उतरवू शकते. स्त्रीची अगदी लहानपणापासून जपलेली, छोटीशी सुप्त इच्छा कोणत्याही वयात पूर्ण झाली, की होणारा आनंद आणि त्याचं मोल ती त्या स्त्रीइतकंच सहृदयतेने अनुभवते. म्हणूनच मग तिच्या लेखणीतून उतरतात गुप्ता आण्टी. 

‘ती एकटी’ं मधील वयस्कर स्त्रीचा जोडीदार स्वर्गवासी झाल्यानंतर तिला आलेला एकाकीपणा लेखिकेने किती हळुवारपणे अनुभवलाय. वाचताना आपल्यालाही हुरहूर लागते. मुलं, नातवंड परदेशी असली तरी, ‘संध्याछाया भिवविती मना’ अशी स्थिती असली तरी, भारतीय कुटुंबव्यवस्थेत, नात्यागोत्यात शेजारपाजारात आढळणारा ओलावा त्या एकाकीपणावर मात करत असतो.

अमेरिकेतील खट्टे अनुभव हे उद्‌भवलेल्या प्रसंगांचे आहेत. तेथील माणसांचे नाहीत. या सगळ्या अनुभवांचं वर्णन लालित्यपूर्ण आहे, त्यात सहजता आहे, भावप्रणवता आहे. नि म्हणूनच ते मनाला अतिशय भावतं. हे पुस्तक आपण लेखिकेच्या नजरेतून वाचतो तरीही ते आपल्या अंतर्मनाला भिडतं. पुस्तकाचं मुखपृष्ठ आणि मांडणी अतिशय देखणी आहे. सकाळ  साप्ताहिकमध्ये या लेखांचे सदर प्रसिद्ध झाले होतेच, पण पुस्तक म्हणून एकत्रितरीत्या वाचन करणं हा एक आनंददायी अनुभव आहे, म्हणूनच अमेरिकेला जाऊन आलेल्यांसाठी, अमेरिकेला जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी आणि घरबसल्या अमेरिकेचा अनुभव मिळावा असं वाटणाऱ्यांसाठी, संग्रही ठेवावं असं हे पुस्तक आहे.

संबंधित बातम्या