सामाजिक कर्तृत्वाचा प्रवास

मृणालिनी कानेटकर-जोशी
सोमवार, 8 जुलै 2019

पुस्तक परिचय
 

कवयित्री अंजली कुलकर्णी यांनी लिहिलेले ‘अपराजिता’ हे पुस्तक म्हणजे आमदार नीलम गोऱ्हे यांच्या सामाजिक कार्यकर्तृत्वाचा लेखाजोखा मांडणारा, त्यांचा संघर्ष, त्यांची कामाप्रती निष्ठा, विशेषतः स्त्रियांचे प्रश्‍न सोडवण्यासाठीची त्यांची तळमळ वाचकांसमोर उलगडणारा चित्रदर्शी पटच आहे, असे म्हणावे लागेल.
मुळात एक प्रगल्भ राजकारणी म्हणून प्रसिद्ध असलेल्या, शिवसेनेसारख्या महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या पक्षात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या नीलमताई मुत्सद्दी आणि संवेदनशील नेत्या म्हणून प्रसिद्ध आहेत, पण त्यांच्या कार्याची सुरुवात झाली ती सामाजिक बांधिलकीतून. स्त्रियांचे विविध प्रश्‍न सोडवतानाच समाजातल्या अंधश्रद्धा, शिक्षण अशा प्रश्‍नांवरही त्यांनी खूप काम केले. पण, आजच्या घडीला नीलमताई म्हटले, की त्यांची राजकीय प्रतिमाच डोळ्यांपुढे अधिक ठळकपणे येते. अंजली कुलकर्णी यांनी मात्र त्यांच्या सामाजिक कार्यावर लक्ष केंद्रित करत या क्षेत्रातला त्यांचा प्रवास पुस्तक रूपाने उलगडला आहे आणि हे या पुस्तकाचे श्रेय आणि वेगळेपण आहे.

नीलमताई सुविद्य पण कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलगी. प्रभादेवी येथील आदर्शनगरमधल्या आदर्श विद्यालयाबरोबरच मुंबई महापालिकेच्या शाळेतही त्यांचे शिक्षण झाले. त्याचबरोबर समाजवादी विचारांशी बांधिलकी मानणाऱ्या साने गुरुजी विद्यालयात त्यांचे शिक्षण झाले. त्यामुळे समाजातल्या वेगवेगळ्या घटकांशी त्यांचे नाते जुळले. वेगवेगळे वैचारिक संस्कार त्यांच्यावर झाले. वडील पशुवैद्यकीय डॉक्‍टर. ते परदेशातून शिक्षण घेऊन आले. येताना आधुनिक मतप्रवाह बरोबर घेऊन आले. नीलमताईंच्या मूळच्या धडाडीच्या स्वभावाला हे सारे संस्कार पोषक ठरले. त्यांचे कुटुंब आता सुखवस्तू म्हणून गणले जाऊ लागले होते. नीलमताई आयुर्वेदिक डॉक्‍टरकीचे शिक्षण घेत होत्या. कॉलेजमधल्या विविध स्पर्धा, विशेषतः वक्तृत्व स्पर्धा गाजवत होत्या. पण या सुखकर, स्वप्नरम्य काळाबरोबर नुसते वाहवत न जाता त्या सामाजिक प्रश्‍नांबद्दल सजगतेने विचार करत होत्या. ६० च्या दशकाचा तो काळ. महागाई, बेरोजगारी अशा प्रश्‍नांनी लोक त्रस्त होते. दुष्काळ आणि भ्रष्टाचार यामुळे सामान्य माणसाचे कंबरडे मोडले होते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचे भारावलेपण ओसरून वेगवेगळ्या प्रश्‍नांकडे लक्ष वेधण्यासाठी केल्या जाणाऱ्या आंदोलनांनी महाराष्ट्रातले वातावरण ढवळून निघाले होते. मृणाल गोरे यांचा लाटणे मोर्चा, मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यासाठी दलित पॅंथरच्या पुढाकारातून उभी राहिलेली नामांतर चळवळ, आपल्या हक्कांसाठी जागृत झालेल्या दलित तरुणांनी केलेली विविध आंदोलने या साऱ्या वातावरणाचा नीलमताईंच्या संवेदनशील मनावर परिणाम होणे साहजिकच होते. त्याच वेळी वेगवेगळ्या आदिवासी पाड्यांवर जाऊन आरोग्य शिबिरे घेताना अजूनही आपल्या समाजातल्या वंचित घटकांचे आरोग्य, शिक्षण, अंधश्रद्धा या बाबतीतले मागासलेपण त्यांना प्रकर्षाने जाणवत होते. वक्तृत्व स्पर्धेनिमित्त ‘युक्रांद’च्या डॉ. कुमार सप्तर्षी आणि अरुण लिमये यांच्याशी त्यांचा परिचय झाला आणि खऱ्या अर्थाने त्या सामाजिक कार्याशी जोडल्या गेल्या.

पुढे डॉक्‍टर झाल्यावर पुण्यात हडपसर भागात त्यांनी दवाखाना सुरू केला आणि स्त्रियांची दुःखे, आरोग्य प्रश्‍न, स्त्रीची कुचंबणा, तिचे कुटुंबातले, समाजातले दुय्यम स्थान, या गोष्टी त्यांना अधिक प्रकर्षाने जाणवू लागल्या. नीलमताईंनी अगदी कोवळ्या वयात म्हणजे १०-११ वर्षांच्या असताना मुंबईतील एका वस्तीत एका नवऱ्याने आपल्या बायकोला केलेली अमानुष मारहाण पाहिली होती. त्या अबोध वयात त्यांच्या मनावर उठलेला चरा आता एखाद्या जखमेसारखा भळभळत होता. युक्रांदचे काम काही कारणांनी थांबले होते. स्वतंत्र बाण्याच्या आणि धडाडीच्या नीलमताईंनी परिसरातल्या समविचारी महिलांना हळूहळू एकत्र केले आणि ८ मार्च १९८१ या दिवशी क्रांतिकारी महिला संघटनेची स्थापना केली.

इथून पुढचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. पुण्याच्या मध्य भागातल्या स्त्रिया शिकत होत्या. थोड्याफार स्वतंत्र होत्या. पण पुण्याच्या आजूबाजूचा भाग अजूनही स्त्रियांच्या बाबतीत पारंपरिक मानसिकता जोपासणारा होता. स्त्रियांना घरात नवऱ्याने, सासूने केलेल्या छळाला तोंड द्यावे लागत होते. शिक्षण, चांगले अन्न, आरोग्य सुविधा या गोष्टी तर दूरच. या शिवाय लैंगिक अत्याचार, कुटुंबात मारहाण, चारित्र्याचा संशय या गोष्टी होत्याच. जिथे बाईला माणूस म्हणून काडीचीही किंमत नव्हती, तिथे त्यांना संघटनेच्या सभांसाठी एकत्र करायचे हेदेखील मोठे आव्हान होते. नीलमताईंच्या शांत, संयत पण खंबीर नेतृत्वाने हे साध्य केले. कोणताही आत्मविश्‍वास नसलेल्या, लाचारीचे जीवन जगणाऱ्या या स्त्रियांच्या मनात आत्मविश्‍वास जागृत करण्याचे, घरच्यांचा विरोध मोडून संघटनेच्या सभांना येण्याचे धाडस निर्माण करण्याचे काम नीलमताईंच्या शांत, आश्‍वासक भाषणांनी केले. प्रत्येक स्त्रीशी त्यांचा सुसंवाद असे. यातूनच महिला कार्यकर्त्यांची एक मोठी फळी तयार झाली. शेलार गुरुजींसारखे पुरुष कार्यकर्ते आपणहून या कामात सहभागी झाले. ३ जानेवारी १९८४ रोजी क्रांतिकारी महिला संघटनेचे भावंडे स्त्री आधार केंद्र जन्माला आले. पीडित महिलांना सुविधा मिळवून देणे, त्यांना मानसिक आधार देणे, त्यांचे पुनर्वसन करणे ही कामे या संस्थेच्या माध्यमातून होऊ लागली.

अंजली कुलकर्णी यांनी अतिशय सहज, सोप्या आणि ओघवत्या भाषेत नीलमताईंच्या कार्याचा वेध या पुस्तकातून घेतला आहे. नीलमताईंची जडणघडण, त्यांच्यावरचे संस्कार, त्यांचा कार्यकर्तीचा मूळ पिंड आणि त्यातून एका संवेदनशील, धडाडीच्या नेतृत्वाकडे झालेला त्यांचा प्रवास लेखिकेने या पुस्तकातून उलगडला आहे. लेखिका स्वतः काही काळ युक्रांदचे कार्य करीत असल्याने त्यांनी नीलमताईंच्या कामाचा झपाटा, त्यांची महिलांविषयी तळमळ, कार्यपद्धती जवळून पाहिली आहे. नीलमताईंचा एक डॉक्‍टर म्हणून त्यांच्या दवाखान्यातला वावर असो किंवा क्रांतिकारी महिला संघटनेच्या माध्यमातून समाजसेवेचे त्यांचे काम असो, त्यांच्या या दोन्ही भूमिका अंजली कुलकर्णी यांनी वेळोवेळी जवळून पाहिल्या आहेत, त्यामुळे नीलमताईंच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू त्यांनी आपल्या लिखाणातून उलगडले आहेत. नीलमताईंनी या संघटनांच्या माध्यमातून सोडवलेल्या विविध केसेसचा समर्पक आढावा त्यांनी या पुस्तकातून घेतला आहे. कधी जनता दरबारसारखी अभिनव संकल्पना असो, कधी सामोपचाराने मिटवलेला प्रश्‍न असो, तर कधी चक्क महिला-पुरुष कार्यकर्त्यांनी एकत्र येत अन्याय करणाऱ्याला शिकवलेला धडा असो, या साऱ्याचे वास्तव चित्रण लेखिकेने या पुस्तकातून केले आहे. या केसेस सोडवताना नीलमताईंना एक स्त्री म्हणून, एक माणूस म्हणून येणारी अस्वस्थतादेखील अंजली कुलकर्णी यांनी वास्तवदर्शी शब्दांतून रेखाटली आहे.

महाराष्ट्रातले ६० च्या दशकातले सामाजिक वातावरण, त्या आधीच्या काळात समाजधुरिणांनी स्त्रियांच्या प्रगतीसाठी केलेले प्रयत्न, ताराबाई शिंदे यांनी स्त्री-पुरुष तुलना या छोट्याशा पुस्तिकेतून पुरुषप्रधान संस्कृतीवर ओढलेले ताशेरे, जागतिक पातळीवर सुरू झालेला स्त्रीमुक्तीचा लढा, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून घोषित होणे यांसारख्या महत्त्वाच्या घटना लेखिकेने या पुस्तकातून अधोरेखित केल्या आहेत.
नीलमताईंच्या या साऱ्या प्रवासातला महत्त्वाचा टप्पा ठरणाऱ्या दोन गोष्टी म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या महिला धोरण निर्मितीत त्यांचा असलेला सिंहाचा वाटा आणि बीजिंग येथील चौथ्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेमधील त्यांचा सन्माननीय सहभाग, यावर दोन स्वतंत्र प्रकरणे पुस्तकात आहेत. नीलमताईंच्या सामाजिक कर्तृत्वाची संघर्षगाथा अंजली कुलकर्णी यांनी अतिशय प्रभावीपणे मांडली आहे.

विश्‍वकर्मा पब्लिकेशन्स या प्रकाशन संस्थेने उत्तम निर्मितीमूल्ये असलेले हे पुस्तक वाचकांच्या हाती दिले आहे. नीलमताईंचे छायाचित्र असलेले समर्पक मुखपृष्ठ, त्यांचे प्रकट चिंतन तसेच यांच्या राजकीय कारकिर्दीचा आढावा घेणारे परिशिष्ठ यामुळे या पुस्तकाला परिपूर्णता आली आहे. साधारणतः १९७० पासून आजपर्यंतच्या काळातल्या सामाजिक स्थित्यंतराचा पट उलगडत नीलम गोऱ्हे यांच्यासारख्या एका महत्त्वाच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रातल्या व्यक्तिमत्त्वाच्या कार्याचा परिचय करून देणारे एक महत्त्वाचे पुस्तक असेच ‘अपराजिता’ या पुस्तकाबद्दल म्हणावे लागेल.

संबंधित बातम्या