मराठीचा बाज राखणारे भाषांतर   

नम्रता आचार्य-ठेमस्कर
सोमवार, 13 जुलै 2020

बुकशेल्फ

‘प्रकाश बाळ जोशी यांच्या कथा’ या राज्य पुरस्कार प्राप्त मराठी  कथासंग्रहाचे  इंग्रजीत भाषांतर केलेले ‘मिरर इन द हॉल’ (Mirror in the Hall) हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. मराठी कथासंग्रहामध्ये एकूण २९ कथा असल्या, तरी या  इंग्रजी पुस्तकात एकूण १५ कथा वापरण्यात आल्या आहेत. या कथांबरोबर प्रकाश बाळ जोशी यांनी काढलेली कलात्मक रेखाचित्रेसुद्धा आहेत. ही रेखाचित्रे हे या पुस्तकाचे एक आकर्षण.  तसे पाहिले तर मानवी संवेदनशीलतेचा शोध घेणाऱ्या या प्रायोगिक कथा; सुरुवात, मध्य आणि शेवट असा नेहमीचा फॉर्म्युला वापरून लिहिलेल्या नाहीत. प्रकाश बाळ जोशी हे अमूर्त शैलीत काम करणारे एक ज्येष्ठ चित्रकार असून त्यांच्या कथाही काहीशा प्रवाही मार्गाने जाणाऱ्या प्रायोगिक पद्धतीने साकारलेल्या आहेत. म्हणूनच त्याचे  भाषांतर करणे हे एक आव्हानच आहे. 

‘डिसेक्शन’ ही कथा घेऊया.  या कथेत बेडकावर चालणारे प्रयोग असले, तरी  हॉस्टेलचे आयुष्य जगताना एखाद्या विद्यार्थ्याला कशा गैरसोयी वाट्याला येतात आणि डिसेक्शन करून घेणाऱ्या बाईंचे दुःख  वेगळ्या प्रकाराचे असले, तरीही ही  कथा दोन समांतर प्रवाहाला घेऊन पुढे सरकते. त्यातले काही परिच्छेद तर फक्त शब्दांचे पुंजकेच आहेत, तेथे कुठली वाक्यरचनाच  नाही. ही  कथा इंग्रजीत वाचताना या कथेतील बाज कायम ठेवून भाषांतर केल्याचे जाणवते. काही ठिकाणी मूळ कथेतील काही संदर्भ, विशेषनाम कायम ठेवून कथा पुढे जाते, पण कुठेही खटकत नाही. 

‘हातात हात’ या कथेत हातात हात म्हातारीचा असतो, पण त्याला कायम आपल्या प्रेयसीची  आठवण येते. या नादात ऑफिसला सुटी मारून तिला भेटण्याचा  कार्यक्रम ठरविणारा नायक कसा फसतो, याचे चित्रण छान केले आहे. त्यात ऑफिसला पोचायला होणारा उशीर आणि बॉसच्या अपेक्षित प्रतिक्रिया याचे वर्णन समर्पक आहे. पुणे शहरात घडणारी ही कथा आणि तिथले स्थळ-काळ वर्णन मराठी कथेत आहे तसे इंग्रजी कथेत भाषांतर करताना ठेवले आहे. 

काही कथा अतिशय छोट्या आहेत. त्यातल्याच ‘आरसा’ या कथेत आईचे स्वच्छ कपाळ कसे दिसेल? ते बघून आरसा भेगाळला होता, असे मार्मिक वर्णन करून आईच्या कुंकवाला महत्त्व दिले आहे. ‘वडील आणि मुलाखत’ ही कथा जरी फार पूर्वी लिहिलेली असली, तरी त्यातील कथानक वर्तमान काळातही तितकेच  समर्पक वाटते. मोठ्या हुद्द्यावर बाप पोचला म्हणून पत्रकार मुलाची मुलाखत घेतो, पण प्रत्यक्षात जन्म दिलेल्या बापाबद्दल मुलाला काहीच ठाऊक नसते. त्यात तो कसा अडखळतो, थातुरमातूर बोलतो याचे वर्णन लेखकाने इतके मार्मिक केले आहे की ही कथा एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोचते. यात त्यांच्यातील पत्रकार दिसून येतो. पत्रकार म्हणून अनेकांच्या मुलाखती घेताना त्यांनी मानवी स्वभावाच्या ज्या हालचाली टिपल्या त्याचे अचूक वर्णन या कथेत केले आहे, शेवटी वडिलांबद्दल काहीच माहीत नसलेल्या मुलाला वडिलांबरोबर कधीच वेळ घालवायला मिळाला नाही हे त्याचे दुःख समोर येते. त्यामुळे ‘वडील आणि मुलाखत’ ही या संग्रहातील एक उत्तम कथा आहे असे जाणवते.

या कथासंग्रहातील ‘रातराणी’ या कथेत मूल न होऊ शकणाऱ्या स्त्रीचे  दुःख आहे.  त्यातून बाहेर निघण्यासाठी तिने चित्रकलेचा आधार घेतला आहे.  पण तिच्या नवऱ्याला चित्रकलेत रस नाही. या कथेत चित्रकलेसाठी वापरलेल्या साहित्याचे अचूक वर्णन केले आहे. त्यामुळे ही कथा वाचताना लेखक एक उत्कृष्ट चित्रकारदेखील आहे हे लक्षात येते. चित्रांतून मानवी संवेदना कशा प्रकट होतात हे या कथेत उत्तमपणे मांडले आहे.

एकंदर या सर्व कथा मानवी जीवनाचा अचूक वेध घेणाऱ्या  आहेत, या कथा सामान्य माणसाच्या आहेत. या सर्व कथेतील पार्श्वभूमी खूप साधी मध्यमवर्गीय आहे. त्यामुळे त्या वाचताना मराठी संस्कृतीशी परिचित नसलेला वाचकसुद्धा या कथांशी समरस होऊ शकतो. 

दिल्ली येथील  रत्ना बुक्स यांनी प्रकाशित केलेला हा कथासंग्रह स्मिता करंदीकर यांनी भाषांतरित केलेला असून हे त्यांचे पहिलेच भाषांतराचे काम आहे.

Mirror in the Hall and other stories
लेखक : प्रकाश बाळ जोशी
इंग्रजी अनुवाद : स्मिता करंदीकर
प्रकाशन : रत्ना बुक्स, दिल्ली
किंमत : ३९९ रुपये  पाने : २१४

संबंधित बातम्या