स्त्री-समस्यांवर समुपदेशन

नयना निर्गुण
गुरुवार, 22 फेब्रुवारी 2018

पुस्तक परिचय

तुमच्या आमच्या लेकी
लेखिका ः
डॉ. लिली जोशी
प्रकाशन ः रोहन प्रकाशन, पुणे
किंमत ः १८०,  पाने ः १४८

आज स्त्री सर्व क्षेत्रांत पुरुषांच्या बरोबरीने वावरत असली, तरी स्त्री म्हणून तिचे वेगळेपण आहेच. तिच्या समस्या, तिचे मानसिक ताण वेगळे आहेत, जे एका स्त्रीलाच समजू शकतात. अनेकदा हे मानसिक ताण तिच्या आरोग्यावर परिणाम करतात. पेशंट म्हणून आलेल्या मुलीला किंवा स्त्रीला शारीरिक उपचारांपेक्षा मानसिक उपचारांची, समूपदेशनाची गरज असते. त्यांच्याशी संवाद साधत त्यांचा विश्वास संपादन केला, तर त्या मनमोकळेपणाने बोलतात आणि त्यांच्यावरील ताण, दडपण हेच त्यांच्या आजाराचे मूळ असल्याचे लक्षात येते. 

आरोग्य समस्या घेऊन येणाऱ्या स्त्रियांशी, मुलींशी संवाद साधत, त्यांच्या समस्यांचे मूळ डॉ. लिली जोशी यांनी नेमके हेरले आणि वैद्यकीय उपचारांबरोबरच त्यांचे समुपदेशनही केले. शरीराबरोबरच मनानेही त्यांना तंदुरुस्त केले.

अशाच काही पेशंटचे अनुभव डॉ. जोशी यांनी ‘तुमच्या आमच्या लेकी’ या पुस्तकात शब्दबद्ध केल्या आहेत. वैद्यकीय उपचारांबरोबरच मनमोकळ्या संवादातून समुपदेशन ही लेखिकेच्या उपचाराची पद्धत दिसते. त्यामुळेच स्त्रिया, मुली त्यांच्याशी आपल्या खासगी प्रश्नांचीही मोकळेपणाने चर्चा करतात. या चर्चेतून कधी कधी त्यांची त्यांनाही उत्तरे मिळतात.

स्त्रीत्व... बाईपण
आपण हे साहस स्वीकारलं ना
तेव्हा कल्पनाही नव्हती केली
यात केवढा आनंद आहे... केव्हढं दुःख
वाटलंही नव्हतं तेव्हा
किती गरज लागते, आपल्याला एकमेकींची
म्हणून सांगते...
बहिणींना विसरू नकोस

एका अनाम कवयित्रीच्या या अत्यंत बोलक्‍या, समर्पक कवितेने लेखिकेने आपल्या अनुभव लेखनाला सुरवात केली आहे. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर, वेगवेगळ्या नात्यांनी भेटणाऱ्या स्त्रियाच आपले जीवन समृद्ध करत असतात, त्यामुळे त्यांना विसरू नकोस, हे या कवितेतून एका आईने आपल्या नवविवाहित मुलीला सांगितले आहे. पुढे लेखिका ज्या पद्धतीने आपल्या पेशंटचे प्रश्न सोडविते, त्यातून याचाच प्रत्यय येत राहतो.

आज मुली मुलांप्रमाणेच जगतात, कोणत्याही बाबतीत आपण कमी पडू नये, यासाठी जिवाचा आटापिटा करतात. स्वतःच्या क्षमता गृहीत धरून झेप घेतात आणि पडल्या तर शक्‍यतो कोणाचाही आधार न घेता, स्वाभिमानाने पुन्हा उभे राहण्याचा प्रयत्न करतात. कितीही आव आणला तरी या साऱ्याचा ताण त्यांच्या मनावर येतो आणि मग शरीराच्या तक्रारीही सुरू होतात. लेखिकेने पेशंटचा मानसिक ताण समजून घेऊन, त्यांचा कुठेही स्वाभिमान न दुखावता त्यांना उभारी दिलेली दिसते.

शिक्षण, नोकरीसाठी आज अनेक मुली घरापासून दूर दुसऱ्या गावात होस्टेलवर किंवा पेइंग गेस्ट म्हणून राहतात. अनोळखी शहरात एकट्याने राहात असताना अनेक समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागते. रोडरोमिओंची मनात दहशत असते. मित्रमैत्रिणींच्या संगतीने, मनावरचा ताण कमी करण्यासाठी म्हणून काही व्यसनांनाही त्या बळी पडतात. फॅशनेबल राहण्याच्या अट्टहासापोटी कोणी मुली शरीराला होणारे अपायही विचारात घेत नाहीत, तर कोणी सौंदर्यवती होण्याच्या ध्येयापोटी स्वतःच्या शरीराचे हाल करून घेतात. उच्चविद्याविभूषित होण्यासाठी वाट्टेल ती किंमत चुकणारीही एखादी युवती असते. या प्रत्येकाचे समुपदेशन करताना लेखिकेने त्यांचा प्रश्न मुळापासून समजून घेतलेला दिसतो. त्यांची इच्छा, महत्त्वाकांक्षा यांच्या आड न येता त्यांच्यावर उपचार केलेले दिसतात.

काही आईवडील आपल्या मुलीची इतकी काळजी घेतात की, ऐन बहरण्याच्या वयात ती कोमेजून जाते, आपल्या आशाआकांक्षांना तिला तिलांजली द्यावी लागते, तर काही आईवडील आपलीच महत्त्वाकांक्षा मुलीवर लादताना तिच्या मनाचा अजिबात विचार करत नाहीत. अशा वेळी लेखिकेने त्या मुलीबरोबरच तिच्या आईवडिलांची मानसिकताही समजून घेतली आहे. 

स्त्रीच्या आयुष्याचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे विवाह. जीवनाच्या जोडीदाराविषयी प्रत्येकीची काही स्वप्नं, काही अपेक्षा असतात. त्यानुसार जीवनसाथी शोधताना काहींची फसवणूक होते, काही जणी जोडीदाराकडून फिल्मी पद्धतीने अपेक्षा ठेवतात, त्यातून वेगळाच गुंता निर्माण होतो. ब्रेकअपनंतर सहानुभूतीच्या नावाखाली एखादीची फसगत होते. करिअर की लग्न, अशा द्वंद्वात एखादी सापडते, विवाहानंतर अचानक वेगळे वागावे लागल्याने मनावर ताण येतो, अशा प्रसंगांना सामोरे जावे लागलेल्या मुलींचे प्रश्नही लेखिकेने हाताळले आहेत.

घरातील एकुलती एक कमावती मुलगी घरातून जाऊच नये यासाठी प्रयत्न होतो, तर आपल्या मुलीने चारचौघांत चांगले दिसावे म्हणूनही मुद्दाम काही गोष्टी केल्या जातात. त्यातून मुलीच्या मनात न्यूनगंड निर्माण होतो. लहानपणापासून पुरुषांविषयी वाईटच गोष्टी मनावर बिंबविल्याने मुलीच्या मनात त्यांच्याबद्दल सतत भीती असते, तर आईवडिलांचा घटस्फोट, आईचे मित्राबरोबरचेही संबंध तुटणे, यातून बाबा कुणा म्हणू, अशी स्थितीही एखादीची होते. कोणी संसार सावरण्यासाठी घरापासून दूर राहण्यास तयार होते, तर कोणी सतत सासरच्यांच्या दडपणाखाली असते. 

मुलांचे संगोपन हा विषयही लेखिकेने वेगवेगळ्या दृष्टिकोनातून हाताळला आहे. त्यातही विशेष मुलाचे आईपण, तसेच एकेरी पालकत्व निभावताना स्त्रीला तारेवरची कसरतच करावी लागते. धकाधकीच्या आयुष्यात सर्व पातळ्यांवर यशस्वी होताना एखादीला वैवाहिक सुखाचा आनंद घेता येत नाही, तर एखादी संसार न मोडता त्या सुखाचा शोध घेण्याचा प्रयत्न करते. नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध माहीत असूनही मुलांसाठी लग्न टिकविण्यासाठीची धडपड करणारी कोणी असते तर स्त्रीभ्रुण हत्या रोखण्यासाठी स्वतःला ‘गिनिपीग’ करून घेणारीही एखादी असते.

अशा एक ना अनेक... साऱ्या जणी आपल्या अवतीभवतीच वावरणाऱ्या... सारे प्रश्न कोणाच्या ना कोणाच्या बाबतीत आपणही ऐकलेले आणि वरकरणी खूपच गंभीर वाटणारे... लेखिकेने सहज सुंदर शैलीत अनुभव कथन करून या साऱ्यांची उत्तरे दिली आहेत. 

संबंधित बातम्या