प्रेरणादायी बानूबाई

नयना निर्गुण
गुरुवार, 26 एप्रिल 2018

पुस्तक परिचय

डॉ. बानू कोयाजी... वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रात प्रचंड दबदबा असलेले नाव ! पद्मभूषण, रॅमन मॅगसेसे यासह अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केलेले आणि त्याहीपेक्षा अनेक खेड्यापाड्यांमध्ये डॉक्‍टर म्हणून सर्वसामान्यांच्या हृदयात अढळ पद मिळविलेले व्यक्तिमत्त्व. ‘मूर्ती लहान पण कीर्ती महान’ या उक्तीचा शब्दशः प्रत्यय ज्यांच्याबाबतीत येतो, अशा डॉ. बानूबाई यांची जडणघडण आणि कार्यकर्तृत्वाचा परिचय त्यांच्याच बरोबर काही काळ काम केलेल्या, त्यांचा प्रत्यक्ष सहवास अनुभवलेल्या, डॉ. प्रतिभा कुलकर्णी यांनी ‘बानूबाई’ या पुस्तकात करून दिला आहे.

बानूबाई केवळ डॉक्‍टर, स्त्रीरोगतज्ज्ञ नव्हत्या, तर त्या उत्तम व्यवस्थापक होत्या, समोरच्या व्यक्तींमधील गुणवत्ता ओळखून त्याचा पुरेपूर वापर करण्याचे कसब त्यांच्यात होते. पुण्यातील केईएम रुग्णालयाचा विस्तार करत असताना त्यांनी ज्या ज्या व्यक्तींवर जबाबदारी टाकली, त्यांनी त्या संधीचे सोने केले. म्हणूनच पूर्वी भट्टी दवाखाना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केईएम या चाळीस खाटांच्या मॅटर्निटी होमचे मोठ्या जनरल हॉस्पिटलमध्ये रूपांतर झाले. बानूबाईंचे द्रष्टेपण, व्यवस्थापन कौशल्य, नेतृत्वगुण, कामाचा ध्यास आणि समाजाविषयीचा कळवळा यामुळेच वैद्यकीय क्षेत्रात अनेक गोष्टी प्रथम करण्याचा मान केईएम रुग्णालयाला मिळाला. या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा संप हाताळण्यापासून, सरकारी मदत बंद झाल्यानंतरही गरीब रुग्णांना सवलतीच्या दरातच सेवा मिळावी, यासाठी देणग्यांच्या माध्यमातून निधी उभारण्यापर्यंत साऱ्या प्रसंगांत बानूबाईंचे व्यवस्थापन कौशल्य आणि नेतृत्व गुण दिसून येतो. सन १९४४ मध्ये बानूबाई केईएममध्ये दाखल झाल्या. १९९९ मध्ये त्या जेव्हा निवृत्त झाल्या, तेव्हा केईएम हे ५५० खाटांचे मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल होते.

केईएम हे त्यांचे पहिले मूल होते, असे म्हणत, इतके त्यांचे या रुग्णालयाविषयी ममत्व होते. हॉस्पिटलमध्ये ‘राउंड’ घेताना त्या केवळ स्वतःच्याच नाही तर सर्व पेशंटची भेट घ्यायच्या, तेही तिन्ही मजल्यांचे जिने चढून जात... कारण त्यांचा ‘राउंड’ हा केवळ रुग्णतपासणीसाठी नसे तर हॉस्पिटलमधील स्वच्छता, व्यवस्थितपणे, तसेच इतर बारीकसारीक गोष्टींकडेही त्यांचे लक्ष असे. 

केईएममध्ये पुण्याच्या आजूबाजूच्या खेड्यांतून रुग्ण येत. वाहतूक सुविधांअभावी येईपर्यंतच त्यांची विशेषतः प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांची परिस्थिती गंभीर असे. हे पाहून ‘केईएम’ची सेवाच खेड्यापाड्यांत नेण्याचा विचार बानूबाईंनी केला आणि ग्रामीण आरोग्य योजनेचा जन्म झाला. त्यासाठी वढू परिसराची निवड केली. केईएममध्ये प्रशिक्षण देऊन प्रत्येक गावात ग्रामीण आरोग्य मार्गदर्शक नेमले. त्यांच्या माध्यमातून खेडोपाडी आरोग्यविषयक जनजागृती केली. ग्रामीण भागातील स्त्रियांना त्यांची स्वतःची ओळख करून देऊन नवीन गोष्टी शिकवणे, त्यांच्या आरोग्याची काळजी आणि मुलींना स्वावलंबी बनविणे, या तीन गोष्टींवर बानूबाईंचा भर होता. आरोग्य, स्वच्छता याविषयी त्या महिला, मुलींशी चर्चा करत, त्याचबरोबर मुलींना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन पायावर उभे करण्याचाही प्रयत्न त्यांनी या योजनेच्या माध्यमातून केला. त्यासाठी कन्या मंडळांची स्थापना केली. वढू, केंदूर, पाबळ या परिसरातील ग्रामस्थ, महिला, मुलींशी त्या इतक्‍या समरस झाल्या होत्या की, तेथे प्रत्येक जण त्यांचे नाव आदराने, आपुलकीने घेई. इतके की तेथील एकाने आपल्या मुलाचे नाव बानूकोयाजी विठ्ठल गायकवाड ठेवले.  

बानूबाईंच्या जडणघडणीत लहानपणी त्यांच्या आईवडिलांबरोबरच मोठा वाटा होता त्यांच्या आजीचा. त्यांची आजी कडक शिस्तीची होती. पहाटे पाचला उठण्याचा तसेच घरात नोकर असले तरी स्वतःचे काम स्वतः करण्याचा त्यांचा दंडक होता. नीटनेटके राहण्याची शिस्तही आजीचीच. आजीप्रमाणेच बानूबाईंच्या जडणघडणीवर, कामावर आणि एकूणच आयुष्यावर आणखी एका व्यक्तीचा फार मोठा प्रभाव होता. ते म्हणजे त्यांचे गुरू आणि नात्याने दीर असलेले डॉ. एदलजी कोयाजी. त्यांच्याच सल्ल्याने त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतले, गायनाकॉलॉजी विषयात पदव्युत्तर पदवी घेतली आणि त्यांच्याच सूचनेनुसार त्यांनी ‘केईएम’मध्ये काम करायला सुरवात केली. एदलजींची कामाची पद्धत, रुग्ण हा माणूस हा विचार, त्यांचे निदान कौशल्य, ज्ञान, निरलस सेवा, निरिच्छ, साधे वागणे या साऱ्यांचा बानूबाईंच्या व्यक्तिमत्त्वावर मोठा प्रभाव होता.

कल्पना मांडणे, त्याचा पाठपुरावा करणे आणि ती प्रत्यक्षात आणण्यासाठी योग्य त्या माणसाच्या हाती देणे, हे बानूबाईंचे वैशिष्ट्य होते. त्यांच्या याच वैशिष्ट्यामुळे ‘केईएम’ची भरभराट झाली, ग्रामीण भागात आरोग्यसेवा रुजली, त्याचबरोबर ‘सकाळ’चे संस्थापक- संपादक डॉ. नानासाहेब परुळेकर यांच्या निधनानंतर ‘सकाळ’ पुन्हा ताकदीने उभा राहिला. डॉ. परुळेकर ‘केईएम’च्या संचालक मंडळात होते. सहा आठवड्यांकरिता त्यांना परदेशात जायचे होते. त्या काळात ‘सकाळ’ची जबाबदारी सांभाळण्याचे बानूबाईंनी कबूल केले. या सहा आठवड्यांत त्यांनी वृत्तपत्राची कार्यपद्धती जाणून घेतली, त्या त्यामध्ये इतक्‍या गुंतल्या की पुढे सुमारे चाळीस वर्षे त्या ‘सकाळ’शी जोडलेल्या राहिल्या. परुळेकर यांच्या निधनानंतर सुमारे बारा वर्षे त्यांनी अन्य संचालकांच्या मदतीने ‘सकाळ’ सांभाळला. तेथील व्यवस्थापनापासून कर्मचाऱ्यांपर्यंत साऱ्यांशी त्या आपुलकीच्या नात्याने जोडल्या गेल्या. या काळात अनेक संघर्षांना, खटल्यांनाही त्यांना सामोरे जावे लागले. ‘सकाळ’ पवार कुटुंबीयांकडे आल्यानंतर इतर सर्व संचालकांनी राजीनामे दिले. पण नानासाहेबांवरची निष्ठा आणि ‘सकाळ’वरील प्रेमापोटी बानूबाई मात्र ‘सकाळ’शी जोडलेल्याच राहिल्या.

बानूबाईंबरोबर काम केलेले वैद्यकीय, सामाजिक आणि वृत्तपत्र क्षेत्रांतील दिग्गज तसेच कर्मचारी, कार्यकर्ते, बानूबाईंचे कुटुंबीय, त्यांचे विद्यार्थी, स्नेही, ड्रायव्हर, परिचारिका अशा विविध स्तरांतील व्यक्तींनी सांगितलेल्या आठवणींमधून बानूबाईंचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व उलगडत गेले आहे. छोट्या, छोट्या प्रसंगातून त्यांच्या स्वभावाचे, विचारांचे आणि गुणांचे दर्शन घडले आहे. यशाच्या उत्तुंग शिखरावर असतानाही जमिनीवर पाय घट्ट रोवून असणाऱ्या आणि उच्चभ्रू समाजात सहज वावरत असतानाही तळागाळातल्या जनतेचा कायम विचार करत त्यांच्यासाठी धडपडणाऱ्या  बानूबाईंसारख्या व्यक्ती विरळाच...! त्यांचे हे चरित्र वैद्यकीय, व्यवस्थापन आणि सामाजिक क्षेत्रात काम करू पाहणाऱ्यांसाठी निश्‍चितच प्रेरणादायी ठरेल.

संबंधित बातम्या