कर्तृत्ववान मातृत्वाचा प्रवास

नयना निर्गुण
सोमवार, 13 मे 2019

पुस्तक परिचय
 

मातृत्व ही स्त्रीला मिळालेली देणगी. मात्र नवनिर्मितीचा आनंद उपभोगत असताना अनेक दिव्यांनाही तिला सामोरं जावं लागतं. आई होणं हा स्त्रीचा पुनर्जन्म मानला जातो, तो केवळ प्रसूतीवेळी सहन कराव्या लागणाऱ्या वेदनांमुळे नव्हे, तर खरोखरच तिचं आयुष्य त्यानंतर पूर्णपणे बदलून जातं. त्याची सुरुवात बाळाची चाहूल लागल्यापासूनच होते. नव्या जबाबदारीची जाणीव तिला रोजच्या आयुष्याकडं गंभीरपणे पाहण्यास भाग पाडते. दैनंदिन जीवनातील प्राधान्यक्रम बदलतात आणि आई झाल्यावर, तर विशेषतः करिअरिस्टिक स्त्रियांना मुलाचं संगोपन, संसार आणि करिअर अशी तिहेरी कसरत करावी लागते. अनेक जणी ही सारी आव्हानं पेलत आपल्या करिअरचा आलेख चढताच ठेवण्यात यशस्वी होतात. अशाच काही मातांनी आपल्या मातृत्वाविषयी, मुलांच्या संगोपनाविषयी अनुभव सांगितले आहेत ‘सुपर मॉम’ या पुस्तकात.

विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविलेल्या १७ मातांनी आपल्या मातृत्वाला या पुस्तकात उजाळा दिला आहे. प्रत्येकीनं मातृत्व आनंदानं, तितक्‍याच जबाबदारीनं स्वीकारलं. मूल झाल्यानंतर काही काळ काम बाजूला ठेवत संगोपनाला प्राधान्य दिलं. मूल केवळ आईवडिलांचं नसतं, तर संपूर्ण कुटुंबाचं असतं. मुलांवर चांगले संस्कार होण्यासाठी कुटुंबातील वडीलधारी मंडळी आणि त्याचबरोबर भावंडांचाही सहवास आवश्‍यक असतो. या सर्वांनी आपलं मूल आजी-आजोबा, भावंडांबरोबर वाढेल, याची काळजी घेतली आहे. आपण ज्या समाजात वावरतो, त्याचाही प्रभाव मुलांवर पडत असतो. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. राणी बंग म्हणतात, मुलं ही समाजाचा ठेवा असतात, त्यांना जबाबदार आणि आदर्श नागरिक घडविणं ही मातृत्वाची जबाबदारी असते. 

मुलांना दैनंदिन नियोजनात सहभागी करून घेतलं, की फारशा तडजोडी कराव्या लागत नाहीत, असं प्रत्येकीचंच मत. आईच्या कामाची माहिती असल्यानं मुलांना त्या क्षेत्रातील अडचणी, आव्हानांची जाणीव लवकर होते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या डॉ. शैला दाभोलकर, पर्यटन क्षेत्रात नावाजलेल्या वीणा पाटील या गोष्टीशी सहमत आहेत. मुलांना बाहेरच्या जगात जाऊ द्यावं. आपण फक्त बोट धरून त्यांच्या मागं जावं, असं दाभोलकर यांचं म्हणणं. 

शास्त्रज्ञ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सुरेखा देवी संशोधक कार्यामुळं मुलीपासून बराच काळ लांब राहिल्या, पण त्यांच्या कामाची माहिती असल्यानं मुलीनंही ते समजून घेतलं. मुलांना जेव्हा आपली खरी गरज असते, तेव्हा कोणताही विचार न करता पुढं यायला पाहिजे, ही आपल्या आईची शिकवण डॉ. देवी यांनी अवलंबिली. मुलांना प्रेमाची, वेळ देणाऱ्या पालकांची गरज असते. हा वेळ देणं शक्‍य नसेल, तर तशी माणसं आजूबाजूला हवीत, असं ज्येष्ठ आयपीएस अधिकारी किरण बेदी सांगतात. मुलांवर चांगले संस्कार होण्यासाठी घरातील प्रेमाची माणसंच गरजेची असतात, असं प्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांचं मत. त्यामुळं सासू-सासऱ्यांबरोबर राहा, असा सल्ला त्या आपल्या शिष्यांनाही देतात. 

माधुरी दीक्षित, ऐश्वर्या राय, काजोल या बॉलिवूडच्या अभिनेत्री. प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाच त्या आई झाल्या. पण तिघींनीही मातृत्व सहजपणे स्वीकारलं. अभिनय क्षेत्रात एकदा ब्रेक घेतल्यानंतर पुनरागमन फारसं यशस्वी होत नाही, असा खरंतर अनुभव. पण तिघींनीही मुलांच्या संगोपनाला प्राधान्य दिलं आणि काही काळानंतर पुन्हा रुपेरी पडद्यावर यशस्वीपणे झळकल्या. सुरुवातीला त्या मुलांना बरोबर घेऊन गेल्या. त्यातून मुलांना त्यांच्या क्षेत्रातील, त्यातील अनियमितपणाची जाणीव झाली. त्यामुळे मुलांकडून त्यांना सहकार्य मिळालं. मुलांना विश्वासात घेऊन आपल्या कामाबद्दल माहिती दिली, तर तीही समंजसपणे वागतात, असा अनुभव प्रत्येकीनं सांगितला आहे. प्रसिद्ध नृत्यांगना झेलम परांजपे या तर रांगत्या मुलाला कडेवर घेऊनच नृत्याचा सराव करायच्या. निवृत्त सनदी अधिकारी नीला सत्यनारायण दौऱ्यावर जाताना मुलीला घेऊन जायच्या. मुलीलाही त्यांच्या कामाची जाणीव झाली. त्यामुळंच विशेष असलेल्या धाकट्या भावाच्या संगोपनात तिनं आईला भक्कम आधार दिला.

मुलांना क्वालिटी टाइम द्यावा, पण तो आपल्या दृष्टीनं नाही, तर मुलांच्या दृष्टीनं असावा. त्यांना जेव्हा गरज आहे, तेव्हा वेळ दिला पाहिजे. यशदाच्या संचालिका मीनल नरवणे यांच्या दोन कन्यांपैकी एक आयएएस झाली. मुलींना लहानपणापासून वेगवेगळे अनुभव देऊन त्यांच्यात शिक्षणाची आस निर्माण केल्याचं त्यांनी आवर्जून नमूद केलं आहे.

कुटुंबात मोकळा संवाद हवा. घरात आजीआजोबा हवे. मुलांना ते हवे असतात, ते त्यांच्याशी जास्त मोकळेपणानं वागू शकतात. मुख्य म्हणजे त्यातून मुलांवर चांगले संस्कार होतात, हा या सुपर मॉमचा अनुभव. म्हणूनच स्वतः अनाथालयात वाढलेल्या प्रसिद्ध लेखिका इंदुमती जोंधळे यांना दोन मुलींचं आईपण निभावताना अनेक प्रसंगात प्रत्येक मुलीला आई किंवा आजी हवीच, असं वाटून गेलं. 

आपण मुलांचे दोस्त बनलो, तरच ते आपल्याला मार्गदर्शक बनवतात, हा काजोलचा अनुभव. मुलांशी मैत्रीचं नातं असेल, तर त्यांच्यापासून दूर असतानाही उलघाल होत नाही, कारण मनातून ती जोडलेलीच राहतात, असे आंतरराष्ट्रीय दर्जाची नेमबाज अंजली वेदपाठक भागवत म्हणते.

बालपणात मुलांवर होणाऱ्या संस्कारांचा त्यांच्या आयुष्यावर दीर्घकालीन परिणाम होतो. ही केवळ सहवासातून साध्य होणारी गोष्ट नाही, तर त्यासाठी संवाद महत्त्वाचा असतो. आज मुलगा परदेशात आहे, तरीही मनानं आम्ही सोबतच असतो, असं किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडच्या प्रतिमा किर्लोस्कर म्हणतात.

कवयित्री कल्पना दुधाळ यांची दोन मुलं हाच त्यांच्या कवितेचा श्वास आहे. कारण त्यांच्या कवितालेखनाची सुरुवातच मुलांसाठी बडबड गीते लिहून झाली. विशेष मुलीचं मातृत्व पेललेल्या स्नेहा गाडगीळ यांनी आईपण आव्हान म्हणून स्वीकारलं. गौरीला वाढविताना त्यांनी स्वतः त्या आजाराचा अभ्यास केला. सर्वसाधारण मुलीप्रमाणं तिला वाढवलं. गौरी आज आंतरराष्ट्रीय जलतरणपटू, नृत्यांगना आहे. तिच्यावर निघालेल्या, तिनं स्वतःच अभिनय केलेल्या चित्रपटासाठी तिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

जगण्याची शाळा करून टाकली, की अनेक गोष्टी शिकता येतात, हे आपण आईकडून शिकलो, असं ऐश्वर्य पाटेकर म्हणतात. पतीनं पाच मुलांचं पितृत्व नाकारल्यानंतर त्यांना मोलमजुरी करून वाढविणाऱ्या आईचं व्यक्तिचित्र त्यांनी रेखाटलं आहे.

ब्रेकनंतर पुन्हा काम सुरू केल्यावर आपलं मुलांकडे दुर्लक्ष होतं आहे, असं वाटणं स्वाभाविक आहे. पण त्यासाठी क्वालिटी टाइमचा बाऊ करू नये, असे या सुपर मॉमचे म्हणणे. आपली आई हीच प्रत्येकीसाठी मातृत्वाचा आदर्श आहे. कुटुंबानं कायम सोबत असणं त्यांना महत्त्वाचं वाटतं. त्यांच्या यशाचं गमक म्हणजे कुटुंबाची विशेषतः पतीची भक्कम साथ आणि पुन्हा भरारी घेण्याची जिद्द.

आणखी एका गोष्टीवर या साऱ्यांनी भर दिला आहे, तो म्हणजे स्त्रीचं आर्थिक स्वावलंबन. आई होण्याचा विचार करताना, मुलाचं चांगल्या पद्धतीनं संगोपन करण्याकरता स्त्रीनं आर्थिकदृष्ट्या सक्षम असलं पाहिजे. आज नोकरी, करिअरच्या मागं धावणाऱ्या तरुणींना, आई झाल्यानंतर आपलं करिअरच संपेल, अशी भीती वाटते. त्यातून आई न होण्याचा पर्यायही अनेक जणी स्वीकारतात. त्यांच्यासाठी या ‘सुपरमॉम’चा मातृत्वाचा प्रवास प्रेरणादायी आहे.   
 

संबंधित बातम्या