अंधार पिणाऱ्या माणसाची गोष्ट 

निरंजन मेढेकर
गुरुवार, 27 फेब्रुवारी 2020

पुस्तक परिचय
 

राज्यातल्या-देशातल्या कुठल्याही शहरी, निमशहरी भागात देशोधडीला लागलेले, रस्त्यांवर भटकणारे बेघर निराधार मनोरुग्ण आपल्या सगळ्यांच्याच पाहण्यात कधी ना कधी आलेले असतात. लज्जारक्षणापुरते अंगावर जेमतेम कपडे असलेले किंवा तेही नसलेले, केसांच्या जटा झालेले आणि स्वतःशीच बडबडणारे हे लोक कोण असतात, ते कुठे राहतात, काय खातात, कुठे झोपतात असे प्रश्न आपल्याला कधी पडतात का? ‘वेडे’ म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याशिवाय किंवा त्यांच्या अस्तित्वाची दखलही न घेता त्यांना ओलांडून पुढे जाण्याशिवाय स्वतःला सुजाण म्हणवून घेणारे आपण दुसरे काही करतो का? मानसोपचारतज्ज्ञ डॉ. भरत वटवानी आणि डॉ. स्मिता वटवानी या दांपत्याने मात्र न राहवून अशाच एका तरुण मनोरुग्णाला मदतीचा हात पुढे केला आणि ‘श्रद्धा रिहॅबिलिटेशन फाउंडेशन’च्या माध्यमातून १९८८ मध्ये निराधार भटक्या मनोरुग्णांसाठीच्या त्यांच्या कर्मयज्ञाला सुरुवात झाली. 

डॉ. भरत वटवानी लिखित आणि आनंद आगाशे अनुवादित मेनका प्रकाशनाचे ‘बेदखल’ हे नवीन पुस्तक डॉ. वटवानी पती-पत्नींनी गेल्या ३२ वर्षांत ‘श्रद्धा’च्या माध्यमातून मानसोपचारांद्वारे आपापल्या कुटुंबीयांशी त्यांचे पुनर्मिलन घडवून आणलेल्या हजारो बेघर मनोरुग्णांची यशोगाथा सांगते. तर दुसरीकडे आत्ता या क्षणीही मदतीच्या प्रतीक्षेत रस्तोरस्ती भटकणाऱ्या अन् कुणाच्याच खिजगणतीत नसलेल्या लक्षावधी मनोरुग्णांची व्यथा मांडते. त्यामुळेच हे पुस्तक वाचकाला कमालीचे अस्वस्थ करते, अंतर्मुख करते आणि त्याच वेळी मनोविकारांबाबत आपल्या समाजात अजूनही असलेल्या अपसमजांना-अंधश्रद्धांना वाचा फोडते. 

डॉ. वटवानी यांना २०१८ चा रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळालेला आहे. त्यांनी त्यांच्या अनुभवांवर आधारित प्रसंगांची मांडणी या पुस्तकात अतिशय वस्तुनिष्ठ पद्धतीने केली आहे. यामध्ये त्यांनी आजवर उपचार केलेल्या अनेक मनोरुग्णांचे अनुभव कथन केले आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यातून कोणत्याही मनोरुग्णाचा ‘श्रद्धा’च्या कर्जतमधील केंद्रात होणारा प्रवास, त्याच्यावर केले जाणारे उपचार आणि स्किझोफ्रेनिक रुग्ण बरा झाल्यावर तितकाच अवघड असा त्याच्या घरच्यांचा घेतला जाणारा शोध असा सगळा पट प्रभावी पद्धतीने उलगडण्यात आला आहे. मुंबईच्या प्रतिष्ठित जे जे स्कूल ऑफ आर्ट्समधल्या प्राध्यापकापासून ते अनेक पदवीधर-द्विपदवीधर तरुणांचा समावेश डॉ. वटवानी यांनी आजवर उपचार केलेल्या मनोरुग्णांमध्ये आहे. यातून स्किझोफ्रेनिया किंवा स्मृतीभ्रंशासारखा मानसिक आजार हा समाजातल्या कुठल्याही स्तरातील व्यक्तीला होऊ शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तो योग्य उपचारांनी बरा होऊ शकतो, हे लेखकाने अतिशय योग्य शब्दांत मांडले आहे. 

पुस्तकाचे सगळ्यात मोठे बलस्थान म्हणजे हे पुस्तक माहितीपर असले तरी ते रूक्ष झालेले नाही. पहिल्या चार प्रकरणांत डॉ. वटवानी यांचा स्वतःचा बालपणीचा संघर्ष, कमालीच्या बिकट परिस्थितीत त्यांनी पूर्ण केलेले वैद्यकीय शिक्षण याचे मोजकेच पण मुद्देसूद वर्णन आल्याने पुस्तकाला चरित्रात्मक मूल्यही प्राप्त होते. डॉ. वटवानी त्यांच्या पत्नीसह हॉटेलमध्ये बसले असताना रस्त्याकाठच्या गटारातले पाणी पिणाऱ्या एका तरुण मुलाला पाहून त्या मनोरुग्णाच्या मदतीसाठी त्यांचे धावून जाणे आणि त्याला उपचारांनी बरे करत आंध्रप्रदेशातल्या त्याच्या घरच्यांचा शोध घेत त्यांची पुनर्भेट घडवून आणण्याच्या प्रवासातून रुजलेले ‘श्रद्धा’चे बीज त्यापुढच्या प्रकरणात मांडण्यात आले आहे. कोणतेही आगळेवेगळे समाजकार्य सुरू करणे हे जितके अवघड असते तितकेच किंवा त्यापेक्षाही ते पुढे नेणे हे आणखी आव्हानात्मक असते. मनोरुग्णांविषयी समाजात असलेल्या भीतीमुळे, गैरसमजांमुळे सुरुवातीच्या काळात डॉ. वटवानींना कमालीच्या संघर्षाला तोंड द्यावे लागले. या संघर्षाचा एकेक टप्पा त्यापुढच्या प्रकरणांतून येतो.    

मनोरुग्णांप्रती एकूणच आपल्या समाजात असलेल्या असंवेदनशीलतेमुळे हे सामाजिक कार्य पुढे नेताना स्थानिक आंदोलनांपासून ते कोर्ट कचेऱ्यांपर्यंत वेगवेगळ्या अग्निदिव्यांना आत्तापर्यंत वटवानींनी तोंड दिले आहे. आपण करतोय ते काम समाजालाच नको असेल, तर ते सुरू तरी का ठेवावे अशा विचारांनी वेळोवेळी आलेले नैराश्यही त्यांनी मोकळेपणाने मांडले आहे. तर सुरुवातीच्या काळात अशाच एका दीर्घ निराशेच्या गर्तेत अडकले असताना ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटेंशी हेमलकसा येथे झालेल्या भेटीतून त्यांना त्यांच्या आयुष्याच्या प्रयोजनाचा कळलेला अर्थही अतिशय ओघवत्या शैलीत त्यांनी मांडला आहे. बेघर  

मनोरुग्णांच्या यातनांनी आणि त्यांच्या निरपेक्ष-निरागस वृत्तीने हेलावून जात असतानाच मनात येणाऱ्या भावनांना डॉ. वटवानी हे कवितांच्या रूपाने शब्दरूप द्यायला शिकले. अशा त्यांच्या अनेक इंग्रजी कवितांचा चपखल भावानुवाद पुस्तकात मधेमधे पाहायला मिळतो. 

संस्थेने आत्तापर्यंत जवळपास सात हजार मनोरुग्णांवर उपचार करून त्यांची कुटुंबीयांशी पुनर्भेट घडवून आणली असली, तरी या प्रश्नाची व्याप्ती बघता हा आकडा अगदीच थिटा असल्याचे लेखक स्वतः प्रांजळपणे नमूद करतो. एका अंदाजानुसार एकट्या भारतात अजूनही जवळपास चार लाख मनोरुग्ण असेच रस्त्यावरचे जीणे कंठत आहेत. नेपाळ, इराण, बांगलादेशमधून कुटुंबीयांसोबत काही निमित्ताने भारतात आले असताना परागंदा झालेल्या रुग्णांच्या कथा विषद करत आणि उपचाराअंती त्यांना त्यांच्या मायदेशी पाठवण्याचा संपूर्ण प्रवास उलगडत या प्रश्नाचे वेगवेगळे कंगोरे आणि जागतिक व्याप्ती लेखकाने मांडली आहे. या प्रश्नासंदर्भात समाजाने आणि सरकारने काय केले पाहिजे यावरही त्यांनी पुस्तकात नेमकेपणाने भाष्य केले आहे. भूतपूर्व केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री मनेका गांधी यांनी आपल्या प्रस्तावनेत बेघर मनोरुग्णांच्या उपचारांसाठी आणि पुनर्वसनासाठी काम करणारी दुसरी कोणतीही संस्था आपल्या पाहण्यात नसल्याचे सांगत श्रद्धाच्या कामाचे महत्त्व आणि यासारख्या आणखी संस्थांची गरज अधोरेखित केली आहे. प्रकाश आमटे यांचीही प्रस्तावना पुस्तकाला लाभली असून, डॉ. वटवानी यांच्याशी हेमलकशात झालेल्या पहिल्या भेटीपासूनच्या त्यांच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला आहे. 

देशाच्या सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात अजूनही सर्वाधिक दुर्लक्षित असलेल्या मानसिक आरोग्याच्या आणि बेघर मनोरुग्णांच्या प्रश्नावर ‘बेदखल’ नेमकेपणाने भाष्य करते. डॉ. वटवानी यांनी कोणताही अभिनिवेश न आणता या अवाढव्य आव्हानाची सद्यःस्थिती मांडली आहे. ती त्यांनी कधी आकडेवारीतून मांडली आहे, तर कधी त्यांना त्यांच्या जीवनानुभवांतून स्फुरलेल्या कवितांतून. ‘बेदखल’मधल्या डॉ. वटवानी यांच्या कविता वाचताना आणि त्यांच्या आजवरच्या कार्याने निःशब्द होतानाच नकळत म. म. देशपांडे यांच्या तहान या कवितेतील काव्यपंक्ती आठवत राहतात...
सारा अंधारच प्यावा अशी लागावी तहान, 
एका साध्या सत्यासाठी देता यावे पंचप्राण 
व्हावे एवढे लहान सारी मने कळों यावी, 
असा लागावा जिव्हाळा पाषाणाची फुले व्हावी

संबंधित बातम्या