आठवणींचा रंगीबेरंगी कोलाज!

पराग पोतदार
गुरुवार, 7 फेब्रुवारी 2019

पुस्तक परिचय
 

आठवणींच्या प्रदेशात रमायला सगळ्यांनाच आवडते. या आठवणींची रंगत मोठी असते. ते आपलेच आपल्याशी जपलेले संचित असते. ते कधी गप्पांतून उलगडते तर कधी प्रसंगनिमित्ताने. मनाच्या सांदीकोपऱ्यात अशा असंख्य आठवणी आपापली हक्काची जागा घेऊन घर करून बसलेल्या असतात. अशा आठवणींना जेव्हा शब्दरुप मिळते तेव्हा त्याचा एक वेगळा आनंद मिळत असतो. चित्रपटांच्या दुनियेतील एक ज्येष्ठ चित्रकार आणि ‘पब्लिसिटी’च्या क्षेत्रातील कलावंत म्हणून नावलौकिक मिळवलेल्या श्रीकांत धोंगडे यांनी आपल्या अशाच सुंदर आठवणींचा गोफ विणत आयुष्याचा सुरेख पट शब्दांकीत केला आहे. 

 ‘राहून गेलेल्या आठवणी’ हे पुस्तक म्हणजे अशाच सप्तरंगी आठवणींचा कोलाज आहे. यात आयुष्यातील हळवे कोपरे जसे आहेत तसे वळणवाटांवर भेटलेली साधीसुधी, वेडीबागडी आणि कलंदर माणसेही आहेत. कुठे दुखरी सल आहे तर कुठे आनंदाचे कारंजेही! त्यामुळेच या विविधांगी आठवणींमुळे हे पुस्तक निश्‍चितच वाचनीय झाले आहे. कलावंत शब्दांतून व्यक्त झाला तरी त्याची कलात्मकता लपून राहत नाही. त्याची प्रचिती या पुस्तकाच्या पानापानांतून येते. ‘ओघळलेली फुलं वेचल्यावर पारिजातकाच्या झाडावरची ‘राहुल गेलेली फुलं’ वेचण्याचा मोह होतो’ या भूमिकेतून पुस्तकाचे पहिले पान उलटतो तिथपासून हा कलासक्त प्रवास पानापानांत भेटत राहतो. 

 ‘साठवणीतील आठवणी’ हे श्रीकांत धोंगडे यांनी लिहिलेले आठवणींच्या मालिकेतील पहिले पुस्तक. ते लिहिल्यानंतर आठवणीच्या चाळणीतून सुटलेल्या अनेक आठवणी पुन्हा शब्दबद्ध केल्या आणि हे ‘राहून गेलेल्या आठवणी’ साकारल्या. या पुस्तकाला तितकीच ओघवती प्रस्तावना लाभली आहे प्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांची. या आठवणींच्या शिंपल्यांतून एक फेरीवाला पोरगा ते प्रतिथयश   चित्रकार हा सर्व प्रवास पडद्यामागून उलगडत जातो. पुस्तक विविध विभागांमध्ये समोर येते. पहिल्या ’रंग आणि रेषा’ या विभागात अमिताभ, देव आनंद, हेमा मालिनी, धर्मेंद्र, राज कपूर, मधुबाला आदींची सुरेख रेखाचित्रे लक्ष वेधून घेतात. ‘अनुभवलेल्या जीवनकथा’ या विभागामध्ये पहिलीच ‘ती’ ही आठवण काळजाला भिडले. तरुणवयातलं प्रेम आणि त्यानंतरचा वियोग सुरेख शब्दरुप केलेला आहे. केवळ प्रेमापोटी, गाढवावरची वरात, एक शून्य चुकलं, एकानं फेकलं दुसऱ्यानं झेललं... अशा कितीतरी मस्त आठवणी यात आहेत. किस्सेवजा आठवणी झाल्यानंतर पुढच्या विभागात भेटतात, साध्यासुध्या व्यक्तिरेखा. रोजच्या जगण्यातल्या. नरपत भिकारी, चित्रकार गोपाळ, तुंड्या, मेहरांच्या मामी, आक्का बारटक्के या व्यक्तिरेखा आजही आजूबाजूला असाव्यात इतक्‍या रसरशीत आणि जिवंत आहेत. 

 तिसऱ्या विभागात ‘बिनभिंतीची उघडी शाळा’ जीवनात कसे जगायचे हे सांगणारी जी माणसे भेटली त्यांचा वेध घेताना दिसते. ‘आयुष्यात एकदाच भेटलेले महारथी’ या विभागात सुधीर फडके, राजा परांजपे, स्मिता पाटील, ग. दि. माडगूळकर, हेमंत खरे आदींची भेट होत जाते आणि एक सुंदर वाचनानुभव मिळतो.‘पासस्टावी कला’ या विभागात जाहिरातीची कला, जाहिरातींमधील अनेक किस्से, डिझायनिंगमधील अनेक किस्से उलगडत जातात. यातून या लेखकाच्या क्षेत्रातील मातब्बर कामगिरीचा आलेख उलगडत जातो. 

या संपूर्ण आठवणींमध्ये खटकणारी एकच बाब आहे ती म्हणजे, बऱ्याच चांगल्या आठवणी विस्तारभयामुळे नको इतक्‍या आटोपशीर झाल्या आहेत. त्यामुळे अनेकदा त्या आठवणी ज्या ताकदीने पोचायला हव्यात तितक्‍या पोचत नाहीत. बाकी भाषा सहज संवादी, ओघवती असल्याने आणि 
एक महत्त्वाचा काळाचा पट त्यातून उलगडत असल्याने एका वेगळ्या विश्वात घेऊन जाण्यात हे पुस्तक निश्‍चितच यशस्वी ठरते. 

संबंधित बातम्या